Sunday, 21 January 2018

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते

*'न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते'*
----------------------------------------------

हा भगवद्गीतेच्या चवथ्या अध्यायातील अडतिसाव्या श्लोकाचा पूर्वार्ध. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या जगात ज्ञानासारखे पवित्र असे काहीहि नाही. सारे यच्चयावत ज्ञान ज्याच्या पदी विसावा घेते ते सच्चिदानंदस्वरूप श्रीकृष्ण ज्या ज्ञानाची मुक्तकंठाने एवढी थोरवी गातात ते ज्ञान म्हणजे कोणते ज्ञान याचा उलगडा त्याच श्लोकाच्या उत्तरार्धावरून होतो.

*'तत्स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्मनि विन्दति'* हाच तो उत्तरार्ध. ते ज्ञान, योग ज्याला पूर्णपणे साधला आहे, योगात ज्याला पूर्णपणे सिद्धि प्राप्त झाली आहे त्याला कालांतराने प्राप्त होते. अर्थात भगवंत ज्या ज्ञानाची थोरवी गातात, ज्याच्या पावित्र्याचा ते निर्वाळा देतात, ते ज्ञान म्हणजे लौकिक ज्ञान नव्हे, तर ते परमात्मस्वरूपाविषयीचे ज्ञानच होय हे उघड आहे.

खुद्द भगवंतांनीच दहाव्या अध्यायात *'अध्यात्म विद्या विद्यानाम्'* असे म्हटले आहे. त्यावरूनहि अध्यात्म विद्या हीच खरी विद्या होय, तेच खरे ज्ञान होय, हे अगदी स्पष्ट आहे.

पण एवढ्या खोलात शिरण्याचे आपणाला काही कारण नाही. ज्ञानाचा साधा लौकिक अर्थ जरी घेतला तरी तेहि ज्ञान अतिशय पवित्र आहे, यात मुळीच संशय नाही. ज्ञानाची थोरवी अतिशय मोठी आहे. ज्ञान ही महान संपदा आहे, तो एक अमोल ठेवा आहे. दिल्याने ते वाढते, आणि साठवून ठेवल्याने नष्ट होते.

*अपूर्वः कोपि कोशोयं विद्यते तव भारती ।*
*व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात् ।।*

ज्ञान हेच माणसाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अज्ञानी माणूस हा पशुसमान आहे. ज्ञानाच्या जोरावरच जग एवढे पुढे गेले आहे. अनेक शोध लागले आहेत. त्यायोगे माणसाच्या सुखसोयीत भर पडली आहे. त्याचे जीवनमान उंचावले आहे. विज्ञानाने अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. पडद्यावरील चित्रांना बोलायला लावले आहे आणि मानवी कंठातून निघालेल्या सुस्वर आलापांना एबोनाइटच्या तबकडीत कोंडून ठेवले आहे. टेलिफोन, तारायंत्र, रेडिओ आणि टेलिव्हिजन यांनी काळ व अंतर यांना जिंकले आहे, जगाची दोन टोके एकत्र आणली आहेत.

ज्ञानाचे स्वरूप परमेश्वराप्रमाणेच शाश्वत आहे.

*नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।"*
*न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।*

त्याला शस्त्रे तोडू शकत नाहीत, अग्नि जाळू शकत नाहीत, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा शोषू शकत नाही. शिवाजीचे राज्य गेले, पण रामदासांचा दासबोध कायम आहे. विजयानगरचे साम्राज्य गेले, पण त्या साम्राज्याच्या विजयकाली लिहिण्यात आलेली ज्ञानेश्वरी अजूनहि लोकांच्या हृदयावर साम्राज्य गाजवीत आहे. एवढेच काय पण ज्या पार्थाला भगवंतांनी गीता सांगितली, आणि ज्याचा सारा मोह गीताश्रवणाने नाहीसा होऊन ज्याने कौरवांशी अठरा दिवस पर्यंत घनघोर युद्ध केले तो पार्थ आज कोठे आहे? त्याचे राज्य त्याच्यासकट काळाच्या उदरात गडप झाले, पण भगवद्गीता मात्र युगायुगातून मानवजातीला अमर संदेश देत आपल्या दैदिप्यमान तेजाने अजूनहि तळपत आहे. अशी आहे ज्ञानाची थोरवी..
========================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...