Tuesday, 23 January 2018

कामाघनाशिनी नदी

*-: कामाघनाशिनी नदी :-*
--------------------------------------
सूत म्हणाले, "अशोक तीर्थापासून आग्नेय दिशेला एक कोसावर सर्वपापनाशक आणि पवित्र अशी कामाघनाशिनी नावाची नदी आहे. पूर्वी कामदेव गोकर्णक्षत्री गेला आणि या नदीत स्नान करून शिवाच्याबाबतीत केलेल्या महान्‌ द्रोहातून तो मन्मथ मुक्त झाला."
शौनक म्हणाले,"मदनाने शंकराची कोणती फसवणूक केली? कामाघनाशिनी नावाची नदी कशी निर्माण झाली? कामेश्वर क्षेत्र कसे झाले?"
सूत म्हणाले,"हे शौनका, तू जे विचारलेस ते मी सांगतो. पूर्वी अत्यंत पवित्र असा मदनदेव शिवाच्या क्रोधाग्नीने दग्ध झाला. शिवाबाबत त्याने केलेल्या पापाच्या शांतीसाठी तीन वेळा या भूमीवर आला परंतु या क्षेत्रात प्रवेश करण्यास तो लायक ठरला नाही. तेव्हा त्या क्षेत्राच्या बाहेर राहून तपस्वी व्रत आचरून तप करू लागला. विधीवत्‌लिंग करून दिव्यसहस्त्रवर्षे त्याची पूजा करत तो मदन शिवध्यानपरायण झाला. नंतर प्रसन्न होऊन महादेव प्रत्यक्ष प्रकट झाला. शम्भूला पाहून हर्षयुक्त मदनाने हात जोडून इष्ट अशा वाणीने शिवाचे स्तवन केले.
"हे शिवा, नमस्कार. शुध्द, शान्त अशा हराला नमस्कार. आधार असलेल्या त्रिनेत्र शंकराला नमस्कार. सृष्टी, स्थिती, विनाशाचा हेतू असलेल्या परमात्म्याला, पशूपतीला नमस्कार. पूर्वी देवांच्या शब्दांनुसार मी तुला फसविले. त्या दोषापासून मला शांती व पुन्हा शरीरप्राप्ती मी मागू इच्छितो. या क्षेत्राच्या आत प्रवेश आणि पूजा करावयाची अवस्था हे मला मिळावे अशी माझी इच्छा आहे."
ते बोलणे ऐकून ऐकून शम्भूमहादेवाने प्रेमाने त्या मकरध्वज मदनाला म्हटले, *"वसुदेवाच्या घरी साक्षात्‌ कमलापती विष्णु जेव्हा अवतार घेईल तेव्हा तू त्याचा पुत्र होशील. गोकर्णामध्ये प्रवेश करण्यास तू लायक होशील."* असे म्हणूनभगवान्‌ शम्भूने आपल्या त्रिशूळाने त्यावेळी भूमी खणली. भूमी खणली असता गंगा पाताळातून वर आली. तेव्हा शंकर मदनाला पुन्हा म्हणाले,
*नमः शुध्दाय शांताय हरये परमात्मने।*
*सृष्टीस्थितिविनाशानां कारणाय नमोनमः॥*
हा मन्त्र उच्चारून कामाघनाशिनीत स्नान केल्यावर द्रोहामुळे निर्माण झालेल्या पापातून माणूस क्षणात मुक्त होतो. म्हणून या ठिकाणी स्नान कर. सर्व पापातून मुक्त होशील. शंभूमहादेवाचे ते बोलणे ऐकून विधीवत्‌ स्नान केल्यावर त्या क्षणापासून निर्मल, शांत, शिवभक्तीयुक्त होऊन कामदेव शिवस्तुतीपरायण झाला.
हरशम्भो, महादेव विश्वेशामरवल्लभ, शिवशंकर सर्वेशभक्तवत्सल पाहिमाम्‌। अशा प्रकारे स्तुती करून त्याने मोठया भक्तीने दुसरा वर मागितला."हे प्रभो, या लिंगाची पूजा कामनापूरक होवो, कामेश्वर या नावाने सर्वसिध्दीदायक होऊ दे, अघनाशन नावाची हीनदी नद्यांमध्ये श्रेष्ठ ठरो. चैत्र महिन्याच्या शुक्ल त्रयोदशीला जो मनुष्य या नदीत स्नान करून कामेशाला भजेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत." असे कामदेवाने म्हणताच शंकरांनी उत्तर दिले,"हे मन्मथा, तू जे म्हटलेस तसेच सर्व होईल. जो मनुष्य ब्रह्महत्या, गुरुपत्नीशी द्रोह करणारा, सुवर्णचोर असेल किंवा सुरापान वा अनेक पापांनी युक्त असेल तो अघनाशिनी नदीत स्नान करून कामेशाची पूजा करेल तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तो सर्वपापमुक्त होऊन गोकर्णयात्रा करण्यास लायक होईल. ही कथा पापी माणसाची, तर सन्मार्गाने जाणार्‍याची काय अवस्था सांगावी?" असा वर कामदेवाला देऊन शिव त्याला पुन्हा म्हणाला,"अरे माझ्याबरोबर गोकर्णात ये आणि मला स्मर." हे शिवाचे बोलणे ऐकून मदन त्याच्यासह गोकर्णक्षेत्री गेला आणि तेथील सर्व गोष्टी शिवात्मक पाहून, आपण कृतकृत्य झालो असे मानूनतप आचरू लागला. कोटितीर्थाच्या हरिहरेश्वरापासून पश्चिम दिशेला पवित्र आश्रम बनवून कामदेव तेथे तीर्थाच्या पुढयात लिंगाची स्थापना करून निराहार, जितेन्द्रिय होऊन शिवाची आराधना करू लागला. दिव्यसहस्त्रवर्षे तशाप्रकारे तो तेथे राहत असता पुन्हा शिव गौरीसमवेत प्रत्यक्ष प्रकट झाला आणि हे शौनका, त्या प्रामाणिक व सुंदर अशा मदनाला म्हणाला,"तुला जे हवे ते माग, माझ्याकडून वर माग." हे ऐकून मदनाने डोळे उघडून देवाला पाहून नमस्कार केला, त्याची स्तुती केली व आपले मनोगत देवासमोर व्यक्त केले."हे देवदेवेशा, मी पूजिलेले हे लिंग माझ्या नावाने ओळखले जावे. ते पूजा करणार्‍यांचे मनोरथ पूर्ण करणारे होवो. मी निर्माण केलेले हे तीर्थ कामतीर्थ या नावाने दर्शनाने, स्पर्शाने वा स्नानाने इच्छापूर्ती करणारे व मोक्ष देणारे होवो. तुझ्या प्रसादाने, हे प्रभो, मी सर्वव्यापी व सिध्द झालोआहे." असे मदनाने म्हटल्यावर, त्रिपुरारी शिव पुन्हा म्हणाला,"हे मदना, ऐक. चैत्रशुक्लत्रयोदशीला येथे स्नान करून कामदेवाला जे भजतील त्याची सर्व ईप्सिते पूर्ण होतील." अशा प्रकारे त्याला वर देऊन महादेव तेथेच अंतर्धान पावला. कामदेवही त्या वराने धन्य होऊन आपल्या इच्छित स्थळी गेला. असे हे कामेश्वर नावाचे लिंग ज्याच्या दर्शनामुळे व पूजनाने सर्व इच्छा पूर्ण करणारे व मरणान्ती मोक्षद आहे.
सूत म्हणाले, राजा, ऐक. मी तुला प्राचीन कथा सांगतो. पूर्वी शम्भू नावाचा कलिंगदेशीय ब्राह्मण होता. तो अत्यंत दुर्जनांच्या संगतीत राहणारा, दुष्ट, दुराचारी, नेहमी चोरी करण्यात वाकबगार, लोकांना फसवण्यात मग्न असे. आपली ब्राह्मण वृत्ती सोडून नेहमी शूद्रवृत्तीचा राही. अशाप्रकारे तो वागत असता एकदा त्या दुष्ट ब्राह्मणाने रात्रीच्या वेळी कामातुर होऊन, मोहाने पापपीडित होऊन आपल्या मातेशीच समागम केला.लोकांनी दूषणे दिल्यामुळे त्याला पश्चात्ताप झाला. आईला बरोबर घेऊन सगळीकडे फिरला. पापमुक्त होण्यासाठी सर्व ऋषीमुनींच्या आश्रमात गेला. परंतु त्या सर्व मुनींनी त्याची निर्भत्सना करून तिरस्कार केला. तेव्हा दुर्वास ऋषींना पाहून वारंवार खुश करून प्रार्थना केली."मी पापी आहे, पापकर्मी असून मुनींनी मला दूषणे दिली आहेत. हे मुनिश्रेष्ठा, अज्ञानामुळे मातेशी संग केला. या पापाच्या शुध्दीसाठी हे मुने, मला उपाय सांगा. हे दयानिधे, पापी अशा माझ्यावर कृपा करा."
दुर्वास म्हणाले,"तू केलेल्या पापाला कधीही क्षमा नाही. हे ब्राह्मणा, तुझ्याशी सम्भाषणही खरे तर पापकारक आहे. तरीही तुझ्या पापाला प्रायश्चित्त आहे. गोकर्ण नावाचे पापनाशक असे एक महाक्षेत्र आहे. पश्चिम समुद्राच्या तीरावर साक्षात्‌ शिव वास करतो आहे. तेथे सर्व पापांचे क्षालन करणारी कामाघनाशिनी नदी आहे. शिवाच्यात्रिशूळाने निर्मित मदनाच्या पापशांतीसाठी झालेली ही नदी होय. तिच्यात स्नान केल्यावर कामदेव शिवद्रोहातून मुक्त झाला. तेव्हा हे ब्राह्मणा, तू मातेसह आजच गोकर्णक्षेत्राला जा. त्या नदीत स्नान करून पंचाक्षरी मंत्राचा जप कर. तेथे कामेश्वर लिंगाची विधीवत्‌ पूजा कर. असे बारा वर्षे व्रताचा भंग न करता आचरण कर. असे केल्यावर तू पापमुक्त होशील."

दुर्वास ऋषींचे ते बोलणे ऐकून आणि त्यांना प्रणाम करून नंतर तो ब्राह्मण आईसह गोकर्णक्षेत्री गेला. कामाघनाशिनी नदी पाहून, तेथे दीर्घकाळ राहून, त्या नदीत स्नान करून, कामेश्वराची पूजा करून, आईसह पंचाक्षरी मंत्राचा जप करत राहू लागला. नंतर बारा वर्षांनंतर कोटितीर्थामध्ये त्या ब्राह्मणाने प्रवेश केला. स्नान करून तेथे महाबलाच्या लिंगाची पूजा करून तो शम्भू ब्राह्मण कृतकृत्य झाला. नंतर मातेसह आपल्या नगरी जाऊन, सदाचारी राहून ब्रह्मध्यानपरायण झाला. अनेक सुखोपभोग भोगून मरणानंतर त्याने मोक्ष मिळविला. अशा प्रकारे माणसाच्या हातून महापातक घडले तरी या कामाघनाशिनी नदीत स्नान करून कामेश्वराची पूजा केली असता त्या पापातून मनुष्य मुक्त होतो आणि या नदीचे व कामेश्वराचे हे माहात्म्य जो ऐकेल तो सर्वपापमुक्त होईल.
==========================📓
*सं :- श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...