Thursday, 1 February 2018

मंगलचंडी देवी

*🔅 मंगलचंडीदेवी 🔅*
=================

श्रीनारायणमुनी म्हणाले, "आता मी तुला मंगलचंडीचे उपाख्यान सांगतो. कल्याणकारी, मंगल क्रियादक्ष अशी ही मंगलचंडिका आहे. ही सर्वमान्य महीसुत मंगल यासही इष्ट आहे. म्हणून तिला मंगलचंडिका म्हणतात. मनूच्या वंशात हा मंगल ग्रह उत्पन्न झाला. तो सप्तद्वीपाचा राजा आहे. त्याला पूज्य अशी ही देवी आहे. 

प्रत्यक्ष मूलप्रकृतीची अंशरूप अशी ही दुर्गाच आहे. ती कृपाळु, अगोचर, स्त्रीयांची इष्ट देवता आहे. विष्णूकडून शंकराला त्रिपूरवधाची प्रेरणा झाल्यावर त्याने मंगलचंडिकेचे पूजन केले. शंकर संकटात सापडल्यावर ब्रह्मदेवाने त्याला उपदेश केला व तिचे पूजन केले. 

त्रिपुराने शंकराचे यान पाडले. तेव्हा ते अंतरिक्षातच लोंबत राहिले. तेव्हा शंकराला दुर्गेची स्तुती करण्याचा आदेश दिला. शंकराच्या स्तुतीमुळे दुर्गा प्रसन्न झाली. ती निराळ्याच स्वरूपात प्रकट झाली. ती म्हणाली, "हे प्रभो, भिऊ नकोस. भगवान विष्णु वृषभरूपाने तुझे वाहन होईल व मीच शक्तीरूप होईन. तुला संकटमुक्त करीन. माझ्या प्रसादाने व हरीच्या सहाय्याने देवांचा शत्रू त्रिपूर याचा तू वध करशील." 

असे म्हणून ती देवी शंकराची शक्ती झाली. नंतर त्या उमापतीने विष्णूस अर्पण केलेल्या खड्‌गाने त्रिपुराचा वध केला. तेव्हा सर्व देवांनी शंकराची स्तुती केली. नंतर शंकराने स्नानादि क्रिया करून मंगलचंडी देवीला पाद्य, अर्घ्य, आचमन, विविध वस्त्रे, पुष्पे, चंदन, नैवेद्य, बकरे, रेडे, मेंढे, गवय, पक्षी, अलंकार, पुष्पमाला, पायस, मिष्टान्न इत्यादी सर्व प्रकारे तिला अर्पण करून तिची पूजा केली. 

*"ॐ र्‍हीं श्रीं क्लीं हे पूज्य देवी, हे मंगलचंडिके, हुं फटस्वाहा"*
 हा एकवीस अक्षरी मंत्र जपावा. त्याचा दहा लक्ष जप केल्यास सर्व कामना पूर्ण होतात. 

"ही देवी सोळा वर्षांची चिरतरुणी आहे. ती अत्यंत सौंदर्यपूर्ण आहे. तिची कांती शुभ्र चाफ्यासारखी आहे. नीलकमलाप्रमाणे नेत्र आहेत. ती जगताची धात्री असून संपत्ती देणारी आहे. ती समुद्रात ज्योतीरूप आहे. मी तिचे नित्य पूजन करतो." असे तिचे ध्यान करावे. 

महादेव म्हणाले, "हे मंगले, तू मंगल आहेस. तू सर्व मंगलांमध्ये मंगल आहेस. तू मंगलाचे आगरच आहेस. सर्वांना मंगल देणारी तू मंगलवारी पूज्य आहेस. मनूच्या वंशातील पूज्य मंगलाची तू प्रिय देवता आहेस. तूच मांगल्याची अधिष्ठात्री असून संसाराचे स्थान आहेस. तू सर्वांचे सार असून मोक्षरूप आहेस. तू सुखदायी असून

प्रत्येक मंगलवारी पूजनीय आहेस." 

अशारीतीने मंगलचंडिकेचे स्तवन केल्यावर महादेव स्वस्थानी गेले. शिवानंतर मंगल नावाच्या ग्रहाने तिचे पूजन केले. नंतर मंगल नावाच्या राजाने पूजा केली. सुंदर स्त्रियांनी मंगलवारी तिचे पूजन केले. कल्याणेच्छू पुरुषांनी तिचे पूजन केले. अशा तर्‍हेने प्रत्येक विश्वात तिचे यथोचित पूजन झाले. त्या वेळेपासून ती सर्वांना पूज्य झाली. देव, मनु, मानव, मुनी वगैरेंनी तिचे पूजन केले. तिचे स्तोत्र श्रवण करणार्‍यास पुण्य लाभते. 

याप्रमाणे देवीचे आख्यान मी तुला निवेदन केले. आता मनसेचे आख्यान ऐक. 

ती कश्यपाची मानसकन्या असून ती मनानेच ईश्वराशी खेळते, म्हणून तिचे नाव मनसा असे पडले आहे. ती मनाने परमात्म्याचे ध्यान करते. ती विष्णूभक्त असून महासिद्ध योगिनी आहे. तिने तीन युगे श्रीकृष्णाचे तप केले. तिचे क्षीण झालेले शरीर अवलोकन करून त्या गोपीपतीने तिचे नाव जरत्कारू ठेवले आणि तिची इच्छा पूर्ण केली. नंतर स्वतः पूजा करून इतरांकडून तिची पूजा करविली. 

स्वर्ग, नाग, लोक, पृथ्वी, ब्रह्मलोक व सर्व जगात ती गौरी, जगद्‌गौरी या नावाने विख्यात आहे. ती शंकराची शिष्या असल्याने तिला शैवी असे म्हणतात. ती विष्णूभक्त असल्याने तिला *वैष्णवीही* म्हणतात. तिनेच परीक्षितीच्या यज्ञाचे वेळी नागांना जीवन प्राप्त करून दिले. त्यामुळे तिला *नागेश्वरी* व *नागभगिनी* असे म्हणतात. ती विषाचा नाश करणारी असल्याने तिला विषहारी म्हटले आहे. शंकरापासून सिद्ध योगाची तिला प्राप्ती झाली, म्हणून तिला *सिद्धयोगिनी* म्हणतात.* योग, ज्ञान, मृतसंजीवनी विद्या तिला लाभल्यामुळे तिला महाज्ञानयुता म्हणतात. तिला अस्तिकमाता म्हणूनही संबोधतात. ती जरत्कारूची भार्या असल्याने तिला जरत्कारूप्रिया असे म्हणतात. 

जरत्कारू, जगद्‌गौरी, मनसा, सिद्धयोगिनी, वैष्णवी, नागभगिनी, शैवी, नागेश्वरी, जरत्कारूप्रिया, अस्तिकमाता, विषहारी, महाज्ञानयुता अशा बारा नावांनी त्या विश्वपूजितेची पूजा करावी. त्यामुळे पूजकाच्या वंशजांना सर्पापासून भय नाही. 

ज्यावेळी नागापासून भय उत्पन्न होईल, त्यावेळी हे स्तोत्र म्हटल्यास त्या भयापासून पुरुष मुक्त होतो. याचा दहा लक्ष जप केल्यास मंत्राची सिद्धी होते. अशाप्रकारे मंत्र सिद्ध करणारा पुरुष सर्प खाण्यासही समर्थ होतो. तो नागांचे वाहन करू शकतो. नागाचे आसन किंवा नागांची शय्या करून तो मृत्यूनंतर विष्णूलोकी जातो."
========================📓
*श्रीधर कुलकर्णी*
 *ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...