Wednesday, 24 January 2018

ज्ञानेश्वरी जयंती विशेष

*🔺 ज्ञानेश्वरी जयंती विशेष 🔺*
------------------------------------------
ज्ञानेश्वरीतील विज्ञानाचा आपण सहज मागोवा घेऊन पाहावा तर थक्कच होतो. 700 वर्षांपूर्वी माउलींनी ज्ञानेश्वरीतून मांडलंय ते आजही आपण विज्ञानातून अनुभवतोय. नवीन शोध म्हणून त्याकडे बघतो आणि सहज मान्य करतो की, ही ज्ञानेश्वरी किती विज्ञानस्पर्शी आहे. ज्ञान आणि विज्ञान यांचा समन्वय ज्ञानेश्वरीत आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानमयो विज्ञानमयोसी आहे.
‘अमृताने पैजा जिंकीन’ असा सार्थ अभिमान ज्या मराठी भाषेबद्दल ज्ञानदेवांच्या मनात होता, त्या मराठी भाषेतील ‘न भूतो, न भविष्यति’ अशा अप्रतिम, अद्वितीय ग्रंथाची निर्मिती ज्ञानदेवांच्या हातून झाली. तीच ज्ञानेश्वरी. खरे तर भगवद्गीता या मूळ संस्कृत ग्रंथावर केलेले ते भाष्य आहे. पण, गीतेतील 700 श्लोकांवर भाष्य करताना ज्ञानेश्वरांच्या अमृतवाणीतून 9033 ओव्या बाहेर पडल्या. ज्ञानदेवांच्या अभिजात कवित्वाची ही साक्षच!
*वाचे बरवे कवित्त्व । कवित्त्वी बरवे रसिकत्त्व*
*रसिकत्त्वी परतत्त्व । स्पशरु जैसा*
या ओवीत म्हटल्याप्रमाणे ज्ञानेश्वरी हा परतत्त्व स्पर्श करणारा म्हणजेच जीवनाचे रहस्य उलगडून दाखविणारा ग्रंथ आहे, म्हणूनच हा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ असला तरी त्याला प्रेमाची माधुरी आहे. वारकरी संप्रदायाचे अध्वयरू शं. वा. तथा सोनोपंत दांडेकर तर म्हणतात, ‘ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय कोणी मरूच नये’ वाचणार्‍या प्रत्येकाला प्रत्येक वेळी ज्ञानेश्वरीतील कितीतरी पैलू नव्यानेच खुणावतात. तत्त्वज्ञान आणि वाड्मय माधुर्यासोबतच त्यातील भक्तीमयता, आध्यात्मिकता, वैचारिकता, ज्ञान आणि किती काही.. जे शब्दात पकडता येणार नाही. पण, अनुभवता मात्र येईल. ज्ञानेश्वरीतील विज्ञानाचा आपण सहज मागोवा घेऊन पाहावा - तर थक्कच होतो. 700 वर्षांपूर्वी माउलींनी ज्ञानेश्वरीतून मांडलंय ते आजही आपण विज्ञानातून अनुभवतोय. नवीन शोध म्हणून त्याकडे बघतो आणि सहज मान्य करतो की, ही ज्ञानेश्वरी किती विज्ञानस्पर्शी आहे.
ज्ञानदेवांनी ज्ञान आणि विज्ञानाची व्याख्या किती सहजतेने केली आहे.. जे निश्चित स्वरूपाचे असते आणि जेथे तर्क करायला वाव नसतो ते ज्ञान होय. ज्ञानाच्या साहाय्याने जे जाणले जाते ते विज्ञान होय.
*विज्ञान योग’ हा ज्ञानेश्वरीचा सातवा अध्याय.*त्यात माउलींनी सांगितलंय,
*तैसी जाणीव जेथ न रिघे ।*
*विचार मागुता पाऊली निघे ।*
*तकरु आयणी नेघे । आंगी जयाचा ।*
*अर्जुना तया नाव ज्ञान । येर प्रपंचु हे विज्ञान*
*तेथ सत्यबुद्धि ते अज्ञान । हें ही जाण ।*
जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही, जेथून विचार मागे फिरतो आणि त्यासंबंधी तर्कचातुर्य चालत नाही- ते ज्ञान. ज्ञान म्हणजे निसर्गाचे न बदलणारे तत्त्व. परंतु, त्याचसोबत निसर्गात घडणार्‍या घटनांबाबत संशोधन करता येते, प्रयोग करता येतात, अनुमानाने व अंदाजाने तर्क करता येतात, निष्कर्ष मिळतात. त्या क्षेत्रात बुद्धीचा प्रवेश शक्य झाल्याने जे हाती लागते ते विज्ञान होय. हे सांगतानाच ज्ञानदेवांचा दृष्टिकोन किती व्यापक आहे याची जाणीव होते.
द्वापारयुगात श्रीकृष्णांनी सांगितलेल्या गीतेवर ज्ञानदेवांनी तेराव्या शतकात भाष्य केले. खरे तर युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण व अर्जुनाचा ‘विज्ञान’ विषयावर संवाद होणे हेच विशेष आहे. अशा प्रसंगी विज्ञानाचे काय करायचे आहे? असा प्रश्न सहज मनात येतो. त्यावर ज्ञानदेव म्हणतात,
*एथ विज्ञाने काय करावे । ऐसे घेसी जरी मनोभावे*
*तरी पै आधी जाणावे । तेचि लागे ।*
येथे विज्ञानाशी काय करायचे आहे? ही समजूत दूर करून आधी विज्ञानच समजून घेणे आवश्यक आहे आणि आज तर एकविसाव्या शतकात ‘रात्रंदिन आम्हा, युद्धाचा प्रसंग’ आहे म्हणूनच आपणा सर्वांना विज्ञानाचे आणि अर्थातच या ओवीचे महत्त्व नक्कीच पटले आहे.
ज्ञानेश्वरी वाचताना अनेक असे प्रसंग येतात की, आपण थक्क होतो. ऊर्जा अक्षय्यतेचा नियम आधुनिक विज्ञानातील Energy can neither be created nor be destroyed; only one form of energy gets converted into another form of energy. Total energy of the universe always remains constant. पण कितीतरी पूर्वीच ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीत म्हटलंय.
*उपजे ते नाशे । नाशले पुनरपि दिसे ।*
*हे घटिका यंत्र तैसे । परिभ्रमे गा ।*
जे निर्माण होते ते नाश पावते आणि जे नाश पावते ते पुन्हा दिसते. असे वारंवार घटिका यंत्रासारखे परिभ्रमण करीत राहाते. खर्‍या अर्थाने विश्वातील ऊर्जा नाशरहित आहे. विश्वाच्या ठिकाणी नित्यता बुद्धी आहे. ज्ञान हे नित्य आहे आणि तेच विज्ञानाच्या जन्मास कारण आहे. हेच तत्त्व आजही ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीतून सिद्ध होताना जाणवते. 700 वर्षांपूर्वी जिवंत समाधीस्थ झालेल्या माउलींच्या आळंदीतील समाधीशिळेवर मस्तक टेकवताना आजही ओम्काराची स्पंदने जाणवतात; हा सत्य अनुभव वारकरी बंधु-भगिनींचा. आणि शास्त्रज्ञांनी आव्हान म्हणून तेथे कंपण मापकयंत्र नेले तर खरोखरच त्या ठिकाणी जाणवणारी कंपणांची गती इतरत्रच्या भूमीपेक्षा अधिक. हा अनुभव विज्ञानाचा.
न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला ही घटना सतराव्या शतकातली, पण, ज्ञानदेवांनी तेराव्या शतकात लिहिलंय..
*का चंद्राचे नि पूर्णपणे । सिंधु भरती ।*
पूर्ण चंद्राच्या उदयाने समुद्राला भरती येते, अर्थातच त्यामागे गुरुत्वाकर्षण आहे. आश्चर्य वाटते ते असे की, वयाच्या केवळ सोळाव्या वर्षीही ज्ञानेश्वरी लिहिण्याएवढे सारे ज्ञान कसे झाले असेल ज्ञानदेवांना?
भौतिकशास्त्रानुसार अखिल विश्व ज्या चार बलांच्या आधारे अस्तित्वात आहे, त्याविषयी ज्ञानेश्वरीत विस्तृत वर्णने आहेत. 1. गुरुत्त्वीय बल 2. विद्युत चुंबकीय बल 3. क्षीण / मंद बल 4.तीव्र बल केवळ एवढेच नाही तर सुयोग्य उदाहरणांनी त्यांचे अस्तित्व सिद्ध केले आहे.
आयुर्वेद, शरीरविज्ञान शास्त्रच नव्हे तर नेत्रचिकित्सेसारखी विज्ञानशाखाही ज्ञानेश्वरीतून डोकावते. ज्ञानदेव म्हणतात..
*हे असो डोळ्यांचे । डोळांचि पडदे रचे ।*
*तेणे देखणेपण डोळ्यांचे । न गिळिजे कायि ।*
डोळ्यांचे पाणी डोळ्यात गोठून त्याचा पडदा डोळ्यांवर येतो व तो पडदा डोळ्यांची दृष्टी नाहीशी करतो. आधुनिक नेत्र चिकित्सेनुसार यालाच आपण ‘मोतीबिंदू’ म्हणतो.
ज्ञानदेवांचे केवढे हे ज्ञान. आणि त्यातून परावर्तीत होणारे विज्ञान. उत्तराचा वेध घ्यावा ज्ञानदेवांच्याच अभंगातून; तर कळते
*स्थिरावले मन, ज्ञानाचिये वृत्ती।*
*विज्ञान संपत्ती, साधली या।*
ज्ञान मिळविण्याच्या वृत्तीने जर मन स्थिर म्हणजेच एकाग्र केले तर विज्ञानाची संपत्ती साधता येते, हे तर मानसशास्त्र. मानसशास्त्र ही आधुनिक विज्ञानाची शाखा-मनाचे शास्त्र. तेदेखील ज्ञानेश्वरीतून स्पर्शिले आहे. एका ओवीत ज्ञानदेव म्हणतात, स्फटिकाच्या तावदानात ठेवलेले दिवे मंद मंद हलताना जसे बाहेरून सुंदर दिसतात तशा अंत:करणातील चांगल्या मनोवृत्ती कृतीतून प्रकट होताना दिसतात, म्हणूनच आपल्या मनोवृत्ती चांगल्या असणे गरजेचे आहे; मग कृती आपसूकच चांगल्या घडतात.
==================================
श्रीधर कुलकर्णी :९६६५६३२९५३

*📝 ज्ञानामृत मंच*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...