Monday, 7 May 2018

दंभ म्हणजे काय

*दंभ म्हणजे काय ?*
-------------------------

दंभ म्हणजे काय ?  स्वस्य *अन्यथाप्रदर्शनं इति दम्भः |* जीवन जगत असताना मी जसा आहे तसा न दाखविता मी जो नाही तो जगाला दाखविणे, भासविणे म्हणजेच ‘ *दंभ* ’ होय.  थोडक्यात आत एक आणि बाहेर एक अशा दुटप्पी वृत्तीला दंभ असे म्हणतात. मनुष्यामध्ये ही दंभित्वाची वृत्ति का निर्माण होते ?  याचे निरीक्षण केले तर समजते की, प्रत्येक मनुष्य हा स्वार्थी आहे.  त्यामुळे १) पूजा, २) लाभ, ३) ख्याती किंवा प्रसिद्धि या तीन गोष्टींच्या प्राप्तीसाठी मनुष्य दांभिकतेने वागतो. 

 *१) पूजा –* प्रत्येक मनुष्य लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच कोणीही असो, त्याला मान, सन्मान, प्रतिष्ठा यांची सहजस्वाभाविक इच्छा असते.  जगाने, समाजाने मला मान, आदर देऊन पूजा करावी, अशी इच्छा असते. 

 *२) लाभ –* कोणतेही कर्म करीत असताना मनुष्याच्या मनामध्ये काहीना काहीतरी स्वार्थ असतोच.  स्वार्थापोटी तो कर्मप्रवृत्त होतो.  मात्र बाहेरून तो आपण निःस्वार्थपणे कर्म करीत आहोत, असे जगाला भासवितो. 

 *३) प्रसिद्धि –* प्रत्येकाला प्रसिद्धीची हाव असते.  अनेक लोकांनी मला ओळखावे, सर्वांच्या मुखी माझे नाव असावे, मला मान द्यावा, वर्तमानपत्रामध्ये माझे नाव झळकावे, हीच मनोमन इच्छा असते. 

थोडक्यात पूजा-मानसन्मान, लाभ-स्वार्थकामना, ख्याती-प्रसिद्धि या तीन गोष्टींच्या पूर्तीसाठी मनुष्याच्या मनामध्ये दंभित्वाची वृत्ति निर्माण होते.  ज्यावेळी या तीन इच्छा स्वतःच्या पुरुषार्थाने, स्वकर्तृत्वाने खूप प्रयत्न करूनही पूर्ण होत नाहीत, त्यावेळी मनुष्य दांभिकतेचा अवलंब करतो.  स्वकर्तृत्वाने मोठे झाले तर जगाला दाखविण्याची गरजच नाही.  सूर्याला मी प्रकाशक आहे, हे सांगण्याची वेळ येत नाही.  परंतु स्वतःमध्ये गुण नसताना दुसऱ्याने आपल्याला मोठे म्हणावे ही इच्छाच दंभाला कारण आहे. दंभाच्या वृत्तीमुळे तो वाममार्गाचेही अनुसरण करतो. 
- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्दसरस्वती लिखित पुस्तकामधून,
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...