Friday, 28 September 2018

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
---------------------------------
    श्राध्दमाहात्म्य :-६..

        *ब्रह्मदत्ताचा वृतांत*

मार्कंडेय सांगतात - मागें वैभ्राज राजा त्या सात हंसांपैकीं एकाचे उदरी यावें म्हणजे आपणास अनायांसे योगसिद्धि होईल, अशा संकल्पानें तप करून देह ठेविता झाला म्हणून सांगितलें. त्या संकल्पानुरूप तो तपस्वी व योगनिष्ठ वैभ्राज विष्वक्सेन या नांवानें जन्मास आला. पुढें एके दिवशीं ब्रह्मदत्त हा आपली भार्या सन्नति हिला बरोबर घेऊन मोठया आनंदाने इंद्राणीसहित रमणार्‍या इंद्राप्रमाणें वनांत विहार करीत होता, आणि विहार करीत असतां एक मुंगळा कामवश होऊन आपल्या प्रियेची कामदानाविषयीं काकुळती येऊन याचना करीत होता, तें त्यांने ऐकिलें, व तो मुंगळा प्रार्थना करीत असतां ती इवलिशी मुंगी त्याच्या चारगटपणानें त्याचेवर संतापली आहे, असें त्यानें पाहिले. त्याला त्यांची भाषा समजत होतीच; त्यामुळें तो प्रकार ध्यानी येतांच ब्रह्मदत्त एकाएकीं खदखदा हसला. जवळ त्यांची स्त्री सन्नति होती, तिला पति कां हसला, याचे कारण बरोबर न कळल्यामुळे हा आपणासच हसला असा संशय येऊन ती लाजल्यासारखी झाली व तिचा नूर अगदीं उतरून गेला. त्या सुंदरीच्या हृदयाला ती गोष्ट इतकी लागली कीं, तिने बहुत दिवस अन्नपाणी सोडले. नवरा जेव्हा तिची विनवणी करून, "प्रसन्न हो, रुसलीस कां ?" म्हणून म्हणूं लागला, तेव्हां ती मनोहर हास्य करून म्हणाली, "तुम्हीच माझा उपहास करून मला कारण विचारितां ? मला मुळींच आतां अशा जगण्याचा कंटाळा आला आहे." तें ऐकून त्यानें हसण्याचे खरें कारण काय होतें तें तिला सांगितलें, पण तिचा विश्वास बसेना. ती घुश्श्यांतच त्याला म्हणाली कीं, तुम्ही म्हणतां पण ही गोष्ट माणसांचे अंगीं वसत नाहीं. हे राजा, एक तर देवाची कृपा किंवा पूर्वजन्मींचे तपोबल, किंवा योगबल यांच्या साहाय्याशिवाय मुंग्यांची भाषा समजेल असा कोण मनुष्य आहे बरें ? तें कशाला, आपणच सर्व प्राण्यांची भाषा जाणता ना ? तर जेणेकरून ही गोष्ट माझे समजुतीत येईल त्या प्रकारे माझी समजूत करा, नाही तर मी प्राणत्याग करीन. हें माझें बोलणे थट्टेचे नव्हे; खरेखुरे आहे. 

राणीच हे कठोर भाषण ऐकून राजा मोठया विचारांत पडला, व संकटनिवारणार्थ आहार वर्ज करून सर्व भूतपति व शरणागतांचा पालक जो परमात्मा नारायण त्याला अनन्यभावानें व एकाग्रचित्ताने शरण गेला. त्यावेळीं सहाव्या रात्रीं भूतमात्राविषयी दयार्द्र असणारा भगवान् नारायण प्रभु त्याला प्रत्यक्ष दर्शन देऊन म्हणाला, "उदईक तूं सुखी होशील" असें म्हणून देव तेथेंच दिसेनासा झाला. 

इकडे मागें त्या चार ब्राह्मणांचा जो दरिद्री पिता सांगितला तो आपल्या मुलांपासून ते श्लोक शिकून घेऊन आपण कृतकृत्य झालों असें मानूं लागला. तथापि, त्याला ते श्लोक मंत्र्यांसह राजाला गाठून त्याचे कानी घालण्याला अवसर सापडेना, म्हणून तो विवंचनेत होता. इतक्यांत राजा ब्रह्मदत्तच नारायणाचा वर प्राप्त झाल्यामुळें हर्षित होऊन सरोवरांत स्नान करून मोठया आनंदाने आपल्या कांचनमय रथांत बसून नगराकडे चालला. त्या वेळीं त्याचा स्नेही द्विजश्रेष्ठ कण्डरीक यानें रथाच्या पागा धरिल्या होत्या; व दुसरा स्नेही पांचाल हा चवरी व व्यजन ढाळीत होता. आपले श्लोक कानी घालण्याला हीच संधी योग्य आहे असें मनांत आणून त्या ब्राह्मणानें तो राजा व त्याचे ते दोघे सचिव यांचे कानी ते दोन्ही श्लोक घातले. ते श्लोक असे - 

*"सप्तव्याधादशार्णेषु मृगाः कालिंजरे गिरौ ॥ *
*चक्रवाका शरद्वीपे हंसा: सरसि मानसे ॥ १ ॥ *
*तेभिजाता कुरुक्षेत्रे ब्राह्मणा: वेदपारगाः ॥ *
*प्रस्थिता दीर्घमध्वानं यूयं किमवसीदथ ॥ २ ॥" *

याचा अर्थ दशार्ण देशांत सातजण व्याध होते. पुढें कालिंजर गिरीवर ते मृग झाले. नंतर शरद्वीपांत चक्रवाक झाले व मानससरोवरांत हंस झाले. अखेरीस त्यांपैकी आम्हीं चौघे कुरुक्षेत्रांत वेदपारंगत असे ब्राह्मण होऊन मोक्षमार्गाला गेलों आणि मग तुम्हींच तेवढे कां फसून पडलां ? 
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...