*अशोकतीर्थ*
-----------------------
-----------------------
सूत म्हणाले, आता श्रेष्ठ अशा अशोकतीर्थाविषयी ऐक. पूर्वी प्लक्षद्वीपाधिप अशोक नावाचा राजर्षी होऊन गेला. तो मेधातिथीचा नातू तर पारावताचा मुलगा होय. त्याचे शंभर पुत्र होते.त्यांचेही महावीर्यवान् पुत्रपौत्र होते. एवढया संततीसह राजा अनेक वर्षे उपभोग घेत होता. त्या अशोक राजाच्या शंभर कन्याही होत्या. त्यांच्या पुत्रपौत्रांनी तो परिसर भरून गेला होता. त्या सर्वसंततीने वेढलेला राजा अनेक प्रिय विषयांचा उपभोग घेत राहिला व प्रजेचे रंजन करत पृथ्वीपती झाला.त्याचे अनेक अक्षोहिणी सैन्य होते. सुमती नावाचा राजा त्याचा शत्रू होता. सुमतीचे सैन्यही दसपट बलवान् होते. आपल्या बलवान् सैन्याच्या साहाय्याने अशोकाच्या नगरीला वेढून त्या राजाबरोबर दीर्घकाळ युध्द केले. अशोक राजाला न मारता, त्याच्या पुत्रपौत्रादींसह सेनेचा सुमतीने विनाश केला. तेव्हा सर्व वस्तूंचा त्याग करून शोकपूर्ण मनाने राज्य सोडून एकटा पांढर्या घोडयावर स्वार होऊन जम्बूद्वीपाकडे गेला. सर्व देश सोडून तो भरतखण्डात आला. हीच भोग व मोक्ष देणारी श्रेष्ठ अशी कर्मभूमी आहे आणि सर्व तीर्थक्षेत्रात गोकर्ण उत्तम आहे, हे जाणून राजा गोकर्णाला आला. देवगंधर्व उपभोगित असलेल्या शतशृङ्ग पर्वतावर आपल्याच आजोबांचा पवित्र असा आश्रम पाहिला आणि आपलेच चार पितामह पाहिले.प्रियव्रताचे पुत्र म्हणजे अशोकाचे ते पितामह होते. मुक्तीची इच्छा करणारे ते त्याचे भाऊ तपस्या करत होते. पितामहांनी आपल्या नातवाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन करून त्याची चौकशी केली. तेव्हा त्या राजर्षीने घडलेला सर्व वृत्तान्त सांगितला. आपल्या नातवाचे ते बोलणे ऐकून करुणायुक्त असे ते शोकयुक्त अशा त्या अशोकाला म्हणाले,"हे नृपश्रेष्ठा, येथे राहून तू महादेवाची आराधना केलीस तर शोकमुक्त होशील. तो महादेव तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करेल."
सूत म्हणाले,"ठीक आहे." असे म्हणून पवित्र आश्रम निर्माण करून तेथे राहू लागला. पितामहांनी सांगितल्याप्रमाणे उपवास व व्रतांमध्ये मग्न राहून, शिवाचे ध्यान करत, निराहार राहून, केवळ वायुभक्षण करून, अंगठयाने जमिनीला स्पर्श करत तप आचरू लागला. अशाप्रकारे त्या पितामहांच्या समवेत बारा वर्षे तप केले. त्याच्या तपश्चर्येने वत्यांच्या (पितामहांच्या) अपेक्षेप्रमाणे शिव त्याच्यावर प्रसन्न झाला आणि त्या सर्वांच्या व त्या राजाच्या पुढयात प्रकट झाला. त्रिशूळधारी उमापती तसेच बारा आदित्यांप्रमाणे स्वतेजाने प्रकाशमान् अशा त्या देवेशाला पाहून धरणीवर शिरसाष्टांग घालून ते महर्षी म्हणाले,"हे सदाशिव, अशोकाचे आधार व्हा." हे त्यांचे बोलणे ऐकून भगवान् शिव त्यांना म्हणाले,"हे ऋषींनो, वर मागा. तो मी अविलम्ब देईन." हे ऐकून राजा म्हणाला,"हे ऋषभध्वजा, माझे अशोक हे नाव प्रसिध्द आहे. पुत्रपौत्रादी परिवाराने मी अत्यंत आनंदी व सुखी होतो. परंतु माझे राज्य दुसर्यांनी हरण केले, माझा सर्व परिवार मृत झाला. माझे सर्व धन नष्ट झाले व मी एकटा उरलो. हे पार्वतीपते, त्यामुळे मी शोकविव्हल झालो आहे. म्हणून मी येथे तुला शरण आलो आहे. हे विभो, माझ्या पितामहांच्या संगतीने, त्यांच्या प्रभावानेच मी आपल्याला पाहू शकलो."तेव्हा शंकर प्रेमपूर्वक त्या राजाला म्हणाले,"हे राजा, युध्दात जे नातेवाईक मेले ते जिवंत होतील. माझ्या प्रसादामुळे तू सर्व शत्रूंवर विजय प्राप्त करशील. आजपासून शोक करू नकोस. शाश्वत अशी सिध्दी तुला प्राप्त होईल. हा तुझा आश्रम लोकविख्यात होईल. हे राजा, हे तीर्थ तुझ्या नावाने लोकांना ज्ञात होईल. हे तू स्थापिलेले लिंग अशोकेश्वर या नावाने त्रैलोक्यात पूज्य होईल आणि सर्व पापांचा नाश करेल. तुझ्या पूर्वजांचे महान् आश्रम त्या त्या नावांनी ओळखले जातील आणि सर्वपापहारक ठरतील. वैशाख महिन्यात, विशाखा नक्षत्रात या तीर्थात स्नान करून गन्धाक्षतपुष्पे यांनी अशोकेश्वराची जे पूजा करतील त्यांना माझ्या कृपेने सात जन्म शोक (दुःख) होणार नाही. तसेच सात जन्मात केलेले पाप स्नानानंतर नष्ट होईल. हे राजा, जा. शत्रूंचा नाश करून निर्विघ्नपणे राज्याचा सांभाळ कर. पुत्रपौत्रांनी,नातवंडांनी, नातेवाईक वगैरेंनी वेढलेला तू सर्व प्राणिमात्रांसह पृथ्वीचा सांभाळ कर."
अशाप्रकारे शंकरांनी अशोकाला वर देऊन इतर राजर्षींना अनुमती देऊन त्याच ठिकाणी शिव अंतर्धान पावले.
अशोकाच्या समोर शोकविनाशक असे सर्व पापांचे हरण करणारे असे तीर्थ तयार झाले. त्याच्या पश्चिमेला सुमारे वीस हातांवर अग्निद्युत सर्व पापनाशक असे तीर्थ झाले. त्याच्या नैऋत्येला तीस हातांवर अग्निबाहु असे श्रेष्ठ तीर्थ आहे.त्याच्या वायव्येला पन्नास हातांवर मेधातिथीचे सिध्दीदायक असे तीर्थ आहे. त्याच्यापासून पश्चिमेला शरपात नावाचे मोक्षदायी तीर्थ आहे. अशोकपञक या नावाने ही पाच तीर्थे सर्व लोकात प्रसिध्द आहेत. या पाच तीर्थात स्नान करून जो अशोकेश्वराची पूजा करतो त्याची सर्व दुःखे निश्चितपणे नष्ट होतात. अशोकाचे हे माहात्म्य जो ऐकतो त्याच्या सुखाचा नाश कधीच होत नाही.
=========================♦
*सं :- श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*
=========================♦
*सं :- श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*
No comments:
Post a Comment