Thursday, 8 February 2018

शालीग्राम व तुलसी माहात्म्य*

*शालीग्राम व तुलसी माहात्म्य*
--------------------------------------------

श्रीनारायणमुनी म्हणाले, "हे नारदा, सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून हरीने शंखचूडाचे कवच मागून घेतले. शंखवूडाचे रूप घेऊन तो नगरीत गेला. प्रासादाजवळ जाऊन त्याने विजय प्राप्त झाल्याची निशाणी म्हणून दुंदुभीचा गजर करविला. जयदुंदुभी ऐकताच तुलसीला अत्यानंद झाला आणि गवाक्षातून ती राजमार्गाकडे पाहू लागली. इकडे श्रीहरीने ब्राह्मणांना दाने दिली. शुभाशुभ वार्ता सांगणार्‍या हेरांनाही विपुल द्रव्य दिले. 

रथातून उतरल्यावर तो तुलसीच्या मंदिरात गेला. त्या रत्नजडित मंदिरात पोहोचताच तुलसीने त्याला पती समजून त्याचे पूज्य भावनेने पाय धुतले. त्याला नमस्कार करून त्या कामुकीने श्रीहरीला शृंगारलेल्या रत्नमय मंचकावर बसविले. त्याला सुवासिक तांबूल दिला. ती म्हणाली, 

"रणांगणातून परत आलेल्या पतीला अवलोकन करून मला परम आनंद झाला आहे. आज माझे जीवन सफल झाले." 

कामविव्हल होऊन तिने त्याच्याकडे पाहून कामुक कटाक्ष फेकले. तिने पतीला रणातील वृत्तांत विचारले, "हे प्रभो, विश्वसंहारक शंकराशी युद्ध करून तुमचा जय कसा झाला ?" 

तेव्हा तो प्रभू हसतमुखाने म्हणाला, "हे कांते, एक पूर्ण वर्ष युद्ध झाल्यावर ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून मी देवांचे राज्य परत दिले. मी व शिव आपापल्या स्थानी गेले. हे कामिनी, सर्व दानवांचा नाश झाला आहे. ब्रह्मदेवाने देवांचे व माझे सख्य करून दिले. नंतर मी येथे आलो." 

असे सांगून तो जगन्नाथ मंचकावर पहुडला. ते दोघेही रममाण झाले. पण सुरतक्रीडेचे विविध प्रकार लक्षात येताच ती भयभीत झाली. सर्व प्रकार तिच्या ध्यानी आला. ती म्हणाली, "हे कपटशिरोमणे, तू कोण ? कपटाने तू मला भोगलेस, तू माझे सतित्त्व भंग केलेस, म्हणून मी तुला शाप देते." 

हे शब्द ऐकताच श्रीहरीने आपले मनोहर दर्शन दिले. त्या सनातन, तेजस्वी, पीतवस्त्रधारी देवास पहाताच तिला मूर्च्छा आली. सावध झाल्यावर ती म्हणाली, "हे देवा, तू पाषाणहृदयी आहेस. कपटाने तू धर्मभंग करून माझ्या स्वामीस मारलेस, म्हणून हे प्रभो, तू संसारास पाषाण होऊन रहाशील. तुला साधु म्हणणारे सर्वजण मूर्ख आहेत. तू माझ्या पतीला मारलेस." 

असे म्हणून ती विव्हल होऊन रडू लागली. त्यानंतर त्या कमलापतीने तिला नीतिमत्तेच्या गोष्टी सांगून तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. श्रीभगवान म्हणाले, "हे कल्याणी, तू माझ्यासाठी व शंखचूडाने तुझ्यासाठी दारूण तप केले. तुझ्या तपाची फलप्राप्ती व्हावी म्हणून तू दिव्य देह धारण करून रमेप्रमाणे माझ्याशी रममाण हो. तुझे शरीर गंडकी नावाच्या नदीरूप होवो. तू भारत वर्षात पुण्यवान हो. तुझे जल पाप्यांना पवित्र करणारे होवो. तुझा केशसंभार पुण्यवृक्षाप्रमाणे होईल. तू तुलसी नावाने प्रसिद्ध पावशील. 

तू पुष्पांत श्रेष्ठ होशील. गोलोकात विरजा नदीच्या तीरावर, वृंदावनातील रासमंडलात, चंपकवनात, चंदनवनात, सर्व ठिकाणी तुझे पुण्यकारक वास्तव्य होवो. माझ्या वराने वृक्षाच्या मूळ ठिकाणी पुण्यक्षेत्र होईल. तुलसीपत्राने अभिषेक केल्याने पुण्यक्षेत्रातील स्नानाचे पुण्य मिळेल. हजारो अमृतघटांपेक्षा तुळशीच्या एका पानाने हरी तृप्त होतो. हजार गोप्रदानाचे पुण्य कार्तिकात तुळशीपत्र वाहिल्याने मिळते. मृत्यूसमयी तुलसीपत्राचे उदक प्राप्त होणार्‍यास मुक्ती मिळते. 

नित्य तुलसीपत्र भक्षण करणार्‍यास हजारो अश्वमेधांचे पुण्य मिळते. तुलसीपत्र हातात घेऊन दिलेले वचन न पाळणार्‍यास कालसूत्र नरकाची प्राप्ती होते, तसेच खोटी शपथ वहाणार्‍यास चौदा इंद्र होईतो कुंभीपाक नरकात खितपत पडावे लागते.

पौर्णिमा, अमावास्या, द्वादशी, सूर्यक्रांतीचे दिवशी तसेच अपवित्रकाली, मलिन वस्त्रासहित जे तुलसीपत्र तोडतात ते हरीचेच मस्तक तोडतात. या वृक्षाची अधिष्ठात्री देवी गोलोकात कृष्णासह नित्य क्रीडारत होते. नदीच्या अधिष्ठात्री देवता, माझ्या अंशरूप लावण्याने सागराची पत्नी होईल. तू वैकुंठात माझी प्रियाच होशील. 

तुझ्या शापामुळे मी गंडकीतीरावर शैलरूपाने वसती करीन. तीस दाढांनी युक्त असलेले असंख्य किडे तेथे शीलेवर माझे चक्र करतील. तेच लक्ष्मीनारायण चक्र होय. दोन द्वारातील चार चक्रांचे गोप्रदान असलेले चक्र रघुनाथ म्हणून प्रसिद्ध आहे. लहान व दोन चक्रांनी युक्त असे जे चक्र त्याला वासनामिध म्हणतात. अत्यंत व वनमालायुक्त चक्राला श्रीधर म्हणतात. स्थूल व वर्तुलाकार असलेल्या चक्राचे नाव दामोदर आहे. 

मध्यम आकाराच्या, बाण कोरलेल्या चक्रास रणराम म्हणतात. सात चक्रे छत्रभूषणांनी युक्त असल्यास राजराजेश्वर चक्र, मेघकांतीचे चारी फले देणारे अनंत चक्र, चक्राकार दोन चाके असलेले मधुसूदन चक्र, ज्या चक्रावरील सुदर्शन गुप्त आहे ते गदाधर चक्र, दोन चक्रांचे ओबडधोबड असलेले वैराग्यदायक नारसिंहचक्र, विस्तृत मुखांचे दोन चक्रे असलेले लक्ष्मीनृसिंह, द्वारभागी वासुदेव चक्र हे सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे. 

सर्वांना सुख देणारे प्रद्युम्न चक्र, तसेच सर्वफल देणारे संकर्षण चक्र, पिवळे व वर्तुलाकार अनिरुद्ध नावाचे चक्र सुखदायक आहे. 

ज्या ठिकाणी शालग्राम शीला असते, तेथे हरी व लक्ष्मी रहात असते. त्याच्या पूजनाने पातकांपासून मुक्ती मिळते. छत्राकार शीला असल्यास राज्यप्राप्ती, वर्तुळाकार असल्यास संपत्ती, शकटाकार असेल तर दुःख, शूलाप्रमाणे अग्रभाग असल्यास मृत्यू, शीलेचे मुख ओबडधोबड असल्यास दारिद्र्य, पिंगल असल्यास हानी, भग्न झाले असल्यास व्याधी प्राप्त होते, विदीर्ण असल्यास मरण संभवते. 

व्रत, दान, प्रतिष्ठा, श्रद्धा, देवाची पूजा वगैरेमध्ये शालिग्राम असल्यास प्रशस्त होते. शालिग्राम असणार्‍याला तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य मिळते, तसेच त्याला यज्ञदीक्षेचे, तीर्थे, व्रते, तपे वगैरे केल्याचे पुण्य मिळते. शालिग्रामशीलेचे उदक प्राशन केल्यास सर्व मनोरथ पूर्ण होतात. अंतकाली तो वैकुंठात जातो. ब्रह्महत्त्येची पापेसुद्धा नष्ट होतात. 

त्याच्या पदरजाने देवी वसुंधराही सत्वर पवित्र होते. 

शालिग्राम हातात धरून खोटे बोलणारा ब्रह्मदेवाचे आयुष्य असेपर्यंत कुंभिपाक नरकात पडतो. शालिग्राम शीला घेऊन असत्य वचन करणारा एक लक्ष मन्वंतरे असिपत्र नावाच्या नरकात पडतो. 

हे कांते, "शालिग्रामावरील तुलसीपत्राचा विच्छेद केल्यास स्त्रीवियोग घडतो. शंखावरील तुलसीपत्राचा विच्छेद केल्यास भार्याहीन व रोगग्रस्त होतो. शालिग्राम, शंख व तुलसी हे एकत्र ठेवणारा महाज्ञानी व हरीप्रिय होतो. 

एकदा जो जिच्या ठिकाणी वीर्याधान करतो, तिचा विच्छेद केल्यास त्याला दुःखे प्राप्त होतात. तू एक मन्वंतर शंखचूडाची प्रिया आहेस म्हणून तुझा शंखाशी वियोग होणे हे दुःखद आहे." 

श्रीहरीने अशारीतीने तुलसीची समजूत घातली. नंतर देह टाकून तिने दिव्यरूप धारण केले आणि ती हरीच्या वक्षस्थळी राहिली. नंतर तिच्यासह श्रीहरी वैकुंठी गेला. लक्ष्मी, सरस्वती, गंगा, तुलसी चारी स्त्रिया हरीला प्रिय आहेत. 

त्याचवेळी तिच्या देहापासून गंडकी नदी उत्पन्न झाली. हरीसुद्धा तिच्या तीरावरील एक पर्वत झाला. तेथील विविध किडे, विविध शीला कोरत असतात. त्यातील उदकात पडणार्‍या शीला पुण्यफल देणार्‍या असतात. जमिनीवर पडलेल्या शीला सूर्याच्या उष्णतेमुळे पिंगल होतात.
========================☀
*सं :- श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

संध्योपासना

*🔅संध्योपासना*🔅
-------------------------------

प्रातःसंध्या नक्षत्रे लुप्त होण्यापूर्वी, मध्यान्ह संध्या सूर्य मध्यावर आला असताना, सायंसंध्या सूर्यास्तापूर्वी करून उपासना करावी. प्रातःसंध्या सूर्योदयापूर्वी उत्तम, नक्षत्रे लोप झाल्यावर मध्यम व सूर्योदयानंतर अधम होय. सायंसंध्या सूर्यास्तापूर्वी उत्तम, सूर्यास्तानंतर मध्यम, नक्षत्रे दिसू लागल्यावर अधम अशी तीन प्रकारची आहे. ब्राह्मण हा वृक्ष, संध्या ही त्याची मूळे, कर्म हीच त्याची पाने होत. म्हणून प्रयत्नपूर्वक मूळांचे रक्षण करावे. नाहीतर वृक्षशाखा रहाणार नाहीत. जो जिवंतपणी संध्योपासना करीत नाही तो शूद्र होय. तो मृत्यूनंतर श्वान होतो. संध्येवाचून अन्य कर्माचा अधिकारी होता येत नाही. उदय व अस्त यांच्यानंतर तीन घटकांपर्यंत संध्येची उपासना करावी. तोपर्यंत संध्या केल्यास प्रायश्चित नाही. कारण अन्य कारणाने मुख्य काल न साधल्यास हा गौण काल सांगितला आहे. काळाचे अतिक्रमण झाल्यास चवथे अर्ध्य द्यावेत किंवा प्रथम आठशे गायत्री जप करावा. त्या कालाची अधिदेवता असेल तिचे स्मरण करून संध्या करावी. घरात केलेली संध्या साधारण, गाईच्या गोठ्यात मध्यम, नदीकिनारी उत्तम, देवीच्या घरात सर्वोत्तम होय. देवीची उपासना असल्याने तिन्ही संध्या देवीच्या समीप कराव्यात. ब्राह्मणांना हेच फलदायी दैवत आहे. गायत्री उपासनेपुढे विष्णु व शिव यांची उपासना मुख्य नाही. ब्रह्मादि देवसुद्धा योग्यवेळी संध्यास्नान करीत असतात. वेदही तिची उपासना करतात. म्हणून तिला वेदोपास्या म्हणतात. सर्व द्विज शाक्त आहेत. कारण ते आदिशक्ती वेदांची माता जी गायत्री, तिची उपासना करीत असतात. केशवादि देवांची नावे घेऊन आचमन करावे. केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णू मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर, ऋषीकेश, पद्मनाभ, दामोदर, संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज, नारसिंह, अच्युत, जनार्दन, उपेंद्र, हरी, कृष्ण या क्रमाने नावे ॐकारपूर्वक उच्चारावीत. नंतर स्वः असे म्हणून उदक प्राशन करावे व नमः म्हणून स्पर्श करावा. पहिल्या तीन नावांनी उदक प्राशावे. नंतरच्या दोन नावांनी हात धुवावेत. दोन नावांनी मुख प्रक्षालन, दोन नावांनी मार्जन, एका हाताने प्रोक्षण करावे. एकेका नावाने दोन्ही पाय, मस्तक प्रोक्षित करावे. संकर्षणादि बारा नावांनी शरीराच्या बारा अंगास स्पर्श करावा. संकर्षण म्हणून मधली तीन बोटे जोडून मुखास, वासुदेव, प्रद्युम्न नावांनी अंगठा व तर्जनी जोडून नाकपुड्यास, अनिरुद्ध, पुरुषोत्तम नावांनी अंगठा व अनामिका जुळवून नेत्रास, अधोक्षज, नारसिंह म्हणून कर्णद्वारास, अच्युत म्हणून नाभीस, जनार्दन म्हणून तळहाताने हृदयास, उपेंद्र म्हणून मस्तकास, हरये नम: कृष्णाय नमः म्हणून दोन्ही बाजूस स्पर्श करावे. आचमन घेताना डावा हात उजव्या हातास लावावा. त्याशिवाय उदक शुद्ध होत नाही. गोकर्णाच्या आकाराचा हात करावा. उडीद बुडेल इतके पाणी घ्यावे. त्यापेक्षा कमी अधिक उदक प्राशन केल्यास तो द्विज मद्यपी होतो. सर्व अंगुली, अंगठा, कनिष्ठिका जोडून उजव्या हाताने आचमन करावे. प्रणवाचे स्मरण करून चतुर्थपदयुक्त शिरसासह गायत्री जप करावा. नंतर प्राणायाम करावा. प्रथम उजवी नाकपुडी दाबून डाव्या नाकपुडीने वायु उदरात घ्यावा. त्याला कुंभकाने स्थिर करावे. नंतर डावी नाकपुडी दाबून उजव्या नाकपुडीने वायु बाहेर सोडावा. यालाच प्राणायाम म्हणतात. उजवी नाकपुडी अंगठा डावी कनिष्ठिका व अनामिका यांनी दाबून मधले बोट व तर्जनी सोडावी. ज्यांचे मन नियमित केले आहे त्यांनी रेचक, कुंभक, पूरक असा प्राणायाम करावा. रेचक वायूस बाहेर सोडतो. पूरक वायूस उदरात भरतो. कुंभक वायूस स्थिर करतो, पूरक करताना नीलकमलाप्रमाणे कृष्णवर्ण, चतुर्भुज हरी नाभिकमलात असल्याची भावना करावी. कुंभकाचे वेळी हृदयात कमलासनावर ब्रह्मदेव व रेचकसमयी स्कटिकवर्णाच्या निर्मल ललाटावरील महेशाचे चिंतन करावे. पूरकाचे वेळी विष्णूस पूज्य, कुंभकाचे वेळी ब्रह्मदेवाची गती व रेचकाने महेश्वर यांची प्राप्ती होते. हे पौराण आचमन होय. हे नारदा, आता पापनाश करणारे श्रौत आचमन सांगतो. प्रथम प्रणवाचा उच्चार करून गायत्रीची ऋचा म्हणावी. तिच्या प्रत्येक पदारंभी भूः वगैरे तीन व्याहुती म्हणाव्यात. या आचमनास श्रौत आचमन म्हणतात. शिरसासह व्याहृतीपूर्वक गायत्रीचा जप करावा. प्रत्येक वेळी प्रणव योजून तीन वेळा जप केल्यास प्राणायाम होतो. प्रणव म्हणून पाच बोटांनी नाकाचे अग्र दाबून धरावे म्हणजे सर्व पापहरण करणारी मुद्रा होते. कनिष्ठिका व अनामिका यांच्या योगाने यतींनी व ब्रह्मचार्‍यांनी प्राणायाम करावा. 'अपोहिष्ठा' हे मंत्र म्हणून कुशोदकाने प्रोक्षण करावे. ऋचेच्या अथवा पदाच्या शेवटी मार्जन करावे. म्हणजे वर्षभरातले पाप नाहीसे होते, आचमन करून 'सूर्याश्च' या मंत्रांनी अंतःकरणात पोहोचेपर्यंत उदक प्राशन करावे. प्रणव, व्याहृती, प्रणवयुक्त गायत्रीजप करून 'अपोहिष्टा' या सूत्रांनी मार्जन करावे. यज्ञोपवीत उजव्या हाताखाली घालावे. गोकर्णाप्रमाणे केलेल्या हातात उदक घेऊन नासिकेजवळ न्यावे. डाव्या कुशीत पातकाचे व कृष्णवर्ण पुरुषाचे स्मरण करावे. नंतर 'ॠतूंच' ही ऋचा म्हणावी. दुपादा इत्यादी ऋचा म्हणाव्या. उजव्या नाकपुडीने श्वासाच्या योगाने उदकात पाप आणावे. नंतर उदकाकडे न पहाता ते डाव्या बाजूस दगडावर टाकावे व शरीर निष्पाप झाल्याची भावना करावी. नंतर उठून दोन्ही पाय सारखे जोडावेत. अंजुलीने जल घेऊन सूर्याकडे पहात गायित्रीने अभिमंत्रित करावे. असे तीन वेळा उदक उडवावे. हेच अर्ध्यदान होय. नंतर 'असौ अदित्यः' मंत्र म्हणून सभोवार उदक उडवीत स्वांग प्रदक्षिणा घालावी. मध्यान्हकाली एकदा, दोन्ही संध्यांचे वेळी अर्ध्य द्यावेत. प्रभातकाली दंडाप्रमाणे उभे राहून, मध्यान्हसमयी जरा ओणवे होऊन, सायंकाळी आसनावर बसून द्विजाने उदक उडवावे. त्याचे धारण सांगतो. मंदेह नावाचे कृतघ्न, घोर असे तीस कोटी महावीर राक्षस सूर्यास खाण्याची इच्छा करीत असतात. त्यासाठी तप करणारे ऋषी महासंध्येची उपासना करतात

व उदकांजली फेकतात. त्यामुळे उदक वज्रासारखे होऊन राक्षस दग्ध होतात. म्हणून ब्राह्मणाने संध्योपासना करावी. त्यामुळे महत्पुण्य लाभते. अर्ध्याच्या अंगभूत मंत्राच्या उच्चाराने सांग संध्येचे फल मिळते. ''तो अर्क मी आहे, मी ज्योती आहे. आत्मा स्वयंप्रकाश आहे. मी शिव आहे, मी आत्मज्योती आहे. आत्मा स्वयंप्रकाश आहे. शुद्ध, सर्व ज्योती व रस मी आहे.'' असा हा मंत्र आहे. हे वरदायिनी, ब्रह्मरूपिणी, देवी गायत्री, ये आणि जपाची, अनुष्ठानाची सिद्धी होण्यासाठी माझ्या हृदयात प्रवेश कर. हे देवी, उठ. आता पुन्हा येण्यासाठी गमन कर. हे देवी, माझ्या हृदयात प्रवेश करून अर्ध्यामध्ये गमन कर. असे म्हणून आपले आसन शुद्धी स्थळी मांडावे. त्यावर बसून वेदमाता गायत्रीचा जप करावा. प्राणायामानंतर खेचरी मुद्रा करावी. प्रातः संध्येच्या वेळी अशी मुद्रा करावी. आता हे नारदा, तिच्या नावाचा अर्थ सांगतो. चित्त शून्य आकाशात भ्रमण करते, जिव्हा पोकळीमध्ये रहाते, दृष्टी दोन्ही भिवयात प्रवेश करते, त्या अवस्थेला खेचरी अवस्था म्हणतात. सिद्धासनासारखे आसन नाही. कुंभकासारखा वायु नाही. खेचरी मुद्रेसारखी मुद्रा नाही. प्रणवाचा उच्चार करून वायूस जिंकून, निरहंकार, ममताशून्य होऊन स्थिर आसनावर निश्चल व्हावे. योनीस्थान एका पायाच्या अंगुलांनी बंद करावे. दुसर्‍या पायाच्या टाचेने शिवणी दाबून धरावी. हृदय एकाग्र करावे, शरीर दंडाप्रमाणे ताठ ठेवावे. स्तंभाप्रमाणे निश्चल व्हावे. इंद्रियांचे संयमन करावे. निश्चल दृष्टीने भूमध्यप्रदेशी पहावे. ह्मा आसनालाच सिद्धासन म्हणतात. गुणविशिष्ट गायत्री मजकडे येवो. हे देवी, तू वेदांचे ज्ञापन करणारी आहेस. म्हणून सवितृमंडलापासून माझ्या हृदयात ये. *ॐ हे अक्षर 'ब्रह्मसदृश* ' आहे म्हणून मजकडून उपासना होईल असे कर. दिवसाची अभिमानी देवता दिवसाचे पाप घालविते. हे सर्व वर्णे, हे महादेवी, हे संध्याविद्ये, हे सरस्वती, हे अजरे, हे अमरे, सर्वदेवी, तुला नमस्कार असो.'' 'तेजोसि' या मंत्राने देवीचे आवाहन करावे. नंतर शापमोचनासाठी विधान करावे. ब्रह्मदेव, विश्वामित्र, वशिष्ठ या तीन प्रकारे शाप आहेत. ब्रह्मदेवाच्या स्मरणाने ब्रह्मदेवाचा शाप निवृत्त होतो. विश्वामित्राच्या स्मरणाने विश्वामित्राचा शाप व वसिष्ठाच्या स्मरणाने वसिष्ठाचा शाप नाहीसा होतो. 'मी हृदयकमलात प्रमाणभूत, सत्यस्वरूप, सर्व जगत्‌स्वरूप अशा पुरुषाने ध्यान करतो.' तो परमात्मा चिद्‌रूप शब्दातीत आहे. हे नारदा, आता संध्येच्या अंगभूत न्यासविधी सांगतो. ॐ असे म्हणून 'पादाभ्यां नमः' असा उच्चत्करावा. ॐ भूवः ' जानुभ्‍यां नमः' म्हणावे. 'स्वः कटिभ्यां नमः; महः मनाम्यै नम:; जनः हृदयाय नमः; तपः कंठाय नमः;' 'सत्यं ललाटायनम'; असे म्हणावे. 'तत्सवितुः अंगुष्टाभ्यां नमः; 'वरेण्यं ' तर्जनीच्य्या नमः ;' 'भर्गो देवस्य मध्यमाभ्यां नमः ।' 'धीमहि अनामिमकाभ्या नम:; ।' धियो यो नः कनिष्टिकाभ्यां नमः । ' असे म्हणून न्यास करावा. प्रचोदयात् असे म्हणून हाताची पाठ व तळ यावर न्यास करावा. ' *तत्सवितुः ब्रह्मात्मने हृदयाय नम:;' तसेच 'वरेण्यं विष्णूवात्मने शिरसे नमः;' पुढे ' भर्गो देवस्य रुद्रात्मने शिखायै धीमही शक्यात्मने करचायाय; धीयोयोनः कलात्मने नेत्रत्रयाय; प्रचोदयातू सर्वात्मने अस्त्राय' असे म्हणून शेवटी नमः उच्चारून न्यास करावा.* गायत्रीच्या अक्षरापासून उत्पन्न झालेला न्यास श्रेष्ठ व पापहरण करणारा आहे. प्रथम प्रणवाचा उच्चार करून वर्णाचा न्यास करावा. तत्काराचा उच्चार करून दोन्ही पदांगुष्ठावर न्यास करावा. सकाराचा दोन्ही घोट्यावर, विकाराचा दोन्ही जंघावर न्यास करावा. तुकाराचा दोन्ही जानुवर, वकाराचा मांड्यांवर, रेकाराचा गुदाचे ठिकाणी, णिकार लिंगप्रदेशी, यकार दोन्ही कटीवर, भकार नाभीमंडलावर, गोकार हृदयाच्या ठिकाणी, देकार स्तनांचे भागी, वकार हृदयावर, स्यकार कंठप्रदेशी असे न्यास करावेत. नंतर धीकार मुखामध्ये, मकार तालूमध्ये, हिकार नासाग्रावर, धिकार, नेत्रमंडळावर, मोकार भ्रूमध्यभागी, दुसरा योकार ललाटावर, नकार पूर्वमुखी, प्रकार दक्षिणमुखी, चोकार पश्चिम मुखावर, दकार उत्तर मुखावर, याकार मस्तकावर व तकाराचा व्यापक न्यास करावा. काही जपात तत्पर रहाणारे पुरुष हा न्यास करीत नाहीत. त्यानंतर जगदंबिका महेश्वरीचे ध्यान करावे. जिची कांती जास्वंदीप्रमाणे आहे, जी परमेश्वरी कुमारी आहे, जी लाल कमलासनावर बसली आहे, लालपुष्पे व वस्त्रे जिने धारण केली आहेत, जिला चार मुखे, चार हात, प्रत्येक मुखास दोन नेत्र, स्रुक, स्रुवी, जपाची माळ, कमंडलू जिने धारण केला आहे, जी सर्व आभरणांनी युक्त आहे, जी ऋग्वेदाचे ध्यान करीत आहे, हंस हे जिचे वाहन आहे, आहवनीय अग्नीमध्ये जी रहात असते, जी ब्रह्मदेवाची देवता आहे, ऋग्वेदाचा एक, यजुर्वेदाचा एक, सामवेद व अथर्ववेदाचा एकेक अशा चार पादांची जी युक्त आहे, जी अष्टदिशा अष्टकुशींनी युक्त आहे, अशा त्या देवीचे ध्यान करावे. व्याकरण, शिक्षा, कल्प, निरुक्त, ज्योतिष, इतिहास, पुराण, उपनिषद या सात मुखांनी जी युक्त आहे, अग्निमुखा, रुद्रशिखा, विष्णूचित्ता अशा माहेश्वरीची भावना करावी. जिचे कवच ब्रह्मदेव आहे, गोत्र सांख्यायन सांगितले आहे. त्या आदित्य मंडलात असलेल्या महेश्वरी देवीची ध्यान करावे. अशारीतीने वेदमाता गायत्रीचे ध्यान करावे. नंतर देवीची प्रीती उत्पन्न करावी. अशी मुद्रा धारण करावी. संमुख, सुंपटं, विततं, विस्तृत, द्विमुख, त्रिमुख, चतुष्कं, पंचकं, षण्मुखं, अधोमुखं, व्यापकांडालीकं, शंकरं, यमपाशं, ग्रथितं, उमुखं, क्लिबं, मुष्टिकं, मस्त्यं, कूर्म, वराहकं, सिंहाक्रांतं, महाक्रांतं, मुद्‌गरं, पल्ववं हा गायत्रीच्या चोवीस मुद्रा आहेत. त्या सर्व मुद्रा तंत्रोक्त असून हातांनी करावयाच्या आहेत. नंतर शंभर अक्षरांच्या गायत्रीची आवृत्ती करावी. गायत्रीची चोवीस अक्षरे सांगितलेली आहेत. तिचा उच्चार करून नंतर ' *जातवेदसे सुनवाभ सोमं' ही ऋचा म्हणावी. शेवटी त्र्यंबकं यजामहे' हा मंत्र म्हणावा.* याप्रमाणे तीन ऋचा म्हटल्यावर शंभर वर्णात्मक गायत्री होते. ही पुण्यकारक आहे. म्हणून ॐ भूः भुवः, स्व या व्याहृती म्हणून चोवीस अक्षरांची गायत्री म्हणावी. श्रेष्ठ ब्राह्मणाने नित्य जप करावा. त्यामुळे संध्येचे फल प्राप्त होऊन सुख मिळते. 
========================📓
*चिंतन :- श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

भस्म माहात्म्य

*भस्म माहात्म्य*
-------------------------

अग्नीजन्य पण गौण भस्मामुळे अज्ञानाचा नाश होतो. अग्निहोत्राच्या अग्नीपासून झालेले मुख्य भस्म होय. विरजा व स्मार्त अग्नीपासून झालेले, समिदग्नीपासून झालेले, पंचाग्नी, दावानलाग्नी यापासून झालेले, असे पाच प्रकारचे भस्म आहे. तीन वर्णियांनी अग्नीहोत्रापासून निर्माण झालेले विरजाग्नीपासूनचे भस्म घ्यावे. गृहस्थांनी स्मार्त अग्नीपासूनचे व ब्रह्मचार्‍यांनी समिदग्नीपासून निर्माण झालेले भस्म लावावे. श्रोतियांच्या घरातील पाच अग्नीपासून उत्पन्न झालेले भस्म शूद्रांनी धारण करावे. विरजानल भस्माचा काल चित्रक्षत्र युक्त पौर्णिमा व रहाण्याचे ठिकाण हाच देश होय. क्षेत्र, बाग, अरण्य ही स्थळेही प्रशस्त आहेत. तेथे शुक्रत्रयोदशीला सुस्नात होऊन नित्यकर्म उरकून आचार्यांनी अनुज्ञा घ्यावी. त्यांचे पूजन करावे. शुभ्र वस्त्रे धारण करून यज्ञोपवीती करावी. पुष्पमाला घालून चंदन लावावे. दर्भासनावर बसावे. उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करावे. तीन प्राणायाम करावे. देव व देवी यांचे ध्यान करावे. ''मी हे व्रत करतो'' असे म्हणून दीक्षा घ्यावी. शरीर नाश होईपर्यंत अथवा ठराविक मुदतीपर्यंत संकल्पाप्रमाणे विरजाहोमाकरता शास्त्रोक्त अग्नी उत्पन्न करावा. आज्य, समिधा, चरू यांनी यथाविधी हवन करावे. तसेच याच द्रव्यांनी मूलमंत्राने हवन करावे. ''माझ्या देहातील तत्वे शुद्ध होवोत'' असे चिंतन करावे. पाच इंद्रिये, सात धातु, पंच वायु, मन, बुद्धी, अहंकार, तीन गुण,

प्रकृती, पुरुष, राग, अविद्या, कला, नियती, काल, माया, विद्या, महेश्वर, सदाशिव, शक्ति, शिवतत्त्व ही तत्त्वे क्रमाने असतात. विरजामंत्राच्या हवनाने ही शुद्ध होतात. नंतर गोमयाचा गोळा करून अभिमंत्रण करावे. तो अग्नीत ठेवावा. त्या दिवशी हविष्यान्न भक्षण करावे. चतुर्दशीस प्रातःकाली पूर्वोक्त सर्व क्रिया करून निराहार रहावे. पौर्णिमेच्या दिवशी तसेच करून रूद्राग्नीचा उपसंहार करून होमाची समाप्ती करावी. एकच शिखा ठेवून मुंडन करावे. स्नान करून भोजन करावे. साधकाची लज्जा नष्ट झाली असेल तर त्याने दिगंबर रहावे अथवा काषाय वस्त्र परिधान करावे. पाय धुऊन आचमन करावे व विरजाग्नीपासून झालेले भस्म धारण करावे. ते मंत्रोक्त मस्तकापासून मुख्य अंगास चोळावे व क्रमाने सर्वांग लिप्त करावे. *शिवाय नमः* या मंत्राने सर्वांगास भस्म लावावे. नंतर पुंड्र लावावा. शिवत्याचे आचरण करावे. या प्रमाणे त्रिकाल आचरण ठेवावे. हेच पाशुपत व्रत होय. भुक्ती, मुक्ती देणारे आहे. हे पशुत्वाचे निवारण करते. हे व्रत धरून लिंगाकृत महादेवाची पूजा करावी. भस्मस्नान हे अत्यंत पुण्यकारक व सौख्य प्राप्त करून देणारे आहे. त्यामुळे आयुष्य, बल, आरोग्य संपत्ती, पुष्टी प्राप्त होते. म्हणून रक्षण, मंगल व सर्व समृद्धी यासाठी भस्मलेपन करावे. जे आपले शरीरास भस्मलेपन करतात, त्यांना महामारीपासून भय प्राप्त होत नाही. शांतिक, पौष्टिक, कामिक असे तीन प्रकारचे भस्म आहे. 
========================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

Sunday, 4 February 2018

*भस्म व त्रिपंड्र लेपन*

*भस्म व त्रिपुंड्र लेपन*
--------------------------------

शिरोव्रत यथाशास्त्र धारण केले आहे त्यांनाच या परविद्येचा उपदेश करावा. इतरांना करू नये. शिरोव्रताच्या आचारानेच ब्रह्मदेव वगैरे देवता झाल्या. सर्व देव हे व्रत करतात. शिरोव्रत करणारा सर्व पापापासून मुक्त होतो. हे अथर्वण अरण्यात सांगितले आहे, म्हणून याला शिरोव्रत म्हणतात. त्याची प्राप्ती महत्‌पुण्याने होते. इतर शाखात या व्रताची वेगवेगळी नावे सांगितली आहेत. पण सर्व शाखात हे व्रत एकच आहे. सर्व शाखात शिवसंज्ञक व सत्य ही वस्तु एकच आहे. तसेच ज्ञानही एकच आहे. शिरोव्रत शून्य होय. हे व्रत पापास दग्ध करते. त्याचे उत्तम आचरण करावे. अथर्वण वेदाची श्रुती सूक्ष्म आहे. त्यातून सूक्ष्म अर्थच प्रकाशित होतो. या व्रताचे नित्य अनुष्ठान करावे. ' *अग्निरीतिभस्म* ' इत्यादी सहा मंत्रांनी शुद्ध केलेले भस्म सर्वांगास लावावे. हेच शिरोव्रत होय. ब्रह्मविद्येचा उदय होईपर्यंत संध्यासमयी हे व्रत करावे म्हणजे विद्या प्राप्त होते. शिरोव्रताने स्नान करणारास जो उपदेश करीत नाही. त्याची सर्व विद्या नष्ट होते. ब्रह्मविद्येचा उपदेश करणारा हजारो जन्म कारूणिक असतो. अज्ञानाच्या प्राबल्यामुळे द्वेष वाढतो. त्यामुळे आत्मज्ञान होत नाही. शिरोव्रत करणारे ब्रह्मोपदेशाचे अधिकारी आहेत. हे पाशुपत व्रत ज्या द्विजांनी पाळले आहे त्यांना उपदेश द्या असे वेदवचन आहे. जो पशु असतो तो या व्रताने आपले पशुत्व टाकतो. त्रिपुंड्रधारणाविषयी जाबाल श्रुतीत आदराने वर्णन केले आहे.

म्हणून *ॐकारसहित 'त्र्यंबकं यजामहे' इत्यादी मंत्राने व शिवाय नमः असे म्हणून त्रिपुंड्र धारण करावा. तीन वेळा ॐकाराचा उच्चार करून हंसः शूचिषद् या मंत्रांनी त्रिपुंड्र लावावा. त्र्यंबकं व ॐ शिवाय नमः इति लाटे असे म्हणून गृहस्थ व वानप्रस्थ यांनी त्रिपुंड्र चर्चावा.* मेधावी या मंत्राने ब्रह्मचार्‍याने त्रिपुंड्र धारण करावा. ब्राह्मणाने नित्य अनुष्ठान करावे. वैदिक मंत्रांनी सिद्ध केलेले भस्म देहास फासावे. रुद्रलिंगाची पूजा करावी. पंचाक्षर मंत्राचे उच्चार करून ललाट, हृदय, बाहू या ठिकाणी भस्म लावावे. त्रियायुष व मेधावी मंत्राने ब्रह्मचार्‍याने व शिवाय नमः या मंत्राने शूद्राने भक्तीपूर्वक त्रिपुंड्र व भस्म लावावे. हा आचार सर्व धर्मात श्रेष्ठ व तत्त्वभूत आहे. अग्निहोत्रातील व विरजा अग्नीपासून झालेले भस्म घ्यावे. हे शुद्ध पात्रात ठेवावे. हातपाय धुऊन आचमन करावे. भस्म घेऊन पाच ब्रह्ममंत्रांनी तीन प्राणायाम करावे. अग्नितीरी भस्म या मंत्राने अभिमंत्रित करून त्याच सात मंत्रांनी तीन बेल्ली अभिमंत्रण करावे. *ॐ आपो ज्योति* असे म्हणून ध्यान करावे. भस्म अंगास फासल्यामुळे मनुष्य पापरहित होतो. नंतर महाविष्णु व वरुण यांचे ध्यान करावे. भस्मात पाणी घालून कालवावे. शंकराचे ध्यान करावे. मस्तकावर भस्म उडवावे. ब्रह्मभूत होऊन त्याचेच पुनः ध्यान करावे. ललाट, वक्ष, स्कंध या ठिकाणी आपल्या आश्रमाप्रमाणे मंत्रोक्त, मध्यमा, अनामिका, अंगुष्ठा यांनी भस्म व त्रिपुंड्र लेपन करावे. 
========================📓
*सं:- श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

नारायण नागबली व त्रिपिंडी

*नारायण नागबली व त्रिपिंडी*
------------------------------------------------

श्रीमन्नारायणादि पंचदेवतांना उद्देशून अतिश्रद्धेने दिलेले समंत्रक ओ विधीयुक्त असे जे अन्नोदक द्रव्यादी त्यास *नारायणबली* असे म्हणतात.

अष्टनागांना उद्देशून त्याचे समाधानाकरिता श्रद्धेने दिलेले समंत्रक विधीयुक्त, तिल, दर्भ, अन्नोदक, दूध इत्यादि अर्पण करणे यांस *नागबली* असे म्हणतात. या दोन्ही विधीस धर्मशास्त्रात  सकामश्राद्ध असे संबोधले आहे. शास्त्रकारांनी  पुत्रप्राप्ती, संततीस सौख्य, दुर्धर शरीर पीडा व योगक्षेमात वारंवार व्यत्यय येणे ह्या ज्या मानवी जीवनात येणाऱ्या अप्रिहार्य अडचणी आहेत यांचा परिहार होण्यासाठी हा विधी प्रामुख्याने करावा असे सांगितले आहे.

प्रेतोपद्रव्यादि संतंतीप्रतिबंधशरीरपीडानाशकत्वात सकामश्राद्ध भण्यते । ( गो. वि. दर्श )
*कृते गर्भाधाने यदि गर्भोत्पत्यभावो मृतापत्या वा तदा प्रतिबंधक प्रतोपद्रवनिवृत्यर्थ नारायणबलीर्नांगबलिश्च कार्य ।*

हे विधी आपल्या पितरांना गती मिळावी, या उद्देशाने केले जातात. त्यासाठी ‘प्रत्येकाने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या १/१० (एक दशांश) खर्च करावा’, असे शास्त्र सांगते. आपल्या शक्तीनुसार खर्च केला तरी चालतो.

*विधी कोण करू शकतो ?*

१. हे काम्यविधी आहेत. ते कोणालाही करता येतात. ज्यांचे आई-वडील हयात आहेत, त्यांनाही करता येतात.

२. अविवाहित असणार्‍यांनाही एकट्याने हे विधी करता येतात. विवाहित असल्यास पती-पत्नीनी बसून हा विधी करावा.

*निषेध*

१. स्त्रियांनी मासिक पाळीचे दिवस पाळणे अत्यंत जरुरीचे आहे.
२. स्त्री गरोदर असल्यास ५ महिन्यांनंतर करू नये.
३. घरात शुभकार्य म्हणजे लग्न, मौजीबंधन वगैरे काही झाले असल्यास अथवा घरात कोणी व्यक्ती मृत झाली असल्यास सदर विधी एक वर्षापर्यंत करू नयेत.

विधी करण्याकरिता पुरुषांसाठी धोतर, उपरणे, बनियन तर महिलांकरिता साडी, झंपर (पोलके) व परकर इत्यादी नवीन वस्त्रे (काळा किंवा हिरवा रंग नसावा) लागतात. ही नवीन वस्त्रे नेसून विधी करावयाचा असतो. नंतर ती वस्त्रे दान करावी लागतात. तिसर्‍या दिवशी सुवर्ण नागाच्या (सव्वा ग्रॅम) एका प्रतिमेची पूजा करून दान करतात.

 *विधीसाठी लागणारा कालावधी*

वरील तीनही विधी वेगवेगळे आहेत. नारायण-नागबली हा विधी तीन दिवसांचा असतो, तर त्रिपिंडी श्राद्ध विधी एक दिवसाचा असतो. वरील तिन्ही विधी करावयाचे असल्यास तीन दिवसांत करता येतात. स्वतंत्र एक दिवसाचा विधी करावयाचा असल्यासही करता येतो

*नारायणबली*

‘दुर्मरणाने मेलेल्या किंवा आत्महत्या केलेल्या माणसाचे क्रियाकर्मांतर न झाल्यामुळे त्याची प्रेतत्वनिवृत्ती झाली नसेल, तर त्याच्या लिंगदेहाला गती न मिळाल्यामुळे तो भटकत रहातो. असा लिंगदेह कुलाच्या संततीला प्रतिबंध करतो. तसेच कोणत्याही प्रकारे वंशजांना त्रास देतो. अशा लिंगदेहाला गती देण्यासाठी नारायणबली करावा लागतो.

*विधी करण्यास योग्य काल*

नारायणबली हा विधी करण्यासाठी कोणत्याही महिन्याची शुद्ध एकादशी व द्वादशी योग्य असते. एकादशीला अधिवास (देवतास्थापना) करून द्वादशीला श्राद्ध करावे. (हल्ली बहुतेक जण एकाच दिवशी विधी करतात.) संततीप्राप्तीसाठी हा विधी करावयाचा असल्यास दांपत्याने स्वतः हा विधी करावा. पुत्रप्राप्तीसाठी हा विधी करावयाचा असल्यास श्रवण नक्षत्र, पंचमी किंवा पुत्रदा एकादशी यांपैकी एका तिथीला केल्यास अधिक फायदा होतो.

नदीतीरासारख्या पवित्र जागी हा विधी करावा.

 *पहिला दिवस :* प्रथम तीर्थात स्नान करून नारायणबलीचा संकल्प करावा. दोन कलशांवर श्रीविष्णु व वैवस्वत यम यांच्या सुवर्णप्रतिमा स्थापून त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर त्या कलशांच्या पूर्वेस दर्भाने एक रेघ ओढून दक्षिणाग्र कुश पसरावे. त्यावर ‘शुन्धन्तां विष्णुरूपी प्रेतः’ या मंत्राने दहा वेळा उदक घ्यावे.

नंतर दक्षिणेस तोंड करून अपसव्याने विष्णुरूपी प्रेताचे ध्यान करावे. त्या पसरलेल्या कुशांवर मध, तूप व तीळ यांनी युक्त असे दहा पिंड ‘काश्यपगोत्र अमुकप्रेत विष्णुदैवत अयं ते पिण्डः’ असे म्हणून द्यावे. पिंडांची गंधादी उपचारांनी पूजा करून त्यांचे नदीत किंवा जलाशयात विसर्जन करावे. पूर्व दिवसाचा हा विधी झाला.

 *दुसरा दिवस* : माध्यान्हकाली श्रीविष्णूची पूजा करावी. नंतर १, ३ किंवा ५ अशा विषम संख्येने ब्राह्मणांस बोलावून एकोदि्दष्ट विधीने त्या विष्णुरूपी प्रेताचे श्राद्ध करावे. हे श्राद्ध ब्राह्मणांच्या पादप्रक्षालनापासून तृप्तीप्रश्नापर्यंत मंत्ररहित करावे. श्रीविष्णु, ब्रह्मा, शिव व सपरिवार यम यांना नाममंत्रानी चार पिंड द्यावे. विष्णुरूपी प्रेतासाठी पाचवा पिंड द्यावा. पिंडपूजा करून त्यांचे विसर्जन झाल्यावर ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.

एका ब्राह्मणाला वस्त्रालंकार, गाय व सुवर्ण या वस्तू द्याव्यात. मग प्रेताला तिलांजली देण्याबद्दल ब्राह्मणांची प्रार्थना करावी. ब्राह्मणांनी कुश, तीळ व तुलसीपत्र यांनी युक्त असे उदक ओंजळीत घेऊन ते प्रेताला द्यावे. मग श्राद्धकर्त्याने स्नान करून भोजन करावे. या विधीने प्रेतात्म्याला स्वर्गप्राप्ती होते, असे सांगितले आहे.

स्मृतिग्रंथांमध्ये नारायणबली व नागबली हे एकाच कामनेसाठी सांगितले असल्याने दोन्ही विधी बरोबर करण्याची प्रथा आहे. नारायण-नागबली असे या विधीचे जोडनाव यामुळेच रूढ झाले आहे.

*नागबली*

घराण्यात पूर्वी कोणत्याही पूर्वजाकडून नागाची हत्या झाली असल्यास त्या नागाला गती न मिळाल्यामुळे तो कुलाच्या संततीला प्रतिबंध करतो. तसेच अन्य प्रकारे वंशजांना त्रास देतो. या दोषाच्या निवारणासाठी हा विधी करतात.

संततीप्राप्तीसाठी हा विधी करावयाचा असल्यास त्या दांपत्याने स्वतः हा विधी करावा. पुत्रप्राप्तीसाठी करावयाचा असल्यास श्रवण नक्षत्र, पंचमी किंवा पुत्रदा एकादशी यांपैकी एका तिथीला केल्यास अधिक फायदा होतो.’

*त्रिपिंडी श्राद्ध*

तीर्थाच्या ठिकाणी पितरांना उद्देशून जे श्राद्ध करतात, त्याला त्रिपिंडी श्राद्ध असे म्हणतात.

आपल्याला माहीत नसलेल्या, आपल्याच वंशातील सद्गती न मिळालेल्या किंवा दुर्गतीला गेलेल्या व कुळातील लोकांना पीडा देणार्‍या पितरांना, त्यांचे प्रेतत्व दूर होऊन सद्गती मिळण्यासाठी, म्हणजेच भूमी, अंतरिक्ष व आकाश या तीन ठिकाणी असलेल्या आत्म्यांना मुक्ती देण्यासाठी, त्रिपिंडी करण्याची पद्धत आहे. एरव्ही केली जाणारी श्राद्धे ही एकाला उद्देशून किंवा वसु-रुद्र-आदित्य या श्राद्धदेवतांच्या पितृगणांतील पिता-पितामह-प्रपितामह या त्रयींना उद्देशून म्हणजेच तीन पिढ्यांपुरतीच मर्यादित असतात, पण त्रिपिंडी श्राद्धाने त्यापूर्वीच्या पिढ्यांतील पितरांनादेखील तृप्ती मिळते. प्रत्येक कुटुंबात हा विधी दर बारा वर्षांनी करावा, मात्र ज्या कुटुंबात पितृदोष अथवा पितरांमुळे होणारे त्रास असतात त्यांनी हा विधी दोष निवारणासाठी करावा.

*विधी करण्यास योग्य काल*

 त्रिपिंडी श्राद्धासाठी अष्टमी, एकादशी, चतुर्दशी, अमावास्या, पौर्णिमा या तिथी व पूर्ण पितृपक्ष योग्य असतो.
गुरु शुक्रास्त, गणेशोत्सव व शारदीय नवरात्र या कालावधीत हा विधी करू नये. तसेच कुटुंबात मंगलकार्य झाल्यावर वा अशुभ घटना घडल्यावर एक वर्षापर्यंत त्रिपिंडी श्राद्ध करू नये. अगदीच अपरिहार्य असेल, उदा. एक मंगलकार्य झाल्यावर पुन्हा काही महिन्यांच्या अंतराने दुसरे मंगलकार्य होणार असेल, तर त्या दोन कार्यांच्या मध्यंतरी त्रिपिंडी श्राद्ध करावे.

*विधी करण्यास योग्य स्थाने*

त्र्यंबकेश्वर, गोकर्ण महाबळेश्वर, गरुडेश्वर, हरिहरेश्वर (दक्षिण काशी), काशी (बनारस) ही स्थाने त्रिपिंडी श्राद्ध करण्यासाठी योग्य आहेत.

*पद्धत*

‘प्रथम तीर्थात स्नान करून श्राद्धाचा संकल्प करावा. नंतर महाविष्णूची व श्राद्धासाठी बोलावलेल्या ब्राह्मणांची श्राद्धविधीप्रमाणे पूजा करावी. त्यानंतर यव, व्रीही आणि तीळ यांच्या पिठाचा प्रत्येकी एकेक पिंड तयार करावा. दर्भ पसरून त्यावर तिलोदक शिंपडून पिंडदान करावे.

*यवपिंड (धर्मपिंड) :* पितृवंशातील व मातृवंशातील ज्या मृतांची उत्तरक्रिया झाली नाही, संतती नसल्याने ज्यांचे पिंडदान केले गेले नाही किंवा जन्मतःच जे आंधळे-पांगळे होते (आंधळे-पांगळे असल्याने लग्न न झाल्याने संततीरहित), अशा पितरांचे प्रेतत्व नष्ट होऊन त्यांना सद्गती मिळण्यासाठी यवपिंड देतात. याला धर्मपिंड असे नाव आहे.

*मधुरत्रययुक्त व्रीहीपिंड* : पिंडावर साखर, मध व तूप एकत्र मिसळून घालतात, त्याला मधुरत्रय असे नाव आहे. हा दिल्याने अंतरिक्षात असलेल्या पितरांना सद्गती मिळते.

*तीलपिंड : पृथ्वीवर क्षुद्रयोनीत राहून इतरांना पीडा देणार्‍या पितरांना तीलपिंडाने सद्गती प्राप्त होते.*

या तिन्ही पिंडांवर तिलोदक द्यावे. त्यानंतर पिंडांची पूजा करून अर्घ्य द्यावे. श्रीविष्णूसाठी तर्पण करावे. ब्राह्मणभोजन घालून त्यांना दक्षिणा म्हणून वस्त्र, पात्र, पंखा, पादत्राण इत्यादी वस्तू द्याव्यात.’

*पितृदोष असल्यास आई-वडील जिवंत असतांनाही मुलाने विधी करणे योग्य असणे*

श्राद्धकर्त्याच्या पत्रिकेत पितृदोष असेल, तर तो दोष घालवण्याच्या उद्देशाने त्याने आई-वडील जिवंत असतांनाही हा विधी करावा.
श्राद्धकर्त्याचे वडील जिवंत नसतील, तर त्याने विधी करतांना केस काढावेत. वडील जिवंत असणार्‍या श्राद्धकर्त्याने केस काढण्याची आवश्यकता नाही.

 घरातील एखादी व्यक्ती विधी करत असतांना घरातील इतरांनी पूजा वगैरे करणे योग्य असणे

त्रिपिंडी श्राद्धात श्राद्धकर्त्यालाच अशौच असते, घरातील इतरांना नाही. त्यामुळे घरातील एखादी व्यक्ती विधी करत असतांना इतरांनी पूजा वगैरे करणे बंद करण्याची आवश्यकता नाही.
======================📓
*सं- श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

रूद्राक्षमहिमा

*🔅 रुद्राक्षमहिमा*🔅
-----------------------------------

ईश्वर म्हणाले, ''हे महासेनापते, कुशग्रंथी, पुत्र, इतर जीव हे रुद्राक्षाच्या सोळाव्या कलेसही पात्र नाहीत. पुरुषात विष्णु, ग्रहात सूर्य, नद्यात गंगा, मुनीत कश्यप, अश्वात उच्चैश्रवा, देवात ईश्वर, देवीत गौरी हे जसे श्रेष्ठ आहेत, तसेच रुद्राक्षधारण हे सर्व साधनात श्रेष्ठ साधन आहे. अक्षय दानातही हे श्रेष्ठ आहे. यापेक्षा कोणतेही स्तोत्र अथवा व्रत श्रेष्ठ नाही. म्हणून रुद्राक्षाच्या पुण्यफलाचा शेवट सांगण्यास कोणीही समर्थ नाही. ज्याच्या शरीरावर भस्म नाही, ज्याच्याजवळ रुद्राक्ष नाही, ज्याच्याकडे शिवाची पूजा नाही तो चांडाल होय. ज्याच्या मस्तकावर रुद्राक्ष असतात, तो मांस खाणारा, मद्यपी, अगम्य गमन करणारा असला तरी पापमुक्त होतो. यज्ञयागादी कर्मे करून जे फल मिळते तेच फल रुद्राक्ष धारणाने मिळते. चार वेद, पुराणांचे पठण, तीर्थवास इत्यादींमुळे जे पुण्य मिळते, ते केवळ रुद्राक्ष धारणाने प्राप्त होते. मृत्यूसमयी रुद्राक्षधारकास शिवत्व प्राप्त होते. कंठात अथवा बहूत रुद्राक्ष असताना मृत्यू आल्यास तो एकवीस कुले उद्धरून रुद्रलोकी जातो. देव मनुष्य वा चांडाल कोणीही असला तरी त्यास देवाची प्राप्ती होते. काही भक्षण करणारा असो, म्लेंच्छ, चांडाळ, पातकी, कोणीही रुद्राक्ष धारण करताच तो कर्ममुक्त होतो. रुद्राक्ष मस्तकावर धारण केल्यास कोटीपद, कर्ण ठिकाणी दहाकोटीपट, गळ्यात शंभरकोटी, मस्तकाच्या अग्रभागी सहस्रकोटी, यज्ञोपवीतात अयुतपट, भुजात लक्षकोटी, मनगटात धारण केल्यास मोक्ष प्राप्ती होते. रुद्राक्ष धारण करून भक्तीने कर्म करणारास महत्कल मिळते. रुद्राक्षात मन लावून राहिले आहे. त्याने रुद्राक्ष धारण केल्यासारखेच आहे. तो पुरुषही वंद्य होय. रुद्राक्षामुळे कीटक, गर्दभ हे प्राणीही शिवलोकी जातात.'' स्कंद म्हणाला, ''हे परमेश्वरा, कीकट देशात गर्दभाने रुद्राक्ष का धारण केले ?'' श्रीभगवान म्हणाले, ''हे पुत्रा, विंध्य पर्वतावर एक पथिक गर्दभावर रुद्राक्षांचा भार लादून येत होता.

पण थकल्यामुळे त्याला भार सहन न होऊन तो भूमीवर पडला. तेथेच त्याचे प्राणोत्क्रमण झाले. पण तत्काल तो त्रिनेत्र, शूलपाणी, महेश्वररूप झाला. तो नंतर मजजवळ आला. त्याच्यावर भारामध्ये जितके रुद्राक्ष होते तितके लक्ष वर्ष तो शिवलोकी राहिला. हे रुद्राक्षरहस्य फक्त आपल्या शिष्यालाच सांगावे. रुद्राक्ष धारण करणे हे पुण्यप्रद आहे. त्याला उपमा नाही. ज्याने व्रत केले असेल, तो हजार रुद्राक्ष धारण करतो, त्याला सर्व देव मानतात. कारण तो रुद्रतुल्य होय. शिखेत एक, हातात प्रत्येकी बारा, कंठात बत्तीस, मस्तकावर चाळीस, कानात प्रत्येकी सहा, वक्षस्थलावर एकशेआठ रुद्राक्ष धारण करणार्‍याची सर्व देव पूजा करतात. मोती, माणिक, स्फटिक, रुपे, वैडूर्यमणी, सुवर्ण यांसह रुद्राक्ष धारण करणारा शंकर होतो. त्याला पाप स्पर्शही करीत नाही. रुद्राक्ष मालेच्या योगाने मंत्र जपल्यास अनंत फल मिळते. रुद्राक्षहीन पुरुषाचे जीवन व्यर्थ होय. रुद्राक्ष मस्तकावर ठेवून स्नान केल्यास गंगास्नानाचे पुण्य मिळते. एकमुखी, पाचमुखी, अकरामुखी, चवदामुखी हे रुद्राक्ष सर्वांना पूज्य आहेत. रुद्राक्षाची भक्तीने पूजा करणारा दरिद्रीही राजा होतो. कोसल देशात गिरिनाथ नावाचा ब्राह्मण होता. तो श्रीमंत, धर्मात्मा, वेदशास्त्रप्रवीण होता. तो यज्ञामुळे दीक्षित झाला होता. त्याला गुणविधी नावाचा सर्वसुंदर पुत्र होता. त्याने आपल्या गुरूच्या मुक्तावली नावाच्या पत्नीस मोहित केले." शिववून म्हणाले, ''हे जेथे मृत्यु पावला आहे त्या ठिकणी भूमीच्या खाली दहा हात रुद्राक्ष आहे. म्हणून आम्ही त्याला शंकराकडे नेत आहोत.'' नंतर त्या गुणनिधीने दिव्यरूप धारण केले व विमानात बसून तो शिवलोकी गेला. असे हे रुद्राक्ष महात्म्य आहे. हे सुव्रता, मी तुला रुद्राक्षाचा महिमा निवेदन केला. हा पापक्षय करणारा आहे. तसेच महापुण्य प्राप्त करून देणारा आहे. 
@  देवीभागवत...
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

दानधर्मादी कर्माची फले

*दानधर्मादी कर्माचे फल*
-----------------------------------

सावित्री म्हणाली, "हे महाभाग धर्मा, सत्यवानाला माझ्याठिकाणी शंभर पुत्र होतील असा वर दे. तसेच माझ्या पित्याला शंभर पुत्र व श्वशुराला नेत्र, राज्य यांची प्राप्ती होऊ दे. एक लक्ष वर्षे उलटल्यावर मी सत्यवानाबरोबर हरीमंदिरी जाईन. हे प्रभो, असा वर दे. तसेच जीव कर्माचे फल व विश्वाचे निरसन याविषयी आपण मला विस्ताराने सांगा." 

धर्म म्हणाला, "हे महासाध्वी, तुझी इच्छा पूर्ण होईल. आता तुला कर्मफलाबद्दल सांगतो. शुभ कर्माचा भोग पुण्यकारक भारतवर्षात भोगावा लागतो. अशुभ कर्माचा नरकात भोगावा लागतो. देव, दानव, दैत्य, गंधर्व हे कर्मजनक नाहीत. पुरुष कर्मजनक आहे. कर्म करणारा मनुष्य सर्व योनीत जाऊन स्वर्ग-नरकात फले भोगतो. पूर्व कर्मे प्राणी योनीत भोगावी लागतात. 

कर्मनाशासाठी भक्तीचा मार्ग आहे. भक्ती दोन प्रकारची आहे. निर्वाणरूप (निर्गुण) प्रकृतियुक्त (सगुण) वाईट कर्मामुळे जीव रोगी व शुभकर्मामुळे तो निरोगी होतो. तसेच कर्मपरत्वे दीर्घ व अल्प आयुष्य, सुख वा दुःख हे भोगावे लागतात. उत्तम कर्मामुळे सिद्धी प्राप्त होते. 

हे देवी, हे पुराणांनी व स्मृतींनी गुप्त ठेवण्यास सांगितले आहे. मनुष्य जाती त्यातून ब्राह्मण जन्म फार श्रेष्ठ आहे. त्यातूनही ब्रह्मनिष्ठ द्विज फारच श्रेष्ठ. सकाम व निष्काम असे दोन प्रकारचे ब्राह्मणा आहेत. सकाम कर्मयोगी व निष्काम उपद्रवरहित असतो. तो देहत्याग करून परमपद मिळवतो.

जे भक्त द्विभुज कृष्णाची सेवा करतात ते गोलोकी जातात. सकाम सेवा करणारे वैष्णव वैकुंठलोकी जाऊन पुन्हा भारतात येतात. ते द्विज जातीत जन्म घेतात. जे निष्काम होतात त्यांना मी निर्मल भक्ती देतो. विष्णुभक्तीहून सकाम ब्राह्मणांना निर्मल बुद्धीची प्राप्ती होत नाही. जे ब्राह्मण तीर्थक्षेत्री तप करतात ते ब्रह्मलोक जाऊन पुन्हा भारतात येतात. स्वधर्माप्रमाणे वागणारे सत्यलोकी जातात. नंतर भारतात परत येतात. ते भारतात सूर्यभक्त होतात. निष्काम धर्म आचरणारे मणिद्वीपाप्रत जातात. 

स्वधर्मरत शिवभक्त, शक्तिभक्त, गणपतीभक्त शिवलोकी जातात. निष्काम हरीभक्त वैकुंठी जातात. स्वधर्मशून्य, देवसेवारहित, दुराचारी, कामुक हे द्विज नरकात जातात. स्वधर्मतत्पर द्विज धार्मिक पुरुषालाच कन्या देतात. ते चंद्रलोकी जातात. चवदा चंद्र होईतो ते तेथे रहातात. सालंकृत कन्यादान करणार्‍याला दुप्पट फल मिळते. 

जे ब्राह्मणाला दूध, रुपे, सुवर्ण, वस्त्र, तूप, फळे इत्यादी देतात त्यांना चंद्रलोक मिळतो. उत्तम गाई, ताम्र ब्राह्मणाला दान देणारे सूर्यलोकात जातात. विपुल भूमि व धन, गृहदान करणारा विष्णुलोकी जातो. राजवाडा दान दिल्यास चौपट व देशदान दिल्यास शतपट पुण्य मिळते. 

तलावाच्या दानाने पापनाश होतो. त्याला जनलोक प्राप्त होतो. वापीच्या दानाचे दसपट पुण्य सांगितले आहे. चार हजार धनुष्य लांबी इतकी विहीर दान केल्यास तडागदानाचे पुण्य लाभते. सत्पात्री कन्यादान केल्यास दहा वापी दानाचे पुण्य मिळते. सालंकृत कन्यादानाचे फल दुप्पट आहे. अश्वत्थ वृक्षाची प्रतिष्ठा करणार्‍यास हजारो वर्षे तपलोक मिळतो. फलांचे उद्यान दान देणारा दहा हजार वर्षे ध्रुवलोकी राहतो. 

जो विष्णूस विमान देतो त्याला मन्वंतरापर्यंत विष्णुलोक मिळतो. ते विमान चित्रयुक्त असल्यास चौपट फल मिळते. शिबिकादानामुळे त्याच्या अर्धे फल मिळते. दोलस्थान असले मंदिर हरीला दान दिल्यास शंभर मन्वंतरापर्यंत विष्णूलोक मिळतो. 

हे पतिव्रते, राजवाडा व राजमार्ग करणारा दहा हजार वर्षे शुक्रलोकी जातो. ब्राह्मणांना व देवांना दिलेल्या दानाचे पुण्य सारखेच मिळते. 

तप केले तरी ब्राह्मणत्व प्राप्त होत नाही. कर्म भोगल्याशिवाय त्याचा क्षय होत नाही. कर्म शुभ असो अथवा अशुभ असो, भोगावेच लागते. देव, तीर्थे इत्यादींच्या सहाय्याने साधक शरीराने शुद्ध होतो. 
@   देवीभागवत..
========================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

Thursday, 1 February 2018

तितिक्षा म्हणजे काय?

*तितिक्षा म्हणजे काय ?*
----------------------------------------

*सहनं सर्वदुःखानां अप्रतीकारपूर्वकं |*
*चिन्ताविलापरहितं सा तितिक्षा निगद्यते ||*
 ( विवेक चूडामणि )

प्रतिकार न करता सर्व दुःखांचे प्रसंग सहन करणे आणि चिंताविलापरहित अशी जी मनाची अवस्था तिला ‘ *तितिक्षा* ’ म्हणतात.  यामध्ये तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत.

१) वर्तमानकाळामध्ये येणाऱ्या अनपेक्षित, दुःखदायक प्रसंगांना कसे सामोरे जावे ?  आनंदाने आणि प्रसन्न मनाने सर्व प्रसंगांचे स्वागत करावे.

२) *चिंता* – प्रत्येक मनुष्याला भविष्यकाळाची चिंता असते.  भविष्यकाळ अज्ञात असल्यामुळे मनात नकळत भीति निर्माण होते.  मन सतत अस्थिर असते.  चिंताग्रस्त होते.  हे मन कधीही सुखी होत नाही.

३) *विलाप* – मनावर सतत चांगल्या-वाईट, सुखदुःखात्मक प्रसंगांचे संस्कार होत असतात.  ते सर्व सूक्ष्मरूपाने साठविले जातात.  अशा भूतकाळातील घटनांची स्मृति वर्तमानकाळात होत असते.  स्मृति ही वाईट नाही.  नको त्या प्रसंगांची आठवण झाली तर त्या आठवणीने मन अस्वस्थ होते, निराश, उद्विग्न होते.  किंवा वर्तमान प्रसंगांची भूतकाळातील प्रसंगांशी मन सतत तूलना करते त्यामुळे ते क्षुब्ध होते, चिडखोर बनते.

अशा प्रकारे मन केव्हाही कोणत्यातरी कारणाने अस्वस्थ, क्षुब्ध, चिंताग्रस्त, बहिर्मुख होत असते.  म्हणून सहनशीलता अशी एक मनाची अवस्था आहे की, ज्यामध्ये मन भूतकाळाच्या संस्कारांच्या स्मृतीने अस्वस्थ होत नाही.  क्षुब्ध होत नाही.  तसेच भविष्यकाळाबद्दल कोणत्याही प्रकारची चिंता, विवंचना नाही आणि वर्तमानकाळात येणाऱ्या प्रसंगांमध्ये मन प्रसन्न, आनंदी असते.  हेच मन शांत, स्थिर, अंतर्मुख, एकाग्र असून ब्रह्मज्ञानासाठी योग्य अधिकारी आहे.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्दसरस्वती लिखित पुस्तकामधून
========================📓
*सं :- श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

रूद्राक्षधारणाचे फल

*रूद्राक्षधारणाचे फल*
--------------------------------

रुद्राक्षाचे मुख ब्रह्मदेव व बिंदू रुद्र होय. विष्णु हे त्याचे पुच्छ आहे. ते भोग व मोक्ष देणारे आहे. पंचमुख व काटेरी लाल, पांढरे, मित्र असे पंचवीस रुद्र एका सूत्रात गुंफावेत व माला तयार करावी. मालेचा मेरु ऊर्ध्वमुख करावा. अशी माला मंत्रसिद्धी प्राप्त करून देते. तिला गंगोदकाने धुऊन पंचगव्य शिंपडून नंतर शुद्ध पाण्याने धुवावे. नंतर मंत्रांचा तिच्यावर न्यास करावा. शिवस्त्रमंत्राने स्पर्श करून शिवकवचाने एकत्र करावे. नंतर त्यावर मूलमंत्राचा न्यास करावा. '' *सद्यो जात* '' इत्यादि एकशे आठ मंत्रांनी प्रोक्षण करावे. मूलमंत्राने तिला शुद्ध भूमीवर ठेवावे. नंतर शिवाची स्थापना करावी. म्हणजे माला सर्व मंत्रसिद्धी देते. ज्या देवांचे मंत्र असेल त्यांची पूजा करावी. नंतर माला गळ्यात घालावी. नित्य रुद्राक्षमालेच्या योगाने जप करावा. सारांश, रुद्राक्ष धारण करणे हे महत्त्वाचे आहे. स्नान, दान, तप, वैश्वदेव, देवपूजा, श्राद्ध, दीक्षासमय यावेळी रुद्राक्ष धारण

करणे अवश्य आहे. त्यावेळी केलेली कर्मे नरक प्राप्त करून देतात. अपवित्र पुरुषाने रुद्राक्ष धारण करू नये. रुद्राक्ष धारण करणारा पापी असला तरी तो पापमुक्त होय असे जबालोपनिषदात सांगितले आहे. रुद्राक्ष धारण करणारे पशूही रुद्रत्व पावतात. रुद्राक्ष धारण करणारे पुरुषांच्या, म्हणजे ब्रह्मदेव, विष्णु, शिव इत्यादी देवांच्या विभूतीच होत. वेदांचे प्रतिपादन करणार्‍यांना रुद्राक्षाची धारणा संमत नाही. पण अनेक जन्मानंतर त्यांना रुद्राक्षाची इच्छा होते. रुद्राक्षाच्या दर्शनानेही कोटीपटीने फल पुण्ये मिळतात. रुद्राक्षमालेसहित जप केल्यास असंख्य कोटीपट पुण्य प्राप्त होते. रुद्राक्ष धारक सर्वांना अवध्य आहे. तो देव व राक्षस यांना वंदनीय आहे. रुद्राक्ष धारण केलेले कुत्रे सुद्धा मृत्युनंतर मुक्त होते. रुद्राक्षधारक उत्तम गतीला जातो. म्हणून महत्प्रयासाने रुद्राक्ष धारण करावा. त्यायोगे एकवीस कुले उद्धरतील व त्याला रुद्रलोकी मान्यता मिळेल. 
@  देवीभागवत...
≠========================🙏🏻
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

सुरभी आख्यान

*🔅 सुरभी आख्यान🔅*
------------------------------------

नारायण म्हणाले, "ती गाईची अधिदेवता असून ती सुरभी गोलोकातच उत्पन्न झाली. एकदा राधानाथ राधा व गोपिकांसह वृंदावनात गेले. तेथे बराच कालापर्यंत त्यांनी एकांतात विहार केला. तेव्हा भगवंताला दूध प्यावेसे वाटले. त्यावेळी आपल्या डाव्या बाजूतून त्यांनी सुरभीला उत्पन्न केले. ती सवत्स व दुभती धेनू असून तिच्या वत्साला मनोरथ म्हणतात. त्या धेनूला पाहिल्यावर दामाने एका भांडयात तिचे दूध काढले. ते अमृताहूनही मधुर दूध भगवान पिऊ लागले. पण अचानकपणे त्यांच्या हातातून भांडे निसटले व ते जेथे पडले तेथे दुधाचे सरोवर झाले. ते अत्यंत विस्तृत असे शंभर योजनेपर्यंत प्रचंड होते. गोलोकात क्षीरसरोवर म्हणून ते विख्यात आहे. 

ते सरोवर गोपी व राधा यांना पुष्करणीइतके प्रिय झाले. त्याचवेळी जेवढे गोप होते तेवढयाच आणखी कित्येक सवत्स कामधेनू सुरभीच्या शरीरातून प्रकट झाल्या. पुढे त्याच्याच संततीने जग व्यापले आहे. प्रथम भगवंताने तिचे पूजन केले. नंतर त्रिभुवनात ती पूजिली जाऊ लागली. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस त्या सुरभीची पूजा करावी. 

"ॐ सुरभ्यै नमः ।" ह्या तिच्या षडाक्षरी मंत्राचा लक्ष जप केल्यास मंत्र सिद्ध होतो. हा मंत्र म्हणजे कल्पतरूच आहे. 

यजुर्वेदात तिचे ध्यान सांगितले आहे. तिचे पूजन समृद्धी प्राप्त करून देते. तसेच मुक्ती मिळून सर्व मनोरथ पूर्ण होते. कारण ती राधेची सखी आहे. गाईमधील ती पहिली गाय

असून गाईंची अधिदेवता आहे. ही गोमाता पवित्ररूपिणी भक्तांची मनोरथ पूर्ण करणारी असून जगात पवित्र आहे. अशा त्या सुरभी देवीचे मी भजन करतो. असे म्हणून घरात अथवा गाईच्या मस्तकावर, गाय बांधतो त्या खांबावर, शालग्रामामध्ये, पाण्यात, अग्नीत तिचे ब्राह्मणाने पूजन करावे. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस सकाळी भक्तीयुक्त मनाने तिची पूजा केल्यास तो भूलोकात मान्य होतो. पूर्वी एकदा वराह कल्पात विष्णु मायेच्या प्रभावामुळे सुरभीने त्रैलोक्यातील दूध नाहीसे केले. तेव्हा सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले व त्याच्या आज्ञेवरून इंद्राने सुरभीचे स्तवन केले. इंद्र म्हणाला, "हे महादेवी, हे सुरभीदेवी तुला नमस्कार असो, तूच त्रैलोक्यातील गोमातांची बीजरूपी देवता आहेस. तू लक्ष्मीच्या अंशापासून उत्पन्न झालीस. कल्पवृक्षाप्रमाणे सर्वांना प्रिय अशा तुला मी नमस्कार करतो. तू क्षीर, बुद्धी, धन देणारी आहेस, हे देवी, माझा तुला नमस्कार असो. हे शुभदे, तू कल्याणरूपिणी, गाई-बैल उत्पन्न करणारी आहेस. तुला प्रणाम असो. हे देवी, तू यश, कीर्ती, धर्म आहेस. मी तुजपुढे लोटांगण घालतो." 

हे स्तोत्र ऐकल्यावर ती गोमाता प्रसन्न झाली व ब्रह्मलोकी इंद्रासमोर प्रकट होऊन तिने महेंद्रास वर दिला. नंतर ती गोलोकी निघून गेली. पुढे विश्वात दुधाची पूर्णता झाली. देवही तृप्त झाले. जो हे स्तोत्र भक्तीने पठण करतो तो गोमान्, धनवान, कीर्तिवान, पुत्रवान् होतो व तीर्थस्नानाचे पुण्य प्राप्त करून घेतो. त्याला यज्ञात दीक्षाग्रहण केल्याचे फळ मिळते. तो शेवटी कृष्णमंदिरी पोहोचतो व कृष्णाची सेवा करतो. तो पुनर्जन्मापासून मुक्त होतो व सुरभीच्या कृपेमुळे तो कृष्णभक्त होतो."
@  देवीभागवत..
============≠==========🙏🏻
*सं- श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

मनसादेवी

*🔅मनसादेवीची महती*🔅
----------------------------------------

श्री नारायणमुनी म्हणाले, "सामवेदात सांगितलेले मनसादेवीच्या पूजनाचे विधी मी तुला सांगतो." 

"तिची कांती पांढर्‍या चाफ्याप्रमाणे असून रत्नालंकारांनी ती विभूषित आहे. अग्नीप्रमाणे शुद्ध वस्त्र तिने परिधान केले आहे. ती नागाचे यज्ञोपवीत ल्याली असून ती सिद्धरूपिणी आहे. अशा त्या देवीची मी भक्ती करतो." 

अशाप्रकारे तिचे ध्यान करावे. निरनिराळे नैवेद्य, धूप, गंध, पुष्पे वगैरे पूजासाहित्य घेऊन मूलमंत्राने तिची पूजा करावी. तिचा कल्पतरू नावाचा इष्ट द्वादशाक्षरी मंत्र आहे. 

*"ॐ र्‍हीं क्लीं मनसादेव्यै स्वाहा"* हा मंत्र पाच लक्ष जपल्यास मंत्र सिद्ध होतो. मंत्रसिद्धी प्राप्त होणार्‍यास विषही अमृताप्रमाणेच भासते. संक्रांतपर्वकाळी, एकांतात, सुस्नात होऊन तिचे भक्तीभावे पूजन करणारा धन, पुत्र व कीर्ती यांनी युक्त होतो. 

पूर्वी भूलोकामध्ये नागजातीच्या भयाने मानव कश्यपास शरण गेले. तेव्हा त्यासह कश्यपमुनी ब्रह्मदेवाला शरण गेले. नंतर ब्रह्मदेवाने सांगितले म्हणून कश्यपाने काही मंत्र तयार केले. वेदबीजाला अनुसरून त्याने मंत्र बनविले होते. नंतर त्याने मनसाला उत्पन्न केले. तप करून मनानेच तिची निर्मिती व पोषण केले. तेव्हा ही मनसा उत्पन्न झाल्यावर कैलासावरील शिवमंदिरात गेली. तेथे तिने चंद्रशेखराचे पूजन केले. देवांची दहा हजार वर्षे तिने सेवा केली. तेव्हा महेश्वर प्रसन्न झाला व त्याने तिला महाज्ञान दिले. सामवेद व अष्टाक्षरी कृष्णमंत्र तिला सांगितला. 

लक्ष्मी, माया, काम यांचे बीज योजून चतुर्थ्यात कृष्णाय असे पद योजावे. नंतर पुढे नमः हे पद ठेवावे. असा तो अष्टाक्षरी मंत्र होता. नंतर शंकराने तिला मंगलनामक कवच, पूजेचा विधीक्रम, पुरश्चरणविधी, मृत्युंजय मंत्र दिला. त्यानंतर तिने तीन युगे पुष्कर क्षेत्रावर श्रीकृष्ण परमात्म्याचे तप केले. तेव्हा त्या प्रभूने तिला दर्शन दिले. 

नंतर कृश झालेल्या मनसेची प्रभूने पूजा केली. तिला वर दिला की, "तू संसारात पूज्य होशील." नंतर श्रीहरी अंतर्धान पावला. 

हे नारदा, कृष्णपरमात्म्याने तिचे पूजन केल्यावर शंकर, कश्यप, देव, मुनी, नाग, मानव यांनी तिची पूजा केली. त्यामुळे ती त्रैलोक्यात पूज्य झाली. नंतर जरत्कारूने तिला वरले. त्यांच्या विवाहानंतर एके दिवशी पुष्करक्षेत्री जरत्कारू मुनी तिच्या मांडीवर मस्तक ठेवून निद्रिस्त झाला होता. सूर्य अस्तास जाण्याचे वेळी पतीच्या धर्मकालाचा लोप होऊ नये म्हणून त्याला उठविण्याचा ती विचार करू लागली. तिने पतीला जागृत केले. पण त्यामुळे तो मुनीश्रेष्ठ क्रुद्ध झाला. तो म्हणाला, "पतीच्या निद्रेचा भंग केलास, त्यामुळे तुझी व्रतवैकल्ये व्यर्थ होत. पतीचे पूजन कृष्णाचे पूजन होय. पतिव्रतेच्या व्रताचे वेळी स्वतः हरी पतीरूप होत असतो. व्रतादि सर्व धर्मकृत्ये पतिसेवेच्या सोळाव्या कलेएवढीपण नाहीत. तेव्हा अशा स्त्रीस कोणते फल मिळते ते तुला सांगतो. "ती प्रथम चंद्रसूर्य असेपर्यंत कुंभीपाक नरकात पडते. नंतर पतिपुत्ररहित ती चांडाली होते." 

असे सांगितल्यावर ती स्त्री भयग्रस्त झाली. ती म्हणाली, "आपल्या धर्मकृत्यांचा लोप न व्हावा म्हणून मी आपणास जागृत केले. पण मज पापिणीला क्षमा करावी." असे म्हणून पतीच्या चरणावर मस्तक ठेवून ती रडू लागली. ते अवलोकन करताच त्या मुनीने सूर्यालाच शाप देण्याचा विचार केला. तेव्हा भानू संध्येसह तेथे आला व मोठया विनयाने म्हणाला, "हे ब्राह्मणा, धर्मलोप होऊ नये म्हणून त्या साध्वीने तुझा निद्राभंग केला. त्यात तिचा काय अपराध ? मी तुला शरण आलो आहे. तू आम्हाला क्षमा कर. ब्राह्मणाने शाप देणे योग्य नव्हे. कारण जाज्वल्य ब्रह्मतेजामुळे ब्राह्मण हा प्राणी ब्रह्मकुंडात उत्पन्न होतो. म्हणून त्याने ब्रह्मज्योतीचे कृष्णरूप ध्यान करावे." 

तेव्हा जरत्कारू संतुष्ट झाला. सूर्यही स्वस्थानी गेला. पण प्रतीज्ञापूर्तीसाठी त्याने आपल्या पत्नीचा त्याग केला. तेव्हा तिने गुरु, देव, शंभू, विधी, हरी, कश्यप यांचे स्मरण केले. त्याचक्षणी ते सर्वजण तेथे आले. तेव्हा त्या ब्राह्मणाने भक्तीभावाने सर्वांची स्तुती केली. सर्वांना नमस्कार करून त्याने विचारले, "तुम्ही का आलात ?" ब्रह्मदेव म्हणाले, "जर तुला भार्येचा त्यागच करायचा असेल तर तू तिच्या ठिकाणी पुत्र उत्पन्न कर. पुत्राविना स्त्रीचा जो पती त्याग करतो त्याचे पुण्य चाळणीतील पाण्याप्रमाणे गळून जाते." ते ऐकताच जरत्कारूने योग सामर्थ्याच्या बलावर मनसेच्या नाभिस मंत्रपूर्वक स्पर्श केला. तो तिला म्हणाला, "हे मनसे, तुला होणारा पुत्र जितेंद्रिय, धर्मतत्पर, तेजस्वी, तपस्वी, सर्वगुणसंपन्न, वेदवेत्त्यात श्रेष्ठ, ज्ञानी, योगी असा यशस्वी होईल. तो विष्णूभक्त उभय कुले उद्धरील. त्याच्या जन्माबरोबरच सर्व पितर आनंदाने नाचू लागतील. जी स्त्री साध्वी व सुशील असते तसाच तिचा पुत्र होतो. यमाच्या तावडीतून सोडविणारी दया हीच खरी भगिनी, विष्णुभक्ती, विष्णु मंत्र देणारा व शुद्ध ज्ञान देणारा तोच खरा गुरु होय. कृष्णाची जाणीव करून देणारे श्रेष्ठ ज्ञान होय. हरीहून दुसरे श्रेष्ठ काही नाही. 

हे साध्वी, तुला मी ज्ञानाचे सार सांगितले. जो ज्ञान देतो तोच स्वामी होय. कारण ज्ञानामुळे प्राणी मुक्त होतो. जो बंधनातून मुक्त करीत नाही तो गुरु, पिता अथवा बंधू व्यर्थ होय. अविनाशी असा कृष्णदर्शनाचा मार्ग जो दाखवीत नाही तो आप्त व्यर्थच

होय. म्हणून हे साध्वी, तू परब्रह्माची आराधना कर. कारण ते ब्रह्मच कृष्णरूप आहे. त्याच्या सेवेमुळे कर्माचा मूळासहित नाश होतो. 

हे प्रिये, मी स्वार्थामुळेच कपट करून तुझा त्याग केला. म्हणून मला क्षमा कर. पतिव्रता स्त्रिया क्षमाशील असतात. हे देवी, सांप्रत मी पुष्करतीर्थावर तपश्चर्येस जात आहे. कारण मला कृष्णाच्या चरणकमलाशिवाय काहीही नको. तू कोठेही जा." 

हे पतीचे भाषण ऐकून मनसा अश्रुपूर्ण नेत्रांनी म्हणाली, "हे प्रभो, वस्तुतः माझा त्याग करण्यासारखा अपराध मजकडून घडला नाही. म्हणून मी जेव्हा आपले स्मरण करीन तेव्हा आपण दर्शन द्यावे. स्त्रियांना प्राणनाथाच्या वियोगामुळे मरणप्राय दुःख होते. पतिव्रतांना शंभर पुत्रांपेक्षाही पतीच प्रिय असतो. साध्वी स्त्रियांचे मन सदैव पतीच्या ठिकाणीच स्थिर असते." 

असे म्हणून ती पतीच्या चरणावर कोसळली. जरत्कारूने तिला आपल्या मांडीवर बसवले व आपल्या अश्रूंनी तिला न्हाऊ घातले. वियोगाच्या दुःखाने मनसेने मुनीची मांडी भिजवून टाकली. पण ज्ञानामुळे ती दोघेही सत्वर शोकमुक्त झाली. नंतर तो मुनी पत्नीची समजूत घालून निघून गेला. इकडे मनसा आपल्या गुरूदेव शंकराच्या घरी गेली. तेथे तिला पार्वतीचा उपदेश झाला. पुढे योग्य काली तिला नारायणाच्या अंशरूप असा सुलक्षणी पुत्र झाला. शंकराने त्याचे जातकर्म केले व त्याला संपूर्ण वेद शिकविले. तसेच त्याला मृत्युंजय असे ज्ञान दिले. मनसेचा पुत्र अस्तिक हा अद्वितीयच होता. शंकराने सांगितल्यावरून तो पुष्कर तीर्थावर तपासाठी गेला. देवांची तीन लक्ष वर्षे त्याने महामंत्राचा जप करून तप केले. नंतर तो पुनः शंकरास नमस्कार करण्यासाठी कैलासावर गेला. नंतर मनसा आपल्या पुत्राला घेऊन पित्याकडे गेली. त्यामुळे त्या प्रजापतीलाही अपार आनंद झाला. तेथेच ती राहू लागली. 

एकदा अभिमन्यूचा पुत्र परीक्षित राजाला सात दिवसानंतर तुला सर्पदंशाने मृत्यू येईल असा एक ब्राह्मणाचा शाप झाला. ते ऐकून राजा देहरक्षणासाठी निर्वात जागी राहू लागला. एक धन्वंतरी राजाला वाचविण्यास जात होता. पण तक्षकाने त्याला अद्‍भुत मणी देऊन परत पाठवले व अंतरिक्षातील वाडयात जाऊन मंचकारूढ झालेल्या राजाला दंश केला. नंतर जनमेजयाने पित्याचे सर्व संस्कार केले. पुढे त्याने सर्पयज्ञ केला. तेव्हा भयभीत होऊन तक्षक इंद्राला शण गेला. हे जाणताच इंद्राचीच आहुती देण्याचे त्याने मनात आणले. तेव्हा सर्व सर्प मनसेला शरण गेले. अस्तिकाने राजाकडे येऊन त्याला सर्पांना जीवदान देण्यास सांगितले. ते राजाने कबुल केले. ब्राह्मणांनाही विपुल दक्षिणा दिल्या. 

प्राण वाचवल्याबद्दल इंद्राने व तक्षकासह सर्व सर्पांनी विधियुक्त मनसेचे पूजन केले व तिला आवडता बली अर्पण केला. नंतर सर्वजण स्वस्थानी निघून गेले. इंद्राने प्रथम सुस्नात होऊन आचमन घेतले. शुद्ध वस्त्र लेवून रत्नमय मंचकावर मनसा देवीची स्थापना केली. रत्नकुंभातून गंगोदक आणले. अद्वितीय वस्त्रे तिला अर्पण केली. प्रथम गणेश, सूर्य, अग्नी, विष्णू, शिव व गौरी या देवतांचे पूजन केले. नंतर - 

*" ॐ र्‍हीं श्रीं मनसादेव्यै स्वाहा"* 
या मंत्राने तिचे पूजन केले. तिला सोळा उपचार अर्पण करून मंगल वाद्यांचे ध्वनी केले. तिच्यावर पुष्पवृष्टी केली. इंद्र म्हणाला, "हे देवी, तू सर्वोत्तम साध्वी स्त्री आहेस. तूच परात्पर परम प्रकृती असल्यामुळे इच्छा असूनही मी तुझे स्तवन करण्यास समर्थ नाही. वेदांनी तुझ्या स्वभावाचे वर्णन केलेच आहे. तू शुद्ध सत्त्वरूप आहेस. म्हणून जरत्कारू मुनी तुला सोडण्यास सत्वर समर्थ झाला नाही. त्यानेही जाताना तुझीच पूजा केली. हे देवी, माता अदितीप्रमाणे तू मला प्रिय आहेस. तू दयारूप भगिनी व क्षमारूप माता आहेस. माझे सर्व भार्या, पुत्रांसह रक्षण केलेस. 

हे जगदंबिके, तू सर्वांना सर्व स्थळी, सर्व काली पूज्य आहेस. आषाढातील संक्रांतीस, कोणत्याही पंचमीस अगर महिन्याच्या अखेरच्या दिवशी जे पूजन करतील त्यांच्या पुत्रपौत्रादि संपत्तीची वृद्धी होईल. गुण व यश यांनी ते विख्यात होतील. तुझे पूजन करण्याऐवजी तुझी निंदा करणार्‍यास नित्य नागांचे भय आहे. तूच वैकुंठीची कमलाक्षा लक्ष्मी आहेस. तसेच तूच देवाची शक्ती आहेस. तू सर्वांना वंद्य होशील व सर्वत्र तुझे पूजन होईल. तूच सत्यस्वरूप देवी आहेस." 

अशाप्रकारे तिची स्तुती केल्यावर तिजकडून वर मागून घेऊन इंद्र स्वस्थानी निघून गेला. प्रत्यक्ष इंद्रासारख्या भ्रात्यानेच तिची पूजा केली. त्यामुळे ती सर्व वंद्य होऊन चिरकालपर्यंत आपल्या पुत्रासह पित्याकडे राहिली. कामधेनूनेही तिला दुधाने न्हाऊ घातले. कामधेनूने तिला अत्यंत दुर्लभ ज्ञान दिले. 

पुढे देवांनाही पूज्य असलेली ती स्वर्गलोकी गेली. इंद्राने तिचे केलेले स्तोत्र म्हणजे पुण्याचे बीजच आहे. हे स्तोत्र पठण करणार्‍यास वंशपरंपरा नागापासून भय नाही. हे स्तोत्र सिद्ध झाल्यावर विषही अमृताप्रमाणे लागते, तसेच तो सर्पांवर शयन करू शकतो, सर्पाला वाहन व्हायला लावतो. 
@    देवीभागवत.....
# मनसादेवीकडे गोलोकातून आलेली सुरभी कोण ? तिचे चरित्र उद्या सांगतो..
  
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
 *ज्ञानामृत मंच समुह*

मंगलचंडी देवी

*🔅 मंगलचंडीदेवी 🔅*
=================

श्रीनारायणमुनी म्हणाले, "आता मी तुला मंगलचंडीचे उपाख्यान सांगतो. कल्याणकारी, मंगल क्रियादक्ष अशी ही मंगलचंडिका आहे. ही सर्वमान्य महीसुत मंगल यासही इष्ट आहे. म्हणून तिला मंगलचंडिका म्हणतात. मनूच्या वंशात हा मंगल ग्रह उत्पन्न झाला. तो सप्तद्वीपाचा राजा आहे. त्याला पूज्य अशी ही देवी आहे. 

प्रत्यक्ष मूलप्रकृतीची अंशरूप अशी ही दुर्गाच आहे. ती कृपाळु, अगोचर, स्त्रीयांची इष्ट देवता आहे. विष्णूकडून शंकराला त्रिपूरवधाची प्रेरणा झाल्यावर त्याने मंगलचंडिकेचे पूजन केले. शंकर संकटात सापडल्यावर ब्रह्मदेवाने त्याला उपदेश केला व तिचे पूजन केले. 

त्रिपुराने शंकराचे यान पाडले. तेव्हा ते अंतरिक्षातच लोंबत राहिले. तेव्हा शंकराला दुर्गेची स्तुती करण्याचा आदेश दिला. शंकराच्या स्तुतीमुळे दुर्गा प्रसन्न झाली. ती निराळ्याच स्वरूपात प्रकट झाली. ती म्हणाली, "हे प्रभो, भिऊ नकोस. भगवान विष्णु वृषभरूपाने तुझे वाहन होईल व मीच शक्तीरूप होईन. तुला संकटमुक्त करीन. माझ्या प्रसादाने व हरीच्या सहाय्याने देवांचा शत्रू त्रिपूर याचा तू वध करशील." 

असे म्हणून ती देवी शंकराची शक्ती झाली. नंतर त्या उमापतीने विष्णूस अर्पण केलेल्या खड्‌गाने त्रिपुराचा वध केला. तेव्हा सर्व देवांनी शंकराची स्तुती केली. नंतर शंकराने स्नानादि क्रिया करून मंगलचंडी देवीला पाद्य, अर्घ्य, आचमन, विविध वस्त्रे, पुष्पे, चंदन, नैवेद्य, बकरे, रेडे, मेंढे, गवय, पक्षी, अलंकार, पुष्पमाला, पायस, मिष्टान्न इत्यादी सर्व प्रकारे तिला अर्पण करून तिची पूजा केली. 

*"ॐ र्‍हीं श्रीं क्लीं हे पूज्य देवी, हे मंगलचंडिके, हुं फटस्वाहा"*
 हा एकवीस अक्षरी मंत्र जपावा. त्याचा दहा लक्ष जप केल्यास सर्व कामना पूर्ण होतात. 

"ही देवी सोळा वर्षांची चिरतरुणी आहे. ती अत्यंत सौंदर्यपूर्ण आहे. तिची कांती शुभ्र चाफ्यासारखी आहे. नीलकमलाप्रमाणे नेत्र आहेत. ती जगताची धात्री असून संपत्ती देणारी आहे. ती समुद्रात ज्योतीरूप आहे. मी तिचे नित्य पूजन करतो." असे तिचे ध्यान करावे. 

महादेव म्हणाले, "हे मंगले, तू मंगल आहेस. तू सर्व मंगलांमध्ये मंगल आहेस. तू मंगलाचे आगरच आहेस. सर्वांना मंगल देणारी तू मंगलवारी पूज्य आहेस. मनूच्या वंशातील पूज्य मंगलाची तू प्रिय देवता आहेस. तूच मांगल्याची अधिष्ठात्री असून संसाराचे स्थान आहेस. तू सर्वांचे सार असून मोक्षरूप आहेस. तू सुखदायी असून

प्रत्येक मंगलवारी पूजनीय आहेस." 

अशारीतीने मंगलचंडिकेचे स्तवन केल्यावर महादेव स्वस्थानी गेले. शिवानंतर मंगल नावाच्या ग्रहाने तिचे पूजन केले. नंतर मंगल नावाच्या राजाने पूजा केली. सुंदर स्त्रियांनी मंगलवारी तिचे पूजन केले. कल्याणेच्छू पुरुषांनी तिचे पूजन केले. अशा तर्‍हेने प्रत्येक विश्वात तिचे यथोचित पूजन झाले. त्या वेळेपासून ती सर्वांना पूज्य झाली. देव, मनु, मानव, मुनी वगैरेंनी तिचे पूजन केले. तिचे स्तोत्र श्रवण करणार्‍यास पुण्य लाभते. 

याप्रमाणे देवीचे आख्यान मी तुला निवेदन केले. आता मनसेचे आख्यान ऐक. 

ती कश्यपाची मानसकन्या असून ती मनानेच ईश्वराशी खेळते, म्हणून तिचे नाव मनसा असे पडले आहे. ती मनाने परमात्म्याचे ध्यान करते. ती विष्णूभक्त असून महासिद्ध योगिनी आहे. तिने तीन युगे श्रीकृष्णाचे तप केले. तिचे क्षीण झालेले शरीर अवलोकन करून त्या गोपीपतीने तिचे नाव जरत्कारू ठेवले आणि तिची इच्छा पूर्ण केली. नंतर स्वतः पूजा करून इतरांकडून तिची पूजा करविली. 

स्वर्ग, नाग, लोक, पृथ्वी, ब्रह्मलोक व सर्व जगात ती गौरी, जगद्‌गौरी या नावाने विख्यात आहे. ती शंकराची शिष्या असल्याने तिला शैवी असे म्हणतात. ती विष्णूभक्त असल्याने तिला *वैष्णवीही* म्हणतात. तिनेच परीक्षितीच्या यज्ञाचे वेळी नागांना जीवन प्राप्त करून दिले. त्यामुळे तिला *नागेश्वरी* व *नागभगिनी* असे म्हणतात. ती विषाचा नाश करणारी असल्याने तिला विषहारी म्हटले आहे. शंकरापासून सिद्ध योगाची तिला प्राप्ती झाली, म्हणून तिला *सिद्धयोगिनी* म्हणतात.* योग, ज्ञान, मृतसंजीवनी विद्या तिला लाभल्यामुळे तिला महाज्ञानयुता म्हणतात. तिला अस्तिकमाता म्हणूनही संबोधतात. ती जरत्कारूची भार्या असल्याने तिला जरत्कारूप्रिया असे म्हणतात. 

जरत्कारू, जगद्‌गौरी, मनसा, सिद्धयोगिनी, वैष्णवी, नागभगिनी, शैवी, नागेश्वरी, जरत्कारूप्रिया, अस्तिकमाता, विषहारी, महाज्ञानयुता अशा बारा नावांनी त्या विश्वपूजितेची पूजा करावी. त्यामुळे पूजकाच्या वंशजांना सर्पापासून भय नाही. 

ज्यावेळी नागापासून भय उत्पन्न होईल, त्यावेळी हे स्तोत्र म्हटल्यास त्या भयापासून पुरुष मुक्त होतो. याचा दहा लक्ष जप केल्यास मंत्राची सिद्धी होते. अशाप्रकारे मंत्र सिद्ध करणारा पुरुष सर्प खाण्यासही समर्थ होतो. तो नागांचे वाहन करू शकतो. नागाचे आसन किंवा नागांची शय्या करून तो मृत्यूनंतर विष्णूलोकी जातो."
========================📓
*श्रीधर कुलकर्णी*
 *ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...