Monday, 3 September 2018

श्राध्ददेव व पितृवर्णन :- ९

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
--------------------------------
      *भाग :- ९..*

बर्हिषद नांवाने स्वर्गात प्रसिद्ध असलेले पितृगण स्वर्गाच्या ज्या रमणीय प्रदेशांत राहातात त्या प्रदेशाला वैभ्राज असें नांव आहे. हे पितृगणही अमित तेजस्वी आहेत. हे मोठे तपस्वी, महाभाग व महात्मे पुलस्त्य नामक प्रजापतीचे पुत्र आहेत. सर्व देव, यक्ष, गंधर्व, राक्षस, नाग, सर्प व सुपर्ण हेही यांचा फार मान राखतात. यांची जी मानसकन्या ती पीवरी नांवानें विख्यात आहे. ती स्वतः योगनिष्ठ असून योग्याची स्त्री व योग्याचीच माता होणार आहे. ही गोष्ट येत्या द्वापरयुगांत होणार. हे धर्मनिष्ठा, त्या काळीं पराशराच्या कुलांत शुक नांवाचा महातपस्वी योगी उत्पन्न होईल. तो व्यासमुनीपासून अरणीचे ठिकाणी उत्पन्न होईल, व तो तेजाने निर्धूम अग्नीप्रमाणे जाज्वल्य असेल. हा शुकमुनि वर सांगितलेली पीवरी नांवाची जी बर्हिषद नांवाची कन्या तिचे ठिकाणी मोठे बलिष्ठ व योगाचे केवळ आचार्य असे चार पुत्र व एक कन्या निर्माण करील. या पुत्रांची नावें - कृष्ण, गौर, प्रभु व शंभू ही असतील व कन्येचें नांव कृत्वी. ही अणुह राजाची राणी होऊन ब्रह्मदत्ताची जननी होईल. याप्रमाणे असले योगनिष्ठ व महाव्रत पुत्र निर्माण करून व आपला पिता जो व्यास यापासून धर्माची विविध स्वरूपे ऐकून घेऊन तो धर्मनिष्ठ महायोगी शुक जेथून पुनरावृत्ति नाहीं अशा पदाला जाईल. हें पद म्हणजे दुःखशोकरहित अव्यय व शाश्वत असें ब्रह्मच होय.

आतां जे अमूर्त पितर सांगितले त्यांपैकीं सुकालसंज्ञक पितर वसिष्ठ प्रजापतीपासून उत्पन्न झाले असून ते मोठे तेजस्वी व मूर्तिमान धर्म असे आहेत. ते ज्योतींनी भासमान असणार्‍या स्वर्गाच्या भागांत आवडीने राहातात. हा भाग सर्व इच्छित वस्तूंनी सुसंपन्न असा आहे. यांचेपासूनच वृष्णि व अंधक वंशासंबंधी कथेला उद्भव होतो. हेही पितर महामान्य असून ब्राह्मण त्यांचें तर्पण करीत असतात. यांची जी मानसकन्या आहे ती गौ या नांवानें स्वर्गात प्रसिद्ध आहे. हे मार्कंडेया, ही तुझ्याच वंशांत दिली जाऊन शुकाची प्रिय राणी होईल. या गौ नामक कन्येलाच एकश्रृंगा असें वहिवाटींत म्हणतात. ही गौ साध्यनामक जे देवगण त्यांचें भूषणस्थान आहे.

सूर्यमंडलांत मरीचिगर्भ नांवाचे लोक आहेत, तेथें अंगिरसाचे पुत्र (जे हविष्मंत नांवाचे पितर) ते राहतात. यांना साध्यनामक देवांनी पूर्वी वाढविले, अशी कथा आहे. ज्या क्षत्रियांना स्वर्गादिक फलाची इच्छा असेल ते या पितरांचे पूजन करितात. या पितरांची यशोदा नामक कन्या विश्रुत आहे. ही विश्वमहताची स्त्री, वृद्धशर्म्याची सून व राजर्षि महात्मा दिलीप याची आई. हा दिलीप मोठाच कीर्तिशाली झाला. हे मार्कंडेया, त्यानें देवांच्या युगांत एक सुप्रसिद्ध असा अश्वमेध नांवाचा महायज्ञ केला. त्या यज्ञांत शांडिल्यनामक सुप्रसिद्ध वंशांत जन्म घेणारा अग्नि प्रकट झाला. त्या वेळीं यज्ञार्थ तेथें आलेल्या अनेक महर्षीनी दिलीपाचें तें सामर्थ्य पाहून प्रेमाचे भरांत अनेक गाथा गाइल्या. त्यांचा सारांश हा कीं, जे कोणी एकाग्रचित्ताने सत्यनिष्ठ व महोदार अशा दिलीपराजाचे यज्ञसमयीं अवलोकन करितील त्या प्रेक्षकांनाही स्वर्ग प्राप्त होईल.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...