Monday, 24 September 2018

श्राध्ददेव व पितृवर्णन:-११

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
--------------------------------
        *भाग :- ११..*

हें मार्कंडेया, युगायुगाचे ठायीं जेव्हां जेव्हां धर्माचा र्‍हास होतो त्या त्या वेळीं प्रजापालक जो मनु तो या सप्तपितरांची ज्यात विशेष पूजा केली जाते अशा प्रकारची श्राद्धे लोकांत प्रवृत्त करतो. हे द्विजश्रेष्ठा, या सातही पितृगणांत यम हा प्रथम उत्पन्न झाला असल्यामुळें वेदांत त्याला पितृपति अशीच संज्ञा दिली आहे, व त्याचा हा अग्रमान ध्यानांत आणून त्यालाच " *श्राद्धदेव* " असेही म्हणतात. 

हे मार्कंडेया, आता श्राद्धाचे विधान सांगतो तें ऐक. सर्व पितृश्राद्धांत पात्रे रुप्याची किंवा निदान रुप्याने मढविलेलीं तरी असावीत. कारण रुपे हें पितरांना फार प्रिय आहे. असल्या रजत पात्रांत वाढलेले श्राद्धान्न स्वधाशब्दपूर्वक अर्पण केल्याने पितर फार संतुष्ट होतात.

श्राद्धकाली प्रथम सोम, अग्नि व यम यांचे अग्नीत आहुती देऊन संतर्पण करावे. अग्नि नसल्यास जलांत देणे. याप्रकारे जो भक्तिपूर्वक पितरांचा संतोष करितो, त्याला पितरही संतुष्ट करितात. पितर त्याला शरीर, पुष्टि व विपुल संतति देतात. त्याचप्रमाणे स्वर्ग देतात, आरोग्य देतात. फार काय सांगावे तो जे कांहीं इतर इच्छील तेही सर्व देतात. हे मुने, पितृकार्याचे महत्व देवकार्यापेक्षांही विशिष्ट आहे. कारण, देव हे मोठे चेंगट व प्रसन्न होण्याला कठीण. पितर बिचारे अक्रोध म्हणजे शांत व त्वरित कृपा करणारे असे आहेत. म्हणून स्मृत्यादिकांत देवांपेक्षांही पितरांचा संतोष प्रथम करण्याकडे विशेष कटाक्ष आहे. पितरांपासून लोकांचे फारच श्रेष्ठ कल्याण होते. शिवाय पितरांचा प्रसाद सदा स्थिर आहे म्हणजे त्यांची पूजा केली आणि ते अमुक वेळीं प्रसन्न झालें नाहीत, असें कधीं घडतच नाहीं. यास्तव, हे भृगुकुलोत्पन्ना मार्कंडेया, अशा पितरांना तूं नमस्कार कर. ही गोष्ट तुला विशेष आग्रहाने सांगण्याचे कारण असें आहे कीं, तूं मोठा पितृभक्त आहेस व त्यातूनही, हे ब्राह्मणा, तुझी मजवर विशेषच भक्ती आहे. आज मी तुझे कल्याण करणार आहे व तें कसें तें तुला प्रत्यक्ष पाहाता यावे म्हणून मी तुला दिव्य दृष्टि व अनुभवाचें सामर्थ्य, ही दोन्हीही देतो. हे निष्पापा मार्कंडेया, मी जो मार्ग सांगतो, तो फार सावधचित्ताने ध्यानांत घे. वास्तविक पहाता तू कांहीं सामान्य पुरुष नव्हेस. तूं मोठा सिद्ध आहेस. तथापि देवांची योगगति व पितरांची श्राद्धफलरूपी परागति चर्मचक्षूनें तुला दिसणार नाहीं. असें बोलून तो देवश्रेष्ठ त्याच्या जवळच बसलेल्या मला देवांनाही दुर्लभ अशी विज्ञान सहित दिव्यदृष्टि देऊन त्याला इष्ट त्या मार्गाला गेला. जातांना तो जळत्या आहवनीय अग्नीसारखा झळकत होता. 

हे कुरुश्रेष्ठा, त्या सनत्कुमार देवाच्या प्रसादाने मला जें ज्ञान प्राप्त झालें तें या मृत्युलोकांत मनुष्यांना प्राप्त होणें फार कठीण आहे. याकरिता तूं तें नीट समजून घे...
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...