Wednesday, 24 January 2018

स्वाहादेवी

*🔅 स्वाहादेवी  🔅
*---------------------*

श्रीनारायण म्हणाले, "आता तुला अतिशय गूढ-दुर्लभ असे ज्ञान मी तुला सांगतो." 

नारद म्हणाले, "ही देवी, स्वाहा, स्वधा, दक्षिणा वगैरेमध्ये वास करते. म्हणून त्यांचे चरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे." 

नारायण म्हणाले, "पूर्वी देव स्वतःच्या आहारासाठी ब्रह्मदेवाकडे गेले व त्याला आपल्या आहाराविषयी सर्व निवेदन केले. तेव्हा ब्रह्मदेवाने श्रीहरीची स्तुती केली." 

नारद म्हणाले, "भगवान यज्ञरूप झाला. मग यज्ञात ब्राह्मणांनी दिलेल्या दानामुळे देवांची तृप्ती का होत नाही ?" 

नारायण म्हणाले, "ब्राह्मण, क्षत्रिय भक्तीपूर्वक हवी देतात. पण देवांना ते प्राप्त होत नाही. म्हणून पुन्हा उदास होऊन देव ब्राह्मणाकडे गेले. तेव्हा ब्रह्मदेव ध्यानाने श्रीकृष्णास शरण गेले व ध्यानानेच त्याने प्रकृतीचे स्तवन केले. तेव्हा कृष्णवाणी, मनोहररूप असलेली, वरदायिनी देवी ब्रह्मदेवापुढे प्रकट झाली. ती म्हणाली, "हे पद्मयोने, वर माग." 

तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला, "तू अति सुंदर आहेस. म्हणून तू अग्नीची दाहशक्ती हो. तुझ्यावाचून अग्नी दहन करण्यास असमर्थ आहे. तुझ्या नामोच्चाराने व मंत्रांनी मिळणारा हवी देवास प्राप्त होईल असे कर. संपत्ती, श्री, गृहेश्वर असे रूप असलेल्या अंबिके, देव व मानव यांना तू नित्य पूजनीय होशील." 

हे ऐकताच देवी खिन्न झाली. ती म्हणाली, "मी भयंकर तपाने कृष्णाची सेवा करीन. कारण त्याशिवाय इतर सर्व स्वप्नाप्रमाणे आहे. तू जगाचा कर्ता व शंकर संहर्ता आहे. शेषाने विश्वाला धारण केले आहे. धर्म धार्मिकांचा साक्षी आहे. गणेश्वर देवांना पूज्य आहे. पण ज्याच्या प्रसादाने प्रकृती, ऋषीमुनी सर्वांना पूज्य झाले त्या श्रीकृष्णाचे मी चिंतन करते." 

असे म्हणून ती लक्ष्मीचा अंश असलेली देवी एका पायावर उभी राहून तप करू लागली. एक लक्ष वर्षे तप केल्यावर तिला श्रीकृष्णदर्शन झाले. ते मनोरूप पाहून ती

रूपवती कामेच्छेने मूर्च्छित झाली. तेव्हा तपाने क्षीण झालेल्या देवीस उचलून धरून भगवान म्हणाला, "तू वराहकल्पात माझी पत्नी होशील. तू नाग्नजिताची नाग्नजीती नावाची कन्या होशील. तू सर्वांना पूज्य होशील. नंतर अग्नी भक्तीभावाने तुला सांभाळून तुझ्याशी क्रीडा करील." 

असे म्हणून देव गुप्त झाला. त्याच वेळी ब्रह्मदेवाच्या आज्ञेने त्रस्त झालेला अग्नी तेथे आला. सामवेदोक्त मंत्रांनी त्या जगदंबिकेचे त्याने पूजन केले. तिची स्तुती करून नंतर तिचे पाणीग्रहण केले. नंतर शंभर दिव्य वर्षे त्याने निर्जन प्रदेशात तिला संभोगसुख दिले. तिच्या ठिकाणी गर्भ राहिला. बारा वर्षे तो गर्भ धारण केल्यावर तिच्या पोटी दिव्य बालके जन्मास आली. दक्षिणाग्नी, गार्हपत्याग्नी व आहवनीयाग्नी अशी त्यांची नावे आहेत. ऋषी, मुनी, क्षत्रिय सर्वजण स्वाहांत मंत्र उच्चारून हविर्दान देऊ लागले. 

स्वाहायुक्त मंत्रग्रहण करणार्‍यास सर्व सिद्धी प्राप्त होतात. स्वाहाशून्य मंत्र निंद्य होय. स्वाहान्न मंत्रामुळे देवांना आहुती मिळू लागल्या. 

"हे नारदा, मी तुला स्वाहाचे उपाख्यान सांगितले. आता तुला काय ऐकायचे आहे ?" 

नारद म्हणाले, "स्वाहाच्या पूजेचे विधान, ध्यान व स्तोत्र मला सांगा." 

श्री नारायण म्हणाले, "सर्व यज्ञाच्या प्रारंभी शालिग्रामाचे ठिकाणी अथवा घरात स्वाहेची पूजा करावी. नंतर कालप्राप्तीसाठी यज्ञ करावा. ती सर्व सिद्धी देणारी, मनुष्यांना कर्मांचे फल देणारी व शुभ आहे. तिचे ध्यान केल्यावर मूलमंत्राने पाद्यादि देऊन तिचे स्तवन करावे म्हणजे सिद्धी मिळते. त्याला मूलमंत्र असा - 

*"ॐ र्‍हीं श्रीं वन्हिजायायै देव्यै स्वाहा । "*

या मंत्राने पूजा केल्यास सर्व मनोरथ पूर्ण होतात. अग्नी म्हणतो, *"स्वाहा वन्हीस प्रिय आहे.* त्याला संतोष देणारी ती स्त्री आहे. ती त्याची शक्ती आहे. क्रियेचा काल देणारी आहे. कर्माचा परिपाक देणारी नित्य गती, पुरुषांना दहन करणारी, अग्नीस योग्य, संसारसाररूप, घोर संसारातून पार नेणारी, देवांना जीवनरूप, देवांचे पोषण करणारी अशी आहे. ही सोळा नावे जो भक्तीने पठण करतो त्याला ऐहिक व पारलौकिक सिद्धी प्राप्त होतात. त्याची सर्व कर्मे अंगहीन न होता शुभ होतात. निपुत्रिकाला पुत्र होतो. भार्याहिनास भार्या मिळते. रंभेप्रमाणे सुंदर पत्नी लाभल्यामुळे तो परम सुखी होतो."
@   देवीभागवत..
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...