Sunday, 21 January 2018

शब्दांचं मानसशास्त्र

     शब्दांचं मानसशास्त्र
=================

शब्दांचं मानसशास्त्र सांगतं की, तुम्ही दुसऱ्याचं मन वळवू शकता. शब्द बोलताना एवढी काळजी घ्या की ते कुणाला दुखावणार नाहीत. शब्दांतूनच तुम्ही जगता आणि शिकता. शब्दांतूनच तुम्ही जगवता आणि प्रेम करता. आणि शब्दांतूनच तुम्ही निर्भिड, नवीन जीवन उभारता. जोपर्यंत जगाच्या पाठीवर माणूस आहे तोपर्यंत शब्द राहणारच.

शब्द हा माणसाचा पहिला शोध आहे. शहाणपणाचे शब्द, मनापासूनच प्रमाणिक शब्द, सौजन्याचे शब्द, आदरवाचक शब्द, प्रशंसेचे शब्द, विनोद उत्पन्न करणारे शब्द, तिरस्कारयुक्त शब्द, निर्मितीचे शब्द, वेदनायुक्त दुख:चे शब्द, धार्मिक शब्द, हळुवार प्रेमळ शब्द, मनधरणी करणारे सज्जन शब्द, वीरश्री उत्पन्न करणारे जहाल शब्द, शास्त्रीय शब्द, तांत्रिक शब्द, गीतातील शब्द, तबल्यातील शब्द, काल, आज, उद्या सांगणारे शब्द – छे छे छे ! हे शब्दभांडार जादूमय शक्तीने भरलेले दिसते. जंगलबुकमधला मोगली (बच्चा) तर वाघ, हत्ती, अजगर वैगेरे प्राण्यांवरसुद्धा शब्दांच्या उच्चारांनी हुकुमत चालवितो. मनुष्याला बहाल केलेला “स्वर” म्हणजे एक पारितोषिक आहे. त्यातून आपली वृत्ती, दृष्टीकोन व संस्कृती उघड होते. उच्च संस्कृती म्हणजे तरी काय ? नुसता नीटनेटकेपणा नाही; किलबिल, चिवचिव, गप्पाटप्पा, हास्यांची कारंजी, सगळं काही कर्णमधूर !

मला तरी चिडीचूप वातावरण मुग्ध करतं. कशाबद्दलही ‘ब्र’ न काढणारी माणसं भकास आयुष्य निरसपणा जगत असतात. अल्पभाषी म्हणजे अल्पबुध्दीच ! अशी मुखदुर्बळ, घुमी माणसं, मुकाटपणे, निमूटपणे, गपचीप पडून असतात. जिभेचा जड, तोंडाला कुलुप – ही भयानक स्थिती मला असह्य होते. ‘कल्चर इझ अ वे ऑफ लाईफ’. संस्कृती म्हणजे – दररोजची जगण्याची पद्धत. ‍ सदाभीरुची असलेला तो संस्कृत. मनुष्याच्या प्रत्येक कृतीचे सामान्यपणे तीन विभाग पडतात. ते असे :

*1. जीवनासाठी आवश्यक कृती – प्रकृती*
*2. स्वार्थापोटी केलेली कृती –विकृती*
*3. स्वत: त्याग करुन इतरांकरिता केलेली कृती – संस्कृती*

मुख्य काय तर, सुशीक्षीत माणूस सुसंस्कृत व्हावा यासाठी कृतीशील वक्तृत्व लागते. म्हणूनच ऐकून घेणे व बोलणे यांना महत्त्व आहे. ओठातून फुटणारा प्रत्येक शब्द संस्कृती विषयी सांगून जातो. म्हणून उच्चारित शब्द म्हणजे ‘परब्रम्ह’ ठरतो. यशाकरिता स्वरसंस्कृतीचा विकास अत्यंत जरुर आहे. लक्षात ठेवा की भावना किंवा विचार मोठ्याने व्यक्त केल्याशिवाय कृतीत येत नाहीत. लक्षात घ्या की, मेंदूतील विचार आणि भावना म्हणजे न बोललेले शब्दच असतात. त्यांचा उच्चार केल्याशिवाय ते गुणगुणल्याशिवाय (crooned and cried out) सुख किंवा आनंद मिळत नाही. शब्द म्हणजे जणु बीजकोषातील शक्तीच असते. ठळक गोष्टीच परिणाम साधतात. म्हणून मोठ्याने, जिद्दीने, सुखकारक बोला.

शब्दांच्या माध्यमातूनच, माणसं आनंदी व खेळकर होतात. सूर्यास्त जास्त मनोहर होतो, तो वर्णनामुळेच. स्त्री जास्त आकर्षक भासते ती तिच्या भुरळीमुळे, लावण्य व्यक्त केल्यामुळे. एखादा किस्सा रंगतो, ते त्यांतील खुबीदार शब्दांमुळे, बोलक्या शैलीमुळे. उच्चारलेले शब्द, वर्णनात्मक ओघ निर्माण करतात.

आता तुमचं आयुष्य सुरु झाले शब्दामार्फत, तुम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकाल. इतकेच नव्हे तर तुम्ही भावनिक आरोग्यही मिळवू शकाल. घडलेली बरी वाईट गोष्ट शब्दात मांडा. तुम्ही प्रश्न सोडवायला समर्थ व्हाल. तुमचं कार्य अजून वरच्या दर्जाचं झालं पाहिजे. अजून नेमके शब्द वापरुन, त्या कार्याला वरची उंची गाठू द्या. स्वत:शी सतत बोलल्याशिवाय, दुसऱ्यांशी चांगले बोलता येत नाही. ‘नमस्कार भाऊसाहेब’ असं हसत बोलण्याची सवय जडवून घ्या. तुम्ही दुसऱ्यांना कसं देता, काय देता, ते सर्वात महत्त्वाचं. मानवी नातेसंबंध सर्वात महत्त्वाचे. तुमच्यासारखे व तुमच्याहून श्रेष्ठ लोक जगात पडलेत. शब्दांचं वलय सर्वांत महत्त्वाचं. समाजातील यश किंवा मान्यता, व्यक्तीमत्त्वावर संपूर्णपणे अवलंबून असते.

तुमची ठेवण, तुमचा आवाज, तुमची अभिव्यक्ती (अभिनय) हौस, उमाळा, सद्भावना, योग्य निर्णयक्षमता सर्व काही सांगून जातात. तुमचं समर्पण महत्त्वाचं. ते बोलूनच साधतं. मुख्य म्हणजे मोकळेपणा व लवचिकता पाहिजे.

एकमेकांशी संपर्क साधण्याचे कौशल्य का जोपासावे ? उत्तर आहे, लोकांना समजून घेणं. त्यांच्याकडून कामे करवून घेणं याला मधाळ हळुवार शब्दांशिवाय पर्याय नाही. तुमची जादुमय मुद्रा काहीही करु शकते. त्यांच्या मनांत येणारे अडथळे कृतिशील होण्याची वृत्ती मंदपणा तुम्हीच घालविला पाहिजे.

*पुढील प्रकारच्या शब्दांनी, सुरांनी, स्वरांनी माणसं दुखावली जातात.*

उदासीन स्वर, खोल घुमणारा स्वर, भावनाशून्य कोरडा स्वर, कर्कश आवाज, उग्र स्वर, हुश हुश – फुस् स्वर, गगनभेदी स्वर, कंटाळवाणा स्वर, नाकातून आवाज, फार जलद बोलणं, चिरडून काढणारा आवाज, अत्यंत उच्च पट्टीतील आवाज, ऐकू न येईल असं बोलणं, सहानुभूती मागणारा, व्याकरण चुका, चुकीचे उच्चार, दमछाकी कमी स्वर.
@   सुरेश परूळेकर
========================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...