Monday, 22 January 2018

अनंत परमात्मा

*अनंत परमात्मा*
_______श्री_______

मनुष्याचे सत्यस्वरूप हे त्यागाने नटलेले आहे. त्याग हे आत्म्याचे स्वरूप. ज्या वेळेस जीव म्हणतो, “ही वस्तू मला नको, मी हिच्याहून मोठा आहे.” त्या वेळेस एका उदात्त सत्याचा तो उच्चार करत असतो. बाहुलीपेक्षा आपण प्रत्येक बाबतीत श्रेष्ठ आहोत असा जेव्हा मुलीला अनुभव येतो, तेव्हा ती तिला कोपर्‍यात फेकते. ज्या अर्थी वस्तू आपल्या ताब्यात असतात,  त्या अर्थी त्यांच्याहून आपण मोठे आहोत हे उघड आहे. आणि अशा क्षुद्र गोष्टींनी आपणास गुलाम करावे ही केवढी खेदाची गोष्ट ! गृहत्याग करताना याज्ञवल्क्य आपली मालमत्ता जेव्हा मैत्रेयीस देऊ लागतो, तेव्हा ती प्रश्न विचारते, “या मर्त्य वस्तू त्या अमर्त्य परब्रह्माची प्राप्ती करून घेण्याच्या कामी उपयोगी पडतील का?” निराळ्या शब्दात हाच प्रश्न पुढीलप्रमाणे विचारता येईल, “माझ्या आत्म्यापेक्षा या वस्तू मोलाच्या आहेत का?” याज्ञवल्क्य मैत्रेयीस म्हणतो, “सांसरिकदृष्ट्या या वस्तू तुला श्रीमंत करतील.” ती म्हणते, “मग यांचा मला काय उपयोग?” आपल्याला खरोखर काय मिळवायचे आहे, आपल्याजवळ जे आहे त्याची वास्तविक किंमत काय?- हे सारे जर मनुष्य नीट समजून घेईल, तर तो मोहात पडणार नाही. या वस्तू संभाराहून अति थोर, परमोच्च असे माझे स्वरूप आहे, ही गोष्ट त्याला कळून येईल. क्षुद्र बंधनातून मग तो मुक्त होईल. मनुष्य मोहमय संपत्तीच्या पलीकडे जेव्हा जाईल तेव्हाच त्याला स्वतःच्या स्वरूपाची खरी किंमत कळेल. अनन्त जीवनाकडे जाण्याचा मार्ग अनन्त त्यागाच्या पायर्‍यांनी बांधलेला आहे.

अनन्त परमात्मा संपूर्णतेने मिळवणे अशक्य आहे, असे बुध्दीने निर्धारण्याचा हा प्रश्न नाही. ही अनुभव घेण्याची गोष्ट आहे. हा अनुभव आनन्दरूप आहे. आकाशात उडणारा पक्षी पंखाच्या प्रत्येक फडफडण्याबरोबर आकाशाच्या अनन्ततेची जाणीव मिळवत असतो. हे पंख आकाशाच्या अतीत आपणास नेणार नाहीत हे तो पूर्णपणे समजतो. परन्तु असे समजण्यातच आनन्द आहे. त्याच्या पिंजर्‍यातील आकाश मर्यादित आहे. त्याच्या जीवनास तेवढे पुरेसेही असेल. गरजेहून ते अधिक नाही. परन्तु गरजेपुरत्या जीवनात पक्ष्याला आनन्द नाही. आपणास जरूर आहे त्यापेक्षा अनन्त पटीने मिळाले आहे ही कल्पना कळेल तेव्हाच पक्ष्याला आनन्द होईल.


याप्रमाणे अनन्त परमात्म्याकडे आत्मा उड्डाण करत जाऊ दे. जे आपणास मिळवायचे आहे ते मिळवायला आपणास पुरेशी शक्ती नाही, हे पदोपदी अनुभवास येऊन आनंद होऊ दे. हे समजण्यातच मोक्ष आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖♦
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...