Sunday, 21 January 2018

उपनयन म्हणजे काय

*🔹उपनयन म्हणजे काय?🔹*

गायत्रीमंत्राचा उपदेश, *'देवसवितरेष ते ब्रह्मचारी'* आणि मंगलाष्टकानंतर बटूचे आचार्य जे मुखनिरीक्षण करतो, यापैकी प्रत्येकाला उपनयन समजणारे तीन पक्ष होतात. वेदाध्ययनाला सुरवात या दृष्टीने गायत्रीमंत्राच्या उपदेशाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात येते. आपल्या हिंदू धर्माचा, या विश्वाचा मूळ जो प्रजापति त्याला बटु(कुमार) अर्पण करणे हा ऐतिहासिक व अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणून त्याचे सोळा संस्कारात परंपरा या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. यज्ञोपवीत जानवे वगैरे प्रजापतीचे रूप घेण्याची साधने आहेत. उपनयन म्हणजे आपला मूळ जो प्रजापति, आत्म्याने त्याच्या जवळ जाणे, त्याची वस्त्रे, त्याची विद्या आपण मिळविण्याचा प्रयत्न करणे, केवळ या प्रमाणावरून पाहता ज्यांना वेदाधिकार पाहिजे असेल त्यांनी हा संस्कार करावयाचा आणि वैदिक व्हावयाचे असा मूळ उद्देश उपनयन संस्कारात दिसतो. सर्व सोळा संस्कारात उपनयनसंस्कार सर्वात श्रेष्ठ होय. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो. तसेच त्याला वैदिक धर्मात सांगितलेली कर्मे करण्याचाही अधिकार प्राप्त होतो.

*🔺  उपनयन महत्त्व* 🔺

शास्त्रतः हा संस्कार त्रैवर्णिकांना करण्याचा अधिकार आहे. परंतु सध्या हा संस्कार विशेषतः ब्राह्मणात, फार थोड्या क्षत्रियात आणि वैश्यात करण्यात येतो. याला दुसरा जन्म मानण्याची चाल आहे. पहिला जन्म आई-बापांपासून आणि दुसरा जन्म गायत्री मंत्रापासून आणि आचार्य यांच्यामुळे प्राप्त होतो, असे या संस्काराचे महत्त्व वेदांत वर्णिलेले आहे.

उपनयन म्हणजे गुरुंच्या जवळ जाणे. गुरुच्या जवळ राहून , ब्रह्मचारी म्हणून चांगल्याप्रकारे ,एकाग्रचित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक होते. त्या नियमांनी स्वत:ला बांधून घेणे म्हणजेच व्रतबंध. ही व्रते नियमाने पाळण्यासाठी निश्चयशक्तीची जोडही त्याला द्यावी लागते. सारांश, ब्रह्मचारी म्हणून स्वत:च्या शरीराला , मनाला आणि बुद्धीला जाणीवपूर्वक वळण लावावे लागते. ज्याप्रमाणे कंदिलाच्या बाहेरची काच जर खराब असेल तर दिव्याच्या वातीचे तेज बाहेर नीट पडत नाही ; त्यासाठी कंदिलाची काच स्वच्छ असावी लागते त्याप्रमाणे योगाची जी आठ अंगे आहेत त्यांचे अनुष्ठान केल्याने चित्तातील अशुद्धीचा क्षय होत जातो आणि ज्ञानशक्ती प्रदीप्त होते आणि प्रज्ञेचा विकास होतो.  भारतीय संस्कृतीत प्रत्येक आश्रमानुसार ब्रह्मचर्याचे स्वरूप वेगवेगळे सांगितले आहे. पण प्रत्येक टप्प्यावर ब्रह्मचर्याचा अभ्यास करीत असताना आपली संयमशक्ती वाढविण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. यासाठीही योगाभ्यासाचा उपयोग होऊ शकतो.

श्रीधर कुलकर्णी
*📝 ज्ञानामृत मंच*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...