Monday, 24 September 2018

श्राध्ददेव व पितृवर्णन:-१६..

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
--------------------------------
       *भाग :- ४..*

        *चटकोपाख्यान*

धर्मराजा विचारतो, 'हे गांगेया; तुम्ही पूजनीया म्हणून जी पक्षिणी सांगितली ती बहुत दिवस ब्रह्मदत्ताच्या घरांत राहात असून असल्या थोर राजाच्या ज्येष्ठ पुत्राचे डोळे फोडून त्याला आंधळे करणें असलें वाईट काम तिने कशासाठी केलें ? तसेंच पांखराचा तो एवढा स्नेह राजाशी कसा पडावा, हेंही मला एक गूढच आहे. तेव्हां या कामीं सर्व कच्ची हकीकत सांगून आपण माझा संशय दूर करा. 

भीष्म म्हणतात - ठीक आहे. यासंबंधात ब्रह्मदत्ताचे घरीं कोणकोणत्या गोष्टी कसकशा घडल्या, तें सर्व मी तुला सांगतों तें ऐक. हे राजा, ब्रह्मदत्ताच्या घरांत एक चिमणी बहुत दिवस घरटे करून होती. ही चिमणी मोठी देखणी होती; हिचे पंख शुभ्र असून हिचे डोके लाल होतें व पाठ आणि पोट यांचा रंग कबरा होता. हिची आणि ब्रह्मदत्ताची फारच गट्टी जमली. ती इतकी कीं, ती त्याची एकजातीची प्रियसखीच म्हणावी. राजवाडयासारख्या उत्तम स्थळीं तिनें घरटें केलें होतें. तेथून ती रोज दिवसास बाहेर जाऊन समुद्रतीर, डबकी, सरोवरे, नद्या, पर्वत, लताकुंज, बनें, बागा, कल्हारपुष्पांच्या सुवासाने भरून गेलेले, प्रसन्न दिसणारे, कमोद, कमळें इत्यादिकाचें पराग उडून ज्यांचे आसपासची हवा सुगंधमय झाली आहे, व जेथे कारंडव पक्षी ओरडत आहेत व हंस आणि पाणबदकें यांचे शब्द चालू आहेत अशा तलावांचे कांठीं चरून फिरून रात्र पडण्याचे वेळेस कांपिल्य नगरींत ज्ञात्या ब्रह्मदत्त राजाच्या राजमंदिरास परत येई. आल्यावर रात्री मग स्वस्थपणीं आपण दिवसास फिरावयास गेलेल्या नानास्थलीं ज्या ज्या आश्चर्यकारक वस्तु पाहिल्या असतील किंवा गोष्टी अवलोकनांत आल्या असतील त्यासंबंधी ही चिमणूबाई राजाशी चटामटा गोष्टी करीत बसे. असा क्रम चालला असतां त्या ब्रह्मदत्त राजाला, हे राजव्याघ्रा, एक पुत्र झाला. 

याचे नांव सर्वसेन असें ठेविले होतें. याच सुमारास त्या पूजनीयेनेंही एक अंडे घातले व तत्पूर्वी तिने आपल्या कोठ्यांत एक घालून ठेविले होतें, तें या वेळीं फुटले. फुटताच त्यांतून एक मांसाचा लोळा बाहेर आला. या लोळ्याला हात, पाय व चोंच इतके अवयव आले होते. चोंचीचा वर्ण पिंगट होता. अजून डोळे नव्हते (उघडले नव्हते), मग पुढें कांहीं दिवसांनीं त्याला डोळे आले व नंतर थोडया थोडया पांखरडया फुटूं लागल्या. राजपुत्रही दिवसेंदिवस वाढू लागला. चिमणीही आपलें पिलू व राजाचा पुत्र यांवर सारखीच प्रीति करूं लागली. रोज संध्याकाळीं चरून परत येतांना ती आपला पुत्र व राजपुत्र ह्यासाठी म्हणून दोन अमृततुल्य मधुर फळें चोंचींत धरून घेऊन येत असे. तीं फळें खाऊन दोघेही छोकरे खूष होऊन जात. त्या पोरांना तीं फळें खाण्याची चटकच लागून गेली. चिमणी बाहेर उडून गेली म्हणजे राजपुत्राची जी दाई असे ती त्या चिमणीच्या पिलाला बाहेर घेऊन राजपुत्राला त्याशीं खेळवीत असे. एक दिवस दाईच्या नजरेआड राजपुत्रानें खेळ खेळतां तें चिमणीचें पिल्लू मानेला बळकट आंवळून धरिलें. राजपुत्राची चिकाटी मोटी बळकट, कांहीं केल्या सुटेना. मोठया मुष्किलीने त्याची ती मूठ उकलावी लागली. बाकी उकलून कांहीं फळ झालें नाहीं. चिमणीच्या पोरानें अगोदरच प्राण सोडले होते, मग तें आ वासून व गतप्राण होऊन पडलेलें चिमणीचें पोर पाहून राजाला फार दुःख झालें. विशेषतः आपल्या मुलाचे हातून असली गोष्ट झाली, हें ध्यानांत येऊन त्यानें ढळढळ अश्रू ढाळिले; व जिच्या उपेक्षेमुळें राजपुत्राचे हातून असलें कृत्य झालें त्या दाईची त्यानें यथास्थितच खरड काढिली. तथापि झाली गोष्ट ती झालीच. राजा त्या दिवशीं सायंकाळपर्यंत त्या पोराबद्दल विलाप करीतच राहिला. इतक्यांत ती बिचारी चिमणी रानभर फिरून नित्याप्रमाणें दोन फळें घेऊन ब्रह्मदत्ताचे घरीं आली. घरीं येऊन पाहाते तों आपला पोटचा गोळा पंचमहाभूतांनी सोडल्यामुळें (मेल्यामुळें) मोठया शोचनीय स्थितींत पडला आहे. त्याला पाहातांच प्रथम तिला मूर्च्छा आली. नंतर कांहीं वेळाने शुद्धीवर आल्यावर बापडी अतीच विलाप करूं लागली. ती म्हणाली, 'बाळ, कायरे हें ! मी आज बाहेरून आलें व तुला साद घातली तथापि तूं आपल्या गोड व अस्फुट वाणीनें लाडके लाडके चिंव चिंव शब्द करीत करीत मजभोंवतीं रांगत रांगत कसा रे येत नाहीस ? रोजचा पाठ म्हटला म्हणजे मी घरीं येतें आहें तें तुला भूक लागली असल्यामुळें तूं आपलें तें पिंवळें पिंवळें चंचुपुट आतील लांल टाळे दृष्टीस पडे इतकें ताणून भक्ष्यग्रहणार्थ मजपाशीं यावयाचा, परंतु, आज इतका वेळ जाऊनही कसा येईनास ? मी रोज बाहेरून आलें म्हणजे तूं चिंवचिंव करीत मजकडे आलास म्हणजे तुला पंखांखाली घेऊन मी प्रेमभराने ओरडत असें, पण आज मुळीं तुझें तें गोड चिंवचिंवणेंच ऐकूं येत नाहीं, हें काय ? बाळ रे, आज मी रानांतून परत निघालें तेव्हां मला आशा वाटत होती कीं, मी येतें तो आपले पंख हालवीत आपलें तोंड उघडून "आई मला तहान लागली पाणी दे" म्हणून तूं मजपुढें येशील; परंतु, ती माझी आशा सर्वथा विफल झाली. कारण, तूं मुळीच रस्ता धरिलास ! आतां काय करूं ?" 

याप्रमाणें बहुत प्रकारे विलाप करून ती राजाला म्हणाली, "हे राजा, तूं यथाशास्त्र अभिषेक करून गादीवर आलेला राजा आहेस, कोणीतरी नव्हेस. अर्थात तुला आपल्या सनातन धर्माची चांगलीच माहिती असली पाहिजे, असें असून आपल्या दाईच्या हातीं माझ्या पोराचा घात करविलास हें काय ? तुझ्या पोरटयाने माझें लेकरू मान मुरगळून मारिलें. ही गोष्ट हे क्षत्रियाधमा, तुझ्या घरांत संभवली कशी, हें मला नीट सांग. तूं एवढा मोठा शहाणा म्हणवितोस तर "शरण आलेला, भुकेलेला, शत्रूंनी वेढलेला व बहुत दिवस आपल्या घरीं राहिलेला अशांचे रक्षणच केलें पाहिजे; जे न करितील ते निःसंशय कुंभिपाक नरकाला जातील." अशा अर्थाची जी अंगिरसाची श्रुति आहे ती तुझ्या कानी नाहीं काय ? अरे, असल्यांची उपेक्षा करणारे अधमाचे हातून देवांनी हविर्भाग कसा घ्यावा, किंवा पितरांनी स्वधाकार तरी कसा घ्यावा ?" 
======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...