Monday, 24 September 2018

मुमुक्षु म्हणजे काय?

*मुमुक्षु म्हणजे काय..?*
----------------------------------

*|| तस्मात्सैव ग्राह्या मुमुक्षुभिः ||*
                     नारदभक्तीसुत्रे

भक्ती स्वयंफलरूप आहे, म्हणून मुमुक्षुनेदेखील ' *सा एव'* म्हणजे तीच भक्तीच स्वीकारावी. आता मुमुक्षू कोणास म्हणावे याचा विचार करणे आवश्यक आहे. संसारात जे मानवदेहधारी जीव आहेत यांचे बद्ध, मुमुक्षू व मुक्त असे तीन प्रमुख भेद शास्त्रकारांनी कल्पिले आहेत. बद्धालाच विषयी असेही म्हणतात किंवा बद्धात पामर व विषयी असे दोन वर्ग मानले जातात. ऐहिक विषयभोगाचा धर्माधर्म, योग्य-अयोग्य न पाहता स्वैररूपाने अंगीकार करणारा रागद्वेषलोभादिकांनी युक्त अशा मनुष्यास पामर म्हटले जाते. ऐहिक भोगासक्त ते पामर व स्वर्गलोकातील म्हणजे पारत्रिक धर्म्य अशा पुण्यविशेषाने प्राप्त झालेल्या भोगात आसक्त पुरुषांना विषयी म्हटले आहे. पामर हा धर्माधर्म पाहत नाही, व विषयी धर्मानेच प्राप्त झालेल्या विषयाचे सेवन करीत असतो, त्यामुळे तोही बद्धच असतो. विषयासक्तीने रागद्वेषादिकांनी देहतादात्म्यानी, कर्म व कर्मफलासक्तीने व तन्मूलक अहंकार अज्ञानादि अनेक बंधनांनी तो बांधला गेलेला असतो, त्या बंधनातून सहजरीत्या तो बाहेर पडू शकत नाही. यालाच *संसारबंधन* म्हणतात. या बद्धासच शास्त्रीय भाषेत 'बुभुक्षू, भोगासक्त असेही म्हटले जाते. या बुभुक्षूत दोन प्रकार संभवतात. मुमुक्षूत्व योग्य व अयोग्य एखादा भोगासक्त असला तरी पूर्वसुकृताने सत्संगतीत केलेल्या सच्छास्त्र श्रवणाने या भोगातील दोष अनुभवास आल्यामुळे त्यातील असारता जर कळू लागली तर यातून सुटावे असे वाटू लागल्यास त्यास मुमुक्षुत्वयोग्य म्हणावे, व असा विचारही ज्याच्या मनात कधी येत नाही, कोणी योग्य मार्गदर्शन केले तरी अश्रद्धा, दुराग्रह, कुतर्क, विपर्ययादी दोषांनी सन्मार्गाकडे न प्रवृत्त होणार्‍यांना मुमुक्षुत्व अयोग्य म्हटले जाते. ज्याचे पूर्वसंस्कार चांगले आहेत असे सदबुद्धिवान जप ज्यांना इहपरभोगातील दोषाची पूर्ण कल्पना आली आहे, या देहात, संसारात राहणे म्हणजे एकप्रकारचे बंधन आहे, कारण मुक्तपणाने आनंदाचा भोग येथे नाही, अनेक बंधने अंतर्बाह्य रूपाने आपणांस पीडा देतात त्यामुळे जो दुःखी होतो व त्याचे परिमार्जन करण्याचा जो सतत प्रयत्न करतो त्यासच *मुमुक्षू* असे म्हटले जाते. 
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...