Friday, 26 January 2018

दक्षिणा देवी

*🔅  दक्षिणा देवी 🔅*
----------------------------------
स्वाहा व स्वधा यांचे स्तुत्य, मधुर व उत्कृष्ट चरित्र मी सांगितले. आता दक्षिणेचे आख्यान सांगतो. 

पूर्वी हरीची प्रिया गोपी सुशीला गोलोकात गेली. ती राधेची मुख्य सखी, धन्य, मनोहर होती. तसेच रूप, गुण, स्वभाव यांनी ती श्रेष्ठ असून कला जाणणारी होती. जिचे अंग कोमल, तेजस्वी, नेत्र कमलाप्रमाणे व जिची श्रोणी उत्तम आहे, स्तन उत्कृष्ट आहेत, वर्ण काळा आहे, शरीर बांधेसूद असून रत्नालंकारांनी विभूषित आहे, थोडक्यात जी अत्यंत सुंदर आहे, कामशास्त्रनिपुण, पतीची इच्छा करणारी अशी कृष्णाप्रिया आहे, तसेच सर्व रसांविषयी रसिक आहे आणि जी रासमंडळात राधेच्या समक्ष कृष्णाच्या अंकावर विराजमान झाली आहे अशी ती, तिच्यापुढे राधिकेनेही मान खाली घातली आहे, मधुसूदनही भयाने खाली पहात आहे, अशी ती श्रेष्ठ स्त्री होती. 

जिचे नेत्र रक्तकमलाप्रमाणे असून कामामुळे वदन लाल झाले आहे, अंग कोपाने कंपित झाले आहे, ओठ स्फुरण पावत आहेत अशा त्या सुंदरीला पाहून व राधेचा हेतू जाणून श्रीकृष्ण गुप्त झाला. कांत पळाल्याचे पाहून सुशीला वगैरे गोपी थरथर कापू लागल्या. तेव्हा राधेस त्या म्हणाल्या, "आमचे रक्षण कर." असे म्हणून त्या राधेस शरण गेल्या. पती पळून गेल्याचे अवलोकन करून राधेने सुशीलेस शाप दिला. 

"आजपासून ती गोपी गोलोकी आली तर पाऊल ठेवताच भस्म होऊन जाईल." असे म्हणून रागाने ती रासेश्वरास बोलावू लागली. पण कृष्ण तिला न दिसल्यामुळे तो एकेक विरहक्षण तिला कोटी युगाप्रमाणे वाटू लागला. ती म्हणाली, "हे नाथ, हे प्राणप्रिया, तुझ्यावाचून प्राण रहात नाहीत. पतीने मान दिला की स्त्रीचा गर्व नित्य वृद्धींगत होत असतो. म्हणून ज्याच्यापासून सुख मिळते त्याचीच सेवा करावी. कुलवान स्त्रियांचा सर्वात परम आप्त म्हणजे पती होय. तोच संपत्तीरूप व भोग देणारा आहे. तोच मान देणारा, संसारातील उत्तम सारभूत स्वामी होय. इतर सर्व आप्तांमध्ये पतीच श्रेष्ठ होय. तोच भरण-पोषण करतो म्हणून त्याला भर्ता म्हणतात. तो पालन करतो म्हणून त्याला पती म्हणतात. 

शरीरावर त्याचा अधिकार असतो. तो काम देतो म्हणून त्याला कांत म्हणतात. तो सुखवृद्धी करतो म्हणून त्याला प्रिय म्हणतात. ऐश्वर्य देतो म्हणून ईश, प्राणांचा स्वामी असल्याने प्राणनायक असे म्हणतात. त्याच्या शुक्रापासून पुत्र होतो. म्हणून तो स्त्रियांस प्रिय असतो. शंभर पुत्र देणारा स्वामी स्त्रियांना अधिक प्रिय असतो. हीन कुळात जन्मलेली स्त्री पतीस जाणू शकत नाही. व्रते, तीर्थस्नाने, यज्ञदक्षिणा, पृथ्वीप्रदक्षिणा, तप, महादाने, गुरूची सेवा, ब्राह्मणाची सेवा, वेदसेवा इत्यादी पुण्य कृत्ये पतीच्या पदसेवेच्या प्रमाणात सोळाव्या कलेइतके पण नाहीत. कारण ह्या सर्वांपेक्षा पती श्रेष्ठ असतो. मी सर्वेश्वरी ज्याच्या प्रसादाने उत्पन्न झाले त्या कांताला मी जाणीत नाही. स्त्री स्वभाव उल्लंघन करता येत नाही." 

असे म्हणून राधेने श्रीकृष्णाचे भक्तिपूर्वक ध्यान केले. ती रडत रडत म्हणाली, "हे नाथ, हे नाथ, हे रमणा, दर्शन दे. मी विरहव्याकुल झाले आहे." 

इकडे सुशीला देवी गोलोकातून भ्रष्ट झाल्यामुळे दीर्घकालीन तपश्चर्येने लक्ष्मीच्या देहात प्रविष्ट झाली. पुढे देवांनी अत्यंत दुष्कर यज्ञ केला, पण त्याचे फल न मिळाल्यामुळे ते खिन्न होऊन ब्रह्मदेवाकडे गेले. 

ते ऐकून ब्रह्मदेवाने विष्णूचे स्मरण केले. तेव्हा 'मी तुझे कार्य करीन.' अशी विष्णूने प्रेरणा दिली. नंतर लक्ष्मीच्या देहापासून भगवान नारायणांनी मर्त्याची लक्ष्मी जी दक्षिणा, तिला उत्पन्न केले व ती ब्रह्मदेवाला अर्पण केली. कर्मे पूर्ण व्हावीत म्हणून ब्रह्मदेवाने ती यज्ञाला अर्पण केली. यज्ञाने तिची पूजा करून तिचे स्तवन केले. ती अत्यंत तेजस्वी, कोटीसूर्याप्रमाणे प्रभा असलेली, सुंदर, कोमलांगी, कमलनेत्रा, शुद्ध वस्त्र परिधान केलेली, मधुर ओष्ठ असलेली अशी सुदंती होती. ती प्रसन्नमुखी व वस्त्राभूषणांनी विभूषित होती. मोहक, कस्तुरी बिंदूमुळे केशाचा खालचा भाग उज्वल दिसत होता. तिचा नितंबप्रदेश प्रशस्त होता. तिची श्रोणी व स्तन मोठे होते. त्या कामबाणांनी पीडीत झालेल्या सुंदरीस पाहून यज्ञपुरुषास मूर्च्छा आली. त्याने तिचा विधीपूर्वक पत्नी म्हणून स्वीकार केला. नंतर देवांची शंभर वर्षे निर्जन वनामध्ये एकांतात त्याने त्या रमणीसह क्रीडा केली. नंतर देवीने बारा वर्षे दिव्य गर्भधारणा केली. तेव्हा तिला कर्माचे फल या नावाचा पुत्र झाला. कर्म पूर्ण झाल्यावर तिचा पुत्र फल देतो.

हा यज्ञपुरुष दक्षिणा व फल याच्यासह कर्मठांना कर्माचे फल देतो. हे नारदा, त्या पुत्र फलामुळे सर्व देवही संतुष्ट झाले. त्यांचे मनोरथ पूर्ण झाले. नंतर ते सर्व स्वस्थानी गेले. 

कर्त्याने कर्म जाणून दक्षिणा द्यावी म्हणजे फलप्राप्ती होते. कर्म कर्त्याने कर्म पूर्ण झाल्यावर दक्षिणा देण्यास विलंब लावला तर फल कमी होते. दक्षिणा न देता एक रात्र गेल्यास ते शंभरपटीने, तीन रात्री गेल्यास त्यापेक्षा शंभरपट, महिना लोटल्यास लक्षपट, एक वर्ष लोटल्यास तीन कोटीपटीने फल निष्फल होते. असा यजमान कर्माचा अधिकारी होत नाही. त्याच्या घरातून लक्ष्मी निघून जाते. देव व अग्नी त्याची पूजा स्वीकारीत नाहीत. 

दक्षिणेकरता याचन करून यजमानाने दक्षिणा न दिल्यास तो यजमान कुंभिपाक नरकात पडतो. तेथे तो एक लक्ष वर्षे राहतो. नंतर व्याधीयुक्त, दरिद्री होऊन चांडाळ होतो. तो पूर्वीचे व नंतरचे सात पुरुष अधोगतीस धाडतो. 

हे नारदा, मी तुला दक्षिणेचे आख्यान सांगितले. आता आणखी काय तुला ऐकायचे आहे ? 

नारद म्हणाला, "दक्षिणाहीन मनुष्य कोणते फल भोगतो ? दक्षिणेचे पूजन कोणत्या प्रकारे करतात ?" नारायण म्हणाले, "दक्षिणाशून्य कर्माचा भोग बळी घेतो. कारण वामनाने ते कर्म बलीस दिले आहे. श्रोत्रिय नसलेल्या ब्राह्मणास श्राद्ध पदार्थ देणे, श्रद्धाहीन दान देणे, अधम ब्राह्मणांचा यज्ञ, अपवित्र पुरुषाचे पूजन, अभक्त शिष्याने केलेली सेवा या सर्व कर्माचे भोग बली हरण करतो. आता दक्षिणेचे पूजाविधान सांगतो. 

यज्ञ कामातुर होऊन स्तुती करू लागला. तो म्हणाला, "पूर्वी तू गोलोकात गोपी होतीस. तू सर्व गोपीमध्ये श्रेष्ठ, राधेच्या बरोबरीची सखी, श्रीकृष्णाची अत्यंत प्रिया होतीस. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी रासमंडळात, राधेच्या महोत्सवकाली, तू लक्ष्मीच्या उजव्या खांद्यापासून प्रकट झालीस. म्हणून तुला दक्षिणा हे नाव प्राप्त झाले." 

हे सुंदरी, शीलसंपन्नतेमुळे तुला सुशील म्हणतात. राधेच्या शापामुळे तू दक्षिणा झालीस. गोलोकातून भ्रष्ट होऊन तू माझ्या भाग्यामुळे तेथे प्राप्त झालीस. माझा स्वामी म्हणून स्वीकार कर. कर्माचे फल देणारी तू आहेस. ब्रह्मा, विष्णु, महेश, दिक्पाल हे देखील कर्माचे फल देऊ शकत नाहीत. ब्रह्मदेव कर्मरूपी, महेश्वर फलरूपी, यज्ञरूपी मी विष्णु आहे. तू सर्वांची साररूपी आहेस. फल देणारी परब्रह्म आहेस. स्वतः श्रीकृष्णही तुझ्यासह शक्तिमान होतो. हे प्रिये, तू माझी शक्ती आहेस. तुझ्यामुळेच मी कर्माविषयी समर्थ आहे." 

असे म्हणून यज्ञ तिच्यापुढे उभा राहिला. तेव्हा ती दक्षिणा प्रसन्न झाली. तिने यज्ञ पुरुषाची सेवा केली. जो यज्ञकाली दक्षिणा स्तोत्र म्हणतो, त्याला यज्ञफल सत्वर मिळते. राजसूय, वाजपेय, गोमेध, नरमेध, अश्वमेध यांचे पुण्य लाभते. धन देणारे व पूर्वकर्म फल देणारा गजमेध, लोहयज्ञ, सुवर्णयज्ञ, ताम्रयज्ञ, शिवयज्ञ, रुद्रयज्ञ, बंधुक नावाचा शकयज्ञ, वरुणयाग, कंडक नावाचे वैरीमर्दनकर्म, शुचियज्ञ, धर्मयज्ञ, पापनाश करणारा अध्वर, ब्रह्मरूप, कर्मयाग, मलप्रकृतीयाग वगैरे समारंभाचे वेळी हे स्तोत्र म्हणणार्‍याचे याग निर्विघ्नपणे पार पडतात. आता ध्यान व पूजाविधी सांगतो. 

शालिग्राम अथवा घरामध्ये दक्षिणेचे पूजन करावे. लक्ष्मीच्या अंशभूत असलेली, कमलेची कला, कर्मदक्ष, फलदायी, विष्णूची शक्तीरूप, पूज्य, वंद्य, शुभलक्षणयुक्त, शुद्धीदायी, सुशील अशा दक्षिणेचे पूजन करतो. 

अशा वेदोक्त मंत्राने देवीस पाद्यादि अर्पण करावे. 
*"ॐ श्री क्लीं र्‍हीं दक्षिणायै स्वाहा ।"*

असा हा मंत्र आहे. नंतर तिचे यथासांग पूजन करावे. हे दक्षिणेचे आख्यान सुखदायी व कर्मफल देणारे आहे. निपुत्रिकांना पुत्र प्राप्त होतो. भार्याहीनास भार्या मिळते. विद्याहीनास विद्या, दरिद्र्यास धन, भूमीहीनास भूमी अशी त्यापासून फलप्राप्ती होते. संकट-विपत्तीच्या वेळी एक महिनाभर हे आख्यान श्रवण करावे म्हणजे तो सर्वांतुन मुक्त होतो.
=====================≠=📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...