*श्राध्ददेव व पितृवर्णन*
---------------------------------
*चटकोपाख्यान*
मार्कंडेय म्हणतात - हे भीष्मा, आतां सांगितल्याप्रमाणें सनत्कुमार देव अंतर्धान पावल्यावर त्यांच्या वचनप्रभावानें दिव्यदृष्टि व विज्ञान ही तत्काल माझे ठायीं प्रकट झाली; व त्यांच्या योगाने, हे गांगेया, सनत्कुमारांनीं कुरुक्षेत्रांत कौशिक कुलात जे सात पुत्र आले म्हणून मला सांगितलें होतें ते मला प्रत्यक्ष दिसू लागले. या साताभावांपैकीं ब्रह्मदत्त नांवाचा जो सातवा भाऊ होता तो राजा झाला. याचा स्वभाव व आचरण यांवरून हा ब्रह्मदत्त पितृवर्ती या नांवानें विशेष प्रख्यात होता. हा कांपिल्य नामक श्रेष्ठ नगरींत राहाणारा जो पृथ्वीपति अणुह त्यापासून त्याची स्त्री जी शुककन्या कृत्वी तिचे ठायीं जन्मला.
भीष्म म्हणतात - हे युधिष्ठिरा, महातपस्वी महाभाग मार्कंडेय यांनीं या अणुह राजाची वंशावळ मला जशी सांगितली तशीच ती मी तुला सांगतो ऐक.
युधिष्ठिर म्हणतो - ताता, आपण एकुण वंशावळ सांगणारच आहांत, पण प्रथम विशेषतः अणुह राजा, हा कोणाचा पुत्र होता, हा कोणत्या काळी होता, व राजा ब्रह्मदत्तासारखा महायशस्वी व धर्मनिष्ठ पुत्र ज्याचे पोटीं जन्मला त्याची वीर्यवत्ता तरी कसल्या प्रकारची होती व त्या सात भावांपैकी ब्रह्मदत्त हा कनिष्ठ असून राजा कां व कसा झाला, हें मला सांगावे. या ब्रह्मदत्ताचे चरित्र मी जें विशेष विस्तारानें ऐकू इच्छितों याचे कारण, हे द्युतिमंता, असें आहे कीं, भगवान् शुकासारखा लोकपूज्य ऋषि आपली कृत्वी नामक कीर्तिमान् कन्या भलत्याच पोंचट माणसाला देणार नाहीं. अर्थात् तो तसाच कांहीं वीर्यवान असला पाहिजे. याकरितां आपण त्याचें वृत्त मला सांगा. शिवाय त्याचे ते मार्कंडेयांनीं सांगितलेले बाकीचे भाऊ संसारांत कसे वागत होते, तें मला सांगा.
भीष्म म्हणतात - हे धर्मा, माझा आजा जो राजर्षि प्रतीप त्याचा हा ब्रह्मदत्त राजा समकालीन होता, असें माझे ऐकिवात आहे. हा मोठा भाग्यवान योगी, प्राणिमात्राचें कल्याण करण्यांत तत्पर व प्राणिमात्राची भाषा जाणणारा होता; व ज्याने तपोबलाने शिक्षानामक वेदांग निर्माण करून संहितेचा पदपाठ व एकंदर वेदांगांचा क्रम प्रचारांत आणिला; व योग शिकविण्यांत अत्यंत निपुण असल्यानें ज्याला योगाचार्य अशी संज्ञा आहे तो गालव ऋषि याचा मित्र होता; व योगिश्रेष्ठ कंडरीक हा त्याचा सचिव होता. महाभाग मार्कंडेय ऋषींच्या सांगण्याप्रमाणें पाहातां ब्रह्मदत्तादि सातही बंधु पूर्वजन्मी निरनिराळ्या जातींत जन्मले असून परस्पर अत्यंत प्रेमळ मित्र होते; व अखेर या जन्मी ते सहोदरच झाले. हे राजा युधिष्ठिरा, पुरुकुलोत्पन्न जो महात्मा ब्रह्मदत्त त्याच्या अति जुनाट वंशाचा वृत्तांत मी तुला सांगतो, तो ऐक. पुरुकुलांत बृहत्क्षत्र नांवाचा जो राजा झाला त्याला सुहोत्र नामक परम धार्मिक पुत्र झाला. त्या सुहोत्राला हस्ति नामक पुत्र होता. प्रसिद्ध जें हस्तिनापुर (हल्लींची दिल्ली) हें प्रथम यानेच वसविले. या हस्तीला अजमीढ, द्विजमीढ व पुरुमीढ असे तीन पुत्र होते. पैकी अजमीढाला धूमिनी नामक स्त्रीचे ठिकाणी बृहदिषु हा पुत्र झाला. हे राजा, या बृहदिषूचे पोटीं महायशस्वी बृहद्धनु हा पुत्र झाला. हा मोठा धार्मिक असल्यामुळे याला बृहद्धर्मा असें म्हणत. याला पुढे सत्यजित हा झाला. त्याचा विश्वजित, विश्वजिताचा पुढें राजा सेनजित झाला. या सेनजिताला लोकविख्यात असे चार पुत्र झाले. यांचीं नांवे - रुचिर, श्वेतकेतु, महिम्नार व वत्स. यांपैकी वत्स हा अवंतीचा राजा होता; व रुचिराला पृथुसेन नांवाचा महायशस्वी पुत्र होता. पृथुसेनापासून पार झाला. पारापासून नीप. नीपाला मात्र अत्यंत तेजस्वी, शूर व बाहुशाली असे महारथि शंभर पुत्र होते; व हे सर्वही राजे झाले; व या सर्वांनाही नीपच म्हणत. या नीपांचा वंश वाढविणारा समर नांवाचा जो पुत्र तो कांपिल्य नगरींत राहात असे व याला नांवाप्रमाणेंच समराची फार आवड असे. या समराला पर, पार व सदश्व असे तीन मोठे धर्मज्ञ पुत्र होते. पैकी पराला पृथु नांवाचा पुत्र झाला. पृथुला सुकृत नामक पुत्र झाला व तो आपल्या सदाचरणानें सर्वगुणसंपन्न झाला. याला पुढें विभ्राज झाला. विभ्राजाचा पुत्र कृत्वीचा नवरा व शुक्राचार्याचा जावई जो सुप्रसिद्ध अणुह तो होय. अणुहाचा पुत्र बलवान राजर्षी ब्रह्मदत्त हा झाला. त्याला योगनिष्ठ व शत्रुमर्दन असा विश्वक्सेन नामक पुत्र झाला. हा जो विश्वक्सेन हा खरें पाहाता ब्रह्मदत्ताचा पूर्वज म्हणजे आजा जो विभ्राज तोच कांहीं कर्मगतीने ब्रह्मदत्ताचे पोटीं पुनः जन्मास आला होता. ब्रह्मदत्ताला याशिवाय सर्वसेन या नांवाचा पुत्र होता. ब्रह्मदत्ताचे घरांत बहुत कालपर्यंत पूजनी या नांवाची एक चिमणी राहात असे. तिने या सर्वसेनाचे डोळे फोडले. आतां या ब्रह्मदत्ताचा विश्वक्सेन म्हणून जो वर महापराक्रमी पुत्र सांगितला, त्याला राजा दंडसेन नामक पुत्र झाला. या दंडसेनाला भल्लाटसंज्ञक पुत्र होता, याला कर्णानें युद्धांत मारिलें आहे. हा भल्लाट मोठा शूर व वंशोद्धार करणारा होता. मात्र याचे पोटी जो पुत्र आला तो मोठा वाईट निपजला. कारण, याच्या एकटयाच्या दुष्कृतीमुळे उग्रायुधराजानें मागें सांगितलेले जे याचे नीपसंज्ञक पूर्वज त्यांच्या एकंदर वंशविस्ताराचा पूर्ण उच्छेद करून टाकिला. एवंच, हा दुर्बुद्धि मोठा कुलांगार निपजला. नीपांचा नायनाट करणार्या त्या उग्रायुधाला जेव्हां अत्यंत गर्व झाला व मोठी घमेंड चढली त्या वेळेस, हे युधिष्ठिरा, मीं त्याला युद्धांत चीत केला.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

Please provide Hindi translation of the page.
ReplyDelete