Wednesday, 24 January 2018

मिथ्या मृत्युशोक

*------ मिथ्या मृत्युशोक------*
___________🌱___________
*अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे |*
*गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः || ११ ||*

(भगवद्गीता २-११)
पारमार्थिक दृष्टीने जर पहिले तर प्रत्येक जीव नित्य, शाश्वत, चिरंतन, जन्ममृत्युरहित परब्रह्मस्वरूप आहेत.  ते कधी आलेले नाहीत व कधी जाणारही नाहीत.  मग ज्यांना जन्ममृत्यु नाही त्यांच्याबद्दल तू कसा शोक करणार ?  कारण त्या तत्त्वाला तू कधीही मारू शकत नाहीस.
ज्याप्रमाणे सोन्यामधून अनेक प्रकारचे अलंकार निर्माण झाले असले तरी सोनाराची दृष्टि सोन्याची असते.  त्या तत्त्वाच्या दृष्टीमध्ये सर्व भेद नाहीसे होतात.  सोनार सर्व अलंकार एकत्वाच्या दृष्टीने पाहतो.  त्याप्रमाणे पारमार्थिक दृष्टीमध्ये जिवांमधील भेद नसून एकच अखंड तत्त्व आहे.  अशा प्रकारे कोणत्याही दृष्टीने त्यांच्याविषयी शोक करणे योग्य नाही.
तसेच मृत्यू आपल्या शोकाचे कारण होत नाही.  मृत्यु जर कारण होत असेल तर कोणत्याही अज्ञात अनोळखी व्यक्तीचा मृत्यूदेखील शोकाचे कारण झाला पाहिजे.  पण तसे दिसत नाही.  तेथे आपण मृत्यु ही एक सत्य घटना म्हणून पाहतो.  त्याठिकाणी स्वतःच्या भावना येत नाहीत.  तर उलट जो जो जन्माला आला तो मृत्यु पावणारच अशी भावना असते.

परंतु तोच मृत्यु ज्यावेळी अत्यंत प्रिय व्यक्तीचा नाश करतो तेव्हा मृत्यूची घटना तीच आहे.  तर मग विशिष्ट व्यक्तीच्या मृत्यूने आपण शोकाकुल का होतो ?  त्याला मृत्यु हे कारण नाही तर त्या व्यक्तीमध्ये असलेला ममत्वभाव हे कारण आहे.  ती प्रिय व्यक्ति नाश पावू नये असे वाटत असते तरी सुद्धा त्या कल्पनेला धक्का बसतो आणि दुःख होते.  थोडक्यात अनेक शरीरामध्ये निरनिराळी नाती निर्माण करून ममत्व-भाव निर्माण करतो.  ममत्वाच्या मागे अहंकार असतो.  हा अहंकार – ममकार अज्ञानकल्पित असून शोकाला कारण होतो.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्दसरस्वती लिखित पुस्तकामधून
===========≠===========®
*श्रीधर कुलकर्णी*: ९६६५६३२९५३
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...