Friday, 26 January 2018

स्वधादेवी

*🔅 स्वधादेवी*🔅
----------------------------
  
श्री नारायण म्हणाले, "हे नारदा, पितरांची तृप्ती करणारे, श्राद्धान्नाचे फल वृद्धिंगत करणारे असे स्वधेचे आख्यान तुला सांगतो." 

सृष्टीच्या आरंभी जगत्कर्त्याने पितृगण उत्पन्न केले. त्यापैकी चार मूर्तिमंत व तीन तेजोरूप होते. त्या सात पितृगणांसाठी त्याने तर्पणयुक्त आहार केला. स्नान व तर्पणयुक्त श्राद्ध, देवपूजन, त्रिसंध्यांत अन्हिक हे ब्राह्मणांचे वेदोक्त कर्म आहे. जे असे आचरण करीत नाहीत ते विषहीन सर्पाप्रमाणे होत. देवीची पूजा न करणारा, श्रीहरीस नैवेद्य न दाखवता खाणारा हा जीवनाच्या अंतापर्यंत म्हणजे स्मशानात भस्म होईपर्यंत सुतकी समजावा. पितरांसाठी श्राद्धे वगैरे निर्माण केल्यावर ब्रह्मदेव स्वस्थानी गेला. पण ब्राह्मण वगैरे जे तर्पण करीत होते, ते पितरांना प्राप्त होत नव्हते. तेव्हा सर्व क्षुधार्त पितर ब्रह्मदेवाकडे गेले. नंतर ब्रह्मदेवाने एक मानसकन्या उत्पन्न केली. ती गुणरूप व यौवनसंपन्न होती. विद्यावती, शुद्ध, प्रकृतीच्या अंशभूत स्वधा नावाची सुंदर कन्या होती. ती लक्ष्मीच्या लक्षणांनी युक्त पद्मरूप धारण करणारी, पितरांची पत्नी होती. पद्माप्रमाणे नेत्र असलेली अशी ती कन्या ब्रह्मदेवाने पितरांना अर्पण केली व ब्राह्मणांना तिचा अत्यंत गुप्त उपदेश केला. त्या स्वधात मंत्रामुळे पितरांना भाग मिळण्याची व्यवस्था केली. म्हणून देवांना दान देताना स्वाहा व पितरांना स्वधा असे मंत्र सांगितले आहेत. नंतर पितर, देवता, ब्राह्मण, मुनी वगैरे सर्वांनी स्वधेचे स्तवन केले. स्वधेच्या वरामुळे सर्वजण संतुष्ट झाले. 

"हे नारदा, मी तुला स्वधेचे उपाख्यान निवेदन केले. आता आणखी तुला काय ऐकायचे आहे ?" 

नारद म्हणाले, "हे महामुने, आता स्वधेचे पूजन व तिचे स्तोत्र मला सांगा."

श्री नारायण म्हणाले, "श्राद्धदिनी, मघायुक्त दिवशी, शरदऋतूतील कृष्ण त्रयोदशीस प्रयत्नपूर्वक स्वधेचे पूजन करावे. नंतर श्राद्ध करावे. स्वधेची पूजा न करता श्राद्ध करणार्‍यास तर्पणाची फलप्राप्ती होत नाही. 

"चिरयौवनसंपन्न, पितर व देव यांना पूज्य अशा ब्रह्मदेवाच्या कन्येचे मी स्तवन करतो." असे म्हणून शीला अथवा मंगल घटात तिची कल्पना करावी. नंतर तिला मूलद्रव्ये व पाद्य अर्पण करावे. 

*"ॐ र्‍हीं श्रीं क्लीं स्वधादेव्यै स्वाहा ।"*
 असे म्हणून तिची पूजा व स्तुती करावी. आता ब्रह्मदेवाने स्वतः केलेले स्तोत्र ऐक.

स्वधेच्या केवळ उच्चाराने पुरुषाचे तीर्थस्नान घडते. तो पापमुक्त होतो. त्याला वाजपेयज्ञाचे फल मिळते. स्वधा, स्वधा असे त्रिवार स्मरण केल्यास श्राद्ध, बली व तर्पणाचे फल मिळते. श्राद्धाचे वेळी एकाग्र चित्ताने स्वधेचे स्तोत्र ऐकणार्‍यास श्राद्धाचे पूर्ण फल मिळते. तसेच पुत्र अथवा स्त्री प्राप्त होते. स्वधा, तू श्राद्धांची अधिष्ठात्री देवता आहेस. तू नित्य, सत्यरूप व पुण्यरूप आहेत. सृष्टीकाली व प्रलयकाली तुझी उत्पत्ती व लय होतो. *ॐ स्वस्ति नम:, स्वाहा, स्वधा व दक्षिणा या सर्वांना प्रशस्त होत.* कर्मे पूर्ण व्हावीत म्हणून परमेश्वराने यांना उत्पन्न केले असे ब्रह्मदेव ब्रह्मसभेत म्हणाला व स्तब्ध झाला. त्याचक्षणी स्वधा तेथे प्रकट झाली. तेव्हा त्या कमलमुख स्वधेला ब्रह्मदेवाने पितरांना अर्पण केले. त्यामुळे पितर अत्यंत हर्षित झाले. 

हे स्वधेचे स्तोत्र एकाग्र होऊन ऐकल्यास सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य मिळते व त्याचे मनोरथ पूर्ण होतात."
========================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...