Monday, 24 September 2018

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२०

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
-------------------------------
   *श्राध्दमाहात्म्य :- २*

पुढील जन्मी ते रम्य कालंजर पर्वतावर मृगयोनीत उत्पन्न झाले. मृगयोनींत उत्पन्न होण्याचें कारण ते व्याधयोनींत असतांना श्वापदांच्या अंतःकरणांत भय उत्पन्न करणारे कर्म करीत असल्यानें जेथे चित्तांत सदा धसधस राहील असला हळू वृत्तीचा जन्म त्यांस प्राप्त झाला. परंतु, त्यांनीं पितृपूजनादि शुभकर्में केली असल्यामुळें याही जन्मीं त्यांना पूर्वजन्माचे स्मरण होतें. या जन्मी त्या मृगांची नांवे - उन्मुख, नित्यवित्रस्तु, स्तब्धकर्ण, विलोचन, पण्डित, घस्मर व नादी, अशीं होतीं. ते जरी पशूच्या जन्मास आले होते, तथापि आपण पूर्वी कोण होतो व या नीच योनीला कां आलों, ही गोष्ट सतत त्यांच्या डोळ्यांसमोर असल्यानें ते या जन्मांत क्षमाशील, निर्वैर व निस्त्रीक होते. त्या सर्वांची राहाणी एक तर्‍हेचीच होती. ते कधीं गैरकर्म करीत नसत व केवळ योग्यांप्रमाणें अंतर्निष्ठ राहून वनांत विहार करीत. ते फक्त पोटाला अल्पसें भक्ष्य देत व पाणी मुळीच पीत नसत. या प्रकारची त्यांनीं कडक तपश्चर्या चालविली. या स्थितींत असतांना त्यांची जी पावले भुईवर उमटली, तीं, हे राजा, कालंजर गिरीवर अद्यापि तशीच्या तशींच दृष्टीस पडतात. 

याप्रमाणे शुभ कर्म करीत असल्यामुळें व अशुभ कर्माचा सर्वथा त्याग केल्यानें त्यांना अधिक शुभ योनीची योग्यता प्राप्त झाली व पुढील जन्मीं ते शरद्वीप नामक शुभ देशांत सातहीजण जलांत राहाणारे चक्रवाक पक्षी झाले. चक्रवाक पक्षाची कामित्वाविषयीं मोठी ख्याति आहे. तो आपल्या मादीला सोडून क्षणभरही राहाण्याची वेळ आल्यास व्याकूळ होतो. पण हे बंधु अशा योनींत येऊनही त्यांनीं मैथुनाचा मार्ग मुळीच न पत्करिता केवळ ब्रह्मचर्यच पत्करले. ते एखाद्या ऋषीप्रमाणें आपला वेळ मननांत घालवीत. या पक्षियोनींत त्यांची नावे - निस्पृह, निर्मम, क्षांत, निर्द्वंद्व, निष्परिग्रह, निर्वृत्ति व निभृत, अशीं होतीं. ते सर्वही पक्षी मोठे शुभलक्षणी व धर्माने चालणारे होते. शेवटीं त्यांनीं आहार वर्ज करून तपाचरणाने नदीकांठीं प्राण सोडले. 

पुढील योनींत ते सातहीजण मानससरोवरात फिरणारे असे हंस झाले. ते सर्वही एकाच जोडप्यांपासून झाले. त्या सर्वांनाही पूर्वस्मरण होतेंच. येथेही ते मोठे धर्मनिष्ठ व ब्रह्मचारीच होते. पूर्वी ब्राह्मणजन्मांत आपल्या प्रत्यक्ष गुरूला त्यांनीं ठकविलें असल्यामुळें त्या दोषानें ते अनेक जन्मांच्या गिर्कींत सापडून नीच योनींत उत्पन्न झाले. तसेंच त्यांनीं आपल्या पोटासाठी तर खरीच, तथापि, पितृश्राद्धाचें नांव करून हिंसा केली होती, एवढयाने त्यांना पूर्वजन्मींचे ज्ञान राहिलें व जन्मही तिर्यग्योनींतच पण एकाहून एक अधिक उंची अशा योनीत आले. या हंसयोनीत त्यांची नांवे - सुमना, शुचिवाक, शुद्ध, पंचम, छिद्रदर्शन, सुनेत्र व स्वतंत्र. 

यांपैकीं पांचवा म्हणजे प्रथम जन्मीं जो कवि नामक होता, तो सातव्या जन्मांत पांचिक ही संज्ञा पावला; सहावा जो खसृम तो कण्डरीक नांवानें प्रसिद्ध झाला; व सातवा ब्रह्मदत्त या नांवानें. त्यांनीं साती जन्मांत जें तपाचरण केलें, जो योगाभ्यास केला, त्यांना कल्याणकारक अशी जी पूर्वजन्मींची स्मृति होती व अगदीं पहिल्या जन्मीं गुरुगृही त्यांनीं जें वेदाध्ययन केलें होतें त्याचा संस्कार, या सर्व संस्कारांच्या प्रभावानें ते जरी संसारांत पडले होते तरी ते सर्वही पक्षी अंतरीं ब्रह्मवेत्ते असून ब्रह्मचर्यानेंच राहात व योगस्थ वृत्तीने वनांत विहार करीत. एकदा ते सर्वही हंस जुटीने एकत्र फिरत असतां पुरुकुलोत्पन्न नीपांचा राजा बिभ्राज हा तेथें आला. हा शरीरानें मोठा शोभायमान, पराक्रमी व श्रीमंत होता. तो आपल्या स्त्रियांस बरोबर घेऊन त्या वनांत शिरला. तो राजा असल्या थाटानें व वैभवानें आलेला पाहून त्या सातांपैकीं स्वतंत्र नांवाचा जो हंस होता, त्याला आपण या राजासारखें व्हावें, अशी इच्छा उत्पन्न झाली. तो म्हणाला, "मी आजपर्यंत उपास कर करून अगदीं थकलों व इतकी तपश्चर्या केली, पण कांहीं फळ मिळाले नाहीं. तर माझ्या पदरीं तपाच्या किंवा नियमांच्या योगानें साचलेले जर कांहीं पुण्य असेल तर त्याच्या बळानें मला या राजासारखी सुखस्थिति प्राप्त व्हावी, असें मी इच्छितो."
========================
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...