Monday, 24 September 2018

वज्रगोपिकानाम:-१३

*वज्रगोपिकानाम*
--------------------------
       *भाग :- १३*

श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार नारद द्वारकेत गेले पण त्यांना तिथे पदरज भेटले नाही म्हणुन शेवटी निराश होऊन नारद परत श्रीकृष्णाकडे आले व सांगितले की, 'देवा ! पुष्कळ भक्त भेटले, पण कोणी पदरज देण्यास तयार नाही.' 
*श्रीकृष्ण म्हणाले,* 'नारदा, तुम्ही वृंदावनात गेला होता का ?' 

 *नारद* - त्या अडाणी खेडयात राहणार्‍या लोकांकडे जाऊन काय उपयोग ? 
 *श्रीकृष्ण* - एक वेळ तेथे जाऊन तर या ! 
देवर्षी त्या व्रजभूमित पोहोचले. त्यांना पाहताच सर्व गोपिका एकत्र झाल्या व आतुरतेने विचारू लागल्या, 'देवर्षे, तुम्ही कोठून आला ? तुम्ही सर्वत्र संचार करता, अशात कधी द्वारकेला गेला होता का ? आमचा हृदयनाथ जो श्रीकृष्ण त्याचा काही समाचार सांगू शकता काय ? 
 *नारद* - अहो, मी थेट द्वारकेहूनच येथे आलो, श्रीकृष्णाच्या मस्तकात फार पीडा होते आहे. 
 *गोपिका* - अरेरे, तेथे कोणी उपाय जाणणारा वैद्य नाही काय ? 
 *नारद* - वैद्य आहे, पण त्यांनी सांगितलेले औषध उपलब्ध होत नाही. 
 *गोपिका* - असे न मिळणारे औषध तरी कोणते आहे ते ? 
 *नारद* - कोणी श्रीकृष्णाचा प्रेमी असेल त्याने आपली पदधूली दिली तर त्याची पीडा दूर होईल. 
 *गोपिका* - पाहिजे तेवढी धूली घेऊन जा. 
सर्वांनी आपल्या पायाची धूळ काढून दिली. 

 *नारद* - तुम्ही फार भोळ्या दिसता. आपण काय करतो याची कल्पना तरी तुम्हाला आहे काय ? श्रीकृष्ण साक्षात परब्रह्म परमात्मा आहे. आपली चरणधूली त्याच्या मस्तकाला लावली तर नरकात जावे लागेल याचा विचार केला काय ? 
 *गोपिका* - ह्या सर्व गोष्टीचा विचार नंतर, प्रथम तुम्ही लगेच द्वारकेला ही घेऊन जा, त्याची वेदना दूर होऊ द्या, त्याला सुख झाले तर आम्ही अनंतकाल पावेतो नरकात राहू, तो नरकच आम्हाला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याला दुःख होत असता आम्ही स्वर्गात राहिलो तर तो स्वर्गही नरकच आहे.' 
हे खर्‍या प्रेमाचे स्वरूप आहे. 'प्रेमात औदार्य असते. तेथे सर्वच दान आहे, तृप्ती आहे. 'यत्प्राप्य न किञ्चिद्वाञ्छति' असे आरंभीच सूत्र पाचमध्ये म्हटले आहे. प्रेमी मागेल तरी प्रेमच मागेल, देईल तर सर्वस्व देईल. 
हृदयात अन्य कामना धारण करणारा भिक्षुक असतो. तो मागतच असतो. आपल्यात तो अभावच अभाव म्हणजे अपूर्णता पाहत असतो. तेथे तृप्ती नसते. प्रेम प्राप्त झाले असता तो प्रेमी सिद्ध होतो, अमृत होतो, तृप्त होतो, असे चौथ्या सूत्रात म्हटलेच आहे. कामी हा भोग्य वस्तूपासून स्वतःस भिन्न समजतो. प्रेमी त्या प्रेमविषयाला आपला आत्माच समजतो. म्हणून त्याच्याच सुखाने तो सुखी होतो. स्वसुख हे त्याच्या सुखाहून त्याला वेगळे वाटत नसते.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...