Monday, 3 September 2018

श्राध्ददेव व पितृवर्णन :- १०

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
----------------------------------
          *भाग : १०..*

पुलह महर्षीपासून सुस्वधा नामक द्विजश्रेष्ठ उत्पन्न झाले. हे कर्दम प्रजापतीचे पितर होत. हे स्वर्गातील कामगसंज्ञक लोकांत रहातात; व आकाशांत यांना अनियंत्रित गति असल्यामुळें हे पक्षीरूपानें संचार करितात. हे मार्कंडेया, यांची उपासना फलार्थी वैश्यगण करितात. यांच्या मानसकन्येचें नांव विरजा हें आहे. हे ऋषे, ही ययातीची आई व नहुषाची पट्टराणी. याप्रमाणे मीं तुला हे तीन पितृगण सांगितले; आतां हा चौथा समजून घे. या चौथ्या गणांतील पितरांना ' *सोमप* ' अशी संज्ञा आहे. हे कवीची कन्या जी स्वधा तिचे ठिकाणी हिरण्यगर्भ जो अग्नि त्यापासून उत्पन्न झाले. शूद्र लोक यांची पूजा करितात. स्वर्गातील ज्या लोकांत ते रहातात त्यांस ' *मानस* ' अशी संज्ञा आहे. नर्मदा नांवाची जी सुप्रसिद्ध श्रेष्ठ नदी ती यांची मानसकन्या. ही नदी उगमापुढें कांहीं अंतरापर्यंत दक्षिणमार्गानें वाहात जात असून आपल्या स्पर्शाने प्राणिमात्राला पावन करिते. ही पुरुकुच्छाची स्त्री व त्रसद्दस्यूची आई. याप्रमाणे ही सात पितरांची हकीकत झाली. हें मार्कंडेया, युगायुगाचे ठायीं जेव्हां जेव्हां धर्माचा र्‍हास होतो त्या त्या वेळीं प्रजापालक जो मनु तो या सप्तपितरांची ज्यात विशेष पूजा केली जाते अशा प्रकारची श्राद्धे लोकांत प्रवृत्त करतो. हे द्विजश्रेष्ठा, या सातही पितृगणांत यम हा प्रथम उत्पन्न झाला असल्यामुळें वेदांत त्याला पितृपति अशीच संज्ञा दिली आहे, व त्याचा हा अग्रमान ध्यानांत आणून त्यालाच *"श्राद्धदेव"* असेही म्हणतात.

हे मार्कंडेया, आता श्राद्धाचे विधान सांगतो तें ऐक. सर्व पितृश्राद्धांत पात्रे रुप्याची किंवा निदान रुप्याने मढविलेलीं तरी असावीत. कारण रुपे हें पितरांना फार प्रिय आहे. असल्या रजत पात्रांत वाढलेले श्राद्धान्न स्वधाशब्दपूर्वक अर्पण केल्याने पितर फार संतुष्ट होतात.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...