Sunday, 4 February 2018

दानधर्मादी कर्माची फले

*दानधर्मादी कर्माचे फल*
-----------------------------------

सावित्री म्हणाली, "हे महाभाग धर्मा, सत्यवानाला माझ्याठिकाणी शंभर पुत्र होतील असा वर दे. तसेच माझ्या पित्याला शंभर पुत्र व श्वशुराला नेत्र, राज्य यांची प्राप्ती होऊ दे. एक लक्ष वर्षे उलटल्यावर मी सत्यवानाबरोबर हरीमंदिरी जाईन. हे प्रभो, असा वर दे. तसेच जीव कर्माचे फल व विश्वाचे निरसन याविषयी आपण मला विस्ताराने सांगा." 

धर्म म्हणाला, "हे महासाध्वी, तुझी इच्छा पूर्ण होईल. आता तुला कर्मफलाबद्दल सांगतो. शुभ कर्माचा भोग पुण्यकारक भारतवर्षात भोगावा लागतो. अशुभ कर्माचा नरकात भोगावा लागतो. देव, दानव, दैत्य, गंधर्व हे कर्मजनक नाहीत. पुरुष कर्मजनक आहे. कर्म करणारा मनुष्य सर्व योनीत जाऊन स्वर्ग-नरकात फले भोगतो. पूर्व कर्मे प्राणी योनीत भोगावी लागतात. 

कर्मनाशासाठी भक्तीचा मार्ग आहे. भक्ती दोन प्रकारची आहे. निर्वाणरूप (निर्गुण) प्रकृतियुक्त (सगुण) वाईट कर्मामुळे जीव रोगी व शुभकर्मामुळे तो निरोगी होतो. तसेच कर्मपरत्वे दीर्घ व अल्प आयुष्य, सुख वा दुःख हे भोगावे लागतात. उत्तम कर्मामुळे सिद्धी प्राप्त होते. 

हे देवी, हे पुराणांनी व स्मृतींनी गुप्त ठेवण्यास सांगितले आहे. मनुष्य जाती त्यातून ब्राह्मण जन्म फार श्रेष्ठ आहे. त्यातूनही ब्रह्मनिष्ठ द्विज फारच श्रेष्ठ. सकाम व निष्काम असे दोन प्रकारचे ब्राह्मणा आहेत. सकाम कर्मयोगी व निष्काम उपद्रवरहित असतो. तो देहत्याग करून परमपद मिळवतो.

जे भक्त द्विभुज कृष्णाची सेवा करतात ते गोलोकी जातात. सकाम सेवा करणारे वैष्णव वैकुंठलोकी जाऊन पुन्हा भारतात येतात. ते द्विज जातीत जन्म घेतात. जे निष्काम होतात त्यांना मी निर्मल भक्ती देतो. विष्णुभक्तीहून सकाम ब्राह्मणांना निर्मल बुद्धीची प्राप्ती होत नाही. जे ब्राह्मण तीर्थक्षेत्री तप करतात ते ब्रह्मलोक जाऊन पुन्हा भारतात येतात. स्वधर्माप्रमाणे वागणारे सत्यलोकी जातात. नंतर भारतात परत येतात. ते भारतात सूर्यभक्त होतात. निष्काम धर्म आचरणारे मणिद्वीपाप्रत जातात. 

स्वधर्मरत शिवभक्त, शक्तिभक्त, गणपतीभक्त शिवलोकी जातात. निष्काम हरीभक्त वैकुंठी जातात. स्वधर्मशून्य, देवसेवारहित, दुराचारी, कामुक हे द्विज नरकात जातात. स्वधर्मतत्पर द्विज धार्मिक पुरुषालाच कन्या देतात. ते चंद्रलोकी जातात. चवदा चंद्र होईतो ते तेथे रहातात. सालंकृत कन्यादान करणार्‍याला दुप्पट फल मिळते. 

जे ब्राह्मणाला दूध, रुपे, सुवर्ण, वस्त्र, तूप, फळे इत्यादी देतात त्यांना चंद्रलोक मिळतो. उत्तम गाई, ताम्र ब्राह्मणाला दान देणारे सूर्यलोकात जातात. विपुल भूमि व धन, गृहदान करणारा विष्णुलोकी जातो. राजवाडा दान दिल्यास चौपट व देशदान दिल्यास शतपट पुण्य मिळते. 

तलावाच्या दानाने पापनाश होतो. त्याला जनलोक प्राप्त होतो. वापीच्या दानाचे दसपट पुण्य सांगितले आहे. चार हजार धनुष्य लांबी इतकी विहीर दान केल्यास तडागदानाचे पुण्य लाभते. सत्पात्री कन्यादान केल्यास दहा वापी दानाचे पुण्य मिळते. सालंकृत कन्यादानाचे फल दुप्पट आहे. अश्वत्थ वृक्षाची प्रतिष्ठा करणार्‍यास हजारो वर्षे तपलोक मिळतो. फलांचे उद्यान दान देणारा दहा हजार वर्षे ध्रुवलोकी राहतो. 

जो विष्णूस विमान देतो त्याला मन्वंतरापर्यंत विष्णुलोक मिळतो. ते विमान चित्रयुक्त असल्यास चौपट फल मिळते. शिबिकादानामुळे त्याच्या अर्धे फल मिळते. दोलस्थान असले मंदिर हरीला दान दिल्यास शंभर मन्वंतरापर्यंत विष्णूलोक मिळतो. 

हे पतिव्रते, राजवाडा व राजमार्ग करणारा दहा हजार वर्षे शुक्रलोकी जातो. ब्राह्मणांना व देवांना दिलेल्या दानाचे पुण्य सारखेच मिळते. 

तप केले तरी ब्राह्मणत्व प्राप्त होत नाही. कर्म भोगल्याशिवाय त्याचा क्षय होत नाही. कर्म शुभ असो अथवा अशुभ असो, भोगावेच लागते. देव, तीर्थे इत्यादींच्या सहाय्याने साधक शरीराने शुद्ध होतो. 
@   देवीभागवत..
========================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...