Thursday, 25 January 2018

सत्संगती का करावी ?

सत्संगती का करावी ? 
______☀_______

मन सत्संगात गेले नाही, तर दुसरीकडे म्हणजे पर्यायाने कुसंगतीत जाईल.  कारण मन रिकामे राहू शकत नाही.  त्याला कुठलातरी संग जोडलाच पाहिजे.  त्यामुळे कुसंगतीत मन विषयाभिमुख होऊन त्या जीवाचा अधःपात होईल.  कुसंग जीवनाचा महानाश करणारा आहे.   *‘ सङ्गात् संजायते कामः |* ’ व नंतर *‘ बुद्धिनाशात् प्रणश्यति | ’* असा शेवट ठरलेलाच आहे.

हे स्पष्टपणे लक्षात घेऊन विवेकी साधकाने विषयात मन न नेता सत्संगात न्यावे.  स्वभावतःच शरीर, इंद्रिये व मन विषयाभिमुख असल्याने, मुद्दाम विषयांच्या संगात मन न्यावेच लागत नाही. संस्कार व विषयप्राबल्यामुळे मन स्वभावतःच विषयांकडे जाते.  मग डोळे उघडे असोत वा बंद असोत !

*परंतु साधुसंगति मात्र प्रयत्नपूर्वक मिळवावी लागते.  ती कष्टसाध्य आहे.  आपणहून मन त्या संगतीत जात नाही व रमतही नाही.*  उलट साधुसंगति अज्ञानी, अविवेकी, मूढ मनुष्याला त्रासदायक वाटते, नको वाटते.  त्यांना विषयांची सवय झाल्याने, त्यांची इतकी जबरदस्त चटक मनाला लागते, की सत्संगाचा त्यांना तिटकारा वाटतो.  त्यांचे मन विषयातच रुळते व रमते.

म्हणून विषयातून बाहेर येण्याची कल्पनाच त्यांना असह्य होते. या महाभयंकर कल्पनेतून बाहेर यायलाच ते घाबरतात. जीवनात या विषयांमुळे सतत दुःख व यातनांचे मरणप्राय फटके बसूनही सत्संगाची किंमत त्यांना कळत नाही.  म्हणून साधुसंत कळवळून विनंती करतात –

*कर जोडोनि विनवितो तुम्हा | नका करु संसारश्रमा |*
*नका गुंतु विषयकामा | तुम्ही आठवा मधुसूदना |*

विषयांच्या कर्दमात लोळू नका.  पण व्यर्थ !  हे कोणालाही पटत नाही.  त्यामुळे अनेक शतके जन्म गेल्यावरच सत्संगाची किंमत, त्याचा महिमा कळतो.  म्हणून  *सङ्गः सत्सु विधीयताम् |* हे विधिवाक्य आहे.  शरीराने नव्हे, तर पूर्ण जाणीवपूर्वक अभ्यासपूर्वक मनानेच मनाला निवृत्त केले पाहिजे व मन सत्संगात नेले पाहिजे.
〰〰〰〰〰〰〰⚜
*सं -* श्रीधर कुलकर्णी
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...