Friday, 28 September 2018

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
---------------------------------
    श्राध्दमाहात्म्य :-६..

        *ब्रह्मदत्ताचा वृतांत*

मार्कंडेय सांगतात - मागें वैभ्राज राजा त्या सात हंसांपैकीं एकाचे उदरी यावें म्हणजे आपणास अनायांसे योगसिद्धि होईल, अशा संकल्पानें तप करून देह ठेविता झाला म्हणून सांगितलें. त्या संकल्पानुरूप तो तपस्वी व योगनिष्ठ वैभ्राज विष्वक्सेन या नांवानें जन्मास आला. पुढें एके दिवशीं ब्रह्मदत्त हा आपली भार्या सन्नति हिला बरोबर घेऊन मोठया आनंदाने इंद्राणीसहित रमणार्‍या इंद्राप्रमाणें वनांत विहार करीत होता, आणि विहार करीत असतां एक मुंगळा कामवश होऊन आपल्या प्रियेची कामदानाविषयीं काकुळती येऊन याचना करीत होता, तें त्यांने ऐकिलें, व तो मुंगळा प्रार्थना करीत असतां ती इवलिशी मुंगी त्याच्या चारगटपणानें त्याचेवर संतापली आहे, असें त्यानें पाहिले. त्याला त्यांची भाषा समजत होतीच; त्यामुळें तो प्रकार ध्यानी येतांच ब्रह्मदत्त एकाएकीं खदखदा हसला. जवळ त्यांची स्त्री सन्नति होती, तिला पति कां हसला, याचे कारण बरोबर न कळल्यामुळे हा आपणासच हसला असा संशय येऊन ती लाजल्यासारखी झाली व तिचा नूर अगदीं उतरून गेला. त्या सुंदरीच्या हृदयाला ती गोष्ट इतकी लागली कीं, तिने बहुत दिवस अन्नपाणी सोडले. नवरा जेव्हा तिची विनवणी करून, "प्रसन्न हो, रुसलीस कां ?" म्हणून म्हणूं लागला, तेव्हां ती मनोहर हास्य करून म्हणाली, "तुम्हीच माझा उपहास करून मला कारण विचारितां ? मला मुळींच आतां अशा जगण्याचा कंटाळा आला आहे." तें ऐकून त्यानें हसण्याचे खरें कारण काय होतें तें तिला सांगितलें, पण तिचा विश्वास बसेना. ती घुश्श्यांतच त्याला म्हणाली कीं, तुम्ही म्हणतां पण ही गोष्ट माणसांचे अंगीं वसत नाहीं. हे राजा, एक तर देवाची कृपा किंवा पूर्वजन्मींचे तपोबल, किंवा योगबल यांच्या साहाय्याशिवाय मुंग्यांची भाषा समजेल असा कोण मनुष्य आहे बरें ? तें कशाला, आपणच सर्व प्राण्यांची भाषा जाणता ना ? तर जेणेकरून ही गोष्ट माझे समजुतीत येईल त्या प्रकारे माझी समजूत करा, नाही तर मी प्राणत्याग करीन. हें माझें बोलणे थट्टेचे नव्हे; खरेखुरे आहे. 

राणीच हे कठोर भाषण ऐकून राजा मोठया विचारांत पडला, व संकटनिवारणार्थ आहार वर्ज करून सर्व भूतपति व शरणागतांचा पालक जो परमात्मा नारायण त्याला अनन्यभावानें व एकाग्रचित्ताने शरण गेला. त्यावेळीं सहाव्या रात्रीं भूतमात्राविषयी दयार्द्र असणारा भगवान् नारायण प्रभु त्याला प्रत्यक्ष दर्शन देऊन म्हणाला, "उदईक तूं सुखी होशील" असें म्हणून देव तेथेंच दिसेनासा झाला. 

इकडे मागें त्या चार ब्राह्मणांचा जो दरिद्री पिता सांगितला तो आपल्या मुलांपासून ते श्लोक शिकून घेऊन आपण कृतकृत्य झालों असें मानूं लागला. तथापि, त्याला ते श्लोक मंत्र्यांसह राजाला गाठून त्याचे कानी घालण्याला अवसर सापडेना, म्हणून तो विवंचनेत होता. इतक्यांत राजा ब्रह्मदत्तच नारायणाचा वर प्राप्त झाल्यामुळें हर्षित होऊन सरोवरांत स्नान करून मोठया आनंदाने आपल्या कांचनमय रथांत बसून नगराकडे चालला. त्या वेळीं त्याचा स्नेही द्विजश्रेष्ठ कण्डरीक यानें रथाच्या पागा धरिल्या होत्या; व दुसरा स्नेही पांचाल हा चवरी व व्यजन ढाळीत होता. आपले श्लोक कानी घालण्याला हीच संधी योग्य आहे असें मनांत आणून त्या ब्राह्मणानें तो राजा व त्याचे ते दोघे सचिव यांचे कानी ते दोन्ही श्लोक घातले. ते श्लोक असे - 

*"सप्तव्याधादशार्णेषु मृगाः कालिंजरे गिरौ ॥ *
*चक्रवाका शरद्वीपे हंसा: सरसि मानसे ॥ १ ॥ *
*तेभिजाता कुरुक्षेत्रे ब्राह्मणा: वेदपारगाः ॥ *
*प्रस्थिता दीर्घमध्वानं यूयं किमवसीदथ ॥ २ ॥" *

याचा अर्थ दशार्ण देशांत सातजण व्याध होते. पुढें कालिंजर गिरीवर ते मृग झाले. नंतर शरद्वीपांत चक्रवाक झाले व मानससरोवरांत हंस झाले. अखेरीस त्यांपैकी आम्हीं चौघे कुरुक्षेत्रांत वेदपारंगत असे ब्राह्मण होऊन मोक्षमार्गाला गेलों आणि मग तुम्हींच तेवढे कां फसून पडलां ? 
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२३

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
--------------------------------
   श्राध्दमाहात्म्य :-५..

             *हंसवर्णन*

हे राजा, पूर्वजन्मीचा जो पांचिक तो या सातव्या जन्मीही पांचवाच होता. सहावा जो खसृम तो कण्डरीक झाला, व सातवा तो ब्रह्मदत्त झाला, हें मागें सांगितलेंच आहे. उरले जे चार पक्षी तेही कांपिल्य नगरींतच एका वेदवेत्त्या दरिद्री ब्राह्मणाचे पोटीं येऊन सख्खे भाऊ झाले. त्याची नांवे - धृतिमान, सुमना, विद्वान् व सत्यदर्शी अशीं होतीं. हे चौघेही वेदाध्ययनांत मोठे निपुण असून त्यांचें मुक्तिमार्गाकडे सदैव लक्ष असे. कारण, पूर्व संस्कारामुळें त्यांचे ठिकाणी तसलेंच ज्ञान उत्पन्न झालें होतें; यामुळें ते याही जन्मीं सदैव योगनिरत राहून आपण आतां सिद्ध झालों असें त्यांना वाटताच ते हा लोक सोडून जाण्याच्या खटपटीस लागले. जातांना आम्ही येतो म्हणून त्यांनीं आपल्या बापाचा निरोप विचारिला. तेव्हां तो म्हणाला कीं, बाबांनो, तुम्ही पुत्रांनी अशा स्थितींत मला सोडून जाणें हा निव्वळ अधर्म आहे. कारण, माझ्या पोटीं जन्मून माझें दरिद्र तुम्हीं विच्छिन्न केलें नाहीं, किंवा संतति करून वंशवृद्धि केली नाही. माझे पश्चात राहून माझें गयावर्जनादि करणें हें तर लांबच राहिलें, पण, माझी या वृद्ध वयांत सेवाचाकरीही केली नाहीं असें असून मला तुम्ही सोडून चालला, हें तुम्हांला शोभत नाहीं. 

हें बापाचे भाषण श्रवण करून ते सर्व ब्राह्मण बापाला म्हणाले कीं, तुम्हाला आत्मोद्धारार्थ संततीची गरज नाहीं. आम्ही ब्रह्मवेत्ते असल्यामुळें तुमचा उद्धार झालेलाच आहे; आतां प्रश्न उरला उपजीविकेचा. त्याची तोड तुम्हाला सांगतो. आपला ब्रह्मदत्त राजा हा मोठा पुण्यवान आहे, तो आपल्या मंत्र्यांसह बसला असेल अशी वेळ साधून त्याकडे जा आणि "सप्तव्याधा" हे श्लोक त्याचे पुढें म्हणा. या श्लोकांत फार गूढार्थ आहे, तो जाणून ब्रह्मदत्त तुम्हावर प्रसन्न होईल व तुम्हाला गांवशीव इनाम देईल, वाटतील तसले भोग्य पदार्थ देईल, फार काय तुमची जी इच्छा असेल ती तृप्त करील. करितां तुम्ही निश्चिंत असा. 

याप्रमाणे पित्याला सांगून व त्याची पूजा करून, ते पुन्हा योगधारणा धरून परम शांतीला पोंचले.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२२

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
------------------------------
   *श्राध्दमाहात्म्य:- ४..*

             *हंसवर्णन*:-१

मार्कंडेय सांगतातः - ते मानससरोवराचे तीरी विहार करणारे पद्मगर्भ, अरविंदाक्ष, क्षीरगर्भ, सुलोचन, उरुबिंदू, सुबिंदु व हेमगर्भ, अशीं नांवे असलेले सातही हंस, जल आणि वायु भक्षण करून योगाभ्यासानें आपलें शरीर शुष्क करीत होते. राजा बिभ्राज याची स्थिति थेट उलट होती. तो शरीराने गलेलठठ असून कामुक होता, व आपल्या स्त्रिया व भोगांगना बरोबर घेऊन इंद्र जसा नंदनवनांत शिरतो, त्याप्रमाणें मानससरोवरावरील वनांत शिरला, व तेथें हे पक्षी योगाभ्यास करण्यांत गुंतले आहेत असें त्यानें पाहिले. हे पक्षी होऊन जर योगाभ्यास करितात, तर मी मनुष्य होऊन विषयासक्त राहाणे हे मोठेंच लज्जाकर आहे, असे वाटून हीच गोष्ट मनांत घोळीत घोळीत तो आपल्या नगरास परत फिरला. त्याला अणुह नांवाचा एक धार्मिक पुत्र होता. याला अणुह नांव पडण्याचे कारण अणु म्हणजे अत्यंत सूक्ष्म असेही धर्माचार साधण्याविषयीं तो परम तत्पर असे, हें होय. याला जी स्त्री मिळाली होती तीही मोठी योगनिष्ठ, सद्‍गुणी, सत्यशील व सर्वथा पूज्यलक्षणांनीं युक्त अशी होती. ही स्त्री म्हणजे शुक्राचार्यांची कन्या जी कृत्वी ती. हे भीष्मा, ही कृत्वी म्हणजे बर्हिषद पितरांची कन्या जी पीवरी म्हणून पूर्वी सनत्कुमारांनी जी मला सांगितली होतो तीच; व त्या वेळीही ही मोठी सत्यपरायण, अजितेंद्रियांना अगम्य व स्वतः योगनिष्ठ असून योगनिष्ठाचीच माता व योगनिष्ठाचीच पत्नी होईल म्हणून मी सनत्कुमारांच्या तोंडची पितृकल्पाची हकीकत सांगत असतां बोललोच आहें; व त्याप्रमाणेंच ती झाली. असो; बिभ्राज राजा घरीं येतांच त्यानें आपले प्रजाजन व ब्राह्मण यांस बोलावून स्वस्तिवाचन वगैरे करवून मोठ्या आनंदाने आपला पुत्र अणुह यांस राज्यावर बसविले; व स्वतः ते सहचारी हंसपक्षी मानससरोवराचे कांठीं जेथे आढळले होते तेथेंच तपश्चर्येसाठी गमन केलें. तेथे गेल्यावर त्या सरोवराचे शेजारीच मोठी तीव्र तपश्चर्या आरंभिली. त्यानें सर्व विषयवासना सोडून दिल्या, व अन्नपाणीही सोडून केवळ वायुभक्षण चालू ठेविले. ही तीव्र तपश्चर्या करण्यांत त्याचा गूढ हेतु असा होता कीं, आपण या जन्मी दृढ संकल्प करून त्याचे बळावर पुढील जन्मी हे जे योगनिष्णात हंसबंधु आहेत यांपैकी एकाच्या उदरी येऊ. म्हणजे आपणांस अनायासेंच योगप्राप्ति होईल. ही गोष्ट मनांत घेऊन त्यानें मोठया नेटाने तपश्चर्या आरंभिली, व आपलें तपस्तेज इतकें वाढविले कीं, पाहाणाराला तो सूर्यासारखा दैदीप्यमान दिसूं लागला; व त्यानें प्रकाशित केल्यामुळें त्या वनाला व त्या सरोवरालाही तेव्हांपासून बैभ्राज असेंच नांव पडलें. इकडे त्या सात पक्ष्यांपैकी जे अखंड योगनिष्ठ होते ते चार, व जे पूर्वी सांगितल्याप्रमाणें योगभ्रष्ट होते ते तीन हे सर्वही तपानें निष्पाप होऊन कांपिल्यनगरीत जन्मांस आले. 

यांपैकी ब्रह्मदत्त हा धुरीण होता. यांपैकी जे चौघे पूर्वजन्मी अखंड योगनिष्ठ होते ते या जन्मी ज्ञान, ध्यान, तप, पूजा, वेद, वेदांग, यांत निष्णात असून पूर्वजन्मींचे त्यांना स्मरण होतेंच; आणि बाकीचे जे तीन त्यांना मात्र भूल पडली. यांपैकीं पूर्वींचा जो स्वतंत्र तो ब्रह्मदत्त नांवानें अणुहाचे पोटीं उत्पन्न झाला. कारण, पूर्वी पक्षियोनीत असतां असाच जन्म आपणांस व्हावा असा त्याचा संकल्पच होता. हा ब्रह्मदत्तही या जन्मीं ज्ञान, ध्यान, तप, इत्यादिकांनीं पवित्र असून मोठा यशस्वी व वेदवेदांगनिपुण होता. छिद्रदर्शी व सुनेत्र हे जे उरलेले दोघे बंधु ते या जन्मी वत्स व बाभ्रव्य वंशांत उत्पन्न झाले. हेही मोठे कर्मनिष्ठ व वेदवेदांगप्रवीण होते; व पूर्वजन्मापासून एकत्र राहिले असल्यामुळें या जन्मी ब्रह्मदत्ताचे सोबती झाले. या जन्मी त्यांना पांचाल व कण्डरीक अशीं नावे होतीं. पैकी पांचाल हा ऋग्वेदामध्ये प्रवीण होता, व यामुळे त्यानें आचार्यत्व स्वीकारले. कण्डरीक हा सामवेद व यजुर्वेद यांत निष्णात असल्यानें त्यानें छंदोगत्व व अध्वर्युत्व पत्करिलें. राजा ब्रह्मदत्त हा सर्व प्राण्यांचे शब्द समजण्यांत निपुण होता. 

त्याची ह्या पांचालकण्डरीकांशीं मोठी गट्टी जमली. हे तिघेही पूर्वजन्मींच्या वासनेप्रमाणे कामलोलुप होऊन मैथुनादि कर्मात जरी आसक्त होते तरी पूर्वसंस्कारामुळें त्यांना धर्म, अर्थ, काम या तिन्ही शास्त्रांची माहिती पुरापूर होती. असो; निर्मळ ब्रह्मदत्ताला राज्यावर बसवून अणुह जो तपश्चर्येला गेला तो पूर्ण योगनिष्ठ होऊन परमगतीला पोचला. ब्रह्मदत्ताला जी बायको मिळाली ती असितकुलोत्पन्न जो देवलऋषि त्याची मुलगी होती. हिचे नांव सन्नति असें होतें. हिच्या नांवाप्रमाणेच ही सन्नतिमान म्हणजे सज्जनांशी नम्रपणे वागणारी किंवा सत् म्हणजे जें ब्रह्म त्याचे ठिकाणी जिची मति लीन आहे अशी होती. सौंदर्यानेंही फार उत्तमच होती. हिचे तेज मोठे उग्र असे व हिला योगाचा नाद असल्यामुळें ब्रह्मदत्ताच्या व हिच्या समजुतीचा एकमेळ होता; व हें पाहूनच ब्रह्मदत्तानें तिला देवलापासून भार्यात्वासाठी मागून घेतली. 
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

Monday, 24 September 2018

कामक्रोध व अहंकार

*कामक्रोध व अहंकार*
-------------------------------

*काम एष क्रोध एष रजोगुण समुद्‌भवः । *
*महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥*
                 गीता ३-३७ 

'श्रीकृष्ण म्हणतात, हा काम हा क्रोध आहे, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा आधाशी व महापापी आहे, या लोकी हा आपला वैरी आहे असे जाण.' या श्लोकावरील श्री ज्ञानेश्वर महाराजांची विस्तृत टीका फार मननीय आहे, त्या ओव्याचा भावार्थ खाली देत आहो. 

"हे अर्जुना ! जीवाला पाप करावयास लावून दुःखात ढकलणारे हे कामक्रोध आहेत असे समज. याचेजवळ दयेचा साठा मुळीच नाही. हे प्रत्यक्ष यमधर्म (काळ) आहेत. हे ज्ञानरूपी ठेव्यावर असलेले भुजंग आहेत. हे विषयदरीतील व्याघ्र आहेत. हे भजनरूपी मार्गावर वाटमारेपणा करणारे आहेत. यांची मृत्यूच्या नगरात चांगली पत आहे, कारण हे जीविताचे शत्रू आहेत. याना भूक लागली असता खाण्यास हे जग एका घासासही पुरत नाही. सहज मुठीत धरण्यास जिला चौदा भुवनेही थोडी आहेत अशी भ्रांती ती याची नव्या नवसाची बहीण आहे, जी खेळत असता त्रैलोक्यरूप खाऊ सहज खाऊन टाकते, त्या भ्रांतीच्या दासीपणाचे जोरावर ही तृष्णा जगली आहे. या कामक्रोधाना मोहाचे घरी मान आहे. आपल्या कौशल्याने जो सर्व जगास नाचवितो तो अहंकार या कामक्रोधापाशी देवघेव करतो. ज्याने सत्याच्या पोटी असलेला मालमसाला काढून त्याऐवजी असत्याचा पेंढा भरला असा जो दंभ तो या कामक्रोधानी जगात प्रसिद्धीस आणला. यानी पतिव्रता शांती तिला वस्त्रहीन केले, मग त्या वस्त्रानी मायारूपी मांगीण सजविली अशा या सजविलेल्या मायेकडून साधूचे समुदाय या कामक्रोधानी भ्रष्ट करविले. यांनी विवेकाचा आधारच नष्ट केला. वैराग्याची तर कातडीच सोलून काढली व निग्रहाची जीवंतपणीच मान मुरगळून टाकली. या कामक्रोधानी संतोषरूप अरण्यच तोडून टाकले व धैर्यरूप किल्ले पाडले आणि आनंदरूपी रोपटे उपटून फेकून दिले. यानी बोधाची रोपेही उपटली, सुखाची तर भाषाही पुसून टाकली व हृदयात सर्वत्र त्रिविध तापाचे निखारे पसरले. हे पाण्यावाचून बुडविणारे, अग्निवाचून जाळणारे व न बोलता अकस्मात प्राणिमात्राना घेरणार आहेत. अर्जुना ! हे शस्त्राविना मारतात, दोरावाचून बांधतात आणि ज्ञान्याचाही प्रतिज्ञापूर्वक वध करतात. (ज्ञानेश्वरी अ. ३ ओवी २४० ते ५८ भावार्थ.) 

तसेच गीतेच्या सोळाव्या अध्यायाच्या शेवटी तर या कामक्रोधादिकाना नरकाचे द्वार म्हटले आहे. 
*त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः । *
*कामःक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत ॥* 
गीता १६-२१ 

'काम-क्रोध-लोभरूपी तीन प्रकारचे हे नरकाचे द्वार आहे व आत्म्याचा नाश करणारे आहे, म्हणून या तिघांचा त्याग करावा.' 
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

भक्तीत सिध्दता

*भक्तीत सिध्दता*
-------------------------

भक्ति सिद्ध होण्याकरिता आवश्यक असा विषयत्याग होण्याकरिता सत्संगतीच पाहिजे. विषयात दोषदर्शन, विषयाची अनित्यता, क्षयातिशयादि दोष युक्तता, त्यातील परिणाम, ताप, संस्कार, दुःख, गुणवृत्ती, विरोधादिदोष सत्संगतीनेच यथार्थ स्वरूपाने कळत असतात. श्री तुकाराम महाराज म्हणतात, *"बैसता संताचे संगती । कळो आले कमळापती । आपुली कोणीच नव्हती । निश्चय चित्त दृढ झाला ॥ १ ॥"* तसेच संगत्याग, संग म्हणजे आसक्ती. बाह्य विषयात दोषदर्शन होऊन कदाचित तात्कालिक त्याग झाला तरी अंतरातील विषयत्याग म्हणजे संग नष्ट होत नाही. ती आसक्ती नष्ट होण्याकरिताही सत्संगती उपयुक्त आहे. 

तिसरे अव्यावृत भजन - जे भजन भोगासाठी होते ते अव्यावृत म्हणजे अखंड कधी होत नाही. अव्यावृत भजनाकरिता संतकृपेचीच आवश्यकता आहे. ध्रुव, प्रल्हाद, वाल्मीकि याचे जे अखंड भजन होत होते श्री नारदाच्या कृपेमुळेच. तुकाराम महाराज म्हणतात, 
*'कृपा केली संतजनी । माझी अलंकारिली वाणी । प्रीत हे लाविली कीर्तनी । तुका चरणी लोळतसे ॥'* म्हणून जी साधने मागील सूत्रांतून सांगितली आहेत ती ती सर्व सत्संगतीने सिद्ध होतात. म्हणून ती सत्संगतीच साधण्याचा साधकाने प्रयत्न करावा. त्यायोगे वरील सर्व साधने व साध्य प्राप्तीही अनायासेच सिद्ध होईल. सूत्रात द्विरुक्तीने सांगितले आहे त्याचे कारण ' *भक्ती* ' हे येथे साध्य आहे व अन्य साधने आहेत, ते साध्य व ती साधने महत्संगानेच सिद्ध होतात हे सिद्ध करण्याकरिता द्विरुक्ती असावी असे वाटते.
=======================
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

अनंत व्रत

*अनंत व्रत*
----------------

भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणत असतात.या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. हे काम्य व्रत असून याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजाकरून हे व्रत पूर्ण करतात. मानवी देहात १४ प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोर्‍याला १४ गाठी असतात.
 प्रत्येक ग्रंथीची विशिष्ट देवता असते. या देवतांचे या गाठींवर आवाहन केले जाते.
 दोर्‍यांची गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसर्‍या ग्रंथीपर्यंत वहाणार्‍या क्रियाशक्तीरूपी चेतनेच्या प्रवाहाचे प्रतीक आहे.
१४ गाठींच्या दोर्‍याची मंत्रांच्या साहाय्याने प्रतीकात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्री विष्णुरूपी क्रियाशक्तीच्या तत्त्वाची दोर्‍यात स्थापना करून असा क्रियाशक्तीने भारित दोरा दंडात बांधल्याने देह पूर्णतः या शक्तीने प्रभारीत होतो.
 यामुळे चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास साहाय्य मिळते.
जिवाच्या भावाप्रमाणे हे कार्यबळ टिकण्याचा कालावधी अल्प-अधिक होतो. त्यानंतर परत पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभारीत नवीन दोरे बांधले जातात.

हे व्रत सार्वत्रिक नाही. कोणी उपदेशिल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास हे व्रत घेतात व मग ते कुळात चालू राहते.पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला अशी आख्यायिका आहे.

      *पूजेचे स्वरूप*

हे व्रत भाद्रपद शु. चतुर्दशी दिवशी करतात. यासाठी उदयव्यापिनी तिथी घेतात. पौर्णिमायुक्‍त असेल तर फल अधिक वाढते. कथेच्या अनुरोधाने जर मध्याह्नपर्यंत चतुर्दशी असेल तर उत्तम मानतात. व्रत करणार्‍याने त्या दिवशी प्रात:स्नान करून

*'ममाखिलपापक्षयपूर्वक शुभफलवृद्धये* *'श्रीमदनन्तप्रीतिकामनया अनंतव्रतमहं करिष्ये ।'*

असा संकल्प सोडून जागा सुशोभित करावी. चौरंगास कर्दळी लावून त्यावर साक्षात नाग अगर दर्भाचा बनवलेला सप्तफणांचा शेषस्वरूप अनंत याची प्रतिष्ठापना करावी.

*नमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर ।*
*नमस्ते सर्व नागेन्द्र नमस्ते पुरुषोत्तम ॥"*

असा श्‍लोक म्हणून नमस्कार करावा
 त्याच्यापुढे १४ गाठींचा रेशमाचा अनंतदोरक ठेवून आम्रपल्लवांसह पंचामृतादी धूप, दीप, गंध, फूल वगैरे षोडशोपचारांनी पूजा करून नैवेद्य अर्पण करावा.

चौरंगावर सर्वतोभद्र मंडल काढतात.त्यावर पूर्णपात्र ठेवून अष्टदल काढतात.त्यावर सात फणांचा दर्भाच्या अंकुराने युक्त शेष नाग ठेवून त्याच्यापुढे चौदा गाठींचा दोरा ठेवतात.कुंभाला वस्त्राचे वेष्टन करतात.कुंभातील जळाला   *यमुना* म्हणतात.शेष व यमुना यांची पूजा झाल्यावर विष्णूची सोळा उपचारांनी पूजा करतात.अंगपूजा, आवरणपूजा, नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजा यामध्ये असतात.पुष्पांजली झाल्यावर अर्घ्य देतात.नंतर दोरकाची प्रार्थना करून चौदा गाठींचा दोरा हातात किंवा गळ्यात बांधतात.जुन्या दो-राचे विसर्जन करतात.वडे आणि घारगे यांचे वाण देतात आणि व्रत देवतांचे विसर्जन करतात.
*न्यूनातिरिक्‍तानिपरिस्फुटानि यानीह कर्माणि मया कृतानि ॥*
*सर्वाणि चैतानि मम क्षमस्व प्रयाहि तुष्ट: पुनरानमनाय ॥'*

या मंत्राने विसर्जन करावे आणि
*दाता च विष्णुर्भगवाननन्त: प्रतिगृहीता च स एव विष्णु: ।*
*तस्मात्त्वया सर्वमिदं ततं च प्रसीद देवेश वरान् ददस्व ॥'*
या मंत्राने वाण द्यावे बिनमिठाचे पदार्थ खावेत. .

या व्रतात सर्पपूजेचे अवशेष दिसतात असे मानले जाते. प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात आल्यावर ही पूजा व्रतरूपात आली असावी असा संकेत मानला जातो.हरियाणात या दिवशी अनंताचे व्रत घेतात.पूजा करतात. हातात ' *अणत* ' बांधतात.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

मुमुक्षु म्हणजे काय?

*मुमुक्षु म्हणजे काय..?*
----------------------------------

*|| तस्मात्सैव ग्राह्या मुमुक्षुभिः ||*
                     नारदभक्तीसुत्रे

भक्ती स्वयंफलरूप आहे, म्हणून मुमुक्षुनेदेखील ' *सा एव'* म्हणजे तीच भक्तीच स्वीकारावी. आता मुमुक्षू कोणास म्हणावे याचा विचार करणे आवश्यक आहे. संसारात जे मानवदेहधारी जीव आहेत यांचे बद्ध, मुमुक्षू व मुक्त असे तीन प्रमुख भेद शास्त्रकारांनी कल्पिले आहेत. बद्धालाच विषयी असेही म्हणतात किंवा बद्धात पामर व विषयी असे दोन वर्ग मानले जातात. ऐहिक विषयभोगाचा धर्माधर्म, योग्य-अयोग्य न पाहता स्वैररूपाने अंगीकार करणारा रागद्वेषलोभादिकांनी युक्त अशा मनुष्यास पामर म्हटले जाते. ऐहिक भोगासक्त ते पामर व स्वर्गलोकातील म्हणजे पारत्रिक धर्म्य अशा पुण्यविशेषाने प्राप्त झालेल्या भोगात आसक्त पुरुषांना विषयी म्हटले आहे. पामर हा धर्माधर्म पाहत नाही, व विषयी धर्मानेच प्राप्त झालेल्या विषयाचे सेवन करीत असतो, त्यामुळे तोही बद्धच असतो. विषयासक्तीने रागद्वेषादिकांनी देहतादात्म्यानी, कर्म व कर्मफलासक्तीने व तन्मूलक अहंकार अज्ञानादि अनेक बंधनांनी तो बांधला गेलेला असतो, त्या बंधनातून सहजरीत्या तो बाहेर पडू शकत नाही. यालाच *संसारबंधन* म्हणतात. या बद्धासच शास्त्रीय भाषेत 'बुभुक्षू, भोगासक्त असेही म्हटले जाते. या बुभुक्षूत दोन प्रकार संभवतात. मुमुक्षूत्व योग्य व अयोग्य एखादा भोगासक्त असला तरी पूर्वसुकृताने सत्संगतीत केलेल्या सच्छास्त्र श्रवणाने या भोगातील दोष अनुभवास आल्यामुळे त्यातील असारता जर कळू लागली तर यातून सुटावे असे वाटू लागल्यास त्यास मुमुक्षुत्वयोग्य म्हणावे, व असा विचारही ज्याच्या मनात कधी येत नाही, कोणी योग्य मार्गदर्शन केले तरी अश्रद्धा, दुराग्रह, कुतर्क, विपर्ययादी दोषांनी सन्मार्गाकडे न प्रवृत्त होणार्‍यांना मुमुक्षुत्व अयोग्य म्हटले जाते. ज्याचे पूर्वसंस्कार चांगले आहेत असे सदबुद्धिवान जप ज्यांना इहपरभोगातील दोषाची पूर्ण कल्पना आली आहे, या देहात, संसारात राहणे म्हणजे एकप्रकारचे बंधन आहे, कारण मुक्तपणाने आनंदाचा भोग येथे नाही, अनेक बंधने अंतर्बाह्य रूपाने आपणांस पीडा देतात त्यामुळे जो दुःखी होतो व त्याचे परिमार्जन करण्याचा जो सतत प्रयत्न करतो त्यासच *मुमुक्षू* असे म्हटले जाते. 
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...