Wednesday, 29 August 2018

वज्रगोपिकानाम :- ६

*वज्रगोपिकानाम*
-------------------------
     भाग :- ६..

भक्तिप्रेमाला महात्म्यज्ञानाची जोड असावी, नसता त्यात दोष निर्माण होण्याचा संभव असतो. भेदबुद्धी, व्यभिचार, फलकामना, स्वसुखाभिलाष इत्यादी निर्माण होतात. 'माहात्म्यज्ञानपूर्वक सुदृढ स्नेह विशेष म्हणजे भक्ती' असे नारदाचे पाञ्चरात्रातील मत पूर्वी उद्‌धृत केले आहे. श्रीज्ञानेश्वरमहाराज हीच गोष्ट दृष्टांताने सांगतात -

*पाहे पा शाखापल्लव वृक्षाचे । हे काय नव्हती एकाचि बीजाचे । *
*परी पाणी घेणे मुळाचे । ते मुळीचि घापे ॥ *
*का दहाही इंद्रिये आहाती । इथें जरी एकेचि देहीची होती । *
*आणि इही सेविले विषय जाती । एकाचि ठाया ॥ *
*तरी करोनि रससोय बरवी । कानी केवि भरावी ॥ *
*फुले आणोनि बांधावी । डोळा केवी ॥ *
*तेथ रसु तो मुखेचि सेवावा । परिमळु तो घ्राणेचि घ्यावा । *
*तैसा मी तो यजावा । मीचि म्हणोनि ॥*
            ज्ञानेश्वरी ९. ३४६ - ४९ 

म्हणून गोपिकांना जर भगवत्तत्वाचे यथार्थ ज्ञान नसते तर ते प्रेम भक्ती या संज्ञेस प्राप्त झाले नसते. तसेच मागील सूत्रात गोपिकांचे जे वर्णन केले आहे ते सर्व व्यर्थ झाले असते. सर्व ऋषी, मुनी, साधुसंत किंबहुना प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवान त्याच्या दिव्य व अलौकिक प्रेमाचे वर्णन करतो त्या अर्थी ते अलौकिक व माहात्म्यज्ञानयुक्तच प्रेम होते. कित्येक बहिर्मुखाना संशय येणे शक्य आहे. श्रीमद्‌भागवतामध्ये प्रत्यक्ष परिक्षिती राजानेच अशी शंका घेतली होती, तिचे उत्तर शुकाचार्यांनी स्पष्ट दिले आहे.

*कृष्णं विदुः परं कांतं न तु ब्रह्मतया मुने । *
*गुणप्रवाहीपरमस्तासां गुणधियां कथं ॥*
         भागवत १० - २९ - १२ 

परिक्षिती म्हणतो, गोपिका कृष्णास कांत, पती समजत होत्या. त्यांना त्याच्या ब्रह्मरूपतेचे ज्ञान नव्हते, त्याचा गुणप्रवाहाचा बाध म्हणजे मोक्ष कसा झाला ? याचे उत्तर शुक्राचार्यानी दिले आहे. ते म्हणाले -
*उक्तं पुरस्तादेतत्ते चैद्यः सिद्धिं यथा गतः *
*द्विषन्नपि हृषीकेशं किमुताधोक्षज-प्रियाः ॥ १३ ॥ *
'तुला पूर्वीच सांगितले आहे की, चैद्य शिशुपालही श्रीकृष्णाच्या द्वेषाने मुक्त झाला, या गोपी तर त्या अधोक्षजाला प्रिय होत्या.' मानवाच्या आत्यंतिक कल्याणाकरिता भगवान व्यक्त स्वरूप धारण करतो. गोपिकांना हे सर्व ज्ञात होते, म्हणून त्यांना माहात्म्यज्ञान होते असे नारद म्हणतात. माहात्म्यज्ञान म्हणजे भगवन्महत्त्व अनेक प्रकारचे असते. रूप, गुण, माधुर्य, सत्ता, सामर्थ्य, ऐश्वर्य, व्याप्ती, भक्तरक्षण, दुष्टनाश, दुरितनाश, शक्ती इत्यादि इत्यादि प्रकार संभवतात. त्या सर्वाचे गोपिकांना ज्ञान संपूर्ण होते, असे गोपीगीत व अन्य प्रसंगी त्याचे जे अनेक उद्‌गार व्यक्त झाले आहेत त्यावरून सिद्ध होते. श्रीकृष्ण सामान्य मानव नव्हता, तर परमेश्वर होता असे गोपिकांनी म्हटले आहे. (भा १० - २९ - ३३) तसेच गोपिका रासलीलाप्रसंगी वेणुनादाने मोहित होऊन श्रीकृष्णाकडे आल्या तेव्हा श्रीकृष्णानी त्यांना परत घरी जाऊन आपल्या पतीची सेवा करा असा उपदेश केला असता गोपिकांनी श्रीकृष्णास उत्तर दिले की -

*यत्पत्यपत्यसुहृदामनुवृत्तिरंग *
*स्त्रीणां स्वधर्म इति धर्मविदा त्वयोक्तम् ।*
*अस्त्येवमेतदुपदेशपदे त्वयीशे *
*प्रेष्ठो भवान्स्तनुभृतां किल बंधुरात्मा ॥*
         भा १० - २९ - ३२ 

"हे श्रीकृष्णा ! पती, पुत्र, बंधू व स्वजनांची सेवा करणे हा स्त्रियांचा धर्म आहे असे तू म्हणतोस ते खरे आहे, पण हा उपदेश तर तुझीच सेवा करण्याची प्रेरणा देत आहे, तू भगवान आहेस, आमच्या पती, पुत्र, बंधू स्वजनादिकांचाही तूच आत्मा आहेस. तुझ्यामुळेच त्यांना पतीपणा प्राप्त झाला आहे."
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

वज्रगोपिकानाम :- ५

*वज्रगोपिकानाम*
----------------------------
      भाग :- ५..

गोपिकांना क्षणभरही श्रीकृष्णाची विस्मृती पडत नव्हती; पण जर क्षणही त्यांना श्रीकृष्णाचा वियोग झाला तर मात्र प्राणांतापेक्षाही त्यांना अधिक दुःख होत होते. रासलीलाप्रसंगी गोपिकांच्या प्रेमाची परीक्षा पाहण्याकरिता श्रीकृष्ण गुप्त झाले तेव्हा त्यांना त्या विरहाने किती दुःख झाले हा सर्व प्रकार भागवत दशमस्कंध अध्याय एकोणतीस ते तेहतीस (ज्यांना रास पंचाध्यायी म्हणतात) यात विस्ताराने आला आहे. त्या वेळी त्यांची अवस्था कशी झाली होती याचे शुकाचार्यानी वर्णन केले आहे -
*तन्मनस्कास्तदालापास्तद्विचेष्टास्तदात्मिका. । *
*तद्‍गुणानेव गायन्त्यो नात्मागाराणि सस्मरुः ॥*
भागवत १० - ३० - ४ 

'श्रीकृष्णाच्या ठिकाणीच ज्यांचे मन लीन आहे, त्याचीच चर्चा, त्याच्याच लीलांचे अनुकरण करणार्‍या, त्याच्याच ठिकाणी चित्ताची एकात्मकता प्राप्त केलेल्या, त्याच्याच श्रेष्ठ गुणांचे अहर्निश गायन करणार्‍या त्या गोपिकांना आपल्या शरीराची किंवा गृहादिकाची स्मृतीही नव्हती.' श्रीकृष्णवियोगाने त्यांच्या चित्तात किती व्याकुलता झाली होती हे गोपिकांनी जे विरहगीत गायिले आहे, ज्यास भागवतामध्ये गोपीगीत अशी संज्ञा आहे त्यातून स्पष्ट होते. प्रेमाची उत्कटता विरहात प्रतीत होते.

त्या विरहाच्या व्याकुलतेत चिंता, जागर, उद्वेग, कृशता, मलिनागता, प्रलाप, व्याधी, उन्माद, मोह, मृत्यू या दहा अवस्था प्रगट होतात. श्रीशुकाचार्यानी गोपिकांच्या ठिकाणी या सर्वाची उत्कटता किती झाली होती याचे विस्तृत वर्णन या पाच अध्यायात केले आहे. विरहाने व्यापलेल्या गोपी वृक्ष, पशू, पक्ष्यांशीच बोलू लागल्या. त्याच विरही अवस्थेतील श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अभंग पुष्कळ आहेत. त्यापैकी प्रसिद्ध म्हणजे,
धनु वाजे घुणघुणा वारा वाजे रुणझुणा । 
भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का ॥ १ ॥ 
चांदवो चांदणे चापे वो चंदनु । 
देवकीनंदनुविण नावडे वो ॥ २ ॥ 
चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी । 
कान्ही वनमाळी वेगी भेटवा का ॥ ३ ॥ 
सुमनांची सेज शीतळ वो निकी । 
ओले आगीसारिखी वेगें विझवा कां ॥ ४ ॥ 

हा आहे. श्रीसंत नामदेव, एकनाथ, तुकाराम, निळोबा यांच्याही गाथ्यातून अशा विरहिणी भूमिकेवरील गोपिकांच्या प्रेमाचे वर्णन केलेले अभंग आहेत. याचे तात्पर्य गोपिकांच्या व्याकुळतेच्या भूमिकेस सर्वानीच महत्त्व दिलेले आहे. भगवान श्रीकृष्णच उद्धवाजवळ त्यांच्या व्याकुळतेचे वर्णन करीत आहेत.

बळिभद्रासमवेत तत्त्वता । अक्रूरें मज मथुरे नेता । 
तै गोपिकासी जे झाली व्यथा । ते सांगता मज न ये ॥ 
ते त्याची अवस्था सांगता । मज अद्यापि धीर न धरवे चित्ता । 
ऐसे देवो सांगता । कंठी बाष्पता दाटली ॥ 
मज मथुरे जाता देखोनि । आसुवाचा पूर नयनी । 
हृदय फुटे मज लागुनि । प्रेमलोळणी घालिती ॥ 
पोटातील परमप्रीती । सारिता मागे न सरती । 
धरिले चरण न सोडिती । येती काकुळती मजलागी ॥ 
मजवीण अवघे देखती वोस । माझीच पुनः पुनः पहाती वास । 
थोर घालूनि निश्वास । उकसाबुकसी स्फुंदत ॥ 
माझेनि वियोगे तत्त्वता । त्यासी माझी तीव्र व्यथा । 
ते व्यथेची अवस्था । बोली सांगता मज न ये ॥ एकनाथी भागवत १२ - १२५ - ३० 

भक्तिशास्त्रकारानी तर संयोगातही वियोगोपलालन होत असणे ही भक्तिप्रेमाची पराकाष्ठा सांगितली आहे. श्रीसंतश्रेष्ठ गुलाबराव महाराज यांनी नारदभक्तिसूत्रावरील आपल्या संस्कृत भाष्यात 'राधासुधानिधी' या काव्यातील एक श्लोक उद्‌धृत केला आहे.
*अंकस्थितेऽपि दयिते कमपि प्रलापं हा मोहनेति मधुरं विदधात्यकस्मात् । *
*श्यामानुरागमदविव्हलमोहनांगी श्यामामणिर्जयतिकापि निकुञ्जसीम्नि ॥ *
'एका वेळी राधादेवी ही श्रीकृष्णाच्या अंकावर असताही हे कृष्णा ! हे मोहना ! असा काही प्रलाप अकस्मात करू लागली. याचे कारण शाम जो श्रीकृष्ण तद्विषयक अनुरागमदाने विव्हल झालेले तिचे हृदय हेच होय.

या विव्हलतेत भक्तीची पराकाष्ठा आहे; व हिचा व्रजवासी गोपिकामध्येच पूर्ण आविष्कार झाला होता, म्हणून नारदांनी आपल्या भक्तिलक्षणाकरिता गोपिकांचे उदाहरण घेतले आहे.

यावर कोणी शंका घेईल की, गोपिका श्रीकृष्णाना परमात्मा समजत होत्या का ? त्या तर त्याला एक सुंदर पुरुष म्हणून मानीत होत्या व जार बुद्धीने त्याच्यावर प्रेम करीत होत्या, त्या कामासक्त होत्या, असे असता त्यांच्या त्या वैषयिक प्रेमाला भक्ती कसे म्हटले जाईल ? याच शंकेचे उत्तर देण्याकरिता पुढील दोन सूत्राची रचना झाली आहे.
======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन :- ८..

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
-------------------------------
      *भाग - ८..*

अच्छोद नांवाचे जे परम रमणीय विख्यात सरोवर आहे तें निर्माण झाले. हिने आपले पितर पूर्वी कधींही पाहिले नव्हते आणि यामुळे पुढें जेव्हा ते अमूर्त स्थितीत तिच्या दिव्यदृष्टीला आढळले तेव्हां आपण ज्यांच्या मनोबलाने उत्पन्न झालो तेच म्हणजे हे आपले पितर, हें त्या शुचिस्मितेच्या लक्षांत आलें नाहीं व यामुळे ती सुंदरी खुद्द आपल्या पितरांना पाहात असूनही अज्ञानामुळे त्यांना परपुरुषाप्रमाणें लाजली, व अद्रिका नामक अप्सरेला बरोबर घेऊन विमानात बसून स्वर्गलोकांत फिरत असणार्‍या अमावसु नांवाच्या आयूच्या यशस्वी पुत्राला पाहून मोहित झाली.

खरें पाहाता हा वसु किंवा अमावसु आकाशगामी पितरांपैकी एक असतां हिनें त्यावर लोलुप होऊन त्याजविषयी कामवासना धरिली; व या पातकामुळे म्हणजे भलत्याचीच कामार्थ प्रार्थना केल्यामुळें ती योगापासून भ्रष्ट होऊन स्वर्गातून पतन पावली. खालीं पडता पडता वाटेत तिला परमाणूहूनही सूक्ष्म आकाराची अशीं तीन विमाने दिसली; व त्यांत अग्नीत असलेल्या विस्तवाचे ठिणगीप्रमाणें अव्यक्त व अत्यंत सूक्ष्म अशा स्वरूपाचे तिचे खरे पितर तिच्या दृष्टीस पडले. तेव्हां लज्जेने खाली मान घालून दुःखित होत्साती 'मला तारा, मला तारा' असें म्हणू लागली. त्यावेळीं तूं 'भिऊ नको, भिऊ नको' अशा शब्दानी तिला आश्वासन दिल्यामुळें ती तशीच आकाशांत थबकून राहिली. नंतर मोठया दीनवाणीने तिने पितरांची प्रार्थना करून त्यांना प्रसन्न करून घेतलें, तेव्हां ते मर्यादोल्लंघन केल्यामुळें ऐश्वयार्पासून भ्रष्ट झालेल्या स्वकन्येला म्हणाले, "हे शुचिस्मिते, तूं ज्याअर्थी स्वदोषामुळे ऐश्वर्यभ्रष्ट झाली आहेस त्या अर्थी तुला मृत्युलोकीं गेलेंच पाहिजे. कारण असा नियम आहे कीं, स्वर्गात राहाणारे जे देव त्यांचे कर्माची फळें त्यांना तत्काल व त्याच शरीरांत म्हणजे ज्या शरीरांकडून तीं कर्मे केली गेली असतील त्या शरीरांतच मिळतात. परंतु, मनुष्यलोकांतील नियम वेगळा आहे. त्या लोकांत केलेल्या कर्माची फळें मरणोत्तर प्राप्त होतात. यासाठी, हे कन्ये, तूं आतां मृत्युलोकी जाऊन तेथें तपश्चर्या करून नंतर मरण पावशील. तेव्हां पुन्हा येथें येऊन तुला तपाचें फल भोगावयास मिळेल. करितां तूं संतोषानें मृत्युलोकीं जा. याप्रमाणे पितरांनी सांगितलेली गोष्ट ऐकून तिने संतोष पावून त्यांची कृपा संपादिली. तेव्हां ते सर्व दयार्द्र होऊन त्यांनीं ध्यानस्थितीत पुढें अवश्य होणारी गोष्ट कोणती ती ध्यानी घेऊन मोठया प्रसन्न चित्ताने तिला म्हणाले कीं, हे मुली, तुझें ज्यावर मन गेले होते तो महात्मा अमावसु पृथ्वीवर मनुष्ययोनींत राजकुलांत उत्पन्न झाला आहे. त्याची तू कन्या होशील व तो जन्म पुरा झाला म्हणजे पुन्हा या दुर्लभ लोकाला प्राप्त होशील. मृत्युलोकांत असतां तूं पराशर मुनींचा वारस असा एक पुत्र प्रसवशील.

तो मोठा ब्रह्मर्षी होईल व आजकाल जो एकच एक अखंड वेद आहे त्याचे तो भाग करून चार वेद करील. पराशराला अशा लक्षणांचा पुत्र देऊन नंतर तूं पूर्वजन्मीचा जो महाभिष नांवाचा राजा तो सांप्रत मृत्युलोकी, शंतनु नांवाचा राजा झाला आहे. त्याची तूं स्त्री होऊन त्याला विचित्रवीर्य नांवाचा एक धर्मनिष्ठ पुत्र व चित्रांगद नांवाचा आणखी एक सुलक्षणी पुत्र, असे दोन पुत्र देऊन नंतर तूं पुन्हा या लोकास येशील. तूं पितरांची अमर्यादा केलीस यास्तव तुला वाईट जन्म प्राप्त होईल. तूं असावसूचीच कन्या होशील व तीही अद्रिका नामक जी अप्सरा त्याजबरोबर होती, तिच्याच पोटी येशील; व तूं अठठाविसाव्या चौकडीत जें द्वापरयुग त्या युगांत एका मत्स्याच्या उदरांतून बाहेर येशील. पितरांनीं याप्रमाणे तिला सांगितल्यावर ती अच्छोदा मत्स्यीच्या पोटीं येऊन धीवरकुलांत प्रगट झाल्याने ती लोकांत धीवरकन्या म्हटली गेली; व पुढें त्या धीवराने ती वसुराजाला नजर केल्यामुळें ती त्याही राजाची कन्या मानली गेली.
========================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:- ७

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
--------------------------------
        भाग :- ७..

मार्कंडेय म्हणतात - हे भीष्मा, अत्यंत तेजस्वी, केवळ देवांचाही देव शोभेल अशा सनत्कुमाराने आतां सांगितल्याप्रमाणें पितरांचा इतिहास मला समजाविला असतां मला पुनरपि कांहीं शंका आल्या त्या मीं अरिनिहंत्या चिरंजीवी भगवान सनत्कुमारापासून पुनरपि उलगडून घेतल्या; त्यांची हकीकत, हे गंगापुत्रा, मी तुला मुळापासून सर्व सांगतो, ती समजून घे.

मी त्या सनत्कुमारास विचारले की, आपण मला देव हेच पितर व पितर हेच देव होत व ते पितर सोमाला पुष्टि देतात, इत्यादि सांगितलें; पण असे हे जे पितृगण त्यांची संख्या किती आहे व ते कोणते लोकांत राहातात तें मला सांगावे. या प्रश्नावर, सनत्कुमारानीं उत्तर केलें कीं, 'हे याजकश्रेष्ठा, स्वर्गात राहाणार्‍या या पितरांचे गण आहेत; त्यांपैकीं चौघे मूर्तिमान म्हणजे शरीरी आहेत व तीन अमूर्तिमान म्हणजे अशरीरी आहेत. हे तपोधना, त्यांचें वसतिस्थान, त्यांची उत्पत्ति, पराक्रम व महत्व ही सविस्तर सांगतो तीं ऐक. या सातांपैकीं जे अमूर्त म्हणून पितृगण सांगितले त्यांचे वसतिस्थानाला सनातनलोक असें म्हणतात. हे पितृगण मोठे दैदीप्यमान असून ते सर्व प्रजापतीचे पुत्र होत. या गणांतील वैराज नांवाचे जे पितृगण आहेत ते विराज प्रजापतीचे पुत्र म्हणून प्रख्यात आहेत. यांचें देवगण शास्त्रविहित कर्माने आराधन करीत असतात. हे पितर म्हणजे प्रथम योगभ्रष्ट तपस्वी असतात. योगाची पूर्णता न झाल्यामुळे हे मुक्तीस न जातां केवळ सनातन ब्रह्मलोकास मात्र जातात. तेथें एक सहस्त्र युगेपर्यंत प्रजाप्रतीसह वास करून पुढील कल्पाचे आरंभी सनकादिक रूपाने ब्रह्मदेवापासूनच उत्पन्न होतात. मग यांस पूर्वजन्मातील स्मृति प्राप्त होऊन पूर्वजन्मी अपूर्ण स्थितींत राहिलेल्या अप्रतिम सांख्य योगाच्या अभ्यासाला ते लागतात, व अखेरीस त्यांचा योग पूर्णतेस जाऊन ते सिद्ध ब्रह्मज्ञानी होतात व नंतर जेथून पुनरावृत्ति नाहीं अशा शाश्वत पदाला पोचतात. हें मार्कंडेया, हे पितृगण इहलोकी जे कोणी नवीन उमेदवार योगाभ्यासाविषयीं यत्न करीत असतात त्यांच्या योगसिद्धीला हे साहाय्य करितात, व हेच आपल्या योगबलानें प्रथम सोमाला पुष्टि आणीत असतात. याकरितां हे जे योगी पितृगण यांचे उद्देशाने विशेषेंकरून श्राद्धे केली पाहिजेत. सोमाची वृद्धि करणारे जे महात्मे त्यांची ही पहिली पिढी होय. यांना मेना नांवाची एक मानस-कन्या झाली. ही गिरिश्रेष्ठ जो हिमालय त्याची पत्नी. हिला हिमवानापासून झालेल्या पुत्रास मैनाक असें म्हणतात. त्या मैनाकाचा पुत्र मोठा शोभिवंत व नानारत्नांनीं युक्त असा क्रौंच नांवाचा महापर्वत होय. मैनाक पुत्राशिवाय शैलराजा जो हिमालय त्यानें आपल्या मैना स्त्रीचे ठिकाणी अपर्णा, एकपर्णा व एकपाटला या नांवांच्या तीन कन्या उत्पन्न केल्या. या तिन्ही कन्यांनीं देव व दानव यांनाही दुश्‍चर असें घोर तप करून त्रैलोक्यातील स्थावरजंगम सृष्टीस त्राही त्राही करून सोडिलें. यांपैकी एकपर्णा नांवाची जी कन्या होती ती वनस्पतीचे एकच पर्ण भक्षण करून रहात असे. दुसरी एकपाटला ही पाटल वृक्षाचे एक पुष्प खाऊन राही. तिसरी जी अपर्णा ती मात्र कधींही खात नसे. तो तिचा तीव्र नियम पाहून तिची आई, जी मेना तिचे मातृप्रेमामुळे आतडे पिळे व ती आपल्या घोर तप करणार्‍या मुलीला 'उ मा' म्हणजे अगे असें करूं नको म्हणून वारंवार निवृत्त करण्याविषयीं यत्न करी. पुढें आईच्या 'उमा' 'उमा' अशा वारंवार शब्दोच्चारामुळे त्या सुंदर मुलीला त्रैलोक्यांत उमा असेंच म्हणूं लागले व हिची योगनिष्ठेविषयींही सर्वत्र फार ख्याति झाली. हे भार्गवा, या जगतांत या तीन कुमारी सदैव राहावयाच्याच. या सर्वही बहिणी आपलें शरीर सर्वदा तपश्चर्येच्या कामी लावणार्‍या, योगबलानें युक्त व ब्रह्मवेत्त्या असून सर्वही ऊर्ध्वरेत्या आहेत. या तीन बहिणीपैकी वयाने वडील, योग्यतेनें श्रेष्ठ, रूपकांतीनें अप्रतिम, व योगबलानें वरिष्ठ अशी जी उमा ती देवाधिदेव जो शंकर त्याचे पदरी पडली. दुसरी जी एकपर्णा ती बुद्धिमान महात्मा, योगाचार्य, जो असितकुलोत्पन्न देवल त्याला दिली, व एकपाटला ही जैगीषव्याला दिली. उमेच्या या दोघीही बहिणी तिचेप्रमाणेच महाभाग्यवान असून योगनिष्ठांच्याच पदरी पडल्या. मरीचि प्रजापतीचे पुत्र जे अग्निष्वात्त नांवाचे पितर आहेत ते सोमपद या नांवानें प्रसिद्ध असलेल्या लोकांत राहातात. हे सर्वही अपार तेजस्वी आहेत. देवही यांचें संतर्पण करित. यांना अच्छोदा नदी ही मानसकन्या होती. हिजपासूनच अच्छोद नांवाचे जे परम रमणीय विख्यात सरोवर आहे तें निर्माण झाले. हिने आपले पितर पूर्वी कधींही पाहिले नव्हते आणि यामुळे पुढें जेव्हा ते अमूर्त स्थितीत तिच्या दिव्यदृष्टीला आढळले तेव्हां आपण ज्यांच्या मनोबलाने उत्पन्न झालो तेच म्हणजे हे आपले पितर, हें त्या शुचिस्मितेच्या लक्षांत आलें नाहीं व यामुळे ती सुंदरी खुद्द आपल्या पितरांना पाहात असूनही अज्ञानामुळे त्यांना परपुरुषाप्रमाणें लाजली, व अद्रिका नामक अप्सरेला बरोबर घेऊन विमानात बसून स्वर्गलोकांत फिरत असणार्‍या अमावसु नांवाच्या आयूच्या यशस्वी पुत्राला पाहून मोहित झाली.
========================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन :- ६

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
---------------------------------
        भाग :- ६..

सारांश, तुम्ही एकमेकांचे बाप व एकमेकांचे पुत्रही आहांच  आणि म्हणून तुमचे पोरांनी तुम्हाला "पुत्र हो" म्हणून म्हणण्यांत अन्याय किंवा अपमान कोठेंच नाही."

याप्रमाणे ब्रह्मदेवानें समजूत घालताच ते स्वर्गवासी देव आपले पुत्रांकडे परत जाऊन त्यांस मोठ्या प्रेमाने म्हणाले, "बापहो, ब्रह्मदेवाने आमची समजूत घातली; तीवरून तुम्ही आमचे ज्ञानदाते अतएव एका अर्थीं आमचे बापच आहां. हा न्याय आम्हांस पटला व आमचा सर्व राग जाऊन, हे धर्मज्ञहो, आम्ही प्रसन्न झालो आहो, तर तुमची काय इच्छा आहे, आम्ही तुम्हांस कोणता वर द्यावा ते सांगा. तुम्ही आम्हाला जें 'पुत्रहो' म्हणून संबोधिले तें यथार्थ आहे. त्यांत कांहीं चूक नाहीं. आतां तुम्ही ज्या अर्थी आम्हांला 'पुत्र' म्हणून म्हटलें आहे त्या अर्थीं आम्ही आतां तुम्हास "पितर" ही कायमची संज्ञा देतो. नाग, दानव, राक्षस, इत्यादिकांपैकी कोणीही श्राद्धकाली आपल्या गत पितरांच्या उद्देशाने ज्या ज्या क्रिया करील, त्या त्या फलद्रूप होतील. त्या अशा कीं, श्राद्धीय अन्नादिकानें तुम्ही प्रथम संतुष्ट झाला म्हणजे तुमचे द्वाराने श्राद्धकर्त्याचे पितर तृप्ति पावतील व त्या पितरांचे द्वारे पितरांची शाश्वत देवता जी सोम (चंद्र) त्याला पुष्टि येईल. याप्रकारे श्राद्धक्रियांनीं सोम पुष्ट झाला म्हणजे तो स्थावरजंगम वस्तूंनीं व्यापलेलें हे समुद्रारण्यपर्वतमय जें जगत त्याला (आपल्या किरणांनी) पुष्टि देईल. आपणास पुष्टि प्राप्त व्हावी, या उद्देशानें जे कोणी गृहस्थ पितृश्राद्धें करितील त्यांस पितर (तुम्ही) सदैव संतति व पुष्टि देतील. त्याचप्रमाणे जो कोणी आपल्या स्वतःचे पितरांच्या नामगोत्राचा स्पष्ट उच्चार करून श्राद्धकाली तीन पिंड देईल, त्याचे पितर आपल्या कर्मगतीमुळें कोणत्याही योनीत व कोणत्याही स्थळी असले तरी तुम्ही त्या श्राद्धकर्त्याने केलेल्या दानाने प्रसन्न होऊन त्याचे तीन पूर्वजांस संतुष्ट कराल." ही कामगिरी तुम्ही करावी, अशी परमेष्टी ब्रह्मदेवाने पूर्वीच आज्ञा दिली होती, ती आज तुम्हांस कळविली आहे. तर हे देव हो, ती तुम्ही खरी करावी, व आपण इतउत्तर परस्परांचे बापही आहो व लेकही आहो, असें मानून प्रेमाने चालू.

सनत्कुमार म्हणतात - आतां ते देवच पितर कसे व पितरच देव कसे आणि परस्पर तेच पितर कसे, पितर आणि देवही कसे, हें कोडे उलगडलें ना ?

क्रमश :- ...
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

Monday, 27 August 2018

श्राध्ददेव व पितृवर्णन :- ५

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
--------------------------------
      भाग :- ६..

ब्रह्मदेवाचे जे दुसरे सात दुर्धर्षपुत्र आहेत ते सर्व माझे धाकटे भाऊ. त्यांचे वंश सृष्टींत चालू आहेत. त्यांची नावे क्रतु, वसिष्ठ, पुलह, पुलस्त्य, अत्रि, अंगिरा व मरीची. या सर्वांचे देवगंधर्वही पूजनसेवन करितात, व हे सातजण आपले तपोबलानें त्रैलोक्याचें रक्षण करितात. मी या भानगडीत पडत नाहीं. मीं प्रजोत्पादन व ऐहिक इच्छा यांना फाटा देऊन यतिधर्म स्वीकारिला आहे; व चित्ताचा आत्मरूपाचे ठिकाणी लय करून सर्वदा स्वरूपीं रममाण असतो. मी उत्पन्न झालो तेव्हां शरीरानें व मनानें जसा बाल किंवा कुमाररूप होतों तसाच इतकी युगे लोटली तरी अजून आहें. व या कारणानें मला सनत म्हणजे निरंतर कुमार म्हणजे बालरूप, या अर्थाने सनत्कुमार हेंच नांव पडलें आहे. माझें दर्शन व्हावे या इच्छेने तूं भक्तिपूर्वक माझें आराधन केलेंस, त्या योगानें हा मी तुझ्या दृष्टीस पडलो आहें. 'तुझा कोणता हेतु मी पूर्ण करूं तें सांग.' हे भीष्मा, याप्रमाणे सनत्कुमारांनी मला आज्ञा केली असतां, पितरांची उत्पत्ति व श्राद्धाचें फल, यासंबंधी तूं जे आज मला प्रश्न केलेस तेच मीं प्रसन्न झालेल्या त्या भगवंताला केले, व त्या दिव्य पुरुषाने माझे संशय दूर केले. त्याचा माझा संवाद बहुत वर्षें झाल्यानंतर सनत्कुमार मला म्हणाले कीं, हे विप्रर्षे, तुझ्या प्रश्नाने मी फार संतुष्ट झालो आहें, तेव्हां या पितरांच्या संबंधी मूळपासूनची कच्ची हकीकत मी तुला सांगतो ऐक. हे आपलें (ब्रह्मदेवाचें) आराधन करितील या संकल्पाने ब्रह्मदेवाने देव निर्माण केले. परंतु ब्रह्मदेवाला एका बाजूला सोडून ते लोभी देव आपल्यालाच फल मिळावे, या उद्देशाने यजन करूं लागले. तें पाहून ब्रह्मदेवानें त्यांस शाप दिला. त्यामुळें त्या सर्व देवांची अक्कल नाहीशी होऊन ते केवळ मूर्ख बनले. त्यांना जेव्हां कांहीं कळेना कीं वळेना, तेव्हां त्यांचें अनुकरण करणारे लोकही मूढ झाले. शेवटीं शापाचे तडाक्यांत सांपडलेले ते सर्व देव पितामहाला वारंवार नमन करून लोकानुग्रहार्थ विनवूं लागले. तेव्हां ब्रह्मदेव त्यांना म्हणाला, 'तुम्ही माझी पूजा न करितां आपलीच पूजा चालविली हा तुम्हांकडून मोठा व्यभिचार झाला आहे; याकरिता तुम्हाला प्रायश्चित्त केलें पाहिजे. तें प्रायश्चित्त इतकेंच की, तुम्ही आपल्या पुत्रांची प्रार्थना करा म्हणजे ते तुम्हाला अक्कल शिकवितील आणि तुम्ही शुद्धीवर याल. ब्रह्मदेवानें जेव्हां याप्रमाणे त्यांना निक्षून सांगितलें तेव्हां त्या लघुत्वामुळें ते अंतर्यामीं व्यथित झाले; परंतु निरुपायामुळे ते ब्रह्मदेवाचे आज्ञेप्रमाणें कृतदोषाचे प्रायश्चित्तार्थ म्हणून, दीन होऊन, आपले पुत्रांस उपाय पुसते झाले. त्या वेळीं पुत्रांनी चित्तनिरोध करून ध्यानपूर्वक अंतर्यामी शोध केला व त्यांना सांगितलें कीं, "बापहो, प्रायश्चित्तें एकच प्रकारची नाहींत. धर्मरहस्यात जे निपुण आहेत, ते काया, वाचा आणि मन या तीनही साधनांनी नित्य प्रायश्चित्ते केली पाहिजेत, असें सांगतात; व स्वतःही ते याप्रमाणेंच नित्य करीत आले आहेत." याप्रमाणे पुत्रांनी कानउघाडणी करून प्रायश्चितांचे महत्व व रहस्य सांगतांच त्या देवमंडळीची अक्कल ताळ्यावर आली. त्या वेळीं त्यांचे पुत्रांनी त्यांना "बरें आहे; तुमचे काम झालें, त्या अर्थी 'पुत्रहो' तुम्ही आलेत तसे परत जा" असा निरोप दिला. तेव्हां आपले पोरगे उलट आपणासच 'पुत्रहो' म्हणून (एखाद्या उन्मत्ताप्रमाणें) बोलले, हा प्रकार काय ? हा आपला अपमानच नव्हे काय ? ह्याचा उलगडा करून घ्यावा, अशा बुद्धीने ते पुनः ब्रह्मदेवाकडे आले. त्यांचें गार्‍हाणे ऐकून ब्रह्मदेवाने उत्तर केलें, 'तुमचे पोरगे तुम्हाला पुत्रहो म्हणाले तें हिशोबीच म्हणाले. हें तुम्ही आपणांस ब्रह्मवादी म्हणजे श्रुतिज्ञ म्हणवीत असून तुम्हाला कसें कळत नाहीं ?." "यस्तानि विजानात्सपितु: पिता सत" अशी एक श्रुति आहे, ती तुम्हाला माहीत आहे ना ? तिचा अर्थ काय बरें ? ज्ञानी पुत्र हा आपल्या पित्याचाही पिता आहे. तुम्ही त्यांना शरीर दिलें या कारणानें तुम्ही त्यांचे पिते व ते तुमचे पुत्र हा न्याय जसा खरा आहे, तसाच, त्यांनीं तुम्हांला ज्ञान दिलें यामुळे ते तुमचे बाप व तुम्ही त्यांचे पुत्र, हाही न्याय तसाच खरा आहे. सारांश, तुम्ही एकमेकांचे बाप व एकमेकांचे पुत्रही आहांच आणि म्हणून तुमचे पोरांनी तुम्हाला "पुत्र हो" म्हणून म्हणण्यांत अन्याय किंवा अपमान कोठेंच नाही."
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:-४

*श्राध्ददेव  व पितृवर्णन*
----------------------------------
    भाग :- ४..

भीष्म सांगतात - नंतर बाबांच्या या आज्ञेवरून मीं पूर्वी खुद्द बाबांना जे प्रश्न विचारले होते, तेच प्रश्न एकाग्रचित्त करून मार्कंडेयांना विचारले; तेव्हां ते महातपस्वी व धर्मात्मा मार्कंडेय मला म्हणाले, "बा, भीष्मा, तूं निष्पापच आहेस, तरीही विशेष शुद्धचित्त ठेवून ऐक म्हणजे तुझ्या शंकांची सविस्तर उत्तरे सांगतो. बाबारे, मी अत्यंत दीर्घायु आहें, पण हें दीर्घायुत्व मला पितरांचे प्रसादानेंच मिळाले आहे व आजपर्यंत माझा जो जगतांत एवढा मोठा लौकिक झाला, त्याचेही मूळ पितृभक्तिच होय. आतां मला पितरांच्या उत्पत्तीचें ज्ञान कोठून झालें तें ऐक. सहस्रावधी वर्षे चालणारा जो युगांतकाल त्या समयीं मी मेरु पर्वतावर राहून अत्यंत दुश्चर असें तप करीत होतो. तप करितां करितां एक दिवस असा चमत्कार झाला कीं, मेरु पर्वताचे उत्तर बाजूनें ज्याच्या तेजाने दाही दिशा उजळून गेल्या आहेत असें एक अत्यंत विस्तीर्ण दिव्य विमान पर्वतावर येऊन उतरले. त्या विमानांत एक पलंग टाकलेला होता व त्या पलंगावर केवळ सूर्याप्रमाणें जाज्वल्य असा एक उग्र तेजाचा पुरुष मीं निजलेला पाहिला. आकाराने हा पुरुष फार मोठा नव्हता, तर केवळ आंगठयाएवढा होता; पण त्याचें तेज इतके गाढ होतें कीं, तो केवळ आगीची ज्योतच दिसे व तसल्या तेजस्वी विमानांत असला पुरुष म्हणजे अग्नीचे ठिकाणींच अग्नि ठेविल्याप्रमाणें दिसत होता. असो; मीं विमानांत बसलेल्या त्या समर्थ पुरूषाला शिरसाष्टांग वंदन करून प्रश्न केला कीं, "हे विभो, आपल्याकडे आमची नजर देखील आपले तेजामुळें धजत नाहीं; तर आपल्या स्वरूपाचे सम्यकज्ञान आम्हांस कसें व्हावें ? माझे अल्पमतीला असें वाटतें कीं, 'आपण तपोबलाने निर्माण झालेले केवळ शुद्धसत्त्वात्मक देवांचेंही दैवत आहां.' हे माझे शब्द ऐकून हसून ते धर्मात्मे म्हणाले, 'बाबारे, तूं निर्मळ आहेस खरा; तथापि ज्या अर्थी माझे स्वरूपाचा सम्यकबोध होत नाहीं, त्या अर्थीं तूं तपश्चर्या चांगले प्रकारे केली नाहीस.' असें बोलून त्यांनीं तत्क्षणीं आपलें रूप बदललें, व असा कांहीं अत्युत्तम पुरुषाचा आकार घेतला कीं, तशा आकाराचा सुंदर पुरुष मीं पूर्वी कधींही पाहिला नव्हता.

सनत्कुमार (हा पुरुष म्हणजेच सनत्कुमार) म्हणाले, "बाबारे, सर्वशक्तिमान जो ब्रह्मदेव त्याचा मी फार जुनाट मानसपुत्र आहें. तूं तर्क केलास त्याप्रमाणें मीही तपोबलानेंच निर्माण झालो असून शुद्धसत्वात्मक आहे. हे भार्गवा, पूर्वींपासून देवमंडळांत सनत्कुमार म्हणून ज्याचे नांव कानी येत असतें तोच मी आहे. वत्सा, तुझें कल्याण असो. तुझी कोणती इच्छा मीं पूर्ण करावी हें सांग."
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

वज्रगोपिकानाम :- ४..

*वज्रगोपिकानाम*
-------------------------
   *भाग :- ४..*

गोकुळामध्ये सहस्रावधी गोपिका होत्या त्याचे यूथ (संघ) होते. त्या प्रत्येकांची काही वैशिष्ट्ये होती. त्या त्या संघाच्या प्रमुख नायिका ज्या त्यांची नावे ही भक्तिशास्त्रीय ग्रंथातून दिली आहेत. गौडीय संप्रदायाचे एक श्रेष्ठ संत श्रीरूपगोस्वामी यांच्या ' *उज्ज्वल नीलमणी* ' नामक भक्तिशास्त्रावरील अपूर्व ग्रंथात गोपिका प्रमुखाच्या काही नावाचा निर्देश केला आहे. राधा, चंद्रावली, विशाखा, ललिता, श्यामा, पद्मा, शैब्या, भद्रिका, तारा, विचित्रा, गोपाली, धनिष्ठा, पालिका, मंगला, विमला, लीला, कृष्णा, विशारदा, तारावली, चकोराक्षी, शंकरी, कुंकुमा, खञ्जनाक्षी, मनोरमा इत्यादी इत्यादी. एकएका यूथामध्ये अनेक गोपिका होत्या. त्यात राधादी आठ या यूथप्रमुख मानल्या आहेत. म्हणून श्रीकृष्णही सांगतात -

*ज्यासी झाली माझी संगती । त्या एकदोन सांगो किती ।*
*शतसहस्त्र अमिती । निजपदाप्रती पावल्या ॥*
        एकनाथी भागवत १२ - १३ 

स्वतः श्रीकृष्ण भगवान गोपिकांचा सर्व व्यवहार कृष्णमय कसा बनला होता हे उद्धवास गोकुळास निरोप देऊन पाठविताना सांगतात.
*ता मन्मनस्का मत्प्राणा मदर्थे त्यक्त दैहिकाः । *
*मामेव दयितं प्रेष्ठ मात्मानं मनसांगताः ॥*
           भागवत १०. ४६. ४

'हे उद्धवा ! गोपिकांचे मन अखंड सर्व व्यवहार करीत असताही माझ्याच ठिकाणी अनुरक्त आहे. त्यांचे प्राण, त्यांचे जीवनसर्वस्व मीच आहे, माझ्याकरिता त्यांनी देहसंबंधी पति-पुत्र, सोयरे या सर्वांचा त्याग केला आहे, त्यांनी बुद्धीनेही मला आपला प्रियतम, एवढेच नव्हे तर, आपला आत्मा मानला आहे.' खरा भक्त तोच आहे की तो ज्या भज्य अशा प्रभूची भक्ती करतो, त्याला ती प्रिय वाटली पाहिजे, या कसोटीस व्रजवासी गोपिकांची भक्ती पूर्ण रूपाने उतरते म्हणून नारदमहर्षीनी गोपिकांचे उदाहरण आपल्या भक्तीच्या लक्षणाकरिता स्वीकारले आहे. भगवद्‌भक्त श्रीतुकाराम महाराजांनी आपल्या बाळक्रीडा प्रकरणातील अभंगातून गोपिकांचा सर्व व्यवहार कृष्णमय कसा झाला होता याचे वर्णन केले आहे -
*ज्यांचे कृष्णी तन-मन झाले रत । गृह-पति-सुत विसरल्या ॥ *
*विष तया झाले धन-मान-जन । वसविती वन एकांती त्या ॥ *
*क्षणभरी होता वेगळा तयांस । होती कासावीस प्राण त्यांचे ॥ *
*त्याचे ध्यानी मनी सर्व भावे हरी । देह काम करी चित्त त्याचे ।* 
*कृष्ण तया ध्यानी, आसनी, शयनी ।*
*कृष्ण देखे स्वप्नी कृष्णरूप ॥* 
*तटस्थ राहिले सकळ शरीर ।* *इंद्रियें व्यापार विसरली ॥ *
*विसरल्या तहान, भूक, घरदार । नाही हा विचार असो कोठे ॥* 
*विसरल्या आम्ही कोणीये जातीच्या । वर्णाही चहूंच्या एक झाल्या ॥ *

आणखीही अनेक अभंगातून गोपिकांच्या भक्तीचे वर्णन केले आढळते. अखिल आचार भगवदर्पित होणे हे जे भक्तीचे नारदप्रोक्त लक्षण आहे ते व्रजवासी गोपिकांच्या ठिकाणी पूर्णत्वाने प्रतीत होते, याबद्दल सर्व संतांची एकवाक्यता आहे. म्हणून सर्वांनी भक्तिमार्गात त्यांना फार श्रेष्ठ स्थान दिले आहे. तसेच नारदांच्या भक्ति-लक्षणाचे दुसरे अंग ' *तद्विस्मरणे परम व्याकुलता'* हेही गोपिकांच्या ठिकाणी पूर्ण दिसून येते. त्यांना कोणत्याही अवस्थेत श्रीकृष्णाचा विसर पडत नव्हता. मथुरानिवासी कुलाङगना गोपिकांच्या अवस्थेचे वर्णन करितात व त्यांना धन्य समजतात. 
*या दोहनेऽवहनने मथनोपलेपप्रेंङखेङखनार्भरुदितोक्षणमार्जनादौ ।*
*गायन्तिचैनमनुरक्तधियोऽश्रु कष्ठयो धन्या व्रजस्त्रिय उरुक्रमचित्तयानाः ॥*
       - भागवत, १० - ४४ - १५ 

'ज्या गोपिका गायीच्या दुधाचे दोहन करतेवेळी, साळी इत्यादी कुटताना, सडासंमार्जन करताना, बालकाना झोके देताना, दह्याचे विरजण घालताना, बालके रडत असताना गाणी म्हणत असता सर्व व्यवहारात प्रेमपूर्ण चित्ताने, अश्रुपूर्ण नेत्रांनी श्रीकृष्णाचे गुणगान करतात, श्रीकृष्णाच्या ठिकाणी ज्यांचे चित्त जडलेले आहे त्या धन्य आहेत.'

क्रमश..
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

Friday, 24 August 2018

श्राध्ददेव व पितृवर्णन :- ३

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
--------------------------------
   भाग :- ३..

भीष्म म्हणतात - "बाबांचे हें बोलणें भूमीचे पोटांतूनच चालले होते. आपले बाबा पुण्यबलाने उत्तम लोकाला गेलेले आहेत, तेव्हां अशांच्या मुखांतून निर्णय ऐकण्याची संधी पुन्हा येणारी नाहीं असें वाटून मी मोठया कौतुकाने माझे बाबा भूमीचे आड असतां तशा स्थितींतच त्यांना प्रश्न केला. मीं म्हटलें "आम्ही असें ऐकितो कीं, पितर हे देव आहेत व ते देवांनाही पूज्य आहेत, तेव्हां आम्ही जी श्राद्धकाली पूजा करित ती देवांची कीं पितरांची, कीं आणखी कोणाची ? आम्ही येथें श्राद्ध करावे त्यानें परलोकीं गेलेले पितर तृप्त कसे होतात, किंवा श्राद्धाचे फल तरी काय ? देव, मनुष्य, दानव, यक्ष, उरग, गंधर्व, किन्नर व नाग हे सर्वच पितृश्राद्ध करितात, तेव्हां हे कोणाची पूजा करितात म्हणावे ? या बाबतींत मला मोठा जबरदस्त संशय आहे व तो निवृत्त करून घेण्याची उत्कंठाही अतिशय आहे. बाबा, माझे मताने आपण धर्मज्ञ, नव्हे सर्वज्ञच आहां; याकरिता हा माझा संशय दूर करा."

हें भीष्माचे वाक्य ऐकून त्याचा पिता शंतनु म्हणाला, "हे वत्सा, पितर मूळ कसे उत्पन्न झाले, श्राद्धांत त्यांना दिलेल्या अन्नाचे फळ आपणास कसें मिळतें व पितरांचे श्राद्ध करण्याचे कारण काय ? इत्यादि जे प्रश्न तू मला केले आहेस त्यांचें थोडक्यांत उत्तर देतो तें स्वस्थ मनाने ऐक. (हे जे पितर म्हणून म्हणतात ते मृत्युलोकीं मरण पावून परलोकी गेल्यावर किंमतीस चढलेले लोक अशांतला अर्थ नव्हे.) हे पितर म्हणजे आदिदेव जो ब्रह्मदेव त्याचे पुत्रच होत; व यांची याच उद्देशाने स्वतंत्र सृष्टि व यांचा स्वर्गातही मान मोठा आहे; कारण तेथेही यांस देवता म्हणून समजतात; व देव, असुर, मनुष्य, यक्ष, सर्प, गंधर्व, किन्नर, नाग, इत्यादि सर्व लोक ज्यांचे यजन करितात, ते हेच पितर. श्राद्धकाली अन्नादि दानाने यांचें आप्यायन झालें म्हणजे ते उलट जगताला आप्यायित (संतुष्ट) करतात, अशी खुद्द ब्रह्मदेवांची सांगी आहे. यास्तव हे महाभागा, असे जे हे पितर त्यांचें तूं निरलसपणे उत्कृष्ट श्राद्धविधीने यजन कर. म्हणजे ते तुझें वाटेल त्या रीतीनें कल्याण करितील. कारण जो जें इच्छील तें फल देण्याचे त्यांचे अंगीं सामर्थ्य आहे. आमचे विशिष्ट नामगोत्रादिकांचा उच्चार करून तूं या पितरांचे आराधन केलेस म्हणजे आम्ही स्वर्गातही असलो तरी ते पितर तेथें आमचे संतर्पण करितील; एवढे मीं तुला सांगितले. आतां उरलेले सारे, आज येथे श्राद्धासाठीं बोलाविलेले हें मार्कंडेयऋषि तुला सांगतील. हे मार्कंडेयऋषि मोठे पितृभक्त असून आत्मज्ञानी आहेत, व यांनी आज जें आपल्या येथें श्राद्धाचे आमंत्रण घेतलें तें मजवर अनुग्रह करण्यासाठींच, असें मी समजतो; याकरिता तुला जें कांहीं विचारणें असेल तें या समर्थांना विचार." असें सांगून आमचे बाबा तेथेंच गुप्त झाले.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृतर्पण :- २

*श्राध्ददेव व पितृतर्पण*
---------------------------------
*_भाग :- २.._*

भीष्म उत्तर करितात - "हे अरिमर्दना, पितर ते कोण, आपण ज्यांची पूजा करितों ते शिवाय कोण ? या गोष्टींचा उलगडा पूर्वी एक वेळीं मी माझे परलोकनिवासी पित्याला श्राद्धसमयी पिण्ड देण्यास उद्युक्त झालो असतां माझे पित्याने समक्ष येऊन मला सांगितला आहे तो मी तसाचे तसाच तुला सांगतो; ऐक. चमत्कार असा झाला कीं, मी आपल्या सूत्रग्रंथांत सांगितल्या विधीप्रमाणे भूमीवर दर्भ आंथरून तेथें माझे पित्याचे उद्देशाने पिण्ड ठेवीत असतां एकाएकी तेथील भूमि उकलली, व तींतून आमचे बाबा पूर्वी जिवंत असतां त्यांचा जसा बाहुभूषणे वगैरेनी अलंकृत व रक्तवर्ण अंगुली व तल यांनी युक्त सुंदर हस्त असे तसाचेतसा हात बाहेर आला, व 'या माझे हातावर पिण्ड दे' असे पित्याचे शब्द माझे कानी आले. ते ऐकून मी चपापून म्हटलें, 'अरेरे, मी विचार न करितां दर्भावरच पिण्ड ठेवीत होतों' ही मोठी चूक होत होती. बाकी तेथें माझा तरी काय इलाज ? बौधायन सूत्रात जो श्राद्धविधि सांगितला आहे त्यांत असा प्रत्यक्ष हात येतो असे कोठेही सांगितलें नाहीं. असो, माझे हे बोल ऐकून व मीं दिलेला पिण्ड घेऊन माझा पिता प्रसन्न होऊन बहुत गोड शब्दांनीं मला म्हणाला, कीं, बाबारे, तुझेसारखा धर्मज्ञ व ज्ञाता सत्पुत्र माझे पोटीं आल्याने मी इहपरलोकी कृतार्थ झालो आहें. हे निष्पापा, तूं मोठा दृढव्रत आहेस असें पाहून या लोकात (तुझे द्वारे) धर्माचे कामी व्यवस्था लावावी म्हणून तू जे आतां मला प्रश्न विचारिलेस ते प्रश्न विचारण्याची बुद्धि मींच तुझे ठिकाणी उत्पन्न केली; कारण एक तर धर्माचे बाबतींत राजा जी गोष्ट प्रमाण धरून चालतो, तीच प्रमाण धरून प्रजाही राजाचें अनुकरण करितात; शिवाय जो कोणी धर्माचें रक्षण करितो त्याला प्रजांच्या सत्क्रियांचे चतुर्थांश फल मिळतें. त्याचे उलट जो मूर्ख राजा प्रजांचे धर्मरक्षण करीत नाही त्याला त्यांच्या पापाचा चतुर्थांश भोगावा लागतो; परंतु, हे भीष्मा, तूं अनादिसिद्ध चालत आलेले जे वेद धर्म तेच प्रमाण धरून चालला आहेस हे पाहून मला तुजविषयीं निरुपम प्रेम उत्पन्न झालें आहे, व यामुळे मी तुजवर प्रसन्न होऊन केवळ आपखुषीनें तुला त्रैलोक्यांतही अन्यत्र न मिळणारा असा वर देतो, तो ऐक. "तुझे मनांत जगवत्काल जगावें असे असेल तावत्काल मृत्यूचा अंमल तुजवर चालणार नाही, तुझी जेव्हा परवानगी मिळेल तेव्हां मग मृत्यूचा शक तुझेवर चालू होईल, याशिवाय तुला आणखी कांहीं मागावयाचे असलें तर, हे भरतश्रेष्ठा, तुझे मनांत असेल तें निःशंक माग, मी द्यावयास तयार आहें."

भीष्म म्हणतात - "हे युधिष्ठिरा, याप्रमाणे बाबा बोलले असतां मी त्यांस अभिवादन करून हात जोडून म्हटले कीं, आपली अशी मजवर कृपा झाली, त्याअर्थी, हे पुरुषश्रेष्ठा, मी आज कृतकृत्य झालो; तथापि, मी आणखीही आपणापासून कांहीं मागून घेण्यास पात्र आहें असें ज्या अर्थीं आपण म्हणतां त्या अर्थी आपण होऊनच मघाशी ज्याचा अंशतः निर्देश केला होता तो प्रश्न मी आपणास सविस्तर पुसणार आहें. तेव्हां माझा धर्मनिष्ठ पिता मला म्हणाला, "तुझ्या मनांत येईल तो प्रश्न मला खुशाल विचार, तूं वाटेल ती शंका काढ. तिचा उलगडा करण्यास मी समर्थ आहें."
     ........क्रमश:.....*
======================
*श्रीधर कुलकर्णी*
*‎ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन

*श्राध्ददेव  व पितृवर्णन*
---------------------------------
*_भाग :- १.._*


जनमेजय विचारतो - "हे वैशंपायना, आपण मनुवंशानुकीर्तनें सांगत असतां विवस्वान याला श्राद्धदेवही म्हणत असें सांगितलें; श्राद्धदेव ही संज्ञा विवस्वानाला कां प्राप्त झाली व श्राद्धाचा श्रेष्ठ विधि कोणता, हें, हे विप्रश्रेष्ठा, ऐकावयाची माझी इच्छा आहे; त्याचप्रमाणें पितर पितर म्हणतात ते कोण ? हे पहिल्याप्रथम कसे उत्पन्न झाले ? त्याचप्रमाणें वेदवेत्ते ब्राह्मण, असें सांगतांना आम्हीं ऐकिले आहे कीं, स्वर्गात हे जे पितर म्हणून आहेत ते देवांचेही दैवत आहेत, हें कसें ? तसेंच या पितरांचे कांहीं गण म्हणून सांगितले आहेत ते कोणचे ? या पितरांचे सामर्थ्य काय ? आम्हीं येथें श्राद्ध करावे, त्यानें स्वर्गात ते पितर कसे तृप्त होतात व तृप्त होऊन त्यांनीं तेथून आशिर्वाद दिले असतां त्या योगाने आमचे येथें कल्याण कसें होतें ? हे सर्व प्रश्न व पितरांची एकूण उत्पत्ति या सर्वांचा उलगडा समजावा, असा हेतु आहे."

वैशंपायन म्हणतात - "बा जनमेजया, तुझा प्रश्न ऐकून मला फार आनंद झाला. ठीक आहे. तुला मीं पितरांची श्र्लाघ्य उत्पत्ति कशी झाली, आपण केलेल्या श्राद्धानें स्वर्गात पितर कसे संतुष्ट होतात व संतुष्ट झाल्यावर तेथून आमचे कल्याण कसे करितात, ते सांगतो ऐक. तूं जे हे कांहीं प्रश्न विचारतोस ते सर्व प्रश्न पितामह भीष्म शर-शय्येवर पडले असतां त्यांना धर्मराजानें विचारले होते. भीष्मांनींही तत्पूर्वी त्याच शंका मार्कंडेयाला विचारिल्या होत्या, व मार्कंडेयांचे त्याविषयी समाधान सनत्कुमारानीं केलें होतें, अशी या विषयाची परंपरा आहे; तेव्हां भीष्म-युधिष्ठिराचा झालेला संवाद मी तुला सांगतो. युधिष्ठिराने विचारिलें, 'हे भीष्मा, जर कोणाचे मनांत आपल्याला पुष्टी प्राप्त व्हावी असें असेल तर ती त्याला कशी प्राप्त व्हावी ? व काय कर्म केलें असतां लोकांचा शोक दूर होईल, तें आपण मला सांगा; आपण धर्मज्ञ आहां, म्हणून मी आपल्याला विचारितो." भीष्म म्हणतात, 'बा युधिष्ठिरा, पितरांचे श्राद्ध हें वाटेल तें तें फल देणारे एक अनुष्ठान आहे, म्हणून जो कोणी शुचिर्भूतपणानें व तत्परतेने पितृश्राद्धे करून पितरांचा संतोष करितो तो श्राद्धकर्ता इहलोकीं व मरणोत्तर परलोकीही आनंदात राहातो. हे राजा, ज्याला धर्मेच्छा असेल त्याला पितर धर्मबुद्धि देतात; ज्याला संततीची इच्छा असेल त्याला संतति देतात, व ज्याला पुष्टीची इच्छा असेल त्याला पुष्टि देतात.

धर्मराज म्हणतो - "पितामहा, आपण हें म्हणता खरें, पण जसें कर्म करावे तसें फल घ्यावे, हा कायदा सर्व प्राण्यांना सारख्याच नियमानें लागू असल्यामुळें कोणाचे पितर स्वर्गात असतील तर कोणाचे नरकांतही असतील; मग जे स्वतःच नरकांत आहेत ते दुसर्‍याला पवित्र फल कोठून देणार ? बरे, जो जो कोणी श्राद्ध करितो तो तो चांगल्याच फलाची इच्छा करितो व यासाठीं वारंवार श्राद्धकाली लोक आपला पिता, पितामह व प्रपितामह या त्रयीच्या उद्देशाने पिण्ड देऊन श्राद्धे करीत असतात. ही श्राद्धे पितरांना कशी पोचतात, व त्यांतील जर कांहीं नरकांत असले तर तेथून ते आपणास सत्फल कसें देऊं शकतात ? ज्या वेळीं केव्हा पितर नरकांत असतील त्या वेळीं जें आपण यजन करितो तें अशाच पितरांचे किंवा त्याऐवजी दुसर्‍याच कोणाचे ? शिवाय स्वर्गातील देवही पितरांचे यजन करितात म्हणून आम्ही ऐकत हें कसें ? हे भीष्मा, आपण अत्यंत तेजस्वी आहां, करितां माझे हे सर्व प्रश्न पुरापूर उलगडून सांगा. आपली बुद्धि केवळ अलोट आहे, यास्तव येथे पितरांचे उद्देशाने केलेल्या श्राद्धाने इहलोकीं आपला बचाव कसा होतो ?"

*क्रमश.....*
======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

वज्रगोपिकानाम :- ३

*वज्रगोपिकानाम*
--------------------------
    भाग :- ३..

भारतातील सर्व प्रांतातील व सर्व भाषांतील भक्तिप्रधान काव्यातून व भक्तिमार्गीय संतांच्या काव्यातून गोपिकांच्या भक्तीचे विशेष वर्णन आढळून येते. महाराष्ट्रातील भागवतधर्मीय सर्व संतांनी आपआपल्या काव्यग्रंथातून, अभंगांतून गोपिकांचे, त्यांच्या भक्तीचे अत्यंत प्रेमपूर्वक रसाळ वर्णन केलेले आढळून येते. श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या वर्णनाची 'ज्ञानियाचा राजा,' 'ज्ञानियाचा शिरोमणि,' 'ज्ञानचक्रवर्ति,' "गुरुमहारावो" अशा अनेक श्रेष्ठ श्रेष्ठ विशेषणांनी सर्वच साधुसंत विद्वानपंडितांनीही गौरव गाथा गाइली आहे. ज्ञानेश्वरी अनुभवामृतादिकांतून त्यांनी पूर्णाद्वैताचे तत्त्वज्ञान पटवून दिले आहे. आपल्या अभंगात गोकुळवासी गोपिकांचे वर्णन केले आहे. त्याचे गौळणी, विरहिणी, सौरी अंबुला हे अभंग सर्व या गोपीभावाच्या महात्म्यानेच भरले आहेत. त्याला मोठा अध्यात्माचा, प्रेमाचा साजही त्यांनी चढविला आहे. विशेष म्हणजे त्यांनी केवळ परोक्षरूपाने गोपिकांचे वर्णन केले नसून स्वतःच्या वृत्तीमध्ये गोपीभावाचा अंगीकार करून गोपिकांचे जीवन साकार केले आहे. ते म्हणतात,
*निवृत्तिप्रसादे मी गोवळिये वो ।*
*माझा भाव तो विठ्ठलु न्याहाळिये वो ॥*
अशी अनेक वचने आहेत. तसेच श्रीनामदेवराय, श्रीएकनाथ महाराज, श्रीतुकाराम महाराज, निळोबाराय यांच्या अभंगाच्या गाथ्यात प्रारंभीच बाळक्रीडा हे प्रकरण आहे व त्यात सर्व कृष्णलीलांचे विस्तृत वर्णन केलेले आहे. त्यात प्रामुख्याने गोपिकांच्या प्रेमाचे वर्णन केलेले आढळते.

श्रीनारद आपल्या भक्तिलक्षणाकरिता ज्या गोपिकांचे उदाहरण घेतात, त्याचे श्रेष्ठत्व आतापावेतो पाहिले. नारदाचे भक्तिलक्षण ' *तदर्पिताखिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलता'* हे गोपिकांच्या चरित्रात त्यांना पूर्णरूपाने दिसून आले. स्वतः श्रीकृष्ण भगवानच गोपिकांच्या प्रेमनिमग्न अवस्थेचे वर्णन करतात.
 *तानाविदन्मय्यनुषङ्गः बद्धधिय स्वमात्मानमथस्तथेदम् । *
*यथा समाधौ मुनयोऽब्धितोये नद्य प्रविष्टा इव नामरूपे ॥ भा. ११ - १२ - १२*

'समाधी अवस्थेमध्ये ज्याप्रमाणे योग्याना दृश्य नामरूपाचे भान राहात नाही, महासागरामध्ये प्रविष्ट झालेल्या नद्यांना निराळे अस्तित्व राहात नाही, त्याप्रमाणे प्रेमातिशयाने ज्यांची अंतःकरणे माझ्याच ठिकाणी एकरूप झाली आहेत, अशा गोपींना आपला देह, आपला जीव, पतिपुत्रादिक लोक-परलोक याचीही जाणीव राहिली नव्हती. सर्वांचाच त्यांना पूर्ण विसर पडला होता.' त्यांचा सर्व आचार भगवत्पर कसा झाला होता याचे वर्णन श्रीएकनाथ महाराजांनी आपल्या टीकेतून विस्तृत आणि सुंदर केले आहे.
*ऐसिया मजलागी आसक्त । माझ्या ठायी अनन्यचित्त ॥ *
विसरल्या देहसुखें समस्त । अति अनुरक्त मजलागी ॥
करिता दळण कांडण । माझे दीर्घस्वरें गाती गुण ।
की आदरिल्या दधिमंथन । माझे चरित्रगायन त्या करिती ॥
करितां सडासंमार्जन । गोपिकासी माझे ध्यान ।
माझेनि स्मरणे जाण । परिये देणे बालका ॥
गाईचें दोहन करिता । माझें स्मरणी आसक्तता ।
एवं सर्व कर्मी वर्ततां । माझ्या विसराची वार्ता विसरल्या ॥
करितां गमनागमन । अखंड माझ्या ठायीं मन ।
आसन भोजन प्राशन । करिता मद्ध्यान तयासी ।
ऐसी अनन्य ठायीच्या ठायी । गोपिकांसी माझी प्रीति पाही ।
त्या वर्तताही देहगेही । माझ्या ठायी विनटल्या ॥
या परी बुद्धी मदाकार । म्हणोनि विसरल्या घरदार ।
विसरल्या पुत्र भ्रतार । निज व्यापार विसरल्या ॥
विसरल्या विषयसुख । विसरल्या द्वंद्व दुःख ।
विसरल्या तहानभूक । माझेनि एक निदिध्यासे ॥
जेणें देहे पति-पुत्रांते । आप्त मानिले होतें चित्ते ।
तें चित्त रातलें मातें । त्या देहातें विसरोनि ॥
विसरल्या इह-लोक परलोक । विसरल्या कार्यकारण निःशेख ।
विसरल्या नामरूप देख । माझे ध्यान सुख भोगितां ॥
जेवी का नाना सरिता । आलिया सिधूतें ठाकिता ।
तेथे पावोनि समरसता । नामरूपता विसरल्या ॥
तेवी गोपिका अनन्यप्रीती । माझी लाहोनिया प्राप्ती ।
*नामरूपाची व्युत्पत्ति । विसरल्या स्फूर्ती स्फुरेना ॥*
           नाथ भागवत अ. १३ - १२
   ......क्रमश.....
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

वज्रगोपिकानाम :-२

*वज्रगोपिकानाम*
-------------------------
    भाग :- २

*द्वापारांते करिष्यामि भवतीनां मनोरथम् । *
*श्रद्धया परया भक्त्या व्रजे गोप्यो भविष्यथ ॥ *
'द्वापारयुगाचे शेवटी श्रीकृष्ण अवतारात तुमचे मनोरथ पूर्ण करीन. तुम्ही परमश्रद्धावान आहात, त्या वेळी तुम्ही गोकुळात गोपी बनाल.'
पद्मपुराणात कथा आहे की, श्रीरामचंद्र दंडकारण्यात आले असता अनेक ऋषी त्यांच्या दर्शनास गेले. रामचंद्राचे अत्यंत सुंदर व लावण्यादिकाने युक्त स्वरूप पाहून त्यांच्या ठिकाणी स्त्रीभाव जागृत झाला. तेव्हा रामचंद्राने त्यांना गोकुळात तुम्ही गोपीरूपाने द्वापारयुगात जन्म घ्याल व माझे सुख भोगाल असा वर दिला. नंतर त्या वराप्रमाणे ते ऋषी स्त्रीभावास प्राप्त झाले, उदाहरणार्थ, उग्रतपानामक ऋषी अग्निहोत्री व तपस्वी दृढव्रती होता. त्याने पंचदशाक्षर मंत्राचा जप अनंत काल केल्यानंतर सुनंदनामक गोपाच्या पोटी सुनंदानामक कन्येच्या रूपाने जन्म घेतला. सत्यतपा नावाचा मुनी वाळलेल्या पानावर राहून दशाक्षर मंत्राचा जप करून दहा कल्पानंतर सुभद्रनामक गोपाची कन्या सुभद्रा नामक गोपी झाला. हरिधामा ऋषी निराहार राहून क्लींबीजयुक्त वीस अक्षरी मंत्राचा जप करून तीन कल्पानंतर सारंग नामक गोपाच्या पोटी रंगवेणी या नावाच्या गोपीच्या रूपाने अवतरला. तसेच जाबाली नावाचा ब्रह्मज्ञानी ऋषी विशाल अरण्यात विहरण करीत असता त्याने एक मोठी विहीर पाहिली. त्या विहिरीच्या पश्चिम तटावर एका वटवृक्षाखाली एक तरुण स्त्री कठोर तपश्चर्या करीत बसलेली त्याला दिसली. तिचा डावा हात आपल्या कमरेवर असून उजव्या हाताने तिने ज्ञानमुद्रा धारण केलेली होती. जाबाली ऋषीने तिला नम्रतेने तू कोण आहेस असे विचारले असता ती म्हणाली,
*ब्रह्मविद्याहमतुलां योगींद्रैर्या च मृग्यते । *
*साहं हरिपदाम्भोज काम्यया सुचिरं तप ॥ *
*चराम्यस्मिन्वने घोरे ध्यायन्ती पुरुषोत्तमम् । *
*ब्रह्मानंदेन पूर्णाहं तेनानंदेन तृप्तधीः ॥ *
*तथापिशून्यमात्मानं मन्ये कृष्णरतिं विना ॥* पद्मपुराण.

ती म्हणाली, 'जिचा मोठमोठे योगी शोध करतात अशी मी ब्रह्मविद्या आहे. कृष्णप्रेमप्राप्तीकरिता या घोर वनामध्ये त्या पुरुषोत्तमाचे ध्यान करीत दीर्घकाल तप करीत आहे. मी ब्रह्मानंदाने पूर्ण आहे, पण श्रीकृष्णप्रेम मला अद्यापि प्राप्त झाले नाही म्हणून स्वतःस शून्य समजत आहे.' हे ऐकून ब्रह्मज्ञानी जाबालीने तिच्या चरणावर मस्तक ठेवून तिच्यापासून श्रीकृष्णप्रेमदीक्षा घेतली. एका पायावर उभे राहून कठोर तप केले. त्या कल्पानंतर प्रचंड नावाच्या गोपाचे घरी चित्रगंधा या गोपीच्या रूपाने अवतार घेतला. अशा अनेक गोपिकांच्या पूर्व जन्माच्या कथा सापडतात.

श्रीशुकाचार्यांसारखे महान ज्ञानीही गोपिकांना गुरुस्थानी मानीत होते असे वर्णन आढळते.
एवढा विचार करण्याचे कारण असे की ज्या अर्थी श्रीनारद महर्षींनी गोपिकांचे उदाहरण आपल्या भक्तिलक्षणाकरिता आवर्जून घेतले आहे त्या अर्थी त्याचाही अधिकार तसा श्रेष्ठ असला पाहिजे.
नारदाच्याही आधी ज्यानी भक्तिविषयक सूत्राची रचना केली, ते श्रीशांडिल्य महर्षीही आपल्या भक्तिसूत्रातून गोपिकांचेच उदाहरण घेतात.
*अतएव तद्‍भावाद्‍बल्लवीनाम ॥ २ - ५ *
'भक्ती ही सर्वसाधननिरपेक्ष अनंतफलस्वरूप आहे. यावर उदाहरण बल्लवी म्हणजे गोपिकांचेच आहे.'
या सूत्रावरील आपल्या विस्तृत संस्कृत टीकेत श्रीनारायणतीर्थ यती, ज्यांनी अनेक शास्त्रावरील मोठमोठ्या ग्रंथावर टीका केल्या आहेत व त्यावरून ते मोठे प्रकांड पंडित होते असे दिसून येते, यानी आदि पुराणातील गोपी महात्म्याचे-काही श्लोक उद्‌धृत केले आहेत
*त्रैलोक्ये केभवद्भक्ता केत्वां जानन्ति मर्मणि । *
भक्त अर्जुन श्रीकृष्णास त्रैलोक्यात तुमचे भक्त कोण आहेत व कोण तुम्हाला यथार्थ जाणतो असा प्रश्न करतो, त्याचे श्रीकृष्ण त्याला उत्तर देतात-
*न मां जानन्ति मुनयो योगिनश्च कथंचन । *
*नच रुद्रादयो देवा यथा गोप्यो विदन्ति मां ॥ *
*मन्माहात्म्यं मत्सपर्यां मच्छ्रद्धां मन्मनोगतिम । *
*गोप्य एवहि जानन्ति नान्यो जानाति मर्मणि ॥ *
*वेदान्तिनोऽपि मुनयो न मां जानन्ति तत्त्वत । *
*यथा ता गोपसुदृशो मम जानन्ति वैभवम् ॥ *
*अहमेव परं रुपं न्यान्ये जानन्ति केचन । *
*गोप्य एवहि जानन्ति मद्रुपं मत्क्रियादिकम ॥* आदिपुराण

'श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना, मला योगी, मुनी, रूद्रादिदेवदेखील गोपिकाप्रमाणे जाणू शकत नाहीत. माझे महात्म्य, पूजा, श्रद्धा, मनोगत केवळ गोपिकाच जाणतात. गोपिका जशा मला जाणतात तशा स्वरूपात वेदांती, मुनीही मला जाणत नाहीत. माझ्या खर्‍या रूपास व मद्विषयक ज्या क्रिया करावयाच्या त्या केवळ गोपिकाच जाणतात.
======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

Thursday, 23 August 2018

वज्रगोपिकानाम

*वज्रगोपिकानाम*
-------------------------
भाग :- १...

*व्रजन्ति गो गोपावासार्थमत्रेति व्रजो गोपावासस्थानम ॥*
जेथे गाई गोपाळ वास्तव्याकरिता राहतात, त्या स्थानाला व्रज असे नाव आहे. तरी रूढ अर्थाने पुराणादिकांतून मथुरेच्या परिसरात यमुनेच्या तटावर बृहद्वन नामक एक सुंदर वन होते. या वनात अनेक व्रज म्हणजे गौळवाडे वसले होते. त्यात अगणित गोप राहत असत व त्याच्याजवळ अगणित गोधनही असे. याच पैकी नंदराज नामक एका श्रेष्ठ गोपाने विभूषित अशा व्रजात श्रीकृष्ण अवतार झाला. याच पवित्र भूमीत श्रीकृष्णाच्या बाललीला झाल्या. ज्याचे वर्णन भारतातील सर्व प्रांतातील साधुसंत, हरिभक्तांनी, कवींनी अनेक रूपाने केले आहे. या गोकुलात श्रीकृष्णाच्या वात्सल्यरसाचा स्वाद नंदयशोदा यांनी पूर्ण रूपाने भोगला. सख्यभक्तीचा आनंद गोपाळास श्रीकृष्णाबरोबर यमुनातीरी गाई चारत असता भरपूर भोगावयास मिळाला. गोकुळात सर्वच भक्त होते; पण माधुर्य भक्तीचा पूर्ण आविष्कार गोपिकांच्याच जीवनात झाला होता. म्हणून श्रीनारद महर्षीनी मुद्दाम आवर्जून ' *यथा व्रजगोपिकानाम ।* ' म्हणून सूत्रात त्यांचे उदाहरण दिले आहे. या व्रज भूमीचे वर्णन सर्वच पुराणांतून तंत्रग्रंथांतून केले आहे. गौतमीय तंत्रात श्रीकृष्णमुखातीलच वचन सापडते.
*भारते व्रजभूः श्रेष्ठा तत्र वृंदावनं परम् ।*
पाच योजनांचा ज्याचा विस्तार आहे असे हे वृंदावन म्हणजे माझा देहच आहे असे भगवान म्हणतात. जेथे भगवान श्रीकृष्णाच्या सर्व वैभवाचा आविष्कार झाला होता अशी ही लीलाभूमी आहे. या व्रजाच्या अंतर्गत यमुनापुलिन, गोवर्धन पर्वत, गव्हरवन, कदम्बखंडिया, नंदग्राम, बरसाना कामवन, चरणाद्रि इत्यादी अनेक स्थाने लीलाभूमीस्वरूप मानली जातात. स्वतः ब्रह्मदेव या भूमीत आपल्याला जन्म प्राप्त व्हावा अशी अपेक्षा करतो. श्रीकृष्णाजवळच ब्रह्मदेवाने म्हटले आहे.

*तद्‌भूरिभाग्यमिहजन्मकिमप्यटव्यांयद्‍गोकुलेऽपिकतमाङ्घ्रिरभिषेजोकम् *
*यज्जीवितं तु निखिलं भगवान्मुकुन्दस्त्वद्यापियत्पदरजः श्रृतिमृग्यमेव ॥*
 - भागवत स्कंध १० - १४ - ३४.

तसेच नारद ज्या गोपिकांचे उदाहरण देतात त्यांनीही व्रजाचे - गोकुळाचे - वर्णन केले आहे.
*जयति तेऽधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्‍वदत्र हि ॥*
 भा. १० - ३१ - १

गोपिका म्हणतात, "हे दीनबन्धो, तू जन्मल्यापासून हे गोकुळ अधिक उत्कर्षाला प्राप्त झाले आहे, येथे लक्ष्मी अखंड आश्रयाला आली आहे." मुळात ती व्रजभूमी ही पुण्यभूमीच होती. पण श्रीकृष्णअवतारामुळे तिला फार श्रेष्ठत्व प्राप्त झाले. त्या व्रजवासी ज्या गोपिका होत्या, त्यांचे उदाहरण नारद आपल्या भक्तिलक्षणाच्या पुष्टीकरिता देतात. वास्तविक त्या गोपिका या सामान्य स्त्रिया नव्हेत ज्याचे वर्णन सर्व ऋषिमुनी, देवता, साधुसंत करतात. त्यांना सामान्य म्हणणे कसे शक्य आहे ? गोपी, गोपिका याचा शब्दार्थ खालील प्रमाणे केला आहे.
गाः इंद्रियाणि पान्ति इति गोप्यः ।
ज्या आपल्या इंद्रियांचे (विषयापासून) रक्षण करतात त्या गोपी.
गां दृष्टिं पान्ति रक्षन्ति (दुर्विषय गमन राहित्येनेति) गोप्यः गां म्हणजे दृष्टी (ज्ञान) तिचे दुष्ट विषयाकडे न जाऊ देता ज्या रक्षण करतात त्या गोपी. आणखीही एक चांगला अर्थ संभवतो.
*गोभि. इन्द्रियैः पिबति श्रीकृष्णरसमिति गोपी ।*
'गो'*  इंद्रियांनाही म्हणतात, आपल्या इंद्रियांच्या द्वारे जी श्रीकृष्णभक्तिरसाचे पान करते ती गोपी.
' *गोपायति* ' इति गोपी म्हणजे आपल्या भक्तिभावनेचे जी रक्षण करते ती गोपी.
येथे 'व्रजगोपिकानाम्' असे अनेकवचन आहे. विशेष म्हणजे गोकुळवासी सर्व स्त्रिया, सुना, लेकी, सास्वा सर्वच श्रीकृष्णावर निरतिशय प्रेम करणार्‍या होत्या. पुराणातून त्यांची अनेक नावेही सापडतात. कित्येक पुराणादिकांतून गोपिकांचे पूर्ववृत्तही आले आहे. काही देवता तप करून गोपीरूपाने भगवत्प्रेमाचा अनुभव घेण्याकरिता आल्या होत्या. काही ऋषीही तप करून गोपिकारूपाने अवतरले होते, तसेच श्रुतीही गोपिका रूपाने भगवत्प्रेम सुख भोगण्यास अवतरल्या होत्या.

गोप्यस्तु श्रुतयो ज्ञेया. ऋषिजा गोपकन्यकाः ।
देवकन्याश्‍च राजेंद्र न मानुष्या कदाचन ॥
श्रीएकनाथ महाराज सांगतात -
त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती । श्रुतीरूपें नव्हें मत्प्राप्ती ।
तै परतल्या म्हणोनि नेति नेति । माझी सुखसंगती न पवेंचि ॥
विषयबुद्धी तें मुख्य अज्ञान । तें असता मी न भेटे जाण ।
असता वेदोक्त जाण पण । तेणेंही संपूर्ण न भेटे मी ॥
जाणीव नेणीव गेलिया निःशेख । माझे पाविजे निजात्मसुख ।
श्रुति जाणोनि हे निष्टंक । गोकुळी त्या देख सुखार्थ आल्या ॥ - एकनाथी भागवत १२. १६३ - ६५

दुसरीही एक कथा उपलब्ध होते. त्रेतायुगात श्रीरामचंद्राचा अवतार झाला. सीतास्वयंवराकरता श्रीरामचंद्र मिथिला नगरीला आले, धनुर्भंग झाला, सीतेने रामचंद्राला माळ घातली, विवाहसोहळा समारंभपूर्वक पार पडला, तेथे ज्या मिथिला नगरीतील स्त्रिया जमल्या होत्या त्याही श्रीरामचंद्राचे ते कोटिकंदर्पदर्पहारी लावण्य बघून मोहित झाल्या. त्यांचीही उत्कट इच्छा झाली की आम्हांलाही हेच पती लाभले तर किती चांगले होईल, त्याकरिता आम्ही वाटेल तो त्याग करू. त्यानी आपली उत्कट वासनाही श्रीरामापुढे प्रगट केली, पण राम अवतार हा मर्यादापुरुषोत्तम होता, एकपत्नीत्वाची मर्यादा पाळणे अवश्य होते. त्या मिथिलानिवासी स्त्रियांचा उत्कटभाव पाहून श्रीरामचंद्र त्यांना म्हणाले, 'तुम्ही शोक करू नका.'
*द्वापारांते करिष्यामि भवतीनां मनोरथम् ।*
श्रद्धया परया भक्त्या व्रजे गोप्यो भविष्यथ ॥
'द्वापारयुगाचे शेवटी श्रीकृष्ण अवतारात तुमचे मनोरथ पूर्ण करीन. तुम्ही परमश्रद्धावान आहात, त्या वेळी तुम्ही गोकुळात गोपी बनाल.'

क्रमश..
=======================
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह**
-------------------------

Monday, 20 August 2018

अंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन

*अंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन*

_________________________

अंकशास्त्राला किमान पाच हजार वर्षांचा इतिहास आहे. प्राचीन काळी पश्चिम आशियातील यहुदी लोक अंकशास्त्राचा वापर करत असत. प्राचीन चीनमध्येही अंकशास्त्र विकसित झाले होते. त्याच प्रमाणे प्राचीन भारतातही अंकशास्त्राचा उपयोग केला जात असे.

प्राचीन ग्रीसमधील प्रसिद्ध गणिती आणि तत्वज्ञ पायथ्यागोरस हा युरोपिअन अंकशास्त्राचा जनक मानला जातो.

*अंकशास्त्रामागील संकल्पना*
-------------------------------------

प्रत्येक व्यक्तिची जन्मतारीख म्हणजे एक अंक असतो. प्रत्येक अंकाचे कांही गुण आणि कांही दोष असतात. या अंकाचा त्या-त्या व्यक्तीच्या स्वभावावर, विचार करण्याच्या पद्धतीवर आणि त्यामुळे जीवनावर प्रभाव पडत असतो. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत, तिचा स्वत:कडे व इतरांकडे पहाण्याचा दृष्टीकोन, येणा-या परिस्थितीला ती व्यक्ति कशा प्रकारे सामोरी जाईल आणि आणि ती व्यक्ति कोणत्या प्रकारचे जीवन जगेल याचा साधारण अंदाज बांधता येतो. हा अंदाज बांधण्यासाठी 1 ते 9 या अंकांचा वापर केला जातो.

*________जन्मांक________*
जन्मांकाला इंग्रजीमध्ये BirthBirth Number, Basic Number  या नावाने ओळखले जाते. व्यक्तिची जी जन्म तारीख असते ती जर एक अंकी असेल, म्हणजे 1 ते 9 दरम्यानची असेल तर ती तारीख हाच त्या व्यक्तीचा जन्मांक असतो. जर ती तारीख दोन अंकी असेल, म्हणजे 10 ते 31 या ताराखांमधील असेल तर त्या तारखेतील अंकाची बेरीज करून तिला एक अंकी बनवले जाते, व तो अंक म्हणजे त्या व्यक्तीचा जन्मांक असतो. उदाहरणार्थ, जर तुमची जन्मतारीख 1 असेल तर तुमचा जन्माक 1 असतो, तसेच जर तुमची जन्मतारीख 10 असेल तर या तारखेतील अंकांची बेरीज 1+0=1 येते, म्हणून तेंव्हाही तुमचा जन्मांक 1 असतो. हाच प्रकार तुमचा जन्म 19 किंवा 28 तारखेस झाला असेल तर होतो. (19=1+9=10=1+0=1, तसेच 28=2+8=10=1+0=1).

जन्मांक हा केवळ तारखेवर अवलंबून असतो, ती व्यक्ति कोणत्या महिन्यात अथवा कोणत्या वर्षी जन्मली याचा जन्मांकाशी संबंध येत नाही.

*_______भाग्यांक_______*

भाग्यांकाला Life Path Number, Fortune Number, Destiny Number इंग्रजीमध्ये म्हणतात. व्यक्तीच्या संपूर्ण जन्मतारखेतील सर्व अंकांची एक अंकी बेरीज म्हणजे त्या व्यक्तीचा भाग्यांक होय. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 15 जानेवारी 1984 रोजी झाला असेल तर ती तारीख 15.1.1985 अशी होते, आणि या तारखेतील सर्व अंकांची एक अंकी बेरीज 3 होते (1+5+1+1+9+8+5=30=3+0=3) म्हणून त्या व्यक्तीचा भाग्यांक 3 असतो.

एखाद्या व्यक्तीचे वाचन करण्यासाठी जन्मांक आणि भाग्यांक या दोन्हींचा वापर केला जातो. प्रत्येक जन्मांक आणि भाग्यांक यांची वैशिष्ठ्ये, गुण, दोष हे वेगवेगळे असतात.

*______नामांक_____*

नामांकाला इंग्रजीत Name Number  म्हणतात. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर त्याच्या जन्मतारखेप्रमाणेच त्याच्या नावाचाही परिणाम होत असतो. त्यामुळे अंकशास्त्रात व्यक्तीचे वाचन करण्यासाठी त्याच्या नावाचाही विचार केला जातो. त्यासाठी नावाच्या स्पेलिंगवरून त्या नावाची अंकामधील किम्मत काढली जाते. अशी किम्मत काढण्यासाठी वापरली जाणारी सोपी पद्दत म्हणजे नावाच्या इंग्रजी स्पेलिंग मधील अक्षरांचे त्यांच्या अल्फाबिट्स मधील स्थानानुसार अंकांमध्ये रुपांतर करायचे व त्यांची बेरीज करायची. उदाहरणार्थ, AJAY हे नाव घ्या. या नावाचे अंकात रुपांतर असे होते:

A=1
J=10=1
A=1
Y=25=7
1+1+1+7=10=1

त्यामुळे अजयचा नामांक 1 येतो. नामांकाचे वाचन करताना केवळ 1 ते 9 एवढेच अंक विचारात घेतले जात नाहीत, तर नामांक काढताना जी दोन अंकी बेरीज येते, त्या अंकांचाही विचार केला जातो.

जन्मांक, भाग्यांक आणि नामांक हे तीनही एकेमेकांना अनुरूप आणि पूरक असतील तर ते त्या व्यक्तीच्या फायद्याचे असते. या तीन अंकांपैकी दोन किंवा तीनही अंक समान असतील तर त्या व्यक्तीमध्ये त्या अंकाचे गुणदोष मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. याउलट हे तीनही अंक वेगवेगळे असतील तर त्या व्यक्तीमध्ये त्या-त्या अंकांचे गुणदोष दिसून येतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे अंकशास्त्रीय वाचन करताना तिचा जन्मांक, भाग्यांक आणि नामांक या तिन्ही अंकांचा विचार करणे गरजेचे असते.

*अंक आणि  त्यांचे गुणदोष आता आपण अंक आणि त्यांचे गुणदोष थोडक्यात पाहू:*

1: महत्वाकांक्षा, पुढाकार, आक्रमकता, विजय
2: चंचलता, धरसोडवृत्ती, उदारता,  रोमान्स 
3: उत्साही, शिस्तप्रिय, हुशार, यशस्वी 
4: तर्कनिष्ठता, फटकळपणा, बहिर्मुखता, कलह
5: मैत्रीभाव, प्रेम, रोमान्स, झटपट विचार आणि निर्णयक्षमता 
6: यशस्वी, विश्वासपात्र, आग्रही,  कौटुंबिकता
7: बेचैनपणा, उद्यमशीलता, अंतर्मुखता
8: उशीर, संपत्ती, उदासीनता 
9: लढाऊपणा, दीर्घ संघर्षातून यश, बहिर्मुखता   

*__अंकशास्त्राचा उपयोग__*

एखाद्या व्यक्तीच्या अंकशास्त्रीय वाचनावरून त्याचे मूलभूत गुण आणि दोष कळल्यामुळे त्यानुसार त्या व्यक्तीला आपल्या गुणांचा विकास आणि दोषांना काबूत ठेवण्याविषयी मार्गदर्शन करता येते. त्याला कोणते शिक्षण, रोजगार, व्यवसाय फायदेशीर ठरतील हे ठरवता येते. आयुष्याचा जोडीदार, व्यवसायातील भागीदार निवडताना अंकशास्त्राचा उपयोग होतो. एखाद्या व्यक्तीस कोणती वर्षे, कोणत्या तारखा अनुकूल अथवा प्रतिकूल असू शकतात याचा अंदाज बांधता येतो.

अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे.* ज्योतिषशास्त्रात व्यक्तिची जन्मवेळ अचूक माहीत असावी लागते. अंकशास्त्रीय वाचनाला जन्मवेळेची गरज नसते तर केवळ पूर्ण जन्म तारीख आणि व्यक्तीचे नाव या गोष्टीच महत्वाच्या असतात. विशेष म्हणजे एखाद्या व्यक्तिची खरी जन्मतारीख माहीत नसेल तर त्याची कागदोपत्रीय तारीख देखील अंकशास्त्रीय वाचनाला चालू शकते.

कांही लोक अंकशास्त्राचा संबंध ज्योतिषशास्त्राशी जोडतात, पण ते चुकीचे आहे. कारण अंकशास्त्राचा संबंध ग्रहगोलांशी नसून अंकांशी आहे. प्रसिद्ध ज्योतिषी किरो याने म्हंटले होते की ज्योतिषशास्त्र, हस्त सामुद्रिक यांच्यापेक्षा अंकशास्त्र हे जास्त उपयोगी पडते.
_____________+____________
संकलन - श्रीधर कुलकर्णी
ज्ञानामृत मंच

रक्तदान :- आरोग्यासाठी फायदेशीर

*रक्तदान :- आरोग्यासाठी फायदेशीर*
-------------------------------------------------

गरजूंना रक्तदान हे आपल्याकडे नेहमीच उत्तम दान मानण्यात आले आहे. या दानामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. पण सर्वसाधारणपणे रक्तदानाबाबत खूप गैरसमज पहावयास मिळतात. यापैकी सर्वात मोठा गैरसमज म्हणजे, रक्तदान केल्याने शरीरामध्ये अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण होतात, किंवा रक्तदानामुळे शरीर अशक्त होते, हा आहे. पण या गोष्टींमध्ये काही तथ्य नसून रक्तदान केल्याने शरीर निरोगी राहते, हे वास्तव आहे.

रक्तदान केल्याने शरीरातील धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका पुष्कळ अंशी कमी होतो. तसेच रक्तदान केल्याने वजन कमी करण्यास ही मदत मिळते. वर्षातून दोन वेळा जरी रक्तदान केले, अरी त्यातून शरीराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. रक्तदान केल्यानंतर शरीरामध्ये नव्या रक्तपेशी निर्माण होतात. त्यामुळे शरीरामध्ये अशक्तपणा न येता काही प्रमाणात ताकदच येते. रक्तदान नियमितपणे करणाऱ्या व्यक्तींमध्ये लिव्हरशी निगडीत असणाऱ्या समस्या उद्भविण्याची शक्यता कमी असते. शरीरामध्ये जर लोह अतिरिक्त असेल, तर त्यामुळे लिव्हरवर दबाव पडण्याची शक्यता असते. रक्तदान केल्याने शरीरातील लोहाची मात्र संतुलित होते. एक वेळ रक्तदान केल्याने शरीरातील ६५० कॅलरीज उर्जा खर्च होत असते.

रक्तदान करताना काही गोष्टी लक्षात घेणे अगत्याचे आहे. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे वय अठरा वर्षांच्या वर हवे, तसेच त्या व्य्क्तीचे वजन ४५ ते ५० किलोंपेक्षा कमी नसावे. रक्तदान करण्याच्या किमान चोवीस तास अगोदर धूम्रापान, मद्यपान, किंवा तंबाखूचे सेवन करू नये. रक्तदान करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेऊन आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार नसल्याची खात्री करून घ्यावी. रक्तदान करण्यापूर्वी झोप चांगली झालेली असावी. तसेच तत्पूर्वी तेलकट पदार्थ किंवा आईसक्रीमसारखे पदार्थ घेणे टाळावे. शरीरामध्ये लोहाचे आवश्यक तेवढे प्रमाण असल्याची काळजी घ्यावी. त्यासाठी लोह युक्त आहार घ्यावा.
=======================💉
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

*एकाग्रता कशी ठेवावी ..*

*एकाग्रता कशी ठेवावी ..*
-------------------------------------

खालील १० सवयी तुम्हाला असे विचलन ताब्यात ठेवून, त्यापासून सुरक्षित अंतर ठेवून आणि चालढकलीची संभाव्यता टाळून तुमच्या कामात एकाग्र राहण्यास मदत करतील:
 *स्वतःवर लक्ष ठेवा :* विचलन हे आंतरिक किंवा बाह्य अशा दोन्ही स्वरूपांतील असू शकतात, त्यामुळे प्रथम स्वतःमध्ये डोकावून पहा. जर तुमचे लक्ष सगळीकडे जात असेल, तर मग स्वतःच्या मनात डोकावून नक्की तपासा की, नक्की गडबड काय आहे? तुमच्या चंचलपणा आणि अस्वस्थतेमागील कारण काय आहे?
*तुमच्या आयुष्यात क्रियाशील राहण्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे? कारणे ओळखा :* एकदा का तुमच्या प्राथमिकता ठरल्या की, इतर बाह्य कारणे ओळखा. त्यामधील एक तुमच्या कार्यालयातील वातावरण हे आहे का? अनाहूत सहकारी? तुम्ही करत असलेल्या कामासाठी लागणारा वेळ, कल्पनाशक्ती किंवा कौशल्य यांची कमतरता? एकदा का तुम्हाला कारणे ओळखता आली, की मग त्यांच्या परिणामांवर उपाय शोधता येतील.
*पूर्वतयारी करा :* सर्व यशस्वी नेते हे उत्तम नियोजक आहेत; ते प्रत्येक बारीक-मोठ्या ध्येयाच्या याद्या तयार करतात. जेव्हा एखादे काम तुमच्याकडे येते, तेव्हा ते कसे पूर्ण करायचे यावर वेळ देऊन थोडा विचार करा. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक असलेल्या सर्व पायर्‍या अंदाजे वेळेसहित लिहून काढा. असे म्हणतात की, नियोजनात घालवलेली 10 मिनिटे अंमलबजावणीतील एक तास वाचवतो.
*ऑफलाइन राहायला शिका :* ई-मेल, सोशल मीडिया आणि भ्रमणध्वनी ही विचलित करणार्‍या सर्वात मोठ्या कारणांपैकी काही आहेत. तुम्हाला जर का खरेच जास्तीत जास्त एकाग्र व्हायचे असेल, तर तुम्हाला जे करायचे असेल ते पूर्ण होईपर्यंत स्वतःला या सर्वांपासून दूर ठेवा.
*स्वतःला वेळ द्या :* मोठी कामं करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांपैकी एक म्हणजे कामातून विराम घेण्याची वेळ माहीत असणे, ही होय. जेव्हा तुम्हाला विचलित झाल्यासारखे वाटते, तेव्हा कामातून विराम घ्या आणि मग पुनर्मूल्यांकन करा व पुन्हा एकदा कामावर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुमचे मन अधिक मोकळे होऊन ते पुन्हा ताजेतवाने होते.
*गाणी ऐका :* गाणी ऐकणे हे कोणतीही गोष्ट जुळवून आणू शकणार्‍या उत्तमोत्तम गोष्टींपैकी एक आहे. जेव्हा तुमच्या भोवतालची प्रत्येक गोष्ट ही लक्ष विचलित करणारी असेल, तेव्हा तुम्हाला ध्यान आकर्षित करणार नाहीत, पण तुमच्या एकाग्रतेसाठी पार्श्वसंगीत म्हणून काम करतील असे संगीत तुमच्या हेडफोन्सवरून ऐका. संगीत तुम्हाला लक्ष एकाग्र करण्यास मदत करतील आणि हेडफोन्समुळे इतरांना तुम्ही व्यस्त आहात, असा इशारा मिळेल.
*कामाचे तुकडे करा :* विशेषतः जेव्हा विचलनं खूप जास्त असतील, तेव्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी तुमच्या मोठमोठ्या कामांची लहान तुकड्यांमध्ये विभागणी करणे साहाय्यक ठरेल आणि तुमच्या मनातही कामाच्या पूर्तीची आणि काम पुढे सरकत असल्याची भावना निर्माण होईल.
 *स्वच्छता बाळगा :* तुमच्या कार्यालयाची अवस्था कशी आहे? जर ते अस्वच्छ, अस्ताव्यस्त व अव्यवस्थित असेल, तर काही वेळ देऊन ते स्वच्छ करा, जेणेकरून तुम्ही अधिक एकाग्रतेने काम करू शकाल.
 *प्रत्येक कामाची मुदत ठरवा :* जर तुम्ही किचकट गोष्टीवर काम करत असाल, सरासरी 90 मिनिटे ही त्यातून काहीही फायदेशीर मिळवायला लागतात आणि सुमारे 30 मिनिटे फक्त तुमचे मन त्यावर लावायला लागतात. एकदा का तुम्ही कामाच्या प्रवाहात आलात की, कामाची वेळ निश्चित करा आणि जेव्हा वेळ संपेल, तेव्हा थांबा. जेव्हा शेवट दृष्टिक्षेपात असेल, तेव्हा एकाग्रता जोपासणे सोपे असते.
*लवकर उठा :* ही खूप सोपी गोष्ट आहे, पण ही सवय अंगीकारल्यास याचे परिणाम खूप खोल आणि चांगले आहेत. आपला कामाचा दिवस इतरांपेक्षा एक तास अगोदर सुरू करा. तो एक तास तुमच्या दिवसाचे नियोजन करण्यासाठी आणि इतर काही विचलन येण्यापूर्वी कामाला सुरुवात करण्यासाठी खर्च करा. तसेच कार्यालयातील लांबलचक जेवणाची वेळ वगळा आणि त्याऐवजी छोटासा ब्रेक घेऊन पाय मोकळे करून या किंवा काही तरी हलके आणि पोषक खाऊन घ्या आणि डोक्यातील विचार साफ करा. यामुळे तुम्ही स्वतःला खर्‍या अर्थाने वेळ आणि ऊर्जा देत असाल. तुमच्या भोवतालची विचलनं कुठेही जाणार नाहीत. त्यामुळे आपणच स्वतः त्यांच्यावर मात करायला शिकणे हेच उत्तम आहे.
           – टीम स्मार्ट उद्योजक
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

डाळीचे पीठ

*डाळीचे पीठ*
--------------------

जुन्या काळात जेव्हा साबण उपलब्धच नव्हते तेव्हा लोक डाळीचे पीठ अंगाला लावून आंघोळ करत होते आणि आता सुद्धा अगदी आधुनिक काळातही डाळीच्या पिठाचा साबणासारखाच नव्हे तर इतर अनेक प्रकारांनी सौंदर्य प्रसाधन म्हणून वापर केला जात आहे. डाळीचे पीठ म्हणजे हरभर्‍याच्या डाळीचे पीठ ज्याला सध्या बेसन पीठ म्हणण्याची पद्धत आहे. बेसन पिठाचे दुधात मिश्रण करून ते मिश्रण चेहर्‍याला लावल्यास चेहरा विलक्षण तजेलदार होतो. हे मिश्रण करताना त्यात थोडी हळद मिसळावी. हे मिश्रण चेहर्‍याला २० मिनिटे लावून ठेवावे आणि नंतर कोमट पाण्याने धुवावे.

अशा प्रकारचे मिश्रण वर्षानुवर्षे वापरले जात आहे. परंतु आता बेसन पिठाच्या वापराचे अधिक संशोधन करून त्याला अधिक शास्त्रीय रूप दिले जात आहे. बेसन पीठ दुधाच्या ऐवजी गुलाब पाण्यात मिसळून त्याचे मिश्रण चेहर्‍याला लावले तर त्याचा गुण अधिक चांगला येतो, असे अलीकडच्या प्रयोगात आढळले आहे. मात्र हे मिश्रण कोरड्या त्वचेच्या लोकांनी वापरायचे नाही. तेलकट त्वचेच्या लोकांनी ते वापरले की, तेलकटपणा कमी होतो.

कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी तेलकटपणा कमी करण्याचा प्रश्‍नच येत नाही. तेव्हा अशा लोकांनी बेसन पीठ आणि मध यांचे मिश्रण करावे. त्यात थोडे दूध आणि किंचित हळद पावडर टाकावी. आठवड्यातून एकदा हे मिश्रण चेहर्‍याला २० मिनिटांसाठी लावावे. त्यामुळे त्वचा ओलसर होते. उन्हामुळे पडणारे काळे डाग कमी करण्यासाठी बेसन पीठ आणि बदामाच्या बियांची पावडर यांचे मिश्रण करावे. ते दुधात कालवावे आणि त्यात चार थेंब लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण चेहर्‍यावर ३० मिनिटे ठेवावे. उन्हामुळे पडलेले चेहर्‍यावरचे काळे डाग नाहीसे होतात.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्रीमंत बाजीराव पेशवे

*श्रीमंत बाजीराव पेशवे जयंती*
____________🌹_____________
*जन्मदिन   :  इ.स. १८ ऑगस्ट १७००*     
*मृत्यूदिन  :  इ.स. २८ एप्रिल १७४०*

         बाळाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा. तर चिमाजी आप्पा धाकटा. आईचे नाव राधाबाई. बाजीरावांचे मूळ नाव विसाजी. मात्र, बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही प्रसिद्ध होते. वयाच्या तेराव्या काशीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला (१७१३). बाजीरावांना चार मुलगे झाले. त्यांपैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले. दुसरी पत्नी मस्तानीस समशेर बहाद्दूर नावाचा मुलगा झाला. समशेर बहाद्दूर पुढे पानिपतच्या लढाईत (१७६१) ठार झाला. आपल्या अवघ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत बाजीरावांनी ४० महत्त्वाच्या लढाया केल्या.  त्यात माळवा (डिसेंबर १७२३), धर (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी १७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपुर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (मे १७३९) या  मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे सर्व लढायांमध्ये ते अजिंक्य ठरले.

             बाजीरावांना हरवणं त्याच्या काळातल्या शत्रूंनाही जमलं नाही.  मराठेशाहीला नर्मदेच्या पलिकडे मराठी घोडदळ नेणारा हा पहिलाच सेनापती. चारशे वर्षांच्या यवनी अंमलानंतर दक्षिणेतून जाऊन दिल्ली काबीज करणारा बाजीराव हा पहिलाच.  दिल्लीपर्यंत धडका मारून मराठ्यांचा दरारा निर्माण केलेला होता. भीमथडीची तट्टे नर्मदेपार नेल्यामुळे उत्तरेकडचे काबुली घोडे दक्षिणेत येण्याचे बंद झाले.  बाजीरांवानी उत्तरेत घुसून गुजरात, माळवा, बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व महत्त्वाचे व्यापारी मार्ग आपल्या ताब्यात घेतले. भविष्यात महाराष्ट्रावर परकीय संकट कोसळू नये म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर आपली सत्ता असायला हवी हे जाणून बाजीरावाने उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे, पवार हे मराठा सरदार उभे केले. त्यामुळे ग्वाल्हेर, इंदौर, देवास आदी संस्थानं पुढे आली.

             बाजीरावांची देशभर मोठी दहशत होती. १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केलं तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला. ‘ *बाजीराव निघालाय’* या एवढ्या बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परतला.  पराक्रमासाठी आणि विजयासाठी ‘ *बाजी* ’ हा शब्दप्रयोग तेव्हापासून रुढ झाला असावा.   बाजीरावाने शनिवारवाडा बांधला आणि साताºयाच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले.

*॥ श्रीशाहूनरपति हर्षनिधान बाजीराव बल्लाळ मुख्यप्रधान॥*

अशी बाजीरावांची मुद्रा होती.

            *कुशल सेनापती*

     बाजीरावाच्या युद्धकौशल्याची जाणीव आपल्याकडे नाही. पण अमेरिकन लष्कर आजही ती जाणीव ठेवून आहे. लष्करी डावपेच आणि रणनीतीच्या अभ्यासक्रमात आजही बाजीरावाने निजाम-उल-मुल्क याच्याविरुद्धची  १७२८ मध्ये पालखेड इथे केलेली लढाई अमेरिकन सैनिकांना शिकवली जाते. त्यासाठी पालखेडचं कायमस्वरूपी मॉडेलच तयार केलं गेलेलं आहे. बाजीरावाने निजामाला पूर्ण पराभव करण्यासाठी त्याला पालखेडच्या कात्रीत कसं पकडलं याचा ‘स्ट्रॅटेजिक वॉरफेअर’च्या अभ्यासाचा भाग म्हणून आजही सांगितलं जातं. बाजीराव शत्रूला स्वत:च्या स्थळी आणून मात देत असे. मैदानात अनुकूल परिस्थिती नसेल तर वाट पाहून कसलेल्या शिकाºयाप्रमाणे हमला करायचा. कदाचित पुढील काळात या युद्धतंत्राचा विसर पडल्यामुळे ‘पानिपता’सारखा प्रसंग ओढावला.  बाजीराव हे मोठे युद्धनीतीज्ञ होते.  म्हणूनच ते अजेय राहिले. त्यांच्या कारकीर्दीतली एकही लढाई ते हरले नाही. म्हणून त्यांची तुलना नेपोलियनसारख्या युद्धनिपुण सेनापतीशी केली जाते. युद्धनीतीतील बारकावे, गनिमी कावे, शत्रूला आपल्या सोयीच्या व मोक्याच्या ठिकाणी आणून हरविणे, त्यासाठी दबा धरून बसणे, सक्षम गुप्तचर यंत्रणा वापरणे आदी तंत्र छत्रपती शिवाजीमहाराजांसारखेच वापरले असल्याचे दिसून येते. बाजीराव पराक्रमात शिवाजी महाराजांच्या बरोबरीचा होता की नाही याबाबत नक्कीच वाद नाही. शिवाजीमहाराजांच्या युद्धतंत्राचा ठसा बाजीरावांवर नक्कीच पडलेला होता.

   घोडदळ ही बाजीरावांची सर्वात मोठी ताकद होती. बाजीरावाने पायदळ आणि तोफखाना बाळगणेच सोडले होते. त्या काळाच्या लढाईचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे सशक्त घोडदळ. बाजीराव घोड्यावर लहानाचा मोठा झाला असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.  सहा फुट उंची असलेले बाजीराव हे उत्तम सेनापती होते.  बुद्धी आणि शक्तीचा अद्वितीय संगम म्हणजे बाजीराव. घोड्यावरच्या बांधलेल्या  पिशवीत भाजलेले चणे घेऊन ते खात खात दौड करीत, सैनिकांसह प्रवास करी. त्यांच्यासोबतच राही. त्यांच्याबरोबर जेवण करत असे. त्याच्या फौजा ७५ किलोमीटर प्रतीदिन या वेगाने जायच्या. घोड्यावर मोजकीच शिधा व शस्त्र असल्याने मराठा सैन्याची गतिमानता जास्त होती. सैन्याचा अंतर कापण्यासाठीचा हा वेग त्या काळातला सर्वोत्तम वेग होता.  त्या काळात मुघल सैन्य दिवसाला ५ ते ६ मैल या वेगाने प्रवास करत असत. शत्रूला सुगावा लागायच्या आतच हल्ला झालेला असायचा. बाजीरावांची गुप्तचर यंत्रणा ही त्याची दुसरी मोठी बाजू. शत्रुच्या हालचालींबाबतची क्षणाक्षणांची माहिती त्यांना मिळायची. मार्गात येणाºया नद्या, नद्यांचे चढ, उतार, पर्वत, घाट या सगळ्यांची अचूक माहिती असायची.

*रावेरखेडी :*

            *२८ एप्रिल १७४० ला (वैशाख शुद्ध त्रयोदशी १६६२) मध्य प्रदेशातील नर्मदेकिनारी असलेल्या रावेरखेडी येथे ज्वर आल्याने बाजीरावांचे निधन झाले.*  बाजीरावांना केवळ ४० वर्षांचे आयुष्य मिळाल. तिथे पुढे नर्मदातटावर नानासाहेबांनी ग्वाल्हेर संस्थानच्या देखरेखीखाली बाजीरावांची समाधी बांधली. उत्तरेत जाण्यासाठी नर्मदा नदी ओलांडावी लागे.  हे मोठे सैनिकी ठिकाण होते. नर्मदेच्या तटाजवळ असलेली ही समाधी महेश्वर धरण प्रकल्पामुळे पाण्याखाली जाणार असल्याचे मध्यंतरी वाचण्यात आले. रावेरखेडी हे बुडित क्षेत्रात येत असून समाधीसह इतर अनेक भाग पाण्याखाली जाणार आहे.  महाराष्ट्रापासून एवढ्या लांब ठिकाणी त्याकाळात घोडेस्वारी करत बाजीराव कसे गेले असतील याचं आश्चर्य वाटते. घोडेस्वारीचं त्याचं कौशल्य अफाट असावं.

आपल्या घरातील व जातीपंथातील लोकांशी मानसिक युद्ध खेळून हरलेला? तरीही जिंकलेला हा ‘ *राऊ* ’ रावेरखेडीस चिरविश्रांती घेत खरा यौद्धाच ठरला. बाजीराव पेशव्यांचा हा इतिहास दैदिप्यमान आणि गौरवशाली आहे. हा इतिहास आपण दुर्लक्षित केला नाही तर चिरंतन टिकणारा आहे.
〰〰〰〰〰〰⚔
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

ईलायची

*इलायची*
-----------------

हिरवा वेलदोडा किंवा इलायची भारतीय खाद्यपरंपरेमधील एक महत्वाचा पदार्थ आहे. केवळ पदार्थाची चव वाढविणे ह्या एका उद्देशाकरिता वेलची वापरली जात नसून, सर्दी-पडश्यासारखी दुखणी बरी करण्यास देखील इलायची सहायक आहे. पण इलायचीचा उपयोग वजन घटविण्यासाठी देखील होऊ शकतो हे तथ्य फारसे अवगत नसणारे आहे. पोटातील जमा झालेली चरबी घटविण्यास इलायचीचे सेवन उपयुक्त आहे. तसेच कोलेस्टेरोलचे स्तर घटवून ग्लुकोज टॉलरन्सच्या पातळीमध्ये सुधार करण्यासही इलायची सहायक आहे. अन्नाचे पचन व्यवस्थित होण्याशी इलायची सहायक आहे.

आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे काही अन्नपदार्थांच्या सेवनाने किंवा काही जीवाणूंचा शरीरामध्ये प्रवेश झाल्याने शरीराला घातक असे पदार्थ शरीरामध्ये तयार होऊ लागतात. ह्या पदार्थांमुळे शरीरातील रक्ताभिसरणामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शरीरातील उर्जा कमी होऊन शरीरामध्ये सतत थकवा जाणवू लागतो. इलायचीच्या सेवनामुळे शरीरात तयार होणारे आम्ल कमी करण्यास मदत होते. त्यामुळे कधी पित्ताचा त्रास होत असल्यास इलायची चघळावी.

अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास ही इलायची सहायक आहे. अनेकदा अन्नाचे पचन नीट न झाल्याने पोट दुखू लागते. इलायचीच्या सेवनाने ही तक्रार दूर होऊ शकते. तसेच शरीरामध्ये अतिरिक्त पाणी साठल्यामुळे. म्हणजेच वॉटर रीटेन्शन झाल्यामुळे अंगावर सूज येऊ लागते. इलायचीच्या सेवनाने शरीरातील अतिरिक्त पाणी लघवीवाटे बाहेर टाकले जाऊन शरीरातील साठलेले अतिरिक्त पाणी कमी होते, व परिणामी अंगावरील सूज उतरण्यास मदत होते.

इलायचीच्या सेवनाने शरीरातील वाईट कोलेस्टेरोलच्या पातळीमध्ये घट होते. परिणामी हृदयाच्या आरोग्याकरिता ही इलायचीचे सेवन उपयुक्त आहे.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

Thursday, 9 August 2018

*मेहंदी वापरण्याचे फायदे*

*मेहंदी वापरण्याचे फायदे*
------------------------------------

केसांशी निगडीत समस्यांवर उपाय म्हणून मेहेंदी वापरण्याची पद्धत आपल्याकडे फार पूर्वीपासून चालत आली आहे. अगदी आजीपासून ते तरुण नातीपर्यंत सर्वच मुली आणि आता मुलेही केसांच्या आरोग्यासाठी मेहेन्दीचा वापर करणे पसंत करताना दिसतात. मेहेंदी वापरल्याने केसांवर रंग तर चढतोच, पण त्याशिवाय मेहेंदी मध्ये असलेली अनेक पोषक तत्वे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. पूर्वीच्या काळी, आणि अजूनही काही ठिकाणी मेहेंदीच्या झाडांची पाने वाटून तो लेप केसांना लावण्याची पद्धत होती. पण आजकाल मेहेंदीची पाने वाळवून त्यापासून तयार केलेली मेहेंदी पावडर बाजारामध्ये सहज उपलब्ध असते. ही मेहेंदी वापरण्याचे जसे फायदे आहेत, तसेच त्यापासून काही प्रमाणात नुकसान ही होऊ शकते.

मेहेंदी केसांच्या मुळांना मजबूत बनविते. मेहेंदीमध्ये मेथीदाण्याची पूड मिसळून हे मिश्रण केसांना लावल्यास केसगळती कमी होते. मेहेन्दीच्या वापरामुळे केस चमकदार, मुलायम होतात. मेहेंदी नैसर्गिक हेअर कंडीशनर आहे. केसांचे कंडीशनिंग करण्यासाठी मेहेंदीमध्ये अंडे किंवा दही घालून हे मिश्रण केसांना लावावे. अर्ध्या तासाने कोमट पाण्याने केस धुवून टाकावेत.

मेहेंदीच्या वापराने केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होते. मेहेंदीच्या नियमित वापराने केसांमधील कोंडा गायब होईलच, शिवाय पुन्हा होणारही नाही. मेहेंदीमध्ये असणारी अँटी फंगल आणि अँटी मायक्रोबियल तत्वे डोक्याची खाज कमी करण्यास मदत करतात. मेहेंदीचा सर्वसामान्य उपयोग केसांना डाय करण्यासाठी केला जातो. बाजारातील रसायन मिश्रित हेअर डाय वापरण्यापेक्षा मेहेन्दीचा वापर हा सुरक्षित पर्याय आहे.

मेहेंदी मध्ये असलेले टॅनिन केसांच्या कॉर्टेक्समध्ये शिरून केसांना मजबूत बनविते आणि केस मुलायम व चमकदार दिसू लागतात. तसेच केसांचा तेलकटपणा नियंत्रित ठेवण्यासही मेहेंदी उपयुक्त आहे. मेहेंदी वापरण्याचे जसे अनेक फायदे आहेत, तसेच काही तोटे देखील आहेत. मेहेंदीच्या अतिवापराने केस राठ, कोरडे होऊ शकतात. त्यामुळे मेहेंदीचा वापर करण्याआधी आणि केल्यानंतर केसांना भरपूर तेल लावावे. तेल केसांमध्ये थोडा वेळ राहू देऊन मग कोमट पाण्याने केस धुवावेत. आजकाल बाजारामध्ये निरनिराळ्या ब्रँड्सच्या मेहेंदी उपलब्ध असतात. पण या सर्वांपैकी खात्रीशीर ब्रँडची निवड करावी. अनेक मेहेंदींमध्ये भेसळ असण्याची शक्यता असते, तसेच त्यामध्ये रसायनांचा वापर केला गेला असण्याचीही शक्यता असते. या भेसळयुक्त किंवा रसायनमिश्रित महेंदीमुळे केसांची हानी होऊ शकते.
=======================📓
*सं.श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

जोडवीचे फायदे

*जोडवी चे फायदे*
--------------------------

आपल्या देशात हिंदू धर्मात विवाहित महिलांमध्ये जोडवी घालण्याची फार जुनी परंपरा आहे. टिकलीपासून ते पायातील जोडव्यांचाही विवाहित महिलांच्या श्रृंगारात समावेश असतो. केवळ विवाहित महिलांच्याच पायांमध्ये या जोडवी बघायला मिळतात. पण फार लोकांना याचे नेमके कारण माहिती नाही. किंवा असे म्हणूया की, बहुतेकांना हे घालण्या मागचे कारण काय असावे असा प्रश्न पडत नाही. सुंदर दिसण्यासोबतच जोडवींचे अनेक आरोग्यदायी फायदेही सांगितले आहेत. त्याचबरोबर यांचा उल्लेख आयुर्वेदातही करण्यात आला आहे.

केवळ पायांमध्ये केवळ श्रॄंगार म्हणून घातले जातात असे नाहीतर जोडवीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मासिक पाळी संबंधी समस्या जोडवी घातल्याने कमी होत असल्याचे म्हटले जाते. यासोबतच मासिक पाळी नियमीत वेळेवर येते.

शरिरातील सर्वच नाड्या आणि मांसपेशी जोडवी घातल्याने योग्य प्रकारे काम करतात. यामुळे तळव्यापासून ते नाभीपर्यंत नाड्या आणि पेशींच्या अनेक समस्या सुटतात. त्याचबरोबर गर्भाशयाशी जोडव्यांचा थेट संबंध असतो. सायन्सनुसार अंगठ्याच्या बाजूने दुस-या बोटात एक विशेष नस असते जी गर्भाशयाशी जोडलेली असते. ही गर्भाशयाला नियंत्रीत करते आणि रक्तस्त्राव संतुलित ठेवते. तसेच जोडवी घातल्याने महिलांमधील प्रजनन क्षमता वाढते, असेही बोलले जाते.

जास्तकरून जोडवी या ही चांदीची बनवलेली असते आणि चांदी एनर्जीसाठी चांगले माध्यम मानले जाते. त्यामुळे पॄथ्वीची ध्रुवीय ऊर्जा जोडवी घातल्याने स्वच्छ करून शरिरात पाठवली जाते आणि त्यामुळे शरीर ताजतवाणे राहते. आयुर्वेदानुसार, महिलांची प्रजनन क्षमता वाढवण्यात जोडवी महत्वपूर्ण भूमिका बजावतात.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

सतत थकवा चे कारणे*

*सतत थकवा चे कारणे*
-----------------------------------

अतीशय काम करावे लागले किंवा दगदग झाली की थकवा जाणवतो. काही वेळा हा थकवा थंड पेयाच्या सेवनाने जातो, काही वेळा थोडी विश्रांती घेतली की जातो किंवा सिनेमा पहायला गेल्याने जातो पण काही वेळा आपल्याला सततच थकल्यासारखे वाटते. तात्पुरत्या उपायांनी हा थकवा जात नाही. हा थकवा गंभीर स्वरूपाचा असू शकतो. त्यावर मुळातून इलाज करावा लागतो. अशा थकव्याची पाच कारणे असतात. त्यातल्या कोणत्या कारणाने थकवा जाणवत आहे हे तपासून पहावे लागेल. पहिले कारण म्हणजे कसल्या तरी कारणाने सतत अस्वस्थ होणे. घर बांधायला काढले असेल तर त्यात रोज अडचणी येतात. कामे वेळेवर होतील की नाही याची चिंता वाटायला लागते. ते घर बांधून पूर्ण होईपर्यंत जीवात जीव येत नाही. सतत थकल्यासारखे आणि गळून गेल्यासारखे होते.

माणूस दिवसभर काम करून थकतो पण त्याला छान झोप मिळाली की, छान वाटते. झोपेतून जागा होतो तेव्हा एकदम ताजे तवाने वाटायला लागते. मात्र काही लोकांना सततच कमी झोप मिळते. कितीही प्रयत्न केला तरी लवकर झोपण्याची संधी मिळत नाही. उशिरापर्यंत जागावे लागतेच पण पहाटेच झोपण्याच्या खोलीत लोकांची खडबड सुरू होते. त्यामुळे कितीही प्रयत्न केला तरीही उशिरा पर्यंत झोपायला मिळत नाही. थकवा गेलेला नसतानाही उठावे लागते. अशी अर्धवट झोपेच्या स्थितीत कामे करीत रहावे लागते. त्यामुळेही सतत थकवा जाणवत रहातो. कामे नीट होत नाहीत. तेव्हा कमी झोप मिळणे हेही सततच्या थकव्याचे कारण आहे.

अशक्तपणा हेे एक सततच्या थकव्याचे मोठे कारण आहे. काम केल्याने माणसाच्या शरीरातली ऊर्जा खर्ची पडलेली असते. ती भरून काढूनच दुसर्‍या दिवशीच्या कामाला लागले पाहिजे पण ती खर्चलेली उर्जा भरून निघण्याएवढे सकस अन्न खायला मिळत नाही. आवश्यक ती जीवनसत्त्वे आणि प्रथिने आहारातून मिळत नाहीत. परिणामी कोणतेही काम करण्याची ताकद अंगात रहात नाही. तशा अवस्थेत काम करीत राहिल्याने जादा थकवा येतो आणि सतत थकवाच येतो. शरीरातल्या अनेक प्रकारच्या ग्रंथींमध्ये थायरॉईड ग्रंथी फार महत्त्वाच्या असतात. थायरॉइड कमी सक्रिय असणे आणि गदीच निष्क्रिय असणे अशा दोन्ही अवस्थांत थकल्यासारखे वाटत रहाते. शरीरात कसलाही संसर्ग असला तरीही थकल्याची जाणीव होते. संसर्ग असतो पण ताप नसतो. आपण आजारी आहोत हे कळत नाही पण संंसर्गाने काम करण्याची क्षमता कमी होते.
=======================
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

अंगारकी चतुर्थी कथा

*अंगारकी चतुर्थी कथा*
--------------------------------

आपल्या हिंदू धर्मातली सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी  उपवास धरतात. आपापल्या घरी संध्याकाळी देव्हाऱ्यातल्या मंगलमूर्ति श्रीगणेशा ची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. आणि चंद्रोदया नंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो.

परंतु हीच संकष्टी जेंव्हा मंगळवारी  येते तेंव्हा हिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधिले जाते. ह्या मागची कथाही तितकीच रंजक आहे.

कृतयुगात अवंती नगरीत  वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेशभक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टी ला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते.

ह्या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंकारक नामक, जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता जो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेशमंत्र देऊन उपासना करायला सांगितलं.

त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले. आणि हाच तो  दिवस होता मंगळवारी  आलेल्या संकष्टी चतुर्थी चा.

" स्वर्गात राहून अमृतप्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायाचे वरदान " त्यानं प्रसन्न झालेल्या श्रीगणेशा कडे मागितीला.

यावर गणेशानं सुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की, "ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवार ची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंकारीका ह्या नांवाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास २१ संकष्टी  केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल. आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. ते ऋणमुक्त होतील".

"अशाप्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अकारका सारखा लाल आहेस  म्हणून अंकाकर  व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून  मंगळ ह्या नांवे तुला ब्रम्हांडातल्या  आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृत पान करशील".

त्यामुळेच गणेशाच्या ह्या वरदानामुळे तेंव्हा पासून अंगारकी चतुर्थीला  अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थी चे व्रत/उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे २१संकष्टी  केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन ही दिले गेले आहे.

म्हणूनच उद्याच्या मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही ह्या वर्षातली पहिली वहिली अंगारकी योग असल्याने आपल्याही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेले महत्वाचे ईप्सित कामे मार्गी लागण्यासाठी, इच्छुकांनी उद्याची अंगारकी मात्र अवश्य धरावी.

कारण उद्या ब्रम्हांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्य लहरी कैक सहस्र पटीने पृथ्वी कडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळे कुणीही उद्याची चतुर्थी धरणाऱ्यांस त्या पुण्यलहरींचा त्याला निश्चितच फायदा होतो हे मी स्वानुभवाने सांगतो.

आणि ह्या दिवशी मात्र खालील श्लोक म्हणुन, चंद्रदर्शन  करुनच उपवास सोडावा.

तसेच हेही ध्यानात असु द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने  कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरुन दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पध्दत मात्र अवलंबू नये.

कारण मुळातच बाप्पा ला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापि रुचत नाही. म्हणून त्याच्याच आदेशा नुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करुन उपवास सोडणे केंव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच.

*🌺गणेश अंगारकी श्लोक*🌺

 गणेशाय नमस्तुभ्यं, 
सर्व सिद्धि प्रदायक ।
संकष्ट हरमे देवं, 
गृहाणार्घ्यम् नमोऽस्तुते ॥
कृष्णपक्षे चतुर्थ्यातु , सम्पूजितं विधूदये। क्षिप्रं प्रसीद देवेश, 
     *अंगारकाय नमोऽस्तुते ॥*
=========================
*सं...श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*
*आपल्या स्वयंपाकघरातच आहेत सौंदर्यप्रसाधने*
---------------------------------------------------

तुमच्या केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत सर्व गोष्टींची निगा राखण्यास मदत करण्यासाठी विविध तऱ्हेची सौंदर्यप्रसाधने बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण या सर्व प्रसाधानांमध्ये अगदी कमी प्रमाणात का होईना, पण रसायने असतातच. त्यामुळे क्वचित प्रसंगी या सौंदर्यप्रसाधनांमुळे अॅलर्जीदेखील उद्भवू शकते. हा धोका टाळायचा असेल, तर घरी तयार केलेली, नैसर्गिक पदार्थ असलेली प्रसाधने वापरणे कधीपण अधिक सोयीस्कर आणि फायद्याचे असते. घरी प्रसाधने तयार करण्यासाठी थोडाफार वेळ खर्ची घालावा लागत असला, तरी त्यापासून आपल्या त्वचेला किंवा केसांना मिळणारे फायदे पहाता, घरी प्रसाधने तयार करण्यासाठी थोडा वेळ जरूर द्यावा.

नैसर्गिक मेकअप रिमूव्हर म्हणून ऑलिव्ह ऑईलचा वापर करावा. मेकअपसाठी वापरण्यात येणाऱ्या सौंदर्य प्रसाधानांमध्ये थोड्या प्रमाणात अॅस्ट्रिंजंट असते, ज्यामुळे आपली त्वचा कोरडी पडू लागते. मेकअप उतरविण्याकरिता ऑलिव्ह ऑईल वापरल्याने मेकअप संपूर्णपणे साफ होतोच, पण त्याशिवाय त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन, त्वचेला आर्द्रता मिळते.

थंडीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये ओठ कोरडे पडून खरखरीत होतात. याचा उपाय आपल्या स्वयंपाकघरामध्ये अगदी सहज उपलब्ध आहे, तो म्हणजे साखर. साखरेमुळे त्वचेवरील मृत पेशी हटविल्या जाऊन, त्वचेमध्ये कोलाजेनचे प्रमाण वाढते. या करिता एक टीस्पून खोबरेल तेलामध्ये एक लहान चमचा मध मिसळावा. या मिश्रणात दोन मोठे चमचे साखर घालून, मग थोडासा लिंबाचा रस घालावा आणि हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करावे. ही तयार झालेली पेस्ट ओठांवर हळुवार गोलाकार चोळावी. दहा मिनिटे ही पेस्ट ओठांवर राहू देऊन, त्यानंतर पाण्याने धुवून टाकावी. ओठ टॉवेलने हळुवार कोरडे करून व्हॅसलिन लावावे. या उपायाने ओठ नेहमी मृदू राहतील.

नारळाच्या दुधामध्ये ई जीवनसत्व व केसांना पोषक नैसर्गिक तेले मुबलक मात्रेमध्ये असतात. अॅवोकाडोमध्ये केसांच्या पोषणासाठी आवश्यक प्रथिने व केसाच्या मुळांना पोषक तत्वे असतात. नारळाचे दुध व अॅवोकाडो वापरून तयार केलेला मास्क केसांसाठी वापरला असता, केस चमकदार आणि मुलायम बनतात. हा मास्क तयार करण्यासाठी अॅवोकाडो आणि नारळाचे दुध एकत्र करून त्यांची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत व्यवस्थित लावून घ्यावी. अर्धा तास ही पेस्ट केसांवर राहू देऊन त्यानंतर केस धुवावेत. या हेअर मास्कमुळे केसांच्या मुळांना ताकद मिळून, केसांची वाढ चांगली होते.

त्वचेची निगा राखण्याकरिता प्रत्येक वेळी ब्युटी पार्लरकडे धाव न घेता, घरच्याघरीच उत्तम फेस मास्क तयार करावा. नितळ, सुंदर त्वचेकरिता टोमॅटो अतिशय चांगला पर्याय आहे. टोमॅटोमधील अ जीवनसत्व त्वचेवरील डाग हलके करण्यास सहायक आहे. तसेच यामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेचा पोत सुधारून, त्वचा चमकदार बनते. हा मास्क बनविण्याकरिता एका टोमॅटोची पेस्ट चेहऱ्यावर लावून वीस मिनिटे राहू द्यावी. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. या उपायाने त्वचा त्वरित उजळते.

हात कोरडे पडून रखरखीत होत असल्यास त्यासाठी मास्क घरच्याघरी तयार करता येतो. एक लहान चमचा मधात थोडा लिंबाचा रस घालावा. त्या मिश्रणामध्ये एक मोठा चमचा बदामाची पूड व एक लहान चमचा अक्रोडाची पूड घालावी. अक्रोडाची पूड नसल्यास एक चमचा सूर्यफुलाचे तेल घालावे व हे मिश्रण हातांना चोळावे. पाच मिनिटांनी हात गार पाण्याने स्वच्छ धुवून टाकावेत. या उपायाने हात मुलायम राहतील.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

तांबोळा

*🥙🥙.. तांबोळा  ..🥙🥙*


 भारतात प्राचीन काळापासून चालत असलेली तांबूल संस्कृती आणि नंतरच्या मुगल राजवटीतील पान –हुक्का पद्धतीमुळे या दोहोंच्या संयोगाने समाजात त्यावेळी एक वेगळाच सार्वजनिक शिष्टाचार रुजला. छोट्याछोट्या बैठकीत पानविडा बनविण्याच्या सर्व पदार्थांनी सज्ज असे तबक फिरविले जाई. प्रत्येकजण आपला विडा आपल्या आवडीप्रमाणे बनवून घेई. बैठकीला जास्त मंडळी असतील तर तबक सहजपणे फिरविणे अडचणीचे होई. त्यामुळे विमान, मोटारी, गाडीचे इंजिन अशा आकारांचे आणि चाके असलेले पानाचे नाविन्यपूर्ण डबे अस्तित्वात आले. त्याला असलेल्या चाकांमुळे असे डबे एकमेकांकडे सरकविणे सोपे होई . काही पानडब्यांना तर सिगारेट व काड्यापेटी ठेवण्याची सोय असे व ash trey बसविलेला असे. अशा नाविन्यामुळे यजमानांची शान वाढत असे. याच कारणांमुळे अडकित्ते, चुनाळी, चुनपट्ट्या, कातगोळ्यांच्या डब्या, तयार विड्यांसाठी छोट्या डब्या.तस्त ( थुंकदाणी ), यांचे असंख्य कलात्मक प्रकार अस्तित्वात आले. त्यापैकी एक अत्यंत दुर्मिळ असा प्रकार म्हणजे *” तांबोळा ” !*

एका कडीत अडकविलेल्या नारळासारख्या निमुळत्या कलशाला सर्व बाजूंनी साखळ्या सोडलेल्या असत. या प्रत्येक साखळीच्या टोकाला एकेक काटा आणि त्या प्रत्येक काट्यात ३ / ४ विडे अडकविलेले असत. आणखी काही तयार विडे वरच्या कलशात सज्ज ठेवले जात असत. एका वेळी पूर्ण तांबोळ्यात ६० / ७० विडे ठेवण्याची सोय असे. नृत्य किंवा गाण्याच्या मैफिलीत गाद्यागिरद्यांवर बसलेल्या शौकिनांना तबकाऐवजी तयार विडे अत्यंत रसिकतेने घेता येतील अशी सोय असलेला हा तांबोळा.! .. *तांबूल धारण करणारा म्हणून “तांबोळा “..* बसलेल्या शौकिनांसमोरून हा तांबोळा फिरविला जाई आणि ते त्यातून सहजपणे विडा काढून घेत असत. साखळीच्या टोकाला बसविलेल्या घुंगुरांमुळे विडा काढून घेऊन साखळी सोडून दिल्यावर एक नाजूकसा आवाज येत असे.वरच्या कलशावर आणि त्याच्या झाकणावर सुंदर नक्षी पाहायला मिळते. तांबूल संस्कृतीतील हे एक अत्यंत वेगळं लेणं म्हणायला हवे.
〰〰〰〰〰〰〰📕
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...