Saturday, 27 January 2018

षष्ठीदेवी

*🔅  षष्ठीदेवी*🔅
--------------------------

नारद म्हणाले, "षष्ठी, मंगलचंडी, मनसा ह्या प्रकृतीच्या कला आहेत. म्हणून त्यांचे चरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे." 

श्री नारायण म्हणाले, "प्रकृतीच्या सहाव्या अंशात्मक देवीला षष्ठी म्हणतात. ती विष्णूची माया असून बालकांची अधिष्ठात्री देवता आहे. षोडश मातृकातील ती प्रसिद्ध देवी आहे. ती देवसेना या नावाने प्रसिद्ध असून स्कंदाची प्रिय व सदाचरणी भार्या आहे. बालकांना आयुष्य देणारी, त्यांचे पालन-रक्षण व पोषण करणारी ती सिद्धयोगिनी आहे. आता तिचा पूजा विधी ऐक. 

स्वयंभुव मनूचा पुत्र प्रियव्रताने भार्येचा स्वीकार न करता तो तपश्चर्या करू लागला. पण ब्रह्मदेवाच्या आज्ञेमुळेच त्याने नाईलाजाने विवाह केला. विवाहानंतर बराच कालावधी गेला. तरी त्यांना पुत्र झाला नाही. म्हणून कश्यपाने त्याला पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्यास लावले. प्रियव्रताने आपली भार्या मालिनी हिला यज्ञाचा चरू भक्षण करण्यास सांगितले. पुढे तिला गर्भ राहिला. देवांची बारा वर्षे तिने तो गर्भ धारण केला. 

पुढे यथावकाश तिने एका सुवर्णकांती असलेल्या बालकास जन्म दिला. पण दुर्दैवाने ते बालक जन्मतःच मरण पावले. त्यामुळे त्याचे सर्व आप्तेष्ट दुःखाकुल झाले. माता अतीव दुःखामुळे मूर्च्छित पडली. राजाने बालकाला स्मशानभूमीवर नेले. पण तेथे अनिवार दुःखामुळे त्याने बालकाला हृदयाशी कवटाळले. राजा मृत पुत्राला सोडण्यास तयार होईना. अखेर तो स्वतःच प्राण देण्यास सिद्ध झाला. त्याचवेळी स्फटिकाप्रमाणे शुद्ध, मण्यांनी विभूषित, तेजस्वी, रेशमी वस्त्राने विभूषित असलेले सुंदर व सचित्र पुष्पमाला धारण केलेले उत्कृष्ट विमान राजाला दिसले. अत्यंत सुंदर अशी भगवती देवी विमानात विराजमान झाली होती. पांढर्‍या चाफ्याप्रमाणे शुभ्र वर्णाची, चिरयौवना, प्रसन्न चेहर्‍याची, दयाळू, भक्तानुग्रही अशा त्या देवीला अवलोकन करताच राजाने हात जोडले. तो तिची स्तुती करू लागला. त्याने आपल्या मृत पुत्रास भूमीवर ठेवले व भगवतीचे पूजन केले. 

तेव्हा ती महातेजस्वी स्कंदभार्या प्रसन्न झाली. राजा म्हणाला, "हे सुंदरी, तू आहेस तरी कोण ? तू धन्य व मान्य आहेस. तू कोणाची कन्या आहेस ?" 

ती देवी पूर्वी देवांच्या सेनेची प्रमुख होती. तिनेच देवांना विजय प्राप्त करून दिला. म्हणून तिला देवसेना म्हणतात. ती जगन्मंगलरूप चंडिका देवसेना म्हणाली, "मीच ब्रह्मदेवाची मानसकन्या देवसेना आहे. उत्पन्न होताच मला पित्याने स्कंदास अर्पण केले. मीच षष्ठी या नावाने प्रसिद्ध आहे. मी प्रकृतीच्या सहाव्या अंशाची कला असून मी निपुत्रिकाला पुत्र देते. मी पुरुषाचे मनोरथ पूर्ण करते, दरिद्र्यांना धन व कर्माचे फल देत असते. हे राजा, सुख, दुःख, हर्ष, खेद वगैरे सर्व कर्मामुळे प्राप्त होत असतात. पुत्र होणे, न होणे अथवा पुत्राचा मृत्यु होणे या सर्व घटना कर्मामुळेच घडत असतात. कोणतीही संकटे, आपत्ती ही कर्मामुळेच प्राप्त होतात." असे म्हणून देवीने त्या मृत बालकाला हातात घेतले व त्याला सहज जिवंत केले. तेव्हा त्या हसतमुख पुत्रास पाहून राजाला अपार आनंद झाला. पण त्या बालकाला घेऊनच ती देवी विमानातून निघून जाऊ लागली. ते पाहून राजा हृदयव्याकुळ झाला. नंतर राजाने तिचे स्तवन केले. त्यामुळे देवी संतुष्ट होऊन राजाला म्हणाली, " हे राजा, तू तिन्ही लोकांचा राजा आहेस. म्हणून तू सर्वांना माझी विधिपूर्वक पूजा करण्यास सांग. तसेच तूही माझे पूजन कर. त्यामुळे तुला बलदंड पुत्र होईल. हा पुत्र नारायणाचा अंश आहे. त्याला पूर्व जन्माचे स्मरण असून हा अत्यंत पंडित आहे. शिवाय याच्या अंगी एक लक्ष हत्तीचे बळ आहे. मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झाले आहे. म्हणूनच धनवान, गुणवान, शुद्ध, विद्वान, प्रिय, ज्ञानी,

यशस्वी व संपत्तीदायी असा हा पुत्र तुला मी दिला आहे." 

असे म्हणून देवीने त्या बालकाला राजाचे स्वाधीन केले. राजाने तिची पूजा करण्याचे वचन दिल्यावर राजाला अनेक वर देऊन देवी स्वर्गलोकी निघून गेली. राजाही आपल्या अमात्य व मंत्र्यांसह राजवाडयात परत आला. पुत्र जिवंत झाल्यामुळे राजाची भार्या व इतर आप्त सर्वजण आनंदित झाले. नंतर राजाने पुत्राचा जन्मोत्सव केला. ब्राह्मणांना विपुल दक्षिणा देऊन त्याने दरमहा शुक्ल षष्ठीस प्रजेकडून षष्ठीदेवीचा महोत्सव केला. सूतिकागृहात बालकाच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी व एकविसाव्या दिवशी तिचे पूजन करण्यास सुरुवात केली. बालकाच्या सर्व शुभकर्माचे दिवशी त्याने सर्वांकडून षष्ठीचे पूजन करविले व स्वतःही पूजन केले. 

हे नारदा, देवीचे कौमुदशाखेत सांगितलेले ध्यान व पूजाविधी स्तोत्रासह तुला सांगतो. 

शालग्राम, घट, वटवृक्ष, अथवा भिंतीवर पुतळी काढून त्या ठिकाणी तिची कल्पना करावी व तिचे पूजन करावे. 

"जिची कांती श्वेत चंपकाप्रमाणे आहे, विविध रत्नांनी जी विभूषित आहे अशा या श्रेष्ठ देवसेनेची मी पूजा करतो." 

असे म्हणून पूजेच्या निर्माल्यातील पुण्य स्वतःच्या मस्तकावर धारण करून तिचे ध्यान करावे. नंतर व्रतस्थ राहून मूलमंत्रोक्त पाद्य, अर्घ्य, आचमन, गंध, पुष्प, धूप, दीप, निरनिराळ्या प्रकारचे नैवेद्य, मधुर फळे वगैरे उपचारांनी तिचे पूजन करावे. 

*" ॐ र्‍हीं षष्ठीदेव्यै स्वाहा ।""*

अशा अष्टाक्षरी मंत्राचा जप करावा. तिची स्तुती करून तिला नमस्कार करावा. सामवेदोक्त तिचे स्तोत्र म्हणावे. नंतर अष्टाक्षरी महामंत्राचा लक्ष जप करावा. म्हणजे त्यामुळे पुत्रप्राप्ती होते. आता सर्व शुभकामना पूर्ण करणारे तिचे स्तोत्र सांगतो. 

प्रियव्रत म्हणाला, "महादेवी, शांतस्वरूपिणी, सिद्धी अशा देवीला माझा नमस्कार असो. त्या शुभ व षष्ठी नावाच्या देवसेनादेवीस माझा नमस्कार असो. वरदायिनी, पुत्रदायिनी, धनदायिनी अशा देवीला नमस्कार असो. सुखदा, मोक्षदा, अशा स्कंदपत्नीस प्रणाम असो. सृष्टीरूप, प्रकृतीचा सहावा अंश असलेल्या अशा सिद्ध ईश्वरीस मी वंदन करतो. माया व सिद्धयोगिनी अशा देवी षष्ठीस मी नमस्कार करतो. साररूप शारदा नावाच्या देवीस माझे वंदन असो. बलांची अधिदेवता, कल्याणी, कर्मफलदायिनी षष्ठी देवीस मी नमस्कार करतो. 

भक्ताला प्रत्यक्ष दर्शन देणारी, सर्व कर्मांना पूज्य असलेल्या स्कंद भार्येस माझा प्रणाम असो. हे देवांचेही संरक्षण करणार्‍या षष्ठीदेवी, तुला माझा नमस्कार असो, शुद्ध सत्त्वरूप, सर्वांस वंद्य, हिंसा व क्रोध यांचा त्याग केलेली अशी जी देवी षष्ठी, त्या देवीला मी लोटांगण घालतो. हे सुरेश्वरी, मला धन, स्त्री, पुत्र, मान, जय इत्यादी प्राप्त करून दे. हे महेश्वरी, माझ्या शत्रूचा नाश कर. यशदायिनी षष्ठी देवी, माझा तुला नमस्कार असो." अशी प्रियव्रताने देवीची स्तुती केली. तेव्हा देवीच्या प्रसादामुळे त्याला पुत्रलाभ झाला. हे षष्ठीचे स्तोत्र जो वर्षभर श्रवण करतो, त्याला चिरंजीव पुत्र प्राप्त होतो. तसेच एक वर्ष तिची पूजा करून हे स्तोत्र श्रवण केल्यास पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतो. महावांझ पत्नी असली तरी देवीच्या भक्तास पुत्रलाभ होतो. शूर, गुणी, धनवान, रूपवान, दीर्घायुषी असा सर्वलक्षणसंपन्न पुत्र देवीच्या प्रसादाने प्राप्त होतो. 

*काकवंध्या, मृतवांझ स्त्रीलाही षष्ठीच्या सेवेने सुपुत्र होतो. रोगग्रस्त बालकाच्या पित्याने अथवा मातेने हे स्तोत्र श्रवण केल्यास ते बालक एक महिन्यात निरोगी होते."*
@   देवीभागवत..
======================🙏🏻
*श्रीधर कुलकर्णी*
   *ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...