Tuesday, 23 January 2018

उदकशांती

*उदकशांती*
---------------
प्रथम पंचगव्य यजमानांना देउन शरीरशुद्धी केली जाते. त्यानंतर आपली कुलदेवता, ग्रामदेवता, सद्गुरू, वास्तुदेवता, आपण ज्या ठिकाणी राहत असतो त्या परिसरातिल देवता या सर्वांना नारळ-विडा ठेवला जातो. प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन येणे अशक्य असल्याने घरातच देवांसमोर हे नारळ-विडे ठेवले जातात. त्यांना नमस्कार करून, घरातील सर्व वडिलधार्‍या मंडळींना नमस्कार करून, आलेले गुरूजी यांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरूवात होते. काही मंगल श्लोकांचे पठण करून तिथी, वार, नक्षत्र, योग, करण या सर्वांचा उल्लेख म्हणजेच पंचांग पठण केले जाते. सर्व कुटुंबिय मंडळींना सुद्दृढ आयुष्य, आरोग्य प्राप्त होउन सर्व प्रकारची शांतता मिळावी. म्हणून आजच्यादिवशी ब्राम्हणांना बोलाऊन उदकशांत करतो. असा संकल्प करतात. संकल्प करून झाल्यावर सर्व कार्य निर्विघ्नतेने संपन्न होण्यासाठी गणेश पूजन करतात.
सुपारीवर किंवा नारळावर गणेशपूजन केले जाते. त्यानंतर पुण्याहवाचन केले जाते. म्हणजे आलेल्या गुरुजींकडून हा दिवस आम्हाला पुण्यकारक, स्वस्तीकारक, ऋद्धिकारक, श्रीकारक व कल्याणकारक असो. असे आशीर्वाद दिले जातात. नंतर आलेल्या गुरुजींची उदकशांतीसाठी नियुक्ती केली जाते. त्याला आचार्यवरण असे म्हणतात. येथपर्यंतचाविधी यजमानांकडून केला जातो. व पुढचेकार्य प्रामुख्याने गुरूजी करतात. पिवळीमोहरी, पंचगव्य व शुद्धपाणी घरात प्रोक्षण करून गृहशुद्धी केली जाते. नंतर मुख्य कार्यास प्रारंभ होतो.
सिकता म्हणजे वाळू , वाळूचे स्थंडिल(ओटा) घालून त्यावर दूर्वा, दर्भ घालून त्यावर फ़ुले व फ़ळे ठेवतात. चार बाजुला विशिष्ट संख्येने दर्भाची परिस्तरणे घालतात. कलश(ब्रह्मपात्र) शुद्धीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. उ. आम्लपदार्थ संयोगाने शुद्धी, तसेच भस्माने, अग्निसंपर्काने शुद्धी त्यात एक प्रक्रिया म्हणजे कलश धुपवून तो शुद्ध करणे. कित्येक यज्ञामध्ये विशेषत: मृत्तिकापात्र शुद्धिकरता घोड्याचा नि:श्वास अथवा वनस्पतिचा धूप घालून पात्र धुपवणे. हि प्रक्रिया सांगितली आहे. अशी प्रक्रिया केल्यामुळे आतिल भागात लपलेले सूक्ष्म जीवसुद्धा धुराच्या वासाने अथवा नि:श्वासाच्या हिसक्याने बाहेर पडतात. उदकशांतिच्यावेळी कोळश्यांवर धूप/ऊद घालून त्या धुराने कलश किंवा कळशी धुपवतात. त्यामधे शुद्धपाणी भरून षडंगसहित वेदपुरूष ब्रह्मदेवतेचे आवाहन करतात. त्याच कलशात ब्रह्मदेवाचे षोडशोपचार पंचामृती पुजा करतात.
या षडंगांची माहिती पुढिल प्रमाणे—
“ब्रह्मदेवतेला चार वेदांचे प्रतिक म्हणून चार मुखे दाखवतात. अनुक्रमे १)ऋग्वेद २)यजुर्वेद ३)सामवेद ४)अथर्ववेद. अशा ब्रह्मदेवाला(वेदरूपी) छंदशास्त्र पायाच्या रुपात आहे. कल्पसुत्रे, धर्मसूत्रे वेदांगज्योतिष डोळ्याच्या स्थानी. वेदार्थ सांगणारे निरुक्त कानाच्यास्थानी. उच्चारण कसे करावे हे शिकवणारा शिक्षाग्रंथ नाकाच्यास्थानी. व पाणिनीसह प्राचीन व्याकरणे ही मुखाच्या रुपात आहेत. अशी ही सहा अंगे मिळून त्यांना षडंग म्हटले जाते. वेदाभ्यास करताना मंत्राचा छंद कोणता आहे त्याची लक्षणे माहित असणे आवश्यक आहे. सुप्रसिद्ध असा गायत्रीमंत्र गायत्री हे पद एका छंदाचे बोधक आहे. ८-८ अक्षरांचे तीन चरण अशी चोविस अक्षरे गायत्री छंदाच्या मंत्रात येतात. त्याचप्रमाणे ८-८ अक्षरांची ४ चरणे अशी ३२अक्षरे अनुष्टुप छंदात येतात. अशीच उष्णिक, त्रिष्टुप, बृहती, पंक्ती इ. छंदनामे आहेत. त्यांची लक्षणे या ग्रंथात सांगितली आहेत.
छंदाचा अभ्यास केल्यामुळे चरण कोठे संपवायचा याचे ज्ञान होते. याच छंदशास्त्रास उपयुक्त असा वृत्तलक्षण हा अभ्यासही महत्वाचा आहे. संस्कृत भाषेतील पंचमहाकाव्ये इ. समजुन घेताना व नविन रचना करताना याचा खूप उपयोग होतो.
“श्रौतसूत्रांमध्ये सोमयाग, वाजपेय अशा श्रौताग्नि साध्य यज्ञांचे निरुपण आहे. त्याचबरोबर दर्शपौर्णमास पिंडपितृयज्ञ यांचेही मार्गदर्शन केले आहे. गृह्यसूत्रात गर्भाधानापासून श्राद्धापर्यंतचे संस्कार वर्णिलेले आहेत. व धर्मसूत्रात धर्मशास्त्र विषयक नियम सांगितलेले आहेत. वेदांतज्योतिषात ऋतु, अयन यांची गणना नक्षत्र देवतांचे वर्णन आले आहे. वेदमंत्रांचा अर्थ लावताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण हजारो वर्षांपुर्वीचे मंत्रातील शब्दांचे अर्थ सांप्रद तशाच वापरल्या जाणार्‍या शब्दांनी व्यक्त होईलच असे नाही. म्हणुनच दर्बोध शब्दांचा संग्रह त्यास निघंटु म्हटले जातात. त्याचा वापर करावा लागतो. निरुक्त ग्रंथात काही मंत्रांचे व काही संज्ञांचे वैदिक परंपरेला अपेक्षित अर्थ कोणते ते सांगितले आहेत. ह्रे निरुक्त यास्काचार्य प्रणित आहे. वैदिक पठण-पाठण परंपरेत उच्चारणात अतिशय महत्व आहे. कुठल्या व्यंजनांचा /वर्णाचा/स्वराचा उच्चार कसा करावा हे समजुन घेणे हे शिक्षा ग्रंथाचे प्रयोजन आहे. कोणता वर्ण मुखाच्या कोणत्या भागातुन उच्चारला पाहिजे हे शास्त्र याचे ज्ञान प्राचिन निश्चित होते. म्हणुनच शास्त्रोक्त शिक्षण घेतलेला वैदिक मग तो काश्मिरचा असो अथवा कन्याकुमारीचा कोणत्याही मंत्राचे पठण जसे काश्मिरमधला वैदिक करेल तसेच कन्याकुमारितला करेल. व्याकरण हे एक महत्वाचे अंग आहे. पाणिनीपूर्व व्याकरणकारांची नावे पाणिनीसूत्रात मिळतात. यातिल बर्‍याच वैय्याकरणांच्या मताचा समन्वय करून पाणिनीमुनिंनी व्याकरण शास्त्राची रचना केली. ही सूत्रे एवढी अचूक आहेत जणू गणित तज्ञाला गणिताप्रमाणे वाटावे व कायदे तज्ञाला कायदे कलमांप्रमाणे वाटावे. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार संगणकाला सर्वात जवळचीभाषा ही संस्कृत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे संगणकातील प्रणाली प्रमाणे(प्रोग्राम प्रमाणे) सूत्रबद्ध असलेले भाषेचे व्याकरणनियम होय. चुकिचा वापरलेला शब्द वज्रनामक आयुधाप्रमाणे यजमानाचा घात करू शकतो हे टाळण्यासाठी शब्दाची व्युत्पत्ती समजून घेण्याकरता व्याकरणशास्त्र उपयोगी पडते.
*पाणी व ब्रह्म यातिल साधर्म्य म्हणून पाण्याची योजना.*
वेदांमध्ये “आपोवैदेवानां प्रियं धाम” म्हणजे पाणी हे देवतांचे आवडते स्थान आहे. “आप:सर्वस्य भेषजी:” म्हणजे पाणी सर्व रोगांवर औषध आहे. अशा अर्थाची वचने आढळतात. त्या आधाराने पाणी व ब्रह्म यांना एकरूप मानले आहे. ब्रह्म ज्याप्रमाणे मुळचे निराकार परंतु ज्याचा आश्रय घेईल तसा त्याचा आकार धारण करते. त्याप्रमाणे पाणीसुद्धा मुळचे निराकार व ज्या पात्रात जाईल त्याच्या आकारानुसार स्वत:चा आकार बनवते. म्हणून कळशी/कलश धुपवून त्यात समंत्रक पाणी भरले जाते. या पाण्यातच ब्रह्मदेवतेचे पूजन केले जाते. विष्णू, शंकराप्रमाणे ब्रह्मदेवतेचे पूजन मुर्तीच्या रुपात न होता पाणी अथवा दर्भाच्या माध्यमातूनच होते. षोडशोपचार पूजा झाल्यावर दूर्वा व दर्भ यांनी कलश/कळशी आच्छादित केली जाते. या दर्भाच्या आच्छादनास ब्रह्मा असे म्हणतात. दर्भ व ब्रह्मा हे एकदमच उत्पन्न झाले आहेत असे वचन आहे. (विरिंचिना सहोत्पन्न) म्हणून या दर्भमुष्टीस ब्रह्मा असे म्हटले जाते. चार दिशांना १-१ गुरूजी नियुक्त केले जातात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद यांच्या संहितेतला आद्य मंत्र म्हणून उदकशांतितील मुख्य मंत्र पठणास प्रारंभ होतो.
यात राक्षोघ्न म्हणजे राक्षसिवृत्तीचा नाश करणारे मंत्र म्हटले जातात. द्वेष करणार्‍यांना रुद्राच्या दाढेत देतो (जबड्यात) देतो. असे पालुपत असलेल्या प्रार्थनाही येतात. चार मुख्यदिशा व त्यांचे अधिपती यांना वंदन करून प्रार्थना केली जाते. येथे उदकशांतिचा पहिला भाग संपतो.   दुसर्‍या भागाला तैतिर्यब्राम्हणातील मंत्राने सुरूवात होते. यात सुरूवातिलाच “दधिचीऋषिंच्या अस्थिंपासुन इंद्राने वज्र बनविले ती कथा येते. पुढे पाणी शुद्धीकरणाशी संबंधित मंत्र येतात. विश्वनिर्मितिचा संकल्पनेचा विचार मांडणारे गासादीय सूक्त सुद्धा यात येते. येथे दुसरा भाग संपतो.
तिसर्‍या भागाला नक्षत्र पाढा असे म्हणतात. कारण- यामधे नक्षत्रांची व नक्षत्रदेवतांची स्तुती आहे. वेदकाळात कृत्तिका नक्षत्रापासून नक्षत्र गणनेला सुरूवात होत असे. म्हणून कृत्तिका नक्षत्र व त्याची देवता अग्नि यांच्या स्तुतीने नक्षत्र पाढ्याला सुरूवात झाली आहे. पुढे क्रमाने रोहिणी, मृग या क्रमाने भरणी पर्यंत स्तुतिमंत्र येतात. मध्ये पौर्णिमा व शेवटी अमावास्या यांचिही स्तुती आहे. तसेच सांप्रद प्रचलीत नसलेले अभिजित हे अठ्ठाविसावे नक्षत्रसुद्धा याक्रमात येते. राशींपेक्षा नक्षत्रे अधीक सूक्ष्म फ़ले देतात. येथे नक्षत्रपाढा पूर्ण होतो.
चौथ्या भागाला म्हणजेच शेवटच्या भागाला स्वाहाकार असे म्हटले जाते. अगोदर सांगितल्याप्रमाणे पाण्यात जो अग्नि असतो त्याला दिलेल्या या आहुती आहेत. नक्षत्र पाढ्यातील नक्षत्रांना व देवतांना स्वाहाss असे म्हणून आहुती दिली जाते. तसेच प्रत्येक नक्षत्रात महत्वाचे जे तारे त्यांच्या देवतांनाही स्वाहाss म्हणून आहुत्या दिल्या जातात. शेवटी ब्रह्मदेवता, अग्नि, पृथ्वी, वनस्पती वाचा, वाचस्पती व विष्णू यासर्वांना त्रिवार नमस्कार केला जातो. याठिकाणी उदकशांत पठणाचा कार्यक्रम पूर्ण होतो.
नंतर आचार्य ब्रह्मदेवतेचे पंचोपचार पूजन करतात. सर्व ऋत्विज कलशाला हातलाउन मंत्र म्हणून कलशाचे उत्थापन करतात. कलशातल्या पाण्याने यजमान कुटुंबियांवर अभिषेक केला जातो. व कलशातील पाणी तीर्थ म्हणून पिण्यास दिले जाते. यजमानांकडून गुरूजिंना दक्षिणा प्रदानाचा संकल्प केला जातो. पूर्वदिशेच्या गुरूजिंना सुवर्ण, दक्षिणदिशेच्या गुरूजिंना रजत(चांदी), पश्चिमदिशेच्या गुरूजिंना कांस्य(कासे) व उत्तरदिशेच्या गुरूजिंना वस्त्र अशारूपात दक्षिणा किंवा व्यावहारिक मूल्याच्या रूपात दक्षिणा दिली जाते. आशीर्वाद मंत्र म्हणून गुरूजी कर्माचे फ़ल प्रदान करतात. यजमान ब्राह्मणांकडून ‘शांती, पुष्टी, तुष्टी असो ’ असे संस्कृत मधून म्हणण्याची विंनंती करतात. त्यानुसार गुरूजी प्रतिवचन देतात. कर्म विष्णूला अर्पण करून कर्म सांगतेला दोनवेळा आचमन करून हा कार्यक्रम संपूर्ण होतो.
‘गृहशुद्धी’ हे ‘उदकशान्ती’चे मुख्य उद्दिष्ट असले तरी त्यासोबतच आरोग्यप्राप्ती व शारीरिक, मानसिक बलप्राप्ती हि सुद्धा उद्दिष्टे आहेत. वास्तुशान्तीचे मुहूर्त नसताना गृहप्रवेश करून राहायला जाणे अत्यावश्यक असल्यास उदकशांती करतात. ( हा तत्कालीन उपाय आहे; याने वास्तुशान्तीचे फळ मिळणार नाही पण वास्तुमुहुर्त मिळेपर्यंत घरात वास्तव्य व अन्नभक्षणादि दोष लागणार नाहीत. पुढे लाभणाऱ्या वास्तुमुहुर्तावर वास्तुशांती करणे मात्र आवश्यक आहे.) घरी कुणाचे निधन झाल्यासही गृहशुद्धी करिता उदकशांती करतात. लहान जागेत,कमी साहित्यात, त्यामानाने कमी वेळात, होमहवनाच्या मानाने कमी धूर व मंत्रांना महत्व देणारी अशी हि उदकशांती दरवर्षी नित्यनेमाने करणारेहि भक्त आहेत.

====================================
सं :- श्रीधर कुलकर्णी
ज्ञानामृत मंच समुह

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...