Monday, 22 January 2018

लवंग

*लवंग*
-----------

या झाडाला संस्कृतांत लवंग हेंच नांव असून लवंग, लविंग, लवंग, लौग, लंग, लोंग, व रोंग हीं त्याचीं दुसरीं एतद्देशीय नांवें आहेत. दक्षिणहिंदुस्थानांत याला किरांबु व करंपु ही नांवेहि आहेत. मॅले भाषेंत लवंगेला बुंग, लवंग असें म्हणतात, बुंग याचा अर्थ 'निरनिराळ्या' रंगाचें (विशेषत: फूल) व लवंग याचा ''गदा'' असा आहे. यावरून लवंग हा शब्द त्या भाषेंतून घेतला असावा असें दिसतें. लवंगेचा उल्लेख रामायणांत व चरकामध्यें आला आहे त्यावरून तो मूळ संस्कृत शब्द असावा.

अति प्राचीन काळीं चीन लोकांचा हिंदुस्थान व अंबोयना येथें व्यापार होता. त्याचप्रमाणें अरब लोकांचाहि हिंदुस्थान व मॅले बेटें येथें व्यापार होता. व प्राचीन लेखकांनीं व्यापार्‍यांच्या राष्ट्रीयत्वावरून व्यापारी मालाला सुद्धां त्या देशाचेंच नांव दिलेलें आढळतें. याच कारणामुळें पालस यानें 'लवंगा हिदुस्थानांतून आणल्या' असें लिहिलें आहे. वास्तविक पहातां हल्ली सुद्धां लवंगांची लागवड हिंदुस्थानांत कोठेंहि पद्धतशीर होत नाही.

विमाफेट्टा यानें १५१२ सालीं मोलुक्का येथील लवंगांची लागवड पाहून तिच्याबद्दल पूर्ण माहिती दिली आहे. ऐने-ई-अकबरीमध्यें (१५९०) लवंगांची किंमत दिली आहे. यावरून असें दिसतें कीं, त्या काली सर्व हिंदुस्थानगर लवंगांची माहिती असून बर्‍याच मोठया प्रमाणावर लवंगांचा व्यापार हिंदुस्थानांत होत होता. १६०३ सालीं ईस्ट इंडिया कंपनी लवंगांचा व्यापार करीत असे. १७७० साली लवंगांची रोपें न्यूगिनीमध्यें नेलीं व नंतर तेथून वेस्ट इंडीज बेटांत गेलीं.

लवंगा म्हणजे लवंगांच्या झाडाच्या न उमलेल्या वाळलेल्या कळ्या होत. या कळ्या वाळल्या म्हणजे अंत:पुष्पकोशाचा गोळा बनतो; व पुष्पावरणाच्या चार दांतांमध्ये तो असतो. पहिल्यानें या कळ्या हिरव्या असतात. नंतर त्या पिंवळ्या होतात, व शेवटीं त्या झकझकीत तांबडया अगर पिंगट होतात. जर त्या झाडावर जास्त दिवस राहूं दिल्या तर कळी उमलते व लवंगेच्या देंठाला बोरासारखा आकार येतो. त्यांत एक अथवा दोन बिया असतात. या बिया ताज्या असतात तेव्हांच १२ इंच अंतरावर लावतात. कारण वाळल्यावर त्या निर्जीव होतात. पांच आठवडयांत या बियांची रोपें होतात व तीं ४ फूट उंच झालीं म्हणजे दुसर्‍या जागेंत २० पासून ३० फूट अंतरावर लावतात; याकरितां जमीन भुसभुसीत असून तिला निचरा चांगला पाहिजे. दलदलीच्या जमिनीवर लवंगांची झाडें मुळींच होत नाहींत. नुसत्या चिकण अगर नुसत्या वाळूच्या जमिनीवरहि हीं झाडें चांगलीं होत नाहींत. या झाडांचें उत्तम पीक येण्यास माती व वाळू यांच्या मिश्रणाची जमीन लागते. या पिकांकरितां एखादी दरी जास्त चांगली असते; परंतु ती वर दाट छाया असली तर मात्र त्यास धोका असतो. या झाडांचें सोसाटयाच्या वार्‍यापासून संरक्षण करणें जरूर आहे; व याकरितां ज्या बाजूनें वारा येतो त्या बाजूस झाडांचें कुंपण असणें श्रेयस्कर आहे. पावसाळ्याच्या आरंभी या झाडांची लागण सुरू करतात. पहिल्या दोन तीन वर्षांपर्यंत छायेची जरूर असते. तीन वर्षांनंतर छाया काढून टाकतात. सहाव्या वर्षी त्यांनां बहर येतो व १२ व्या वर्षी पीक काढतां येतें. जरी १५० वर्षेपर्यंत या झाडापासून पीक काढतां येतें तरी २०-२५ वर्षांनंतर त्यांच्यापासून नफा होण्यासारखें पीक निघत नाहीं. लवंगा हातानें तोडतात अगर त्या झोडून गोळा करतात. प्रत्येक झाडापासून ६ अथवा ७ पौंड वाळलेल्या लवंगा निघतात. झाडावरून काढल्यानंतर गहिरा तपकिरी रंग येईपर्यंत लवंगांनां धूर देतात व नंतर उन्हांत वाळवतात. नंतर शेंकडा ६० या प्रमाणांत त्यांचे वजन कमी होतें. मसाल्याचा जिन्नस म्हणून लवंगांनां व्यापारी दृष्टया महत्त्व आहे. लवंगांपासून तेलहि काढतात व त्याकरितां पेंबाच्या लवंगांचा उपयोग करतात. लवंगांच्या तेलाचा उपयोग अत्तरें काढण्याकरितां करतात.
========≠================📓
*सं:- श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...