Monday, 24 September 2018

श्राध्ददेव व पितृवर्णन :-१७

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
--------------------------------
      *भाग :- ५..*

         *चटकोपाख्यान*

हे राजा, याप्रमाणें राजाशी बोलून ती चिमणी अतिशोकानें केवळ अविचारी बनली; व त्या तडाक्यांत तिने त्या अल्पवयी राजकुमाराचे डोळे आपल्या पायाच्या नख्यांनी ओरबाडिले. पुढें ते डोळे फुटले. याप्रमाणे राजपुत्राला आंधळा करून ही चिमणी आकाशांत उडून जाऊं लागली. इतक्यांत राजानें आपल्या पुत्राची झालेली स्थिति पाहून तिला म्हटलें कीं, "हे कल्याणि, माझ्या पुत्राचे तूं डोळे फोडलेस, फार चांगले केलेंस, आतां भिऊं नको. आतां तर तुझें दुःख दूर झाले ना ? मग आतां कां येथून जातेस ? जाऊं नको. तुझे मन शांत झालें; तर आतां परत फीर. आपली मैत्री पूर्वी होती तशीच चालूं दे, तिचा नाश होऊं देऊं नको; पूर्वी जशी होतीस तशीच सुखानें माझे घरांत रहा. चल परत फीर, आणि चैनींत अस. माझ्या पोराला तूं क्लेश दिलेस म्हणून माझा काही तुझ्यावर राग नाहीं. तूं माझी मैत्रीण आहेस. देव तुझे कल्याण करो. तूं माझ्या पोराचे डोळे फोडलेस खरे, पण त्यांत जें ओघाला आलें तेंच तूं केलेस; त्यांत तुझ्याकडे काय दोष ? 

पूजनीया म्हणाली - "हे राजसिंहा, तूं जरी किती शांतीच्या गोष्टी सांगितल्यास तरी आपलेवरून जग ओळखावे, अशी म्हण आहे, त्याप्रमाणे मला नुकताच पुत्रशोकाचा अनुभव आला आहे, त्यावरून तुझ्या प्रिय पुत्राच्या स्थितीबद्दल तुला किती दुःख होत असेल, याची कल्पना मला तूं न सांगतांही पुरापूर आहे. याकरितां तुझ्या पुत्राचे डोळे फोडण्यासारखें दुष्कृत्य करून पुन्हा मी तुझ्याच घरांत दृष्टीसमोर राहावें, ही गोष्ट मला संमत नाहीं, शिवाय मी जें म्हणतें या म्हणण्याला शुक्राचार्यांच्या नीतींतील वचनांचा आधार आहे. तीं वचने मी म्हणून दाखवितें तीं ऐक. ती अशीं - 

१. कुमित्र, कुदेश, कुराजा, कुमैत्री, कुपुत्र व कुभार्या यांस दुरूनच टाळावी. कारण, कुमित्राचे ठिकाणीं खरा स्नेह होत नाही; कुभार्येचे ठिकाणीं सुखभोग होत नाहीं; कुपुत्राचे हातून पिंड मिळत नाहीं; कुराजाच्या अमलांत सत्याला थारा नाहीसा होतो. जेथे खोटया माणसाशीं स्नेह आहे तेथें खर्‍या विश्वासाला आधार नसतो; कुदेशांत उपजीविकेची मारामार पडते; राजा दुष्ट असला म्हणजे प्रजेच्या जीवाला सदा धाकधूक असते; व पोटचा पोर व वाईट निघाला म्हणजे आई बापांना सर्व बाजूंनीच सुखाचा अभाव होतो. 

२. जो नीच मनुष्य आपल्यावर उपकार करणार्‍याही मनुष्यावर एखाद्या अनाथ दुबळ्याप्रमाणें भार टाकतो, त्याचा लौकरच नाश होतो. 

३. ज्याचा आपल्या ठिकाणी विश्वास नाहीं त्यावर मुळीच विश्वास ठेवू नये; व ज्याचा विश्‍वास आहे अशांवर तरी फाजील विश्वास टाकूं नये. कारण, प्रसंगवशात विश्वासू माणसालाच दगा करण्याची बुद्धि झाली तर तो आपणांस मुळापाळांसकट उखडून काढील. 

४. जो मूर्ख मनुष्य राजाचे सेवक किंवा ज्याचे बीजाविषयीं घोंटाळा आहे, असल्या जातीवर विश्वास ठेवून वागतो त्याचा जीव धोक्यांत आहे, असें समजावे. 

५. मी राजाचे मर्जीतला आहें, मला कसलें भय आहे, असें कोणीही मानू नये. कारण राजेसाहेबांची मर्जी खप्पा होऊन मनुष्य मुंगळ्यासारखा केव्हां चिरडला जाईल याचा कांहीं विश्वास नसतो. 

६. शहाण्या मनुष्याची गोष्ट अशी आहे कीं, ज्याप्रमाणें एखादी कोमल अल्पवल्ली एखाद्या महावृक्षाच्या कवेंत राहूनच त्याला पाडिते, त्याप्रमाणें तो वरून नरमपणा दाखवून व अंग चोरून वागूनच शत्रूला पालथा पाडतो. 

७. ज्याप्रमाणें मुंग्यांचे वारूळ प्रथम झाडाचे बुडांत उत्पन्न होतें, तेव्हां तें मऊ, ओलें व अल्प असतें, परंतु पुढें त्या वृक्षाची मुळें खाऊन टाकिते; त्याप्रमाणे लबाड शत्रु प्रथम बाह्यांगीं मोठा दुर्बळ, मृदु व आर्द्र (स्नेहल) असा दिसून हळूहळू आपल्या पोटांत शिरतो आणि अखेरीस आपला घात करितो. हे राजा, राजकीय विषयांत भले भले दगलबाजी करितात. यांचें प्रसिद्ध उदाहरण म्हणजे इंद्राचे. यानें मुनींच्या समक्ष मी तुझा नाश करीत नाहीं, असा नमूचीला विश्वास देऊन अखेर पाण्याच्या फेसाखाली आपलें वज्र दडवून त्याला नुसते फेंसानें ठार केले. 
======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:

Post a Comment

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...