Friday, 28 September 2018

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
---------------------------------
    श्राध्दमाहात्म्य :-६..

        *ब्रह्मदत्ताचा वृतांत*

मार्कंडेय सांगतात - मागें वैभ्राज राजा त्या सात हंसांपैकीं एकाचे उदरी यावें म्हणजे आपणास अनायांसे योगसिद्धि होईल, अशा संकल्पानें तप करून देह ठेविता झाला म्हणून सांगितलें. त्या संकल्पानुरूप तो तपस्वी व योगनिष्ठ वैभ्राज विष्वक्सेन या नांवानें जन्मास आला. पुढें एके दिवशीं ब्रह्मदत्त हा आपली भार्या सन्नति हिला बरोबर घेऊन मोठया आनंदाने इंद्राणीसहित रमणार्‍या इंद्राप्रमाणें वनांत विहार करीत होता, आणि विहार करीत असतां एक मुंगळा कामवश होऊन आपल्या प्रियेची कामदानाविषयीं काकुळती येऊन याचना करीत होता, तें त्यांने ऐकिलें, व तो मुंगळा प्रार्थना करीत असतां ती इवलिशी मुंगी त्याच्या चारगटपणानें त्याचेवर संतापली आहे, असें त्यानें पाहिले. त्याला त्यांची भाषा समजत होतीच; त्यामुळें तो प्रकार ध्यानी येतांच ब्रह्मदत्त एकाएकीं खदखदा हसला. जवळ त्यांची स्त्री सन्नति होती, तिला पति कां हसला, याचे कारण बरोबर न कळल्यामुळे हा आपणासच हसला असा संशय येऊन ती लाजल्यासारखी झाली व तिचा नूर अगदीं उतरून गेला. त्या सुंदरीच्या हृदयाला ती गोष्ट इतकी लागली कीं, तिने बहुत दिवस अन्नपाणी सोडले. नवरा जेव्हा तिची विनवणी करून, "प्रसन्न हो, रुसलीस कां ?" म्हणून म्हणूं लागला, तेव्हां ती मनोहर हास्य करून म्हणाली, "तुम्हीच माझा उपहास करून मला कारण विचारितां ? मला मुळींच आतां अशा जगण्याचा कंटाळा आला आहे." तें ऐकून त्यानें हसण्याचे खरें कारण काय होतें तें तिला सांगितलें, पण तिचा विश्वास बसेना. ती घुश्श्यांतच त्याला म्हणाली कीं, तुम्ही म्हणतां पण ही गोष्ट माणसांचे अंगीं वसत नाहीं. हे राजा, एक तर देवाची कृपा किंवा पूर्वजन्मींचे तपोबल, किंवा योगबल यांच्या साहाय्याशिवाय मुंग्यांची भाषा समजेल असा कोण मनुष्य आहे बरें ? तें कशाला, आपणच सर्व प्राण्यांची भाषा जाणता ना ? तर जेणेकरून ही गोष्ट माझे समजुतीत येईल त्या प्रकारे माझी समजूत करा, नाही तर मी प्राणत्याग करीन. हें माझें बोलणे थट्टेचे नव्हे; खरेखुरे आहे. 

राणीच हे कठोर भाषण ऐकून राजा मोठया विचारांत पडला, व संकटनिवारणार्थ आहार वर्ज करून सर्व भूतपति व शरणागतांचा पालक जो परमात्मा नारायण त्याला अनन्यभावानें व एकाग्रचित्ताने शरण गेला. त्यावेळीं सहाव्या रात्रीं भूतमात्राविषयी दयार्द्र असणारा भगवान् नारायण प्रभु त्याला प्रत्यक्ष दर्शन देऊन म्हणाला, "उदईक तूं सुखी होशील" असें म्हणून देव तेथेंच दिसेनासा झाला. 

इकडे मागें त्या चार ब्राह्मणांचा जो दरिद्री पिता सांगितला तो आपल्या मुलांपासून ते श्लोक शिकून घेऊन आपण कृतकृत्य झालों असें मानूं लागला. तथापि, त्याला ते श्लोक मंत्र्यांसह राजाला गाठून त्याचे कानी घालण्याला अवसर सापडेना, म्हणून तो विवंचनेत होता. इतक्यांत राजा ब्रह्मदत्तच नारायणाचा वर प्राप्त झाल्यामुळें हर्षित होऊन सरोवरांत स्नान करून मोठया आनंदाने आपल्या कांचनमय रथांत बसून नगराकडे चालला. त्या वेळीं त्याचा स्नेही द्विजश्रेष्ठ कण्डरीक यानें रथाच्या पागा धरिल्या होत्या; व दुसरा स्नेही पांचाल हा चवरी व व्यजन ढाळीत होता. आपले श्लोक कानी घालण्याला हीच संधी योग्य आहे असें मनांत आणून त्या ब्राह्मणानें तो राजा व त्याचे ते दोघे सचिव यांचे कानी ते दोन्ही श्लोक घातले. ते श्लोक असे - 

*"सप्तव्याधादशार्णेषु मृगाः कालिंजरे गिरौ ॥ *
*चक्रवाका शरद्वीपे हंसा: सरसि मानसे ॥ १ ॥ *
*तेभिजाता कुरुक्षेत्रे ब्राह्मणा: वेदपारगाः ॥ *
*प्रस्थिता दीर्घमध्वानं यूयं किमवसीदथ ॥ २ ॥" *

याचा अर्थ दशार्ण देशांत सातजण व्याध होते. पुढें कालिंजर गिरीवर ते मृग झाले. नंतर शरद्वीपांत चक्रवाक झाले व मानससरोवरांत हंस झाले. अखेरीस त्यांपैकी आम्हीं चौघे कुरुक्षेत्रांत वेदपारंगत असे ब्राह्मण होऊन मोक्षमार्गाला गेलों आणि मग तुम्हींच तेवढे कां फसून पडलां ? 
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२३

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
--------------------------------
   श्राध्दमाहात्म्य :-५..

             *हंसवर्णन*

हे राजा, पूर्वजन्मीचा जो पांचिक तो या सातव्या जन्मीही पांचवाच होता. सहावा जो खसृम तो कण्डरीक झाला, व सातवा तो ब्रह्मदत्त झाला, हें मागें सांगितलेंच आहे. उरले जे चार पक्षी तेही कांपिल्य नगरींतच एका वेदवेत्त्या दरिद्री ब्राह्मणाचे पोटीं येऊन सख्खे भाऊ झाले. त्याची नांवे - धृतिमान, सुमना, विद्वान् व सत्यदर्शी अशीं होतीं. हे चौघेही वेदाध्ययनांत मोठे निपुण असून त्यांचें मुक्तिमार्गाकडे सदैव लक्ष असे. कारण, पूर्व संस्कारामुळें त्यांचे ठिकाणी तसलेंच ज्ञान उत्पन्न झालें होतें; यामुळें ते याही जन्मीं सदैव योगनिरत राहून आपण आतां सिद्ध झालों असें त्यांना वाटताच ते हा लोक सोडून जाण्याच्या खटपटीस लागले. जातांना आम्ही येतो म्हणून त्यांनीं आपल्या बापाचा निरोप विचारिला. तेव्हां तो म्हणाला कीं, बाबांनो, तुम्ही पुत्रांनी अशा स्थितींत मला सोडून जाणें हा निव्वळ अधर्म आहे. कारण, माझ्या पोटीं जन्मून माझें दरिद्र तुम्हीं विच्छिन्न केलें नाहीं, किंवा संतति करून वंशवृद्धि केली नाही. माझे पश्चात राहून माझें गयावर्जनादि करणें हें तर लांबच राहिलें, पण, माझी या वृद्ध वयांत सेवाचाकरीही केली नाहीं असें असून मला तुम्ही सोडून चालला, हें तुम्हांला शोभत नाहीं. 

हें बापाचे भाषण श्रवण करून ते सर्व ब्राह्मण बापाला म्हणाले कीं, तुम्हाला आत्मोद्धारार्थ संततीची गरज नाहीं. आम्ही ब्रह्मवेत्ते असल्यामुळें तुमचा उद्धार झालेलाच आहे; आतां प्रश्न उरला उपजीविकेचा. त्याची तोड तुम्हाला सांगतो. आपला ब्रह्मदत्त राजा हा मोठा पुण्यवान आहे, तो आपल्या मंत्र्यांसह बसला असेल अशी वेळ साधून त्याकडे जा आणि "सप्तव्याधा" हे श्लोक त्याचे पुढें म्हणा. या श्लोकांत फार गूढार्थ आहे, तो जाणून ब्रह्मदत्त तुम्हावर प्रसन्न होईल व तुम्हाला गांवशीव इनाम देईल, वाटतील तसले भोग्य पदार्थ देईल, फार काय तुमची जी इच्छा असेल ती तृप्त करील. करितां तुम्ही निश्चिंत असा. 

याप्रमाणे पित्याला सांगून व त्याची पूजा करून, ते पुन्हा योगधारणा धरून परम शांतीला पोंचले.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२२

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
------------------------------
   *श्राध्दमाहात्म्य:- ४..*

             *हंसवर्णन*:-१

मार्कंडेय सांगतातः - ते मानससरोवराचे तीरी विहार करणारे पद्मगर्भ, अरविंदाक्ष, क्षीरगर्भ, सुलोचन, उरुबिंदू, सुबिंदु व हेमगर्भ, अशीं नांवे असलेले सातही हंस, जल आणि वायु भक्षण करून योगाभ्यासानें आपलें शरीर शुष्क करीत होते. राजा बिभ्राज याची स्थिति थेट उलट होती. तो शरीराने गलेलठठ असून कामुक होता, व आपल्या स्त्रिया व भोगांगना बरोबर घेऊन इंद्र जसा नंदनवनांत शिरतो, त्याप्रमाणें मानससरोवरावरील वनांत शिरला, व तेथें हे पक्षी योगाभ्यास करण्यांत गुंतले आहेत असें त्यानें पाहिले. हे पक्षी होऊन जर योगाभ्यास करितात, तर मी मनुष्य होऊन विषयासक्त राहाणे हे मोठेंच लज्जाकर आहे, असे वाटून हीच गोष्ट मनांत घोळीत घोळीत तो आपल्या नगरास परत फिरला. त्याला अणुह नांवाचा एक धार्मिक पुत्र होता. याला अणुह नांव पडण्याचे कारण अणु म्हणजे अत्यंत सूक्ष्म असेही धर्माचार साधण्याविषयीं तो परम तत्पर असे, हें होय. याला जी स्त्री मिळाली होती तीही मोठी योगनिष्ठ, सद्‍गुणी, सत्यशील व सर्वथा पूज्यलक्षणांनीं युक्त अशी होती. ही स्त्री म्हणजे शुक्राचार्यांची कन्या जी कृत्वी ती. हे भीष्मा, ही कृत्वी म्हणजे बर्हिषद पितरांची कन्या जी पीवरी म्हणून पूर्वी सनत्कुमारांनी जी मला सांगितली होतो तीच; व त्या वेळीही ही मोठी सत्यपरायण, अजितेंद्रियांना अगम्य व स्वतः योगनिष्ठ असून योगनिष्ठाचीच माता व योगनिष्ठाचीच पत्नी होईल म्हणून मी सनत्कुमारांच्या तोंडची पितृकल्पाची हकीकत सांगत असतां बोललोच आहें; व त्याप्रमाणेंच ती झाली. असो; बिभ्राज राजा घरीं येतांच त्यानें आपले प्रजाजन व ब्राह्मण यांस बोलावून स्वस्तिवाचन वगैरे करवून मोठ्या आनंदाने आपला पुत्र अणुह यांस राज्यावर बसविले; व स्वतः ते सहचारी हंसपक्षी मानससरोवराचे कांठीं जेथे आढळले होते तेथेंच तपश्चर्येसाठी गमन केलें. तेथे गेल्यावर त्या सरोवराचे शेजारीच मोठी तीव्र तपश्चर्या आरंभिली. त्यानें सर्व विषयवासना सोडून दिल्या, व अन्नपाणीही सोडून केवळ वायुभक्षण चालू ठेविले. ही तीव्र तपश्चर्या करण्यांत त्याचा गूढ हेतु असा होता कीं, आपण या जन्मी दृढ संकल्प करून त्याचे बळावर पुढील जन्मी हे जे योगनिष्णात हंसबंधु आहेत यांपैकी एकाच्या उदरी येऊ. म्हणजे आपणांस अनायासेंच योगप्राप्ति होईल. ही गोष्ट मनांत घेऊन त्यानें मोठया नेटाने तपश्चर्या आरंभिली, व आपलें तपस्तेज इतकें वाढविले कीं, पाहाणाराला तो सूर्यासारखा दैदीप्यमान दिसूं लागला; व त्यानें प्रकाशित केल्यामुळें त्या वनाला व त्या सरोवरालाही तेव्हांपासून बैभ्राज असेंच नांव पडलें. इकडे त्या सात पक्ष्यांपैकी जे अखंड योगनिष्ठ होते ते चार, व जे पूर्वी सांगितल्याप्रमाणें योगभ्रष्ट होते ते तीन हे सर्वही तपानें निष्पाप होऊन कांपिल्यनगरीत जन्मांस आले. 

यांपैकी ब्रह्मदत्त हा धुरीण होता. यांपैकी जे चौघे पूर्वजन्मी अखंड योगनिष्ठ होते ते या जन्मी ज्ञान, ध्यान, तप, पूजा, वेद, वेदांग, यांत निष्णात असून पूर्वजन्मींचे त्यांना स्मरण होतेंच; आणि बाकीचे जे तीन त्यांना मात्र भूल पडली. यांपैकीं पूर्वींचा जो स्वतंत्र तो ब्रह्मदत्त नांवानें अणुहाचे पोटीं उत्पन्न झाला. कारण, पूर्वी पक्षियोनीत असतां असाच जन्म आपणांस व्हावा असा त्याचा संकल्पच होता. हा ब्रह्मदत्तही या जन्मीं ज्ञान, ध्यान, तप, इत्यादिकांनीं पवित्र असून मोठा यशस्वी व वेदवेदांगनिपुण होता. छिद्रदर्शी व सुनेत्र हे जे उरलेले दोघे बंधु ते या जन्मी वत्स व बाभ्रव्य वंशांत उत्पन्न झाले. हेही मोठे कर्मनिष्ठ व वेदवेदांगप्रवीण होते; व पूर्वजन्मापासून एकत्र राहिले असल्यामुळें या जन्मी ब्रह्मदत्ताचे सोबती झाले. या जन्मी त्यांना पांचाल व कण्डरीक अशीं नावे होतीं. पैकी पांचाल हा ऋग्वेदामध्ये प्रवीण होता, व यामुळे त्यानें आचार्यत्व स्वीकारले. कण्डरीक हा सामवेद व यजुर्वेद यांत निष्णात असल्यानें त्यानें छंदोगत्व व अध्वर्युत्व पत्करिलें. राजा ब्रह्मदत्त हा सर्व प्राण्यांचे शब्द समजण्यांत निपुण होता. 

त्याची ह्या पांचालकण्डरीकांशीं मोठी गट्टी जमली. हे तिघेही पूर्वजन्मींच्या वासनेप्रमाणे कामलोलुप होऊन मैथुनादि कर्मात जरी आसक्त होते तरी पूर्वसंस्कारामुळें त्यांना धर्म, अर्थ, काम या तिन्ही शास्त्रांची माहिती पुरापूर होती. असो; निर्मळ ब्रह्मदत्ताला राज्यावर बसवून अणुह जो तपश्चर्येला गेला तो पूर्ण योगनिष्ठ होऊन परमगतीला पोचला. ब्रह्मदत्ताला जी बायको मिळाली ती असितकुलोत्पन्न जो देवलऋषि त्याची मुलगी होती. हिचे नांव सन्नति असें होतें. हिच्या नांवाप्रमाणेच ही सन्नतिमान म्हणजे सज्जनांशी नम्रपणे वागणारी किंवा सत् म्हणजे जें ब्रह्म त्याचे ठिकाणी जिची मति लीन आहे अशी होती. सौंदर्यानेंही फार उत्तमच होती. हिचे तेज मोठे उग्र असे व हिला योगाचा नाद असल्यामुळें ब्रह्मदत्ताच्या व हिच्या समजुतीचा एकमेळ होता; व हें पाहूनच ब्रह्मदत्तानें तिला देवलापासून भार्यात्वासाठी मागून घेतली. 
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

Monday, 24 September 2018

कामक्रोध व अहंकार

*कामक्रोध व अहंकार*
-------------------------------

*काम एष क्रोध एष रजोगुण समुद्‌भवः । *
*महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥*
                 गीता ३-३७ 

'श्रीकृष्ण म्हणतात, हा काम हा क्रोध आहे, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा आधाशी व महापापी आहे, या लोकी हा आपला वैरी आहे असे जाण.' या श्लोकावरील श्री ज्ञानेश्वर महाराजांची विस्तृत टीका फार मननीय आहे, त्या ओव्याचा भावार्थ खाली देत आहो. 

"हे अर्जुना ! जीवाला पाप करावयास लावून दुःखात ढकलणारे हे कामक्रोध आहेत असे समज. याचेजवळ दयेचा साठा मुळीच नाही. हे प्रत्यक्ष यमधर्म (काळ) आहेत. हे ज्ञानरूपी ठेव्यावर असलेले भुजंग आहेत. हे विषयदरीतील व्याघ्र आहेत. हे भजनरूपी मार्गावर वाटमारेपणा करणारे आहेत. यांची मृत्यूच्या नगरात चांगली पत आहे, कारण हे जीविताचे शत्रू आहेत. याना भूक लागली असता खाण्यास हे जग एका घासासही पुरत नाही. सहज मुठीत धरण्यास जिला चौदा भुवनेही थोडी आहेत अशी भ्रांती ती याची नव्या नवसाची बहीण आहे, जी खेळत असता त्रैलोक्यरूप खाऊ सहज खाऊन टाकते, त्या भ्रांतीच्या दासीपणाचे जोरावर ही तृष्णा जगली आहे. या कामक्रोधाना मोहाचे घरी मान आहे. आपल्या कौशल्याने जो सर्व जगास नाचवितो तो अहंकार या कामक्रोधापाशी देवघेव करतो. ज्याने सत्याच्या पोटी असलेला मालमसाला काढून त्याऐवजी असत्याचा पेंढा भरला असा जो दंभ तो या कामक्रोधानी जगात प्रसिद्धीस आणला. यानी पतिव्रता शांती तिला वस्त्रहीन केले, मग त्या वस्त्रानी मायारूपी मांगीण सजविली अशा या सजविलेल्या मायेकडून साधूचे समुदाय या कामक्रोधानी भ्रष्ट करविले. यांनी विवेकाचा आधारच नष्ट केला. वैराग्याची तर कातडीच सोलून काढली व निग्रहाची जीवंतपणीच मान मुरगळून टाकली. या कामक्रोधानी संतोषरूप अरण्यच तोडून टाकले व धैर्यरूप किल्ले पाडले आणि आनंदरूपी रोपटे उपटून फेकून दिले. यानी बोधाची रोपेही उपटली, सुखाची तर भाषाही पुसून टाकली व हृदयात सर्वत्र त्रिविध तापाचे निखारे पसरले. हे पाण्यावाचून बुडविणारे, अग्निवाचून जाळणारे व न बोलता अकस्मात प्राणिमात्राना घेरणार आहेत. अर्जुना ! हे शस्त्राविना मारतात, दोरावाचून बांधतात आणि ज्ञान्याचाही प्रतिज्ञापूर्वक वध करतात. (ज्ञानेश्वरी अ. ३ ओवी २४० ते ५८ भावार्थ.) 

तसेच गीतेच्या सोळाव्या अध्यायाच्या शेवटी तर या कामक्रोधादिकाना नरकाचे द्वार म्हटले आहे. 
*त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः । *
*कामःक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत ॥* 
गीता १६-२१ 

'काम-क्रोध-लोभरूपी तीन प्रकारचे हे नरकाचे द्वार आहे व आत्म्याचा नाश करणारे आहे, म्हणून या तिघांचा त्याग करावा.' 
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

भक्तीत सिध्दता

*भक्तीत सिध्दता*
-------------------------

भक्ति सिद्ध होण्याकरिता आवश्यक असा विषयत्याग होण्याकरिता सत्संगतीच पाहिजे. विषयात दोषदर्शन, विषयाची अनित्यता, क्षयातिशयादि दोष युक्तता, त्यातील परिणाम, ताप, संस्कार, दुःख, गुणवृत्ती, विरोधादिदोष सत्संगतीनेच यथार्थ स्वरूपाने कळत असतात. श्री तुकाराम महाराज म्हणतात, *"बैसता संताचे संगती । कळो आले कमळापती । आपुली कोणीच नव्हती । निश्चय चित्त दृढ झाला ॥ १ ॥"* तसेच संगत्याग, संग म्हणजे आसक्ती. बाह्य विषयात दोषदर्शन होऊन कदाचित तात्कालिक त्याग झाला तरी अंतरातील विषयत्याग म्हणजे संग नष्ट होत नाही. ती आसक्ती नष्ट होण्याकरिताही सत्संगती उपयुक्त आहे. 

तिसरे अव्यावृत भजन - जे भजन भोगासाठी होते ते अव्यावृत म्हणजे अखंड कधी होत नाही. अव्यावृत भजनाकरिता संतकृपेचीच आवश्यकता आहे. ध्रुव, प्रल्हाद, वाल्मीकि याचे जे अखंड भजन होत होते श्री नारदाच्या कृपेमुळेच. तुकाराम महाराज म्हणतात, 
*'कृपा केली संतजनी । माझी अलंकारिली वाणी । प्रीत हे लाविली कीर्तनी । तुका चरणी लोळतसे ॥'* म्हणून जी साधने मागील सूत्रांतून सांगितली आहेत ती ती सर्व सत्संगतीने सिद्ध होतात. म्हणून ती सत्संगतीच साधण्याचा साधकाने प्रयत्न करावा. त्यायोगे वरील सर्व साधने व साध्य प्राप्तीही अनायासेच सिद्ध होईल. सूत्रात द्विरुक्तीने सांगितले आहे त्याचे कारण ' *भक्ती* ' हे येथे साध्य आहे व अन्य साधने आहेत, ते साध्य व ती साधने महत्संगानेच सिद्ध होतात हे सिद्ध करण्याकरिता द्विरुक्ती असावी असे वाटते.
=======================
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

अनंत व्रत

*अनंत व्रत*
----------------

भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणत असतात.या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. हे काम्य व्रत असून याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजाकरून हे व्रत पूर्ण करतात. मानवी देहात १४ प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोर्‍याला १४ गाठी असतात.
 प्रत्येक ग्रंथीची विशिष्ट देवता असते. या देवतांचे या गाठींवर आवाहन केले जाते.
 दोर्‍यांची गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसर्‍या ग्रंथीपर्यंत वहाणार्‍या क्रियाशक्तीरूपी चेतनेच्या प्रवाहाचे प्रतीक आहे.
१४ गाठींच्या दोर्‍याची मंत्रांच्या साहाय्याने प्रतीकात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्री विष्णुरूपी क्रियाशक्तीच्या तत्त्वाची दोर्‍यात स्थापना करून असा क्रियाशक्तीने भारित दोरा दंडात बांधल्याने देह पूर्णतः या शक्तीने प्रभारीत होतो.
 यामुळे चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास साहाय्य मिळते.
जिवाच्या भावाप्रमाणे हे कार्यबळ टिकण्याचा कालावधी अल्प-अधिक होतो. त्यानंतर परत पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभारीत नवीन दोरे बांधले जातात.

हे व्रत सार्वत्रिक नाही. कोणी उपदेशिल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास हे व्रत घेतात व मग ते कुळात चालू राहते.पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला अशी आख्यायिका आहे.

      *पूजेचे स्वरूप*

हे व्रत भाद्रपद शु. चतुर्दशी दिवशी करतात. यासाठी उदयव्यापिनी तिथी घेतात. पौर्णिमायुक्‍त असेल तर फल अधिक वाढते. कथेच्या अनुरोधाने जर मध्याह्नपर्यंत चतुर्दशी असेल तर उत्तम मानतात. व्रत करणार्‍याने त्या दिवशी प्रात:स्नान करून

*'ममाखिलपापक्षयपूर्वक शुभफलवृद्धये* *'श्रीमदनन्तप्रीतिकामनया अनंतव्रतमहं करिष्ये ।'*

असा संकल्प सोडून जागा सुशोभित करावी. चौरंगास कर्दळी लावून त्यावर साक्षात नाग अगर दर्भाचा बनवलेला सप्तफणांचा शेषस्वरूप अनंत याची प्रतिष्ठापना करावी.

*नमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर ।*
*नमस्ते सर्व नागेन्द्र नमस्ते पुरुषोत्तम ॥"*

असा श्‍लोक म्हणून नमस्कार करावा
 त्याच्यापुढे १४ गाठींचा रेशमाचा अनंतदोरक ठेवून आम्रपल्लवांसह पंचामृतादी धूप, दीप, गंध, फूल वगैरे षोडशोपचारांनी पूजा करून नैवेद्य अर्पण करावा.

चौरंगावर सर्वतोभद्र मंडल काढतात.त्यावर पूर्णपात्र ठेवून अष्टदल काढतात.त्यावर सात फणांचा दर्भाच्या अंकुराने युक्त शेष नाग ठेवून त्याच्यापुढे चौदा गाठींचा दोरा ठेवतात.कुंभाला वस्त्राचे वेष्टन करतात.कुंभातील जळाला   *यमुना* म्हणतात.शेष व यमुना यांची पूजा झाल्यावर विष्णूची सोळा उपचारांनी पूजा करतात.अंगपूजा, आवरणपूजा, नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजा यामध्ये असतात.पुष्पांजली झाल्यावर अर्घ्य देतात.नंतर दोरकाची प्रार्थना करून चौदा गाठींचा दोरा हातात किंवा गळ्यात बांधतात.जुन्या दो-राचे विसर्जन करतात.वडे आणि घारगे यांचे वाण देतात आणि व्रत देवतांचे विसर्जन करतात.
*न्यूनातिरिक्‍तानिपरिस्फुटानि यानीह कर्माणि मया कृतानि ॥*
*सर्वाणि चैतानि मम क्षमस्व प्रयाहि तुष्ट: पुनरानमनाय ॥'*

या मंत्राने विसर्जन करावे आणि
*दाता च विष्णुर्भगवाननन्त: प्रतिगृहीता च स एव विष्णु: ।*
*तस्मात्त्वया सर्वमिदं ततं च प्रसीद देवेश वरान् ददस्व ॥'*
या मंत्राने वाण द्यावे बिनमिठाचे पदार्थ खावेत. .

या व्रतात सर्पपूजेचे अवशेष दिसतात असे मानले जाते. प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात आल्यावर ही पूजा व्रतरूपात आली असावी असा संकेत मानला जातो.हरियाणात या दिवशी अनंताचे व्रत घेतात.पूजा करतात. हातात ' *अणत* ' बांधतात.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

मुमुक्षु म्हणजे काय?

*मुमुक्षु म्हणजे काय..?*
----------------------------------

*|| तस्मात्सैव ग्राह्या मुमुक्षुभिः ||*
                     नारदभक्तीसुत्रे

भक्ती स्वयंफलरूप आहे, म्हणून मुमुक्षुनेदेखील ' *सा एव'* म्हणजे तीच भक्तीच स्वीकारावी. आता मुमुक्षू कोणास म्हणावे याचा विचार करणे आवश्यक आहे. संसारात जे मानवदेहधारी जीव आहेत यांचे बद्ध, मुमुक्षू व मुक्त असे तीन प्रमुख भेद शास्त्रकारांनी कल्पिले आहेत. बद्धालाच विषयी असेही म्हणतात किंवा बद्धात पामर व विषयी असे दोन वर्ग मानले जातात. ऐहिक विषयभोगाचा धर्माधर्म, योग्य-अयोग्य न पाहता स्वैररूपाने अंगीकार करणारा रागद्वेषलोभादिकांनी युक्त अशा मनुष्यास पामर म्हटले जाते. ऐहिक भोगासक्त ते पामर व स्वर्गलोकातील म्हणजे पारत्रिक धर्म्य अशा पुण्यविशेषाने प्राप्त झालेल्या भोगात आसक्त पुरुषांना विषयी म्हटले आहे. पामर हा धर्माधर्म पाहत नाही, व विषयी धर्मानेच प्राप्त झालेल्या विषयाचे सेवन करीत असतो, त्यामुळे तोही बद्धच असतो. विषयासक्तीने रागद्वेषादिकांनी देहतादात्म्यानी, कर्म व कर्मफलासक्तीने व तन्मूलक अहंकार अज्ञानादि अनेक बंधनांनी तो बांधला गेलेला असतो, त्या बंधनातून सहजरीत्या तो बाहेर पडू शकत नाही. यालाच *संसारबंधन* म्हणतात. या बद्धासच शास्त्रीय भाषेत 'बुभुक्षू, भोगासक्त असेही म्हटले जाते. या बुभुक्षूत दोन प्रकार संभवतात. मुमुक्षूत्व योग्य व अयोग्य एखादा भोगासक्त असला तरी पूर्वसुकृताने सत्संगतीत केलेल्या सच्छास्त्र श्रवणाने या भोगातील दोष अनुभवास आल्यामुळे त्यातील असारता जर कळू लागली तर यातून सुटावे असे वाटू लागल्यास त्यास मुमुक्षुत्वयोग्य म्हणावे, व असा विचारही ज्याच्या मनात कधी येत नाही, कोणी योग्य मार्गदर्शन केले तरी अश्रद्धा, दुराग्रह, कुतर्क, विपर्ययादी दोषांनी सन्मार्गाकडे न प्रवृत्त होणार्‍यांना मुमुक्षुत्व अयोग्य म्हटले जाते. ज्याचे पूर्वसंस्कार चांगले आहेत असे सदबुद्धिवान जप ज्यांना इहपरभोगातील दोषाची पूर्ण कल्पना आली आहे, या देहात, संसारात राहणे म्हणजे एकप्रकारचे बंधन आहे, कारण मुक्तपणाने आनंदाचा भोग येथे नाही, अनेक बंधने अंतर्बाह्य रूपाने आपणांस पीडा देतात त्यामुळे जो दुःखी होतो व त्याचे परिमार्जन करण्याचा जो सतत प्रयत्न करतो त्यासच *मुमुक्षू* असे म्हटले जाते. 
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

पोळा

*🐂 पोळा 🐂🐂*
--------------------------------

पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पीकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.पोळ्यास ' *बैलपोळा* ' असे देखील म्हणतात.

श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आटोपलेली असते. या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे ' *पोळा* .' या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो. तुतारी (बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदी, ओढय़ात नेऊन धुण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खोंडाला (मान व शरीराचा जोड-खांदा) हळद व तुपाने (सध्या महागाईमुळे तेलाने) शेकले जाते. त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा श्रुंगार), गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी), पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य.

बैलाची निगा राखणार्‍या ' *बैलकरी* ' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात. या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस ' *झडत्या* ' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, ' *मानवाईक* ' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जाते व *पोळा* 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. बैल नेणार्‍यास ' *बोजारा* ' (पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे. 

पोळ्याचे महत्त्व शेतकरीवर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झूल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तर्‍हेने सजविण्यात येते.

शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा व रांगोळ्या काढून त्या पाहुण्यांची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजतगाजत जातात व त्याला ' *अतिथी देवो भव:* 'प्रमाणे घरी आणतात. घरातील सुहासिनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देतात. 

त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या दिवशी गावातील इतर घरातूनही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. शेतकर्‍याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते. महाराष्ट्रातील काही गावामध्ये या दिवशी बैलांच्या शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकर्‍याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकर्‍याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यानंतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. अशा पारंपरिक पद्धतीने मोठय़ा उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍याचा जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला जातो.

याच पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात. दिवसभर उपवास करून सायंकाळी स्नान करतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. घरातील मुलास अथवा मुलीस खीरपुरीचे जेवण देतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत ' *अतित कोण?'*  असा प्रश्न विचारतात. आपल्या मुलाचे नाव घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर देतात. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे यासाठी पिठोरी अमावस्येला फक्त स्त्रियाच हे व्रत मनोभावे करतात.
=======================
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२१

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
---------------------------------
   *श्राध्दमाहात्म्य :- ३..*

            *चक्रवाकवर्णन*

मार्कंडेय सांगतात - भीष्मा, एकानें आपली राजा होण्याची इच्छा प्रदर्शित करितांच त्याच्या जोडीनें फिरणारांपैकी दुसरे दोन म्हणाले कीं, फार ठीक आहे. तूं राजा होशील तर आम्ही तुझे हितचिंतक सचिव होऊं. त्यानें "बहुत बरे" असें म्हणून आपली वृत्ति योगपर केली, व तिघांनीही पुढील संकेताविषयीं परस्पर ठराव केले. तें पाहून शुचिवाक नांवाचा त्यांचा बंधु स्वतंत्राला म्हणाला, "तूं ज्याअर्थी योगाभ्यास सोडून विशेषतः कामवासनेनें प्रेरित होऊन राजा होण्याची इच्छा करितोस, त्या अर्थीं मी काय बोलतो तें ऐकून घे. तुझ्या इच्छेप्रमाणें तूं कांपिल्य नगरीचा खुशाल राजा हो आणि होशीलही, यांत संशय नाहीं. आणि हे दोघे तुझे बंधु तुझे सचिव होतीलच. पण ज्या अर्थी तुम्ही राज्यलोभानें योगाचरणांत व्यभिचार केलात त्या अर्थी तुम्हां तिघांना आमचा शाप आहे व तुमच्याशीं आम्हीं भाषण करणें सोडून दिलें आहे." 

भावांनी याप्रमाणे शाप देतांच ते तिघेही तत्काल योगभ्रष्ट होऊन गडबडून गेले; व पुन्हा आपल्या भावांची विनवणी करून त्यांनीं त्यांचा प्रसाद संपादन केला. तेव्हां त्या चौघांचेही संमतीने सुमना नांवाचा बंधु त्यांना प्रसादयुक्त वचन बोलला की, आमचा शाप निरवधि नाहीं, तो लवकरच संपेल, हा विश्वास ठेवा. या जन्मांतून दूर झालां म्हणजे तुम्हांला पुन्हा मनुष्यजन्म प्राप्त होऊन योगाभ्यासाकडे तुमचें लक्ष लागेल. पैकीं या स्वतंत्राला प्राणीमात्राच्या भाषेचें ज्ञान होईल. आपण सर्वजण त्याचे फार आभारी आहो. कारण, याच्या कृतीमुळेच आपण पितरांच्या उद्देशानें प्रथम गाईचा वध करून मग तिचा स्वीकार केला. या कृतीनें आपले पितर तृप्त होऊन त्यांच्या प्रसादाने आपणाला योगाच्या साधनानें प्राप्त होणारें ज्ञान मिळाले. यासाठीं तुम्हां सर्वांचा शाप कांहीं काळानें पुरा होईल; व "सप्तव्याधा इत्यादि" जन्मांतरचे वृत्तांताचा ज्यांत उल्लेख आहे असलीं वाक्यें तुमच्या कानीं पडून तुम्हांस पूर्ववत योगसिद्धि प्राप्त होईल."
======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२०

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
-------------------------------
   *श्राध्दमाहात्म्य :- २*

पुढील जन्मी ते रम्य कालंजर पर्वतावर मृगयोनीत उत्पन्न झाले. मृगयोनींत उत्पन्न होण्याचें कारण ते व्याधयोनींत असतांना श्वापदांच्या अंतःकरणांत भय उत्पन्न करणारे कर्म करीत असल्यानें जेथे चित्तांत सदा धसधस राहील असला हळू वृत्तीचा जन्म त्यांस प्राप्त झाला. परंतु, त्यांनीं पितृपूजनादि शुभकर्में केली असल्यामुळें याही जन्मीं त्यांना पूर्वजन्माचे स्मरण होतें. या जन्मी त्या मृगांची नांवे - उन्मुख, नित्यवित्रस्तु, स्तब्धकर्ण, विलोचन, पण्डित, घस्मर व नादी, अशीं होतीं. ते जरी पशूच्या जन्मास आले होते, तथापि आपण पूर्वी कोण होतो व या नीच योनीला कां आलों, ही गोष्ट सतत त्यांच्या डोळ्यांसमोर असल्यानें ते या जन्मांत क्षमाशील, निर्वैर व निस्त्रीक होते. त्या सर्वांची राहाणी एक तर्‍हेचीच होती. ते कधीं गैरकर्म करीत नसत व केवळ योग्यांप्रमाणें अंतर्निष्ठ राहून वनांत विहार करीत. ते फक्त पोटाला अल्पसें भक्ष्य देत व पाणी मुळीच पीत नसत. या प्रकारची त्यांनीं कडक तपश्चर्या चालविली. या स्थितींत असतांना त्यांची जी पावले भुईवर उमटली, तीं, हे राजा, कालंजर गिरीवर अद्यापि तशीच्या तशींच दृष्टीस पडतात. 

याप्रमाणे शुभ कर्म करीत असल्यामुळें व अशुभ कर्माचा सर्वथा त्याग केल्यानें त्यांना अधिक शुभ योनीची योग्यता प्राप्त झाली व पुढील जन्मीं ते शरद्वीप नामक शुभ देशांत सातहीजण जलांत राहाणारे चक्रवाक पक्षी झाले. चक्रवाक पक्षाची कामित्वाविषयीं मोठी ख्याति आहे. तो आपल्या मादीला सोडून क्षणभरही राहाण्याची वेळ आल्यास व्याकूळ होतो. पण हे बंधु अशा योनींत येऊनही त्यांनीं मैथुनाचा मार्ग मुळीच न पत्करिता केवळ ब्रह्मचर्यच पत्करले. ते एखाद्या ऋषीप्रमाणें आपला वेळ मननांत घालवीत. या पक्षियोनींत त्यांची नावे - निस्पृह, निर्मम, क्षांत, निर्द्वंद्व, निष्परिग्रह, निर्वृत्ति व निभृत, अशीं होतीं. ते सर्वही पक्षी मोठे शुभलक्षणी व धर्माने चालणारे होते. शेवटीं त्यांनीं आहार वर्ज करून तपाचरणाने नदीकांठीं प्राण सोडले. 

पुढील योनींत ते सातहीजण मानससरोवरात फिरणारे असे हंस झाले. ते सर्वही एकाच जोडप्यांपासून झाले. त्या सर्वांनाही पूर्वस्मरण होतेंच. येथेही ते मोठे धर्मनिष्ठ व ब्रह्मचारीच होते. पूर्वी ब्राह्मणजन्मांत आपल्या प्रत्यक्ष गुरूला त्यांनीं ठकविलें असल्यामुळें त्या दोषानें ते अनेक जन्मांच्या गिर्कींत सापडून नीच योनींत उत्पन्न झाले. तसेंच त्यांनीं आपल्या पोटासाठी तर खरीच, तथापि, पितृश्राद्धाचें नांव करून हिंसा केली होती, एवढयाने त्यांना पूर्वजन्मींचे ज्ञान राहिलें व जन्मही तिर्यग्योनींतच पण एकाहून एक अधिक उंची अशा योनीत आले. या हंसयोनीत त्यांची नांवे - सुमना, शुचिवाक, शुद्ध, पंचम, छिद्रदर्शन, सुनेत्र व स्वतंत्र. 

यांपैकीं पांचवा म्हणजे प्रथम जन्मीं जो कवि नामक होता, तो सातव्या जन्मांत पांचिक ही संज्ञा पावला; सहावा जो खसृम तो कण्डरीक नांवानें प्रसिद्ध झाला; व सातवा ब्रह्मदत्त या नांवानें. त्यांनीं साती जन्मांत जें तपाचरण केलें, जो योगाभ्यास केला, त्यांना कल्याणकारक अशी जी पूर्वजन्मींची स्मृति होती व अगदीं पहिल्या जन्मीं गुरुगृही त्यांनीं जें वेदाध्ययन केलें होतें त्याचा संस्कार, या सर्व संस्कारांच्या प्रभावानें ते जरी संसारांत पडले होते तरी ते सर्वही पक्षी अंतरीं ब्रह्मवेत्ते असून ब्रह्मचर्यानेंच राहात व योगस्थ वृत्तीने वनांत विहार करीत. एकदा ते सर्वही हंस जुटीने एकत्र फिरत असतां पुरुकुलोत्पन्न नीपांचा राजा बिभ्राज हा तेथें आला. हा शरीरानें मोठा शोभायमान, पराक्रमी व श्रीमंत होता. तो आपल्या स्त्रियांस बरोबर घेऊन त्या वनांत शिरला. तो राजा असल्या थाटानें व वैभवानें आलेला पाहून त्या सातांपैकीं स्वतंत्र नांवाचा जो हंस होता, त्याला आपण या राजासारखें व्हावें, अशी इच्छा उत्पन्न झाली. तो म्हणाला, "मी आजपर्यंत उपास कर करून अगदीं थकलों व इतकी तपश्चर्या केली, पण कांहीं फळ मिळाले नाहीं. तर माझ्या पदरीं तपाच्या किंवा नियमांच्या योगानें साचलेले जर कांहीं पुण्य असेल तर त्याच्या बळानें मला या राजासारखी सुखस्थिति प्राप्त व्हावी, असें मी इच्छितो."
========================
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:-१९..

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
--------------------------------
     *श्राध्दमाहात्म्य*:-१

मार्कंडेय म्हणतात - "हे भीष्मा, श्राद्धाचे माहात्म्य तुला किती म्हणून सांगू ? अरे, इहलोकी विद्या, धन, कुल, सत्पुत्र, पशु, आदिकरून जी सुखस्थितीची साधने आहेत तीं तर श्राद्ध केल्याने प्राप्त होतातच. पण, त्याहूनही अधिक जो श्रेष्ठ जो मोक्ष किंवा ब्रह्मैक्य तेही या श्राद्धविधीने प्राप्त होतें असें या श्राद्धाचें अनुपम फल आहे व तें ब्रह्मदत्ताला सात जन्मांत मिळत गेलें. त्या योगानेच त्याची बुद्धि दुर्मार्गापासून हळूहळू आपोआप परावृत्त होऊन सन्मार्गाकडे लागली व इतरांचीही लागते. याकरितां मी तुला श्राद्धाचा विधि सर्व सांगतो. हे निष्पापा, पूर्वकाली कांहीं ब्राह्मणांनी इतर धर्मविधींना धाब्यावर बसवून गोहत्यादि करून केवळ श्राद्ध मात्र केलें होतें, पण तेवढयानेच त्यांना अत्युत्तम फळ प्राप्त झाले. ते कसें, तें सर्व तुला सांगतो ऐक." 

मागें भगवान् सनत्कुमार मला दिव्य दृष्टि देऊन अंतर्धान पावले, हें मीं सांगितलेंच आहे. ते गेल्यावर या दृष्टीच्या बलानें मीं सनत्कुमारांनी पूर्वी निर्दिष्ट केलेले सात ब्राह्मण कुरूक्षेत्रांत धर्मश्रद्धेनें पितृश्राद्ध करीत आहेत, असें प्रत्यक्ष पाहिले. या सातांची नांवे - वाग्दुष्ट, क्रोधन, हिंस्त्र, पिशुन, कवि, खसृम व पितृवर्ति, अशीं होतीं. व या नामांनुरूपच त्यांची कृति होती. हे सर्व कौशिक विश्‍वामित्राचे पुत्र होते, व गार्ग्यमुनीचे शिष्य होते. त्यांचा पिता विश्वामित्र त्यांना शाप देऊन वेगळा सरला, तेव्हां ते सातही बंधु गार्ग्याच्या घरीं जाऊन शिष्यवृत्ति पत्करून ब्रह्मचर्यव्रतानें राहिले. 

तेथें असतां त्यांच्या गुरूची न्यायाने संपादिलेली अशी एक सुंदर दुभती एकरंगी गाय होती; तिला गुरूच्या आज्ञेवरून एक दिवस ते वनांत घेऊन चालले होते. या गाईचे वांसरूंही तिचेसारखेच एकवर्णी होतें. या धेनुवत्सांना घेऊन जात असतां वाटेत त्यांना अतिशय भूक लागली व पोरवय आणि अज्ञान यांमुळें या गाईवरच आपली भूक भागवावी, अशी दुष्टबुद्धि त्यांचे मनांत उपजली. त्यावेळीं कवी व रवसृम या दोघांनी 'असें करूं नका' म्हणून आपल्या बंधूंशी याचना केली. परंतु, ते निवृत्त होतना. त्या वेळीं त्यांतील पितृवर्ति म्हणून जो भाऊ होता, तो नित्य श्राद्ध करणारा होता. तो धर्माचे ठिकाणी स्थिरबुद्धि असल्यानें रागाने आपल्या बंधूस म्हणाला, 'बाबांनो, या सुंदर गाईला अवश्य मारावयाचीच असें ठरत असेल तर त्यांत माझी एक गोष्ट तरी लक्षपूर्वक ऐका. ती ही कीं, गाय मारणेंच तर ती पितृश्राद्धार्थ म्हणून मारावी. असें केलें असतां या गाईचाही धर्मकार्यांत विनियोग होऊन तिला सद्‍गति मिळेल व आपणही पित्रार्चन केल्यानें अधर्म केल्यासारखे होणार नाहीं.' ही त्याची मसलत सर्वांना पटली. मग त्यांनी गाईचे प्रोक्षन (वध) करून व ती पितरांना अर्पण करून मग तिजवर यथास्थित ताव मारिला. नंतर, तळिराम गार करून गुरुगृही परतले व तिचें तें वांसरूं पुढें करून गुरूला म्हणाले, "गाय वाघाने खाल्ली; वांसरूं तेवढे राहिलें आहे, हे संभाळा." गुरु बिचारा निष्कपट होता. त्याला ती गोष्ट खरी वाटली व त्याने "बरें आहे," म्हणून तो वत्स आपले ताब्यांत घेतला. 

याप्रमाणें त्या सर्व ब्राह्मणांनीं आपल्या गुरूला खोटीच गोष्ट सांगून ठकविलें. पुढें ते सर्वहीजण आयुष्य संपतांच मेले. मेल्यानंतर पुढील जन्मी ते सातहीजण पूर्वजन्मींच्या क्रूर कर्मामुळे हिंस्त्र, आपल्या गुरूशीं नीचपणा केल्यामुळें उग्र व हिंसादिकर्मांत आनंद मानणारे असे होऊन पारध्याचे पोटीं जन्मास आले. ते मोठे बळकट व दिलदार होते. पूर्वजन्मीं त्यांनी पितरांचे धर्मबुद्धीनें अर्चन केलें व गोवधही पितरांचेच उद्देशानें केला होता. यामुळे त्यांस चालू जन्मांत पूर्वजन्मींची स्मृति राहिली होती. यामुळे ते जरी दशार्ण देशांत या जन्मीं व्याधासारख्या क्रूर कुलांत उत्पन्न झाले होते तरी ते मोठे धर्मनिपुण असून निर्लोभ व सत्यप्रिय होते. ज्या कुळांत आले तेथील कर्म ते करीत खरें, पण ते केवळ प्राणरक्षणापुरतेंच तेवढे केलें म्हणजे बाकीचा काल ते आत्मानुसंधानांत घालवीत असत. या जन्मीं त्यांची नांवे पुढीलप्रमाणे होतीं. ती - निर्वैर, निर्वृत्ति, शांत, निर्मन्यु, कृति, वैधस व मातृवर्ती. त्यांची कर्मे या संज्ञांनुरूपच होतीं, एकंदरींत ते व्याध होऊन परमधार्मिक होते. 

जातीचे हिंसाकर्म ते करीत खरें, पण बाकीचा वेळ आपल्या वृद्ध मातापितरांचे पूजनांत व संतोषांत घालवीत. पुढें त्याची मातापितरें यथाकाल मरण पावली, त्या वेळीं त्यांनी आपल्या हातांतली शिकारीची धनुष्यें टाकून देऊन वनांतच देहत्याग केला. 
=======================
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:-१८

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
--------------------------------
       भाग :- ६..

          *चटकोपाख्यान*

वैरी म्हटला म्हणजे तो, मनुष्य निद्रिस्त आहे हें पाहात नाहीं. तो निशेंत आहे किंवा गैरसावध आहे, हें पाहात नाहीं; आणि वाटेल त्या उपायांनी - विषप्रयोगानें म्हणा, आग घालून म्हणा, किंवा साधल्यास शस्त्रानें किंवा ठकबाजीनें - त्याचा घात करितो, व त्याची मुळी शिल्लक राहिल्यास अंकुरित होऊन पुन्हा आपणांस त्रास देईल, यास्तव त्याचा उच्छेद करतो, काहीही शिल्लक उरूं देत नाही. कारण, शत्रुशेष, ऋणशेष व अग्निशेष ही पुनरपि वाढतात. यास्तव शहाण्याने तीं शिल्लक ठेवूं नयेत, हा दाखला त्यांचे ध्यानांत असतो. लबाड शत्रु आपले बरोबर हंसतो, अघळपघळ बोलतो, एका बैठकीवर बसतो व एका ताटांत जेवतो देखील. पण हें सर्व करितांना त्याची पापबुद्धि कायम असते. एकदा शत्रुत्व उत्पन्न झालें म्हणजे मग तो शत्रु आपला शरीरसंबंधी असला तरीही त्यावर विसंबू नये. कारण, इंद्राने लढाईत प्रत्यक्ष आपला सासरा म्हणजे बायकोचा बाप जो पुलोमा त्याला ठार केलें. 

मनांत वैरभाव ठेवून जो मनुष्य वरवर गोड बोलतो त्याच्याजवळ जाणें म्हणजे हरिणानें फांसेपारध्याजवळ जाण्यापैकींच आहे. ज्याच्या मनांत आपल्याविषयीं काळें आलें असल्या बलाढय शत्रूच्या आश्रयाला कधीही राहू नये. कारण, नदीचा वेगवान ओघ कांठाच्या वृक्षाला ज्याप्रमाणें खणून काढितो, त्याप्रमाणें तो आपला नाश करितो. शत्रूपासून जरी आपण उदयांस आलों असलो तरी त्यावर भरंवसा ठेवूं नये. कारण, ज्याप्रमाणें एखादा किडा पंख फुटल्याच्या आनंदाने वर उडी मारावयास जातो, परंतु इतक्यांत पक्ष्यांची नजर त्याजवर जाऊन ते त्याला ठार मारतात, त्याप्रमाणें अवस्था होते. 

याप्रमाणे शुक्राचार्यांनी आपल्या नीतीत ही जी अनेक बोध-वाक्यें लिहिली आहेत, ती, हे भूपाला, ज्या सुज्ञ पुरुषाला आपण सुरक्षित नांदावे अशी इच्छा असेल त्यानें मनांत धरावी. मी तर तुझ्या साक्षात पुत्राचे डोळे फोडण्यासारखें अतिदारुण पाप केलें आहे, तेव्हां आतां तुझ्यावर विश्वास ठेवून तूं म्हणतोस तसें तुझ्या घरांत स्वस्थ राहाणे माझ्या हातून होणार नाहीं." असें म्हणून ती चिमणी आकाशांत उडून गेली. 

भीष्म म्हणतात - हे युधिष्ठिरा, राजा ब्रह्मदत्त व पूजनिया चिमणी यांचा घडलेला वृत्तांत मीं तुला सांगितला. आतां तुला श्राद्धाची माहिती पाहिजे आहे तर तिजसाठीं पूर्वी सनत्कुमारांनी मार्कंडेयाचे प्रश्नावरून त्याला एक जुनाट इतिहास सांगितला होता, तो मी तुला सांगतो. आपले हातून पुण्य घडावे व आपणांस श्राद्धाचे फल मिळावें, अशा उद्देशाने वागणारे योगनिष्ठ ब्रह्मचारी जे गालव, कंडरीक व ब्रह्मदत्त, या तिघांचे सातवे जन्मांत हा इतिहास घडलेला आहे. =======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन :-१७

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
--------------------------------
      *भाग :- ५..*

         *चटकोपाख्यान*

हे राजा, याप्रमाणें राजाशी बोलून ती चिमणी अतिशोकानें केवळ अविचारी बनली; व त्या तडाक्यांत तिने त्या अल्पवयी राजकुमाराचे डोळे आपल्या पायाच्या नख्यांनी ओरबाडिले. पुढें ते डोळे फुटले. याप्रमाणे राजपुत्राला आंधळा करून ही चिमणी आकाशांत उडून जाऊं लागली. इतक्यांत राजानें आपल्या पुत्राची झालेली स्थिति पाहून तिला म्हटलें कीं, "हे कल्याणि, माझ्या पुत्राचे तूं डोळे फोडलेस, फार चांगले केलेंस, आतां भिऊं नको. आतां तर तुझें दुःख दूर झाले ना ? मग आतां कां येथून जातेस ? जाऊं नको. तुझे मन शांत झालें; तर आतां परत फीर. आपली मैत्री पूर्वी होती तशीच चालूं दे, तिचा नाश होऊं देऊं नको; पूर्वी जशी होतीस तशीच सुखानें माझे घरांत रहा. चल परत फीर, आणि चैनींत अस. माझ्या पोराला तूं क्लेश दिलेस म्हणून माझा काही तुझ्यावर राग नाहीं. तूं माझी मैत्रीण आहेस. देव तुझे कल्याण करो. तूं माझ्या पोराचे डोळे फोडलेस खरे, पण त्यांत जें ओघाला आलें तेंच तूं केलेस; त्यांत तुझ्याकडे काय दोष ? 

पूजनीया म्हणाली - "हे राजसिंहा, तूं जरी किती शांतीच्या गोष्टी सांगितल्यास तरी आपलेवरून जग ओळखावे, अशी म्हण आहे, त्याप्रमाणे मला नुकताच पुत्रशोकाचा अनुभव आला आहे, त्यावरून तुझ्या प्रिय पुत्राच्या स्थितीबद्दल तुला किती दुःख होत असेल, याची कल्पना मला तूं न सांगतांही पुरापूर आहे. याकरितां तुझ्या पुत्राचे डोळे फोडण्यासारखें दुष्कृत्य करून पुन्हा मी तुझ्याच घरांत दृष्टीसमोर राहावें, ही गोष्ट मला संमत नाहीं, शिवाय मी जें म्हणतें या म्हणण्याला शुक्राचार्यांच्या नीतींतील वचनांचा आधार आहे. तीं वचने मी म्हणून दाखवितें तीं ऐक. ती अशीं - 

१. कुमित्र, कुदेश, कुराजा, कुमैत्री, कुपुत्र व कुभार्या यांस दुरूनच टाळावी. कारण, कुमित्राचे ठिकाणीं खरा स्नेह होत नाही; कुभार्येचे ठिकाणीं सुखभोग होत नाहीं; कुपुत्राचे हातून पिंड मिळत नाहीं; कुराजाच्या अमलांत सत्याला थारा नाहीसा होतो. जेथे खोटया माणसाशीं स्नेह आहे तेथें खर्‍या विश्वासाला आधार नसतो; कुदेशांत उपजीविकेची मारामार पडते; राजा दुष्ट असला म्हणजे प्रजेच्या जीवाला सदा धाकधूक असते; व पोटचा पोर व वाईट निघाला म्हणजे आई बापांना सर्व बाजूंनीच सुखाचा अभाव होतो. 

२. जो नीच मनुष्य आपल्यावर उपकार करणार्‍याही मनुष्यावर एखाद्या अनाथ दुबळ्याप्रमाणें भार टाकतो, त्याचा लौकरच नाश होतो. 

३. ज्याचा आपल्या ठिकाणी विश्वास नाहीं त्यावर मुळीच विश्वास ठेवू नये; व ज्याचा विश्‍वास आहे अशांवर तरी फाजील विश्वास टाकूं नये. कारण, प्रसंगवशात विश्वासू माणसालाच दगा करण्याची बुद्धि झाली तर तो आपणांस मुळापाळांसकट उखडून काढील. 

४. जो मूर्ख मनुष्य राजाचे सेवक किंवा ज्याचे बीजाविषयीं घोंटाळा आहे, असल्या जातीवर विश्वास ठेवून वागतो त्याचा जीव धोक्यांत आहे, असें समजावे. 

५. मी राजाचे मर्जीतला आहें, मला कसलें भय आहे, असें कोणीही मानू नये. कारण राजेसाहेबांची मर्जी खप्पा होऊन मनुष्य मुंगळ्यासारखा केव्हां चिरडला जाईल याचा कांहीं विश्वास नसतो. 

६. शहाण्या मनुष्याची गोष्ट अशी आहे कीं, ज्याप्रमाणें एखादी कोमल अल्पवल्ली एखाद्या महावृक्षाच्या कवेंत राहूनच त्याला पाडिते, त्याप्रमाणें तो वरून नरमपणा दाखवून व अंग चोरून वागूनच शत्रूला पालथा पाडतो. 

७. ज्याप्रमाणें मुंग्यांचे वारूळ प्रथम झाडाचे बुडांत उत्पन्न होतें, तेव्हां तें मऊ, ओलें व अल्प असतें, परंतु पुढें त्या वृक्षाची मुळें खाऊन टाकिते; त्याप्रमाणे लबाड शत्रु प्रथम बाह्यांगीं मोठा दुर्बळ, मृदु व आर्द्र (स्नेहल) असा दिसून हळूहळू आपल्या पोटांत शिरतो आणि अखेरीस आपला घात करितो. हे राजा, राजकीय विषयांत भले भले दगलबाजी करितात. यांचें प्रसिद्ध उदाहरण म्हणजे इंद्राचे. यानें मुनींच्या समक्ष मी तुझा नाश करीत नाहीं, असा नमूचीला विश्वास देऊन अखेर पाण्याच्या फेसाखाली आपलें वज्र दडवून त्याला नुसते फेंसानें ठार केले. 
======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:-१६..

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
--------------------------------
       *भाग :- ४..*

        *चटकोपाख्यान*

धर्मराजा विचारतो, 'हे गांगेया; तुम्ही पूजनीया म्हणून जी पक्षिणी सांगितली ती बहुत दिवस ब्रह्मदत्ताच्या घरांत राहात असून असल्या थोर राजाच्या ज्येष्ठ पुत्राचे डोळे फोडून त्याला आंधळे करणें असलें वाईट काम तिने कशासाठी केलें ? तसेंच पांखराचा तो एवढा स्नेह राजाशी कसा पडावा, हेंही मला एक गूढच आहे. तेव्हां या कामीं सर्व कच्ची हकीकत सांगून आपण माझा संशय दूर करा. 

भीष्म म्हणतात - ठीक आहे. यासंबंधात ब्रह्मदत्ताचे घरीं कोणकोणत्या गोष्टी कसकशा घडल्या, तें सर्व मी तुला सांगतों तें ऐक. हे राजा, ब्रह्मदत्ताच्या घरांत एक चिमणी बहुत दिवस घरटे करून होती. ही चिमणी मोठी देखणी होती; हिचे पंख शुभ्र असून हिचे डोके लाल होतें व पाठ आणि पोट यांचा रंग कबरा होता. हिची आणि ब्रह्मदत्ताची फारच गट्टी जमली. ती इतकी कीं, ती त्याची एकजातीची प्रियसखीच म्हणावी. राजवाडयासारख्या उत्तम स्थळीं तिनें घरटें केलें होतें. तेथून ती रोज दिवसास बाहेर जाऊन समुद्रतीर, डबकी, सरोवरे, नद्या, पर्वत, लताकुंज, बनें, बागा, कल्हारपुष्पांच्या सुवासाने भरून गेलेले, प्रसन्न दिसणारे, कमोद, कमळें इत्यादिकाचें पराग उडून ज्यांचे आसपासची हवा सुगंधमय झाली आहे, व जेथे कारंडव पक्षी ओरडत आहेत व हंस आणि पाणबदकें यांचे शब्द चालू आहेत अशा तलावांचे कांठीं चरून फिरून रात्र पडण्याचे वेळेस कांपिल्य नगरींत ज्ञात्या ब्रह्मदत्त राजाच्या राजमंदिरास परत येई. आल्यावर रात्री मग स्वस्थपणीं आपण दिवसास फिरावयास गेलेल्या नानास्थलीं ज्या ज्या आश्चर्यकारक वस्तु पाहिल्या असतील किंवा गोष्टी अवलोकनांत आल्या असतील त्यासंबंधी ही चिमणूबाई राजाशी चटामटा गोष्टी करीत बसे. असा क्रम चालला असतां त्या ब्रह्मदत्त राजाला, हे राजव्याघ्रा, एक पुत्र झाला. 

याचे नांव सर्वसेन असें ठेविले होतें. याच सुमारास त्या पूजनीयेनेंही एक अंडे घातले व तत्पूर्वी तिने आपल्या कोठ्यांत एक घालून ठेविले होतें, तें या वेळीं फुटले. फुटताच त्यांतून एक मांसाचा लोळा बाहेर आला. या लोळ्याला हात, पाय व चोंच इतके अवयव आले होते. चोंचीचा वर्ण पिंगट होता. अजून डोळे नव्हते (उघडले नव्हते), मग पुढें कांहीं दिवसांनीं त्याला डोळे आले व नंतर थोडया थोडया पांखरडया फुटूं लागल्या. राजपुत्रही दिवसेंदिवस वाढू लागला. चिमणीही आपलें पिलू व राजाचा पुत्र यांवर सारखीच प्रीति करूं लागली. रोज संध्याकाळीं चरून परत येतांना ती आपला पुत्र व राजपुत्र ह्यासाठी म्हणून दोन अमृततुल्य मधुर फळें चोंचींत धरून घेऊन येत असे. तीं फळें खाऊन दोघेही छोकरे खूष होऊन जात. त्या पोरांना तीं फळें खाण्याची चटकच लागून गेली. चिमणी बाहेर उडून गेली म्हणजे राजपुत्राची जी दाई असे ती त्या चिमणीच्या पिलाला बाहेर घेऊन राजपुत्राला त्याशीं खेळवीत असे. एक दिवस दाईच्या नजरेआड राजपुत्रानें खेळ खेळतां तें चिमणीचें पिल्लू मानेला बळकट आंवळून धरिलें. राजपुत्राची चिकाटी मोटी बळकट, कांहीं केल्या सुटेना. मोठया मुष्किलीने त्याची ती मूठ उकलावी लागली. बाकी उकलून कांहीं फळ झालें नाहीं. चिमणीच्या पोरानें अगोदरच प्राण सोडले होते, मग तें आ वासून व गतप्राण होऊन पडलेलें चिमणीचें पोर पाहून राजाला फार दुःख झालें. विशेषतः आपल्या मुलाचे हातून असली गोष्ट झाली, हें ध्यानांत येऊन त्यानें ढळढळ अश्रू ढाळिले; व जिच्या उपेक्षेमुळें राजपुत्राचे हातून असलें कृत्य झालें त्या दाईची त्यानें यथास्थितच खरड काढिली. तथापि झाली गोष्ट ती झालीच. राजा त्या दिवशीं सायंकाळपर्यंत त्या पोराबद्दल विलाप करीतच राहिला. इतक्यांत ती बिचारी चिमणी रानभर फिरून नित्याप्रमाणें दोन फळें घेऊन ब्रह्मदत्ताचे घरीं आली. घरीं येऊन पाहाते तों आपला पोटचा गोळा पंचमहाभूतांनी सोडल्यामुळें (मेल्यामुळें) मोठया शोचनीय स्थितींत पडला आहे. त्याला पाहातांच प्रथम तिला मूर्च्छा आली. नंतर कांहीं वेळाने शुद्धीवर आल्यावर बापडी अतीच विलाप करूं लागली. ती म्हणाली, 'बाळ, कायरे हें ! मी आज बाहेरून आलें व तुला साद घातली तथापि तूं आपल्या गोड व अस्फुट वाणीनें लाडके लाडके चिंव चिंव शब्द करीत करीत मजभोंवतीं रांगत रांगत कसा रे येत नाहीस ? रोजचा पाठ म्हटला म्हणजे मी घरीं येतें आहें तें तुला भूक लागली असल्यामुळें तूं आपलें तें पिंवळें पिंवळें चंचुपुट आतील लांल टाळे दृष्टीस पडे इतकें ताणून भक्ष्यग्रहणार्थ मजपाशीं यावयाचा, परंतु, आज इतका वेळ जाऊनही कसा येईनास ? मी रोज बाहेरून आलें म्हणजे तूं चिंवचिंव करीत मजकडे आलास म्हणजे तुला पंखांखाली घेऊन मी प्रेमभराने ओरडत असें, पण आज मुळीं तुझें तें गोड चिंवचिंवणेंच ऐकूं येत नाहीं, हें काय ? बाळ रे, आज मी रानांतून परत निघालें तेव्हां मला आशा वाटत होती कीं, मी येतें तो आपले पंख हालवीत आपलें तोंड उघडून "आई मला तहान लागली पाणी दे" म्हणून तूं मजपुढें येशील; परंतु, ती माझी आशा सर्वथा विफल झाली. कारण, तूं मुळीच रस्ता धरिलास ! आतां काय करूं ?" 

याप्रमाणें बहुत प्रकारे विलाप करून ती राजाला म्हणाली, "हे राजा, तूं यथाशास्त्र अभिषेक करून गादीवर आलेला राजा आहेस, कोणीतरी नव्हेस. अर्थात तुला आपल्या सनातन धर्माची चांगलीच माहिती असली पाहिजे, असें असून आपल्या दाईच्या हातीं माझ्या पोराचा घात करविलास हें काय ? तुझ्या पोरटयाने माझें लेकरू मान मुरगळून मारिलें. ही गोष्ट हे क्षत्रियाधमा, तुझ्या घरांत संभवली कशी, हें मला नीट सांग. तूं एवढा मोठा शहाणा म्हणवितोस तर "शरण आलेला, भुकेलेला, शत्रूंनी वेढलेला व बहुत दिवस आपल्या घरीं राहिलेला अशांचे रक्षणच केलें पाहिजे; जे न करितील ते निःसंशय कुंभिपाक नरकाला जातील." अशा अर्थाची जी अंगिरसाची श्रुति आहे ती तुझ्या कानी नाहीं काय ? अरे, असल्यांची उपेक्षा करणारे अधमाचे हातून देवांनी हविर्भाग कसा घ्यावा, किंवा पितरांनी स्वधाकार तरी कसा घ्यावा ?" 
======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:-१५

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
---------------------------------
        *भाग :- ३..*

           *चटकोपाख्यान*

हे धर्मा, मी भूमीवर दर्भासनावर लटकलों असतां त्या उग्रायुधानें आपल्या त्या दूताला मध्ये  अग्नीच्या ज्वालेप्रमाणें तीव्र असे हे शब्द माझ्या कानी पाडिले. हे धर्मनिष्ठा, त्या वेळीं मीं त्या नीचाचा अभिप्राय काय तो ध्यानी आणून युद्धार्थ सज्ज होण्याविषयी माझ्या सर्व सेनाधीशांना आज्ञा केली. मला इतक्या चिडीला येण्याला असें कारण झालें कीं, माझ्या मातेचा पुत्र जो विचित्रवीर्य तो अद्यापि केवळ लहान असून सर्वथा माझ्या आश्रयावर अवलंबून होता. त्याकडे पाहून मला त्या हलकटाचा (उग्रायुधाचा) इतका संताप आला कीं, युद्ध करून त्याची हाडे मोडावी, यापलीकडे मला दुसरी कोणतीही गोष्ट सुचेना. परंतु, त्या वेळीं माझे भोंवतीं सल्लामसलतींत कुशल असे माझे सचिव बसले होते, तसेच साक्षात वेदस्वरूप असे माझे ऋत्विज बसले होते, व माझें खरें हित कशात आहे तें जाणणारे माझे जिव्हाळ्याचे स्नेही बसले होते. त्या सर्वांनी मला युद्धापासून निवृत्त होण्याविषयीचा आग्रह केला. ते सर्वच शास्त्रज्ञ असून माझ्या प्रेमातले असल्यानें मला त्यांचें ऐकावे लागलें. शिवाय त्यांनीं आपल्या म्हणण्याला सयुक्तिक कारणें काय तीही मला ऐकविली. माझे मंत्री म्हणाले, हा पापी उग्रायुध सैन्य घेऊन ठेपला, ही गोष्ट खरी; आपण अजून वडिलांचे सुतकांतच आहां, मोकळे झाला नाहीं. शिवाय घे म्हणल्या युद्धाला उठणे ही राजकारणी पुरुषांच्या दृष्टीने कांहीं अव्वलप्रत मसलत नव्हे. साम, दान, भेद, इत्यादि युद्धेतर सौम्य उपाय आहेत ते आम्ही प्रथम चालवून पाहातो. तोपर्यंत आपणही सुतक फिटून शुद्ध व्हाल. मग देवतांना वंदन करून, स्वस्तिवाचन करून, ब्राह्मणांकडून अग्नीत होम देऊन, ब्राह्मणांची पूजा करून व त्यांची आज्ञा संपादून आपण विजयार्थ बाहेर पडावे. कारण, जोंपर्यत कोणाही राजाला अशौच आहे तोपर्यंत त्यानें रणात शिरू नये किंवा अस्त्रप्रयोगही करूं नये, अशी वृद्धांची आज्ञा आहे. आमच्या मते आपण प्रथम सामानें किंवा दानानेच त्याला गप्प कराल. तितकेच न साधलें तर भेदाने, आणि हे सारेच उपाय हुकले तर पराक्रम करून मारणे हेही आपणाला कठीण नाहीं. इंद्राने शंबराला ज्याप्रमाणें तेव्हांच चिरडून टाकले त्याप्रमाणें आपणही यास केव्हांच चिरडाल. त्याची कथा काय ! 

भीष्म म्हणाले - राजा युधिष्ठिरा, असें आहे कीं, आणीबाणीचे प्रसंगीं विशेष जाणत्या लोकांचा व त्यातूनही वयोवृद्धांचा उपदेश ऐकावा. तेव्हां हें तत्त्व ध्यानांत आणून मीं माझ्या मंत्र्यांचे सांगीप्रमाणें युद्धाचा विचार तूर्त सोडून दिला. माझे मंत्री राजकार्यकुशलच होते. त्यांनीं तत्काल उत्तम उत्तम उपाय चालू केले. प्रथम शहाण्या शहाण्यांच्या विचारास आलें त्या त्या रीतींनी साम, दाम, इत्यादिकांचीं बोलणी लावून त्या उग्रायुधाला वाटेवर आणण्याचा उपाय केला. परंतु, खराखुराच नीचबुद्धि तो ! तो असल्या उपायांनी कशाचा वळणावर येणार ? त्यानें कांहीं न ऐकता घमेंडींतच आपल्या हातांत असलेले सुदर्शनासारखे तें जाज्वल्य चक्र आम्हांवर फेकले. परंतु, चमत्कार काय सांगावा कीं, तें तत्काल परत फिरले. कारण, त्या पातक्यानें दुसर्‍याची स्त्री हरण करण्यासारख्या नीच हेतूनें तें सोडले असतां, तें चालावे कसें ? बाकी त्याचें तें चक्र त्यानें गुरूनें सांगितलेली मर्यादा सोडून जेव्हां भलत्याच कामी सोडलें तेव्हांच तें फुकट गेलें, असें मी समजून चुकलो होतों. तसेंच भल्याभल्यांनीं त्या दुष्टाची त्याच्या या कृतीबद्दल निंदा केली असल्यामुळें तो आपले कर्मानेंच मेला आहे, हेंही मी समजून होतों. तथापि, लोकाचाराप्रमाणें माझें सुतक फिटल्यावर मीं विप्रांकडून आशीर्वाद संपादून धनुष्यबाण घेऊन रथांत बसून शहराबाहेर पडून शत्रूंशी भिडलों. नंतर हातझोंबीला येऊन एखाद्या बेहोष झालेल्या माणसाप्रमाणें शत्रूचा व माझा सतत तीन दिवस अंगबल व अस्त्रबल यांचा झगडा सुरू राहिला. तो इतका भयंकर कीं, त्याला एक देवासुरांचेच युद्धाची उपमा योग्य. अखेरीस मीं माझ्या अस्त्रतेजानें अगदीं भाजून काढिला, तेव्हां, हे धर्मा, तो इतका शूर खरा, तथापि, प्राण सोडून माझ्या समोरच तेथल्यातेथेच रणांगणांत पडला. इतक्या अवकाशांत म्हणजे नीप राजा व हा उग्रायुध हे नाहींसे होत आहेत तो पृषत राजा हा कांपिल्य नगरीला येऊन पोंचला; व त्यानें आपलें वडिलार्जित जें अहिछत्र नगरीचें आसपासचें राज्य ते सर्व काबीज केलें. हा पृषत म्हणजे द्रुपदाचा बाप. हा तेव्हां माझ्या तंत्रानें वागत असे. याचे हें राज्य पुढें अर्थातच द्रुपदाकडे आलें. परंतु कांहीं कालाने अर्जुनानें बाहुबलाने द्रुपदाला रणांत जिंकून कांपिल्य नगरीसकट तो सर्व अहिछत्र प्रांत द्रोणाला अर्पण केला. विजयी द्रोणांनी शिष्याच्या त्या देणगीचा सादर स्वीकार तर केलाच; पण, त्यांतून कांपिल्यनगरी त्यानें द्रुपदाला परत दिली, ही गोष्ट तुला ठाऊकच आहे. हे धर्मा, याप्रमाणे मी तुला ब्रह्मदत्त, द्रुपद व वीर उग्रायुध यांच्या वंशांची सविस्तर हकीकत सांगितली. 
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:-१४

श्राध्ददेव व पितृवर्णन:-
-------------------------
  चटकोपाख्यान:-२


धर्मराज म्हणतो - महाराज, हा उग्रायुध कोणाचा पुत्र, कोणच्या कुळांत जन्मला व आपण त्याला युद्धांत काय म्हणून मारिले, हें सर्व मला सांगा. 

भीष्म सांगतात - बाबारे, मागें जो अजमीढ राजा सांगितला, त्याला यवीनर नांवाचा एक विद्वान पुत्र होता; यवीनराचे पोटीं धृतिमान झाला; धृतिमानाचा पुत्र सत्यधृति, सत्यधृतीचे उदरी प्रतापशाली दृढनेमी हा जन्मला. पुढें राजा सुधर्मा हा दृढनेमीचा पुत्र झाला. सुधर्म्याला पुढें सार्वभौम राजा हा पुत्र झाला. याला सार्वभौम म्हणण्याचें कारण खरोखरच तो सर्व पृथ्वीचा मालक झाला होता. याच्या सुप्रसिद्ध वंशांत पुढें पौरवांना आनंद देणारा महान नांवाचा राजा झाला; पुढें महानाला रुक्मरथ झाला, असे लिहिले आहे. रुक्मरथाचा पुत्र सुपार्श्व, सुपार्श्वाचा पुत्र सुमति हा मोठा धार्मिक होता. सुमतीला सन्नति नांवाचा मोठा वीर्यवान पुत्र झाला. याचा पुढें मोठा बलाढय कृत नांवाचा पुत्र झाला. हा कृत कौशल देशांतील इक्ष्वाकु कुलोत्पन्न राजा जो महात्मा हिरण्यनाभ त्याचा शिष्य होता. याने सामवेदाची संहिता चोवीस निरनिराळ्या रीतींनी गाण्याची पद्धत काढिली, व यामुळें याच्या पद्धतीप्रमाणें जे साम पढणारे आहेत त्यांना कार्तय (कृताचे अनुयायी) असें म्हणतात, व त्या सामांना प्राच्यसाम असें म्हणतात. या कृताला पुरुकुलांतील मोठा पराक्रमी असा वर सांगितलेला उग्रायुध हा झाला. याच्या पराक्रमाने पृषत राजाचा आजा जो पांचालाधिपति राजा नीप हा गतप्राण झाला. या उग्रायुधाला क्षेम्य नांवाचा मोठा लौकिकवान पुत्र झाला. क्षेम्याला पुढें सुवीर, सुवीराला पुढें नृपंजय व नृपंजयाला बहुरथ. हे सर्व राजे पुरुकुलोत्पन्न होत. असो; हा उग्रायुध जेव्हां अति माजला, तेव्हां त्याला वाईट वाईट बुद्धि सुचू लागली; त्यानें आपले सैन्य वाढवून नीप-कुलाचा व इतर अनेक राजांचा धुव्वा उडविला; इतकेंच करून न थांबता आमचे बाबा वारल्यावर त्यानें मस्तींत येऊन मला एक फारच वाईट गोष्ट ऐकविली; तो वृत्तांत असा: मी बाबा मेल्यावर एक दिवस माझे सोबत्यांना भोवताली घेऊन सहज धरणीवर निजलों असतां एकाएकीं या उग्रायुधाचा दूत आंत येऊन त्यानें आपल्या धन्याचा निरोप मला कळविला; तो हा - 

"हे भीष्मा, तुझा बाप मेला आहे, तुझी आई जी गंधकाली (सत्यवती) हिचा रूपाविषयी मोठा लौकिक आहे. स्त्रियांमध्यें ती केवळ रत्नच आहे. तेव्हां अशीला आपली भार्या करावी अशी अस्मादिकांची तबियत लागली आहे. तरी, हे कुरुश्रेष्ठा, तुमच्या आईला या कामासाठीं मजकडे पाठवून द्यावी. असें सांगण्याचा माझा हक्क काय म्हणशील तर आजकाल या धरणीतलावर जी जी रत्ने म्हणून आहेत त्यांचा वाटेकरी मीच आहे; करितां हें स्त्रीरत्नही मलाच योग्य आहे. इतकी माझी मागणी तूं मान्य केलीस म्हणजे तुला कांहीं कमी नाहीं. तूं ढेकर देशील इतकी पुष्कळ दौलत व वाटेल तितके विस्तीर्ण राज्य ही मी तुला खुषीनें देईन, ही खात्री ठेव. मला आजकाल दुर्घट असें कांहींच नाहीं. माझ्या हातीं जे हे प्रज्वलित चक्र आहे हें इतकें अजिंक्य आहे कीं, रणांगणीं तें दृष्टीस पडतांच शत्रू सैरावैरा पळूं लागतात, ही गोष्ट तूं ध्यानांत घे; आणि तुझें राष्ट्र, तुझे प्राण व तुझे कुल ही सुरक्षित राहावी अशी जर तुझी इच्छा असेल तर मुकाटयाने माझ्या आज्ञेत तूं वाग; असें न करशील तर तुला शांति म्हणून कशी ती मिळूं देणार नाही." 

श्राध्ददेव व पितृवर्णन:-१३

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
---------------------------------
    *चटकोपाख्यान*

मार्कंडेय म्हणतात - हे भीष्मा, आतां सांगितल्याप्रमाणें सनत्कुमार देव अंतर्धान पावल्यावर त्यांच्या वचनप्रभावानें दिव्यदृष्टि व विज्ञान ही तत्काल माझे ठायीं प्रकट झाली; व त्यांच्या योगाने, हे गांगेया, सनत्कुमारांनीं कुरुक्षेत्रांत कौशिक कुलात जे सात पुत्र आले म्हणून मला सांगितलें होतें ते मला प्रत्यक्ष दिसू लागले. या साताभावांपैकीं ब्रह्मदत्त नांवाचा जो सातवा भाऊ होता तो राजा झाला. याचा स्वभाव व आचरण यांवरून हा ब्रह्मदत्त पितृवर्ती या नांवानें विशेष प्रख्यात होता. हा कांपिल्य नामक श्रेष्ठ नगरींत राहाणारा जो पृथ्वीपति अणुह त्यापासून त्याची स्त्री जी शुककन्या कृत्वी तिचे ठायीं जन्मला. 

भीष्म म्हणतात - हे युधिष्ठिरा, महातपस्वी महाभाग मार्कंडेय यांनीं या अणुह राजाची वंशावळ मला जशी सांगितली तशीच ती मी तुला सांगतो ऐक. 

युधिष्ठिर म्हणतो - ताता, आपण एकुण वंशावळ सांगणारच आहांत, पण प्रथम विशेषतः अणुह राजा, हा कोणाचा पुत्र होता, हा कोणत्या काळी होता, व राजा ब्रह्मदत्तासारखा महायशस्वी व धर्मनिष्ठ पुत्र ज्याचे पोटीं जन्मला त्याची वीर्यवत्ता तरी कसल्या प्रकारची होती व त्या सात भावांपैकी ब्रह्मदत्त हा कनिष्ठ असून राजा कां व कसा झाला, हें मला सांगावे. या ब्रह्मदत्ताचे चरित्र मी जें विशेष विस्तारानें ऐकू इच्छितों याचे कारण, हे द्युतिमंता, असें आहे कीं, भगवान् शुकासारखा लोकपूज्य ऋषि आपली कृत्वी नामक कीर्तिमान् कन्या भलत्याच पोंचट माणसाला देणार नाहीं. अर्थात् तो तसाच कांहीं वीर्यवान असला पाहिजे. याकरितां आपण त्याचें वृत्त मला सांगा. शिवाय त्याचे ते मार्कंडेयांनीं सांगितलेले बाकीचे भाऊ संसारांत कसे वागत होते, तें मला सांगा. 

भीष्म म्हणतात - हे धर्मा, माझा आजा जो राजर्षि प्रतीप त्याचा हा ब्रह्मदत्त राजा समकालीन होता, असें माझे ऐकिवात आहे. हा मोठा भाग्यवान योगी, प्राणिमात्राचें कल्याण करण्यांत तत्पर व प्राणिमात्राची भाषा जाणणारा होता; व ज्याने तपोबलाने शिक्षानामक वेदांग निर्माण करून संहितेचा पदपाठ व एकंदर वेदांगांचा क्रम प्रचारांत आणिला; व योग शिकविण्यांत अत्यंत निपुण असल्यानें ज्याला योगाचार्य अशी संज्ञा आहे तो गालव ऋषि याचा मित्र होता; व योगिश्रेष्ठ कंडरीक हा त्याचा सचिव होता. महाभाग मार्कंडेय ऋषींच्या सांगण्याप्रमाणें पाहातां ब्रह्मदत्तादि सातही बंधु पूर्वजन्मी निरनिराळ्या जातींत जन्मले असून परस्पर अत्यंत प्रेमळ मित्र होते; व अखेर या जन्मी ते सहोदरच झाले. हे राजा युधिष्ठिरा, पुरुकुलोत्पन्न जो महात्मा ब्रह्मदत्त त्याच्या अति जुनाट वंशाचा वृत्तांत मी तुला सांगतो, तो ऐक. पुरुकुलांत बृहत्क्षत्र नांवाचा जो राजा झाला त्याला सुहोत्र नामक परम धार्मिक पुत्र झाला. त्या सुहोत्राला हस्ति नामक पुत्र होता. प्रसिद्ध जें हस्तिनापुर (हल्लींची दिल्ली) हें प्रथम यानेच वसविले. या हस्तीला अजमीढ, द्विजमीढ व पुरुमीढ असे तीन पुत्र होते. पैकी अजमीढाला धूमिनी नामक स्त्रीचे ठिकाणी बृहदिषु हा पुत्र झाला. हे राजा, या बृहदिषूचे पोटीं महायशस्वी बृहद्धनु हा पुत्र झाला. हा मोठा धार्मिक असल्यामुळे याला बृहद्धर्मा असें म्हणत. याला पुढे सत्यजित हा झाला. त्याचा विश्वजित, विश्वजिताचा पुढें राजा सेनजित झाला. या सेनजिताला लोकविख्यात असे चार पुत्र झाले. यांचीं नांवे - रुचिर, श्वेतकेतु, महिम्नार व वत्स. यांपैकी वत्स हा अवंतीचा राजा होता; व रुचिराला पृथुसेन नांवाचा महायशस्वी पुत्र होता. पृथुसेनापासून पार झाला. पारापासून नीप. नीपाला मात्र अत्यंत तेजस्वी, शूर व बाहुशाली असे महारथि शंभर पुत्र होते; व हे सर्वही राजे झाले; व या सर्वांनाही नीपच म्हणत. या नीपांचा वंश वाढविणारा समर नांवाचा जो पुत्र तो कांपिल्य नगरींत राहात असे व याला नांवाप्रमाणेंच समराची फार आवड असे. या समराला पर, पार व सदश्व असे तीन मोठे धर्मज्ञ पुत्र होते. पैकी पराला पृथु नांवाचा पुत्र झाला. पृथुला सुकृत नामक पुत्र झाला व तो आपल्या सदाचरणानें सर्वगुणसंपन्न झाला. याला पुढें विभ्राज झाला. विभ्राजाचा पुत्र कृत्वीचा नवरा व शुक्राचार्याचा जावई जो सुप्रसिद्ध अणुह तो होय. अणुहाचा पुत्र बलवान राजर्षी ब्रह्मदत्त हा झाला. त्याला योगनिष्ठ व शत्रुमर्दन असा विश्वक्सेन नामक पुत्र झाला. हा जो विश्वक्सेन हा खरें पाहाता ब्रह्मदत्ताचा पूर्वज म्हणजे आजा जो विभ्राज तोच कांहीं कर्मगतीने ब्रह्मदत्ताचे पोटीं पुनः जन्मास आला होता. ब्रह्मदत्ताला याशिवाय सर्वसेन या नांवाचा पुत्र होता. ब्रह्मदत्ताचे घरांत बहुत कालपर्यंत पूजनी या नांवाची एक चिमणी राहात असे. तिने या सर्वसेनाचे डोळे फोडले. आतां या ब्रह्मदत्ताचा विश्वक्सेन म्हणून जो वर महापराक्रमी पुत्र सांगितला, त्याला राजा दंडसेन नामक पुत्र झाला. या दंडसेनाला भल्लाटसंज्ञक पुत्र होता, याला कर्णानें युद्धांत मारिलें आहे. हा भल्लाट मोठा शूर व वंशोद्धार करणारा होता. मात्र याचे पोटी जो पुत्र आला तो मोठा वाईट निपजला. कारण, याच्या एकटयाच्या दुष्कृतीमुळे उग्रायुधराजानें मागें सांगितलेले जे याचे नीपसंज्ञक पूर्वज त्यांच्या एकंदर वंशविस्ताराचा पूर्ण उच्छेद करून टाकिला. एवंच, हा दुर्बुद्धि मोठा कुलांगार निपजला. नीपांचा नायनाट करणार्‍या त्या उग्रायुधाला जेव्हां अत्यंत गर्व झाला व मोठी घमेंड चढली त्या वेळेस, हे युधिष्ठिरा, मीं त्याला युद्धांत चीत केला. 
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:-१२

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
---------------------------------
       *भाग :- १२..*

हे मार्कंडेया,  सद्धर्माचरण हें कधींही नाश पावत नाहीं. मध्ये कितीही अडथळे आले तथापि ते पुनरपि कर्त्यांचे बुद्धीला सन्मार्गाकडे ओढीत नेतात. याकरिता तुझी मति वारंवार धर्माकडे लागूं दे. विशेषत: योगाचरणाकडे मति लागली असतां ती दिवसेंदिवस फारच उत्तम होत जाईल. पण, बाबा, योग कांहीं वाटेवर पडला नाहीं. अल्पबुद्धीच्या लोकांना हा कधींच प्राप्त होत नाहीं. कदाचित मोठ्या कष्टानें प्राप्त झालाच तरी हे मूर्ख लोक मृगयादि नाना क्रूर व्यसनांच्या नादी लागून प्राप्त झालेल्याची नासाडी करितात व स्वतः सदा अधर्मानेच राहातात आणि आपल्या गुरूंचाही द्रोह करितात; अशांच्या हातीं योग लागत नाहीं, तर तो कोणाच्या हातीं लागतो तें ऐक. 

जे लोक न मागण्याजोग्या ज्या वस्तु आहेत त्या कधींही मागत नाहींत; शरण आलेल्यांचे रक्षण करितात; दुर्बलांची अवहेलना करीत नाहीत; पैशाच्या उबेमुळें उन्मत्त होत नाहींत; ज्यांचे आहारविहार व स्वकर्तव्यासंबंधी सर्व व्यापार हिशोबी व नेमस्त असतात; जे सदा ध्यान व अध्ययन यात निरत असतात; नायनाट झालेल्या वस्तूसाठी सोधण्या घालीत बसत नाहींत; केव्हांही विषयोपभोगात गढून पडत नाहींत; मद्यमांस भक्षण करीत नाहींत; स्त्रीशी विलास करण्यांत आला तो दिवस घालवीत नाहींत; ब्राह्मणसेवेविषयीं अदक्ष असत नाहींत; हलकट गोष्टींत मन घालीत नाहींत; आळसाने ज्यांना गिळले नाहीं; मान-सन्मानाची ज्यांना विशेष चाड नाहीं; व जे आत्मप्रशंसेंत फारसे पडत नाहींत; जे वृत्तीने अति शांत; ज्यांनीं क्रोध जिंकला आहे; ज्यांना बढाई व मीपणा यांचा विटाळही नाहीं; व जे सदा पुण्यमय विचाराने भरलेले असतात, अशांनाच योग प्राप्त होतो. योग ही चीज मृत्युलोकांत फार दुर्मिळ आहे. भाग्यवान असतील तेच व्रताचरण करितात. पूर्वकाळचे ब्राह्मण असे असत. प्रसंगीं त्यांचे हातून चुकीने दोष घडलाच तर त्याची पुरी आठवण ठेवून ते आपला रस्ता सुधारीत व ध्यान आणि अध्ययन यांत गर्क राहून शांतीचे मार्गाला लागत. 

हे धर्मज्ञा मार्कंडेया, योगधर्माहून अधिक महत्वाचा असा दुसरा कोणताही धर्म नाहीं. हा धर्म सर्वही धर्मात वरिष्ठ आहे. यासाठीं, हे भृगुकुलोत्पन्ना, त्याचीच कांस धर. तूं जर अल्पाहार करणारा, जितेंद्रिय, तत्पर, पवित्र व श्रद्धावान होशील तर तुला आस्ते आस्ते कालगतीनें योगसिद्धि प्राप्त होईल. 

असें बोलून भगवान् सनत्कुमार जागचे जागी अदृश्य झाले. ते गेल्यापासून मी त्यांची उपासना करण्यांत एकसारखा अठरा वर्षेपर्यंत निमग्न होतों; परंतु ती अठरा वर्षें मला केवळ एका दिवसासारखी वाटली; किंवा मला कालाचे कसें तें भानच उरले नाहीं. मी जेव्हां शुद्धीवर आलों, तेव्हां शिष्याजवळ पूसतपास केली, त्यावरून मला अठरा वर्षे लोटली असें कळले. हे भीष्मा, त्या देवाच्या कृपेचा प्रभाव केवढा म्हणून सांगू ? त्या अठरा वर्षांत मला तहान लागली नाहीं; भूक लागली नाहीं; किंवा अन्नपाणी नाही म्हणून मी यत्किंचितही कोमेजलों किंवा थकलो नाही.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:-११

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
--------------------------------
        *भाग :- ११..*

हें मार्कंडेया, युगायुगाचे ठायीं जेव्हां जेव्हां धर्माचा र्‍हास होतो त्या त्या वेळीं प्रजापालक जो मनु तो या सप्तपितरांची ज्यात विशेष पूजा केली जाते अशा प्रकारची श्राद्धे लोकांत प्रवृत्त करतो. हे द्विजश्रेष्ठा, या सातही पितृगणांत यम हा प्रथम उत्पन्न झाला असल्यामुळें वेदांत त्याला पितृपति अशीच संज्ञा दिली आहे, व त्याचा हा अग्रमान ध्यानांत आणून त्यालाच " *श्राद्धदेव* " असेही म्हणतात. 

हे मार्कंडेया, आता श्राद्धाचे विधान सांगतो तें ऐक. सर्व पितृश्राद्धांत पात्रे रुप्याची किंवा निदान रुप्याने मढविलेलीं तरी असावीत. कारण रुपे हें पितरांना फार प्रिय आहे. असल्या रजत पात्रांत वाढलेले श्राद्धान्न स्वधाशब्दपूर्वक अर्पण केल्याने पितर फार संतुष्ट होतात.

श्राद्धकाली प्रथम सोम, अग्नि व यम यांचे अग्नीत आहुती देऊन संतर्पण करावे. अग्नि नसल्यास जलांत देणे. याप्रकारे जो भक्तिपूर्वक पितरांचा संतोष करितो, त्याला पितरही संतुष्ट करितात. पितर त्याला शरीर, पुष्टि व विपुल संतति देतात. त्याचप्रमाणे स्वर्ग देतात, आरोग्य देतात. फार काय सांगावे तो जे कांहीं इतर इच्छील तेही सर्व देतात. हे मुने, पितृकार्याचे महत्व देवकार्यापेक्षांही विशिष्ट आहे. कारण, देव हे मोठे चेंगट व प्रसन्न होण्याला कठीण. पितर बिचारे अक्रोध म्हणजे शांत व त्वरित कृपा करणारे असे आहेत. म्हणून स्मृत्यादिकांत देवांपेक्षांही पितरांचा संतोष प्रथम करण्याकडे विशेष कटाक्ष आहे. पितरांपासून लोकांचे फारच श्रेष्ठ कल्याण होते. शिवाय पितरांचा प्रसाद सदा स्थिर आहे म्हणजे त्यांची पूजा केली आणि ते अमुक वेळीं प्रसन्न झालें नाहीत, असें कधीं घडतच नाहीं. यास्तव, हे भृगुकुलोत्पन्ना मार्कंडेया, अशा पितरांना तूं नमस्कार कर. ही गोष्ट तुला विशेष आग्रहाने सांगण्याचे कारण असें आहे कीं, तूं मोठा पितृभक्त आहेस व त्यातूनही, हे ब्राह्मणा, तुझी मजवर विशेषच भक्ती आहे. आज मी तुझे कल्याण करणार आहे व तें कसें तें तुला प्रत्यक्ष पाहाता यावे म्हणून मी तुला दिव्य दृष्टि व अनुभवाचें सामर्थ्य, ही दोन्हीही देतो. हे निष्पापा मार्कंडेया, मी जो मार्ग सांगतो, तो फार सावधचित्ताने ध्यानांत घे. वास्तविक पहाता तू कांहीं सामान्य पुरुष नव्हेस. तूं मोठा सिद्ध आहेस. तथापि देवांची योगगति व पितरांची श्राद्धफलरूपी परागति चर्मचक्षूनें तुला दिसणार नाहीं. असें बोलून तो देवश्रेष्ठ त्याच्या जवळच बसलेल्या मला देवांनाही दुर्लभ अशी विज्ञान सहित दिव्यदृष्टि देऊन त्याला इष्ट त्या मार्गाला गेला. जातांना तो जळत्या आहवनीय अग्नीसारखा झळकत होता. 

हे कुरुश्रेष्ठा, त्या सनत्कुमार देवाच्या प्रसादाने मला जें ज्ञान प्राप्त झालें तें या मृत्युलोकांत मनुष्यांना प्राप्त होणें फार कठीण आहे. याकरिता तूं तें नीट समजून घे...
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

वज्रगोपिकानाम:-१३

*वज्रगोपिकानाम*
--------------------------
       *भाग :- १३*

श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार नारद द्वारकेत गेले पण त्यांना तिथे पदरज भेटले नाही म्हणुन शेवटी निराश होऊन नारद परत श्रीकृष्णाकडे आले व सांगितले की, 'देवा ! पुष्कळ भक्त भेटले, पण कोणी पदरज देण्यास तयार नाही.' 
*श्रीकृष्ण म्हणाले,* 'नारदा, तुम्ही वृंदावनात गेला होता का ?' 

 *नारद* - त्या अडाणी खेडयात राहणार्‍या लोकांकडे जाऊन काय उपयोग ? 
 *श्रीकृष्ण* - एक वेळ तेथे जाऊन तर या ! 
देवर्षी त्या व्रजभूमित पोहोचले. त्यांना पाहताच सर्व गोपिका एकत्र झाल्या व आतुरतेने विचारू लागल्या, 'देवर्षे, तुम्ही कोठून आला ? तुम्ही सर्वत्र संचार करता, अशात कधी द्वारकेला गेला होता का ? आमचा हृदयनाथ जो श्रीकृष्ण त्याचा काही समाचार सांगू शकता काय ? 
 *नारद* - अहो, मी थेट द्वारकेहूनच येथे आलो, श्रीकृष्णाच्या मस्तकात फार पीडा होते आहे. 
 *गोपिका* - अरेरे, तेथे कोणी उपाय जाणणारा वैद्य नाही काय ? 
 *नारद* - वैद्य आहे, पण त्यांनी सांगितलेले औषध उपलब्ध होत नाही. 
 *गोपिका* - असे न मिळणारे औषध तरी कोणते आहे ते ? 
 *नारद* - कोणी श्रीकृष्णाचा प्रेमी असेल त्याने आपली पदधूली दिली तर त्याची पीडा दूर होईल. 
 *गोपिका* - पाहिजे तेवढी धूली घेऊन जा. 
सर्वांनी आपल्या पायाची धूळ काढून दिली. 

 *नारद* - तुम्ही फार भोळ्या दिसता. आपण काय करतो याची कल्पना तरी तुम्हाला आहे काय ? श्रीकृष्ण साक्षात परब्रह्म परमात्मा आहे. आपली चरणधूली त्याच्या मस्तकाला लावली तर नरकात जावे लागेल याचा विचार केला काय ? 
 *गोपिका* - ह्या सर्व गोष्टीचा विचार नंतर, प्रथम तुम्ही लगेच द्वारकेला ही घेऊन जा, त्याची वेदना दूर होऊ द्या, त्याला सुख झाले तर आम्ही अनंतकाल पावेतो नरकात राहू, तो नरकच आम्हाला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याला दुःख होत असता आम्ही स्वर्गात राहिलो तर तो स्वर्गही नरकच आहे.' 
हे खर्‍या प्रेमाचे स्वरूप आहे. 'प्रेमात औदार्य असते. तेथे सर्वच दान आहे, तृप्ती आहे. 'यत्प्राप्य न किञ्चिद्वाञ्छति' असे आरंभीच सूत्र पाचमध्ये म्हटले आहे. प्रेमी मागेल तरी प्रेमच मागेल, देईल तर सर्वस्व देईल. 
हृदयात अन्य कामना धारण करणारा भिक्षुक असतो. तो मागतच असतो. आपल्यात तो अभावच अभाव म्हणजे अपूर्णता पाहत असतो. तेथे तृप्ती नसते. प्रेम प्राप्त झाले असता तो प्रेमी सिद्ध होतो, अमृत होतो, तृप्त होतो, असे चौथ्या सूत्रात म्हटलेच आहे. कामी हा भोग्य वस्तूपासून स्वतःस भिन्न समजतो. प्रेमी त्या प्रेमविषयाला आपला आत्माच समजतो. म्हणून त्याच्याच सुखाने तो सुखी होतो. स्वसुख हे त्याच्या सुखाहून त्याला वेगळे वाटत नसते.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

वज्रगोपिकानाम:-१२

*वज्रगोपिकानाम*
--------------------------
      *भाग :- १२..*

भक्तवर्य उद्धव गोकुळात श्रीकृष्णाचा निरोप घेऊन आला, काही दिवस तेथे वास्तव्य करून गोपिकांच्या दिव्य प्रेमाचा अनुभव घेतल्यावर परत जाताना वृषभानुकिशोरी राधेला त्याने संदेश मागितला, तेव्हा ती उद्धवाला म्हणाली, 'हे पाहा, प्रियतम शामसुंदर कदाचित येथे आला तर आम्हा सर्वांना अपार सुख होईल हे खरे. परंतु येथे येण्यामध्ये त्याला किंचितही क्लेश होत असतील तर त्याने येथे न आलेले बरे. त्याच्या न येण्याने आमच्या सर्वांच्या भीषण दुःखाला सीमा राहणार नाही, तरी तेथे वास्तव्य करण्यात त्याला सुख होत असेल तर तो आनंदाने तेथेच राहो. कारण त्याच्या सुखातच आम्ही सुखी होऊ.' हे वाक्य ऐकून भक्तवर्य उद्धवाचे तोंडून 'हे राधे, तुझ्या दिव्य प्रेमाचा विजय असो.' असे उद्‌गार निघाले. 

अनेक भक्तांच्या मुखाने एक कथा ऐकण्यात येते ती अशी की, एकदा देवर्षी श्रीनारद द्वारकेत गेले, श्रीकृष्णाची भेट झाली, गोकुळातील काही जुन्या आठवणी निघाल्या, कारण श्रीकृष्णास त्या विसरणे शक्य नव्हते.
 *नारद म्हणाले,* 'देवा ! तुम्ही गोकुळवासी गोपिकांचे वारंवार स्मरण करीत असता त्यामुळे श्रीरुक्मिणीदेवी, सत्यभामादि आपल्या स्त्रिया या अप्रसन्न असतात, त्यांना वाटते आमचे श्रीकृष्णावर प्रेम नाही काय ? गोपिकांच्या प्रेमात अशी विशेषता काय आहे ?' यावर भगवान *श्रीकृष्ण म्हणाले,* 'देवर्षे ! तुमच्या प्रश्नाचे उत्तर पुढे केव्हा तरी देईन, पण सध्या माझ्या मस्तकात फार वेदना होत आहेत, मला फार क्लेश होतात.' नारद म्हणाले, 'मी एखाद्या वैद्याला बोलावून आणतो.' 

 *श्रीकृष्ण* - वैद्याला आणणे व्यर्थ आहे. त्याच्या औषधाचा काही उपयोग होणार नाही.
 *नारद* - मग कसे करावे ? आपणास बरे वाटण्यासाठी कोणता उपाय करावा ? 
 *श्रीकृष्ण* - उपाय आहे, औषध आहे, पण ते कोणी देईल तेव्हा ना ? 
 *नारद* - तुम्ही औषधाचे नाव तर सांगा, मी कोठूनही, कोणापासूनही आणीन. 
 *श्रीकृष्ण* - नारदऋषे, एखाद्या भक्ताची चरणधूली आणून ती मस्तकाला लावली तरच ह्या वेदना कमी होतील. ते औषध संपादन करण्याकरिता नारद बाहेर पडले. जो जो कोणी भक्त म्हणविणारा भेटेल त्याला नारदांनी श्रीकृष्णाची वेदना सांगावी व औषध मागावे. पण कोण असा सापडेल की आपली चरणधूळ देवाच्या मस्तकाला लावू देईल ? हे पाप करण्यास कोण तयार होईल 'द्वारकेत जाऊन पट्टराण्यांनाही विचारले की, तुम्ही श्रीकृष्णाच्या पूर्ण भक्त आहा, पतिव्रता प्रेमी आहा, त्याच्याकरिता तुम्ही तरी ते औषध द्या. चरणधूली द्या. पण त्या म्हणाल्या, 'हरीहरी आपल्या पायाची माती त्या परमात्म्याच्या कपाळास लावावी, ज्याच्या पायावर ब्रह्मा, शिव, इंद्रादी तेहतीस कोटी देव आपली मस्तके नम्र करतात, त्याच्या मस्तकास ही माती लावली तर कोणत्या नरकात जाऊन पडावे लागेल, नारदा, तुम्हाला विचारावे तरी कसे वाटते ?' शेवटी निराश होऊन नारद परत श्रीकृष्णाकडे आले व सांगितले की, 'देवा ! पुष्कळ भक्त भेटले, पण कोणी पदरज देण्यास तयार नाही.' *श्रीकृष्ण म्हणाले,* 'नारदा, तुम्ही वृंदावनात गेला होता का ?'

कथेचा पुढील भाग पुढल्या भागात...
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

वज्रगोपिकानाम:-११

*वज्रगोपिकानाम*
-------------------------
    *भाग :- ११..*

 *प्रेमपराकाष्ठा* ' ही शेवटची अकरावी भूमिकेवर गोपिका  आरूढ झालेल्या होत्या. अतएव त्यांना स्वरूपज्ञान यथार्थरूपाने झाले होते हे वरील विस्तृत विवेचनावरून समजण्यासारखे आहे. 

जर त्यांना महात्म्यज्ञान नसेल तर ते वैषयिक प्रेम होईल व ते निकृष्ट समजले जाते, म्हणून या पुढील सूत्रात 'तद्विहीनं जाराणामिव' म्हणजे महात्म्यज्ञानविहीन (रहित) प्रेम जारप्रेमाप्रमाणे निकृष्ट होईल असे नारद म्हणतात. 'जरयति इति जार.' जो धर्माचा नाश करतो, पावित्र्याचा नाश करतो, नीतीचा नाश करतो तो जार. भगवत्प्रेमस्वरूप तर हृदयाला निर्मल पवित्र करणार आहे. ' *जाराणा* ' हे अनेकवचन अनेक घातक गोष्टी येथे एकत्रित आल्याप्रमाणे होईल हे सांगत आहे. सूत्रातील 'इव' हे पदही दृष्टान्त जसाच्या तसा अक्षरशः घेऊ नये हे सुचवीत आहे. जार किंवा जारिणी हे केवल ऐंद्रिय सुखाची अपेक्षा करत असतात. ते सुख मिळत राहील तोपावेतोच त्यांचा समागम असतो, ते न मिळाल्यास परस्परांचा त्याग होतो, श्रीकृष्ण व गोपिकांचे अन्योन्य प्रेम अखंड, अबाधित व अव्यभिचारी होते, जार-प्रेम व वास्तव प्रेमातील भेद पुढील वाक्यात दाखविला आहे.

काम व प्रेम यांतील भेद या सूत्राच्याद्वारे स्पष्ट केला जात आहे. कामामध्ये कामी स्त्री किंवा पुरुष स्वतःच्या सुखभोगाकडेच पाहत असतो. जारिणी जारापासून स्वतःला किंवा जार जारिणीपासून आपल्याला सुख व्हावे अशी इच्छा व प्रयत्न करीत असतो, व जोपावेतो ते सुख मिळत राहते तोपावेतोच अनुकूल संबंध राहतो. जर दुसर्‍याची सुख देण्याची शक्ती संपली किंवा प्रतिबंध आला तर परस्परांचा संबंधविच्छेद होतो, हे कामाचे स्वरूप आहे. पण प्रेमात स्वसुख-सुखित्वापेक्षा तत्सुख म्हणजे जो प्रेमविषय आहे त्याच्या सुखाने प्रेम करणारा सुखी होत असतो, किंवा स्वतःला सुखी समजत असतो. कामी पुरुष दुसर्‍याला भोग्य समजून स्वतःला भोक्ता समजतो. तसेच त्याचे प्रेम प्रेमविषयाच्या आत्म्यापेक्षा बाह्य स्वरूपावरच असते व त्या बाह्य विषयापासून ऐंद्रियिक सुखाचा भोग होत असतो. त्यासच तो श्रेष्ठत्व देतो. तो स्वतःला अंगी व ज्याच्यावर प्रेम करतो त्याला अंग समजतो. पण खरा प्रेमी स्वतःला अंग व प्रेमविषयाला अंगी समजत असतो; म्हणूनच त्याच्या ठिकाणी तत्सुखसुखित्व हे प्रेमाचे खरे लक्षण लागू पडते. 'उज्ज्वल नीलमणि' या ग्रंथामध्ये एक श्लोक आला आहे. 

*स्यान्नः सौख्यं यदपि बलवत् गोष्ठमाप्ते मुकुंदे । *
*यद्यल्पापि क्षतिरुदयते तस्य मार्गात्कदापि ॥ *
*अप्राप्तेऽस्मिन्यदपि नगरादार्तिरुग्रा भवेन्नः । *
*सौख्यं तस्य स्फुरति हृदिचेत्तत्र वासं करोतु ॥ *
======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

Monday, 3 September 2018

वज्रगोपिकानाम :-१०

*वज्रगोपिकानाम*
-------------------------
     *भाग :-  १०..*

'श्रीकृष्णानी गोपिकांना अध्यात्म शास्त्राचा उपदेश केला, त्या योगाने गोपिकांचा जीवकोश (जीवदशा) नष्ट होऊन त्यांना श्रीकृष्णस्वरूपाची प्राप्ती झाली.' मात्र भक्ताना आत्मैक्यबोध झाला तरी यावदायुष्य प्रेमसुखाचा आस्वाद घेतच राहतात.

कोणी म्हणेल, महात्म्यज्ञान नसले म्हणून काय बिघडले, ज्या वेळी श्रीकृष्ण या अवनीतलावर मूर्तरूपाने (द्वापारयुगात) वास्तव्य करीत होता, तेव्हा तोच भगवान पूर्ण ब्रह्म होताच. त्याच्याशी काम, क्रोध, भय, स्नेह, द्वेष, सौहृद, ऐक्य कोणत्याही स्वरूपाने संबंध आला तरी त्याचा उद्धार होतो असे श्रीशुकाचार्यच म्हणतात.

*कामंक्रोधं भयं स्नेहं ऐक्यं सौहृदमेव च ।*
*नित्यं हरौ विदधतो यान्ति तन्मयतां हि ते ॥*
               भा. १० - २९ - १५
*तमेव परमात्मानं जारंबुद्धयापि संगताः ।*
*जहुर्गुणमयं देहं सद्यः प्रक्षीणबन्धना ॥*
               भा. १० - २९ - ११
'त्या परमात्म्याशी जारबुद्धीने जरी त्या रत झाल्या तरी त्यांची सर्व बंधने सुटून त्यांनी गुणमय देहाचा त्याग केला म्हणजे त्या मुक्त झाल्या.' देवाशी भिन्न भिन्न भावनेने ज्यांचा संबंध आला ते ते मुक्त झाले. त्यांची नावेही सांगितली आहेत. नारद युधिष्ठिर संवादात नारद म्हणतात -
गोण्यः कामाद्भयात्कंसो द्वेषाच्चैद्यादयो नृपाः ।
संबंधाद्वष्णय स्नेहाद्यूयं भक्त्या वयं विभो ॥ भा. ७ - १ - ३०
गोपिका कामभावनेने, भयाने कंस, द्वेषाने शिशुपालादी राजे, संबंधाने यादव, स्नेहाने तुम्ही पांडव व भक्तीने आम्ही मुक्त झालो.
हीच गोष्ट श्रीकृष्णमुखाने श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीही सांगितली आहे.
हेचि कवणें एकें मिसें । चित्त माझ्या ठायीं प्रवेशें ।
येतुलें हो मग आपैसे । मीचि होणे असे ॥
अगा वरी फोडावयालागी ।
लोहो मिळो का परिसाचे आंगी ।
कां जे मिळतिये प्रसंगी । सोनेचि होईल ॥
पाहे पा वालभाचेनि व्याजें । तिया व्रजांगनांची निजे ।
मज मीनलिया काय माझें । स्वरूप नव्हतीचि ॥
ना तरी भयाचेनिमिसें । मातें न पाविजेचि काय कंसे ।
की अखंड वैरवशे । चैद्यादिकी ॥
अगा सोयरेपणेचि पाडवा । माझें सायुज्य यादवा ।
की 'ममत्वे' वसुदेवा । दिकां सकळा ॥
नारदाध्रुवा अक्रूरा । शुका हन सनत्कुमारा ।
इया भक्ती मी धनुर्धरा । प्राप्यु जैसा ॥
तैसाचि गोपिकांशी कामे । तया कंसा भयसंभ्रमे ।
येरा घातकेया मनोधर्मे । शिशुपालादिका ॥
अगा मी येकु लाणीचे खागे । मग येवो ये भलतेनि मार्गे ।
भक्ती का विषये विरागें । अथवा वैरे ॥ ज्ञा. ९. ४६३ - ७०

एकादश स्कंधातही श्रीकृष्ण उद्धवास सांगतात -
अंधारी गूळ खाता । कडू न लगे तो सर्वथा ।
तेवी नेणोनि माझी सच्छिदानंदता ।
माते सविता मी झाल्या ॥
विष म्हणोनि अमृत घेतां । मरण जाऊनि ये अमरता ।
तेवी जारबुद्धी मातें भजतां । माझी सायुज्यता पावल्या ॥ - एकनाथी भागवत, १२. २०५ - ६

वरील शंकेचा आशय हा की, महात्म्यज्ञान नसले तरी केवल कामसंबंधाने भक्ती केली तरी उद्धार होतो हे खरे आहे; पण नारदांनी जे प्रेमाचे लक्षण सांगितले आहे व पुढेही ज्या प्रेमाचा विचार केला जाणार आहे त्या दृष्टीने पाहिल्यास महात्म्यज्ञान असणे आवश्यक ठरते. केवल कामसंबंधाने निरतिशय प्रेम प्रकर्ष संभवणार नाही, जसे भय, द्वेष इत्यादीसंबंधाने केवळ कंस शिशुपालादिकांना मोक्ष मिळाला तसा कामसंबंधाने मोक्ष मिळेल, पण प्रेमयोगात मोक्षनिरपेक्षता असते. भगवत्प्रेम प्रकर्ष हाच पुरुषार्थ मानला जातो. पुढे भक्ती हीच शांतिरूप व परमानंदरूप आहे असे नारदांनी म्हटले आहे. श्रीमधुसूदन सरस्वती फार मोठे अद्वैततत्वज्ञानी तसेच भक्तिशास्त्रकार होऊन गेले. त्यांचा भक्तिरसायन नावाचा भक्तिशास्त्रावर अपूर्व विवेचन करणारा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यात भक्तीच्या अकरा भूमिका त्यांनी सांगितल्या आहेत. त्यात *स्वरूपाधिगति* म्हणजे परमात्मस्वरूपाचे यथार्थज्ञान ही सहावी भूमिका मानली आहे व ' *प्रेमपराकाष्ठा* ' ही शेवटची अकरावी भूमिका मानली आहे. गोपिका या अंतिम भूमिकेवर आरूढ झालेल्या होत्या. अतएव त्यांना स्वरूपज्ञान यथार्थरूपाने झाले होते हे वरील विस्तृत विवेचनावरून समजण्यासारखे आहे..
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन :- १०

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
----------------------------------
          *भाग : १०..*

पुलह महर्षीपासून सुस्वधा नामक द्विजश्रेष्ठ उत्पन्न झाले. हे कर्दम प्रजापतीचे पितर होत. हे स्वर्गातील कामगसंज्ञक लोकांत रहातात; व आकाशांत यांना अनियंत्रित गति असल्यामुळें हे पक्षीरूपानें संचार करितात. हे मार्कंडेया, यांची उपासना फलार्थी वैश्यगण करितात. यांच्या मानसकन्येचें नांव विरजा हें आहे. हे ऋषे, ही ययातीची आई व नहुषाची पट्टराणी. याप्रमाणे मीं तुला हे तीन पितृगण सांगितले; आतां हा चौथा समजून घे. या चौथ्या गणांतील पितरांना ' *सोमप* ' अशी संज्ञा आहे. हे कवीची कन्या जी स्वधा तिचे ठिकाणी हिरण्यगर्भ जो अग्नि त्यापासून उत्पन्न झाले. शूद्र लोक यांची पूजा करितात. स्वर्गातील ज्या लोकांत ते रहातात त्यांस ' *मानस* ' अशी संज्ञा आहे. नर्मदा नांवाची जी सुप्रसिद्ध श्रेष्ठ नदी ती यांची मानसकन्या. ही नदी उगमापुढें कांहीं अंतरापर्यंत दक्षिणमार्गानें वाहात जात असून आपल्या स्पर्शाने प्राणिमात्राला पावन करिते. ही पुरुकुच्छाची स्त्री व त्रसद्दस्यूची आई. याप्रमाणे ही सात पितरांची हकीकत झाली. हें मार्कंडेया, युगायुगाचे ठायीं जेव्हां जेव्हां धर्माचा र्‍हास होतो त्या त्या वेळीं प्रजापालक जो मनु तो या सप्तपितरांची ज्यात विशेष पूजा केली जाते अशा प्रकारची श्राद्धे लोकांत प्रवृत्त करतो. हे द्विजश्रेष्ठा, या सातही पितृगणांत यम हा प्रथम उत्पन्न झाला असल्यामुळें वेदांत त्याला पितृपति अशीच संज्ञा दिली आहे, व त्याचा हा अग्रमान ध्यानांत आणून त्यालाच *"श्राद्धदेव"* असेही म्हणतात.

हे मार्कंडेया, आता श्राद्धाचे विधान सांगतो तें ऐक. सर्व पितृश्राद्धांत पात्रे रुप्याची किंवा निदान रुप्याने मढविलेलीं तरी असावीत. कारण रुपे हें पितरांना फार प्रिय आहे. असल्या रजत पात्रांत वाढलेले श्राद्धान्न स्वधाशब्दपूर्वक अर्पण केल्याने पितर फार संतुष्ट होतात.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन :- ९

*श्राध्ददेव व पितृवर्णन*
--------------------------------
      *भाग :- ९..*

बर्हिषद नांवाने स्वर्गात प्रसिद्ध असलेले पितृगण स्वर्गाच्या ज्या रमणीय प्रदेशांत राहातात त्या प्रदेशाला वैभ्राज असें नांव आहे. हे पितृगणही अमित तेजस्वी आहेत. हे मोठे तपस्वी, महाभाग व महात्मे पुलस्त्य नामक प्रजापतीचे पुत्र आहेत. सर्व देव, यक्ष, गंधर्व, राक्षस, नाग, सर्प व सुपर्ण हेही यांचा फार मान राखतात. यांची जी मानसकन्या ती पीवरी नांवानें विख्यात आहे. ती स्वतः योगनिष्ठ असून योग्याची स्त्री व योग्याचीच माता होणार आहे. ही गोष्ट येत्या द्वापरयुगांत होणार. हे धर्मनिष्ठा, त्या काळीं पराशराच्या कुलांत शुक नांवाचा महातपस्वी योगी उत्पन्न होईल. तो व्यासमुनीपासून अरणीचे ठिकाणी उत्पन्न होईल, व तो तेजाने निर्धूम अग्नीप्रमाणे जाज्वल्य असेल. हा शुकमुनि वर सांगितलेली पीवरी नांवाची जी बर्हिषद नांवाची कन्या तिचे ठिकाणी मोठे बलिष्ठ व योगाचे केवळ आचार्य असे चार पुत्र व एक कन्या निर्माण करील. या पुत्रांची नावें - कृष्ण, गौर, प्रभु व शंभू ही असतील व कन्येचें नांव कृत्वी. ही अणुह राजाची राणी होऊन ब्रह्मदत्ताची जननी होईल. याप्रमाणे असले योगनिष्ठ व महाव्रत पुत्र निर्माण करून व आपला पिता जो व्यास यापासून धर्माची विविध स्वरूपे ऐकून घेऊन तो धर्मनिष्ठ महायोगी शुक जेथून पुनरावृत्ति नाहीं अशा पदाला जाईल. हें पद म्हणजे दुःखशोकरहित अव्यय व शाश्वत असें ब्रह्मच होय.

आतां जे अमूर्त पितर सांगितले त्यांपैकीं सुकालसंज्ञक पितर वसिष्ठ प्रजापतीपासून उत्पन्न झाले असून ते मोठे तेजस्वी व मूर्तिमान धर्म असे आहेत. ते ज्योतींनी भासमान असणार्‍या स्वर्गाच्या भागांत आवडीने राहातात. हा भाग सर्व इच्छित वस्तूंनी सुसंपन्न असा आहे. यांचेपासूनच वृष्णि व अंधक वंशासंबंधी कथेला उद्भव होतो. हेही पितर महामान्य असून ब्राह्मण त्यांचें तर्पण करीत असतात. यांची जी मानसकन्या आहे ती गौ या नांवानें स्वर्गात प्रसिद्ध आहे. हे मार्कंडेया, ही तुझ्याच वंशांत दिली जाऊन शुकाची प्रिय राणी होईल. या गौ नामक कन्येलाच एकश्रृंगा असें वहिवाटींत म्हणतात. ही गौ साध्यनामक जे देवगण त्यांचें भूषणस्थान आहे.

सूर्यमंडलांत मरीचिगर्भ नांवाचे लोक आहेत, तेथें अंगिरसाचे पुत्र (जे हविष्मंत नांवाचे पितर) ते राहतात. यांना साध्यनामक देवांनी पूर्वी वाढविले, अशी कथा आहे. ज्या क्षत्रियांना स्वर्गादिक फलाची इच्छा असेल ते या पितरांचे पूजन करितात. या पितरांची यशोदा नामक कन्या विश्रुत आहे. ही विश्वमहताची स्त्री, वृद्धशर्म्याची सून व राजर्षि महात्मा दिलीप याची आई. हा दिलीप मोठाच कीर्तिशाली झाला. हे मार्कंडेया, त्यानें देवांच्या युगांत एक सुप्रसिद्ध असा अश्वमेध नांवाचा महायज्ञ केला. त्या यज्ञांत शांडिल्यनामक सुप्रसिद्ध वंशांत जन्म घेणारा अग्नि प्रकट झाला. त्या वेळीं यज्ञार्थ तेथें आलेल्या अनेक महर्षीनी दिलीपाचें तें सामर्थ्य पाहून प्रेमाचे भरांत अनेक गाथा गाइल्या. त्यांचा सारांश हा कीं, जे कोणी एकाग्रचित्ताने सत्यनिष्ठ व महोदार अशा दिलीपराजाचे यज्ञसमयीं अवलोकन करितील त्या प्रेक्षकांनाही स्वर्ग प्राप्त होईल.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

वज्रगोपिकानाम :- ९

*वज्रगोपिकानाम*
---------------------------
    *भाग :- ९..*

संस्कृत भाषेत अपवाद शब्दाचा प्रयोग दोन अर्थात केला जातो असे व्याकरणामध्ये सामान्य विधि (उत्सर्ग) चा विशेष विधि द्वारा बाध वा संकोच होतो तेव्हा त्या विशेष नियमाला सामान्य नियमाचा अपवाद असे म्हटले जाते. पूर्व मीमांसा धर्मशास्त्रामध्येही अपवाद शब्दाचा याच अर्थामध्ये प्रयोग होत असतो असे वेदामध्ये 'मा हिंस्यात सर्वाभूतानि' (कोणाही भूताची हिंसा करू नये.) हा सामान्य नियम आहे, पण काही यज्ञात विधीने पशुहिंसा सांगितली आहे, तो तेवढ्यापुरता अपवाद (म्हणजे सामान्य नियमाचा बाध) समजला जातो. साहित्यशास्त्रात अपवाद शब्द दुसर्‍याच अर्थाने योजिला जातो. असे परापवाद, मिथ्यापवाद इत्यादी येथे अपवाद शब्द कलंक या अर्थाने योजिला आहे. एक कथा आहे - एकदा भाद्रपद शुद्ध चतुर्थी तिथी होती, त्या दिवशी सायंकाळी पूजापात्रात दूर्वा, पुष्पे, अक्षता, चंदन इत्यादी पूजासाहित्य घेऊन चंद्रावली नामक गोपी चंद्राला अर्घ्य देण्याकरिता निघाली, रस्त्यात अकस्मात नारदमहर्षी भेटले. त्यांनी विचारले की, "अग तू आज हे काय करीत आहेस ? तुला वेड तर लागले नाही ? आज चतुर्थी आहे, आज चंद्रदर्शन निषिद्ध आहे." चंद्रावली म्हणाली, महाराज 'आज चंद्रदर्शन केल्याने काय होते ? नारद म्हणाले, "निष्कारण कलंक लागतो - आळ येतो." चंद्रावली म्हणाली, "तेच तर मला पाहिजे आहे. माझ्या अन्य सख्यांकडे श्रीकृष्ण पाहतात, हसतात व बोलतात. त्यांच्या घरी जातात, पण या जगात मीच एकटी अशी भाग्यहीन कलंकिता आहे की माझ्याकडे ते पाहतही नाहीत. मी अशी अपेक्षा करते की, सत्य भाग्यात नाही, तर खोटा आळ तरी माझ्यावर यावा की श्रीकृष्ण भगवान माझ्याकडे पाहतात, बोलतात, माझा त्यांच्यांशी सबंध आहे. असा खोटा आळ आला तरी त्यात माझा गौरवच आहे !
*मिथ्यापवादवचसाप्यभिमानसिद्धिः । *
असो. येथे सूत्रात जो अपवाद शब्द आहे तो व्याकरण व धर्मशास्त्रातील अर्थाने नसून व्यावहारिक कलंक (दोष) या अर्थाने घ्यावा. भक्ताच्या जीवनात प्रभूंच्या महात्म्यज्ञानास विसरणे हा कलंक आहे, पण असा कलंक गोपिकांच्या जीवनात मुळीच नाही, तर त्यांना पूर्ण महात्म्यज्ञान होते हे वरील विवेचनावरून सिद्ध होते. कित्येक वेळी गोकुळातील गोप-गोपी, नंद-यशोदा याच्या व्यवहारात त्यांना महात्म्यज्ञानाची विस्मृती झाली होती की काय असा भास होतो; पण तो भासच आहे, ती विस्मृती भगवानच मुद्दाम घडवून आणीत होता. असे जर न होईल तर दासबंधनादि लीलाच संभवल्या नसत्या. पण एवढ्याने महात्म्यज्ञानाचा अभाव मानता येत नाही. गोपिका वियोगावस्थेत जे गीत गायल्या त्यात पदोपदी महात्म्य ज्ञानाचा प्रत्यय येतो.

माझ्या अनन्य भक्तांना मी अज्ञानी ठेवीत नाही, मीच त्यांना बुद्धियोग देतो व त्यांच्या हृदयातील अज्ञानांधकार ज्ञान-दीपाने दूर करतो असे श्रीकृष्णांनी अर्जुनास गीतेच्या दहाव्या अध्यायात स्पष्ट सांगितले आहे.

श्रीमद्‌भागवत दशमस्कंध अध्याय ब्याऐंशीमध्ये श्रीकृष्णानी स्वतः गोपिकांना अध्यात्मज्ञान सांगितले.
*अध्यात्मशिक्षया गोप्य एवं कृष्णेन शिक्षिता ॥*
*तदनुस्मरणध्वस्तजीवकोशास्तमध्यगन*
             भागवत १० - ८२ - ४८
========================
 *श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

वज्रगोपिकानाम :- ८

*वज्रगोपिकानाम*
---------------------------
     *भाग :- ८..*

'माझ्याकरिता तर उत्कृष्ट गोष्ट हीच आहे की या वृंदावनामध्ये एखादे लहान झुडुप अवथा वेल बनून राहावे, म्हणजे या वृंदावनातील गोपिकांची चरणधूली माझ्यावर अखंड पडत राहील, या चरणधूलीत सुस्नात होऊन मी धन्य होईन, ज्याचा त्याग फार कठीण आहे, मर्व स्वजनांचा, लोक, वेद व आर्यमर्यादेचा सहज त्याग करून या गोपांगनांनी भगवान मुकुंदाच्या त्या पदवीची - प्रेममय स्वरूपाची - प्राप्ती करून घेतली आहे की ज्या स्थानाचा श्रुति अनादिकालापासून शोध घेत आहेत, पण त्यांना ते सापडले नाही.' शेवटी तर उद्धवाने त्या गोपिकांच्या पदरजासच नमन केले आहे.

*वन्दे नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुमभीक्ष्णशः ॥*
*यासां हरिकथोद्‍गीतं पुनाति भुवनत्रयम् ॥*
           भागवत १० - ४७ - ६३

'नन्दाच्या व्रजामध्ये वास्तव्य करणार्‍या व्रजस्त्रियांच्या चरणरजांना मी वारंवार नमस्कार करतो, या गोपिकांनी भगवंताच्या लीलाकथांचे जे गायन केले आहे ते तिन्ही लोकांना पवित्र करीत आहे.'

पूर्ण ब्रह्मस्वरूप स्थितीस प्राप्त झालेले श्रीशुकाचार्यही या गोपिकांच्या भाग्याचे वर्णन करतात -
*नेमं विरिञ्चो न भवो न श्रीरप्यङ्गसंश्रया । *
*प्रसादं लेभिरे गोपी यत्तत्प्राप विमुक्तिदात् ॥*
             भागवत. १० - ९ - २०

'जो प्रसाद यशोदादिक गोपिकांना मिळाला तो ब्रह्मदेव, श्रीशंकर व अर्धांगिनी लक्ष्मीलाही प्राप्त झाला नाही.' गोपिकांच्या श्रेष्ठत्वाची परिसीमा श्रीकृष्णानी रासलीला प्रसंगी गोपिकांशी बोलताना जी भाषा वापरली आहे त्यावरून पूर्णतया कळून येते.

*न पारयेऽहं निरवंद्यसंयुजां स्वसाधुकृत्यं निबुधायुषासि वः । *
*या माभजन्दुर्जरगेंहश्रृंखलाः संवृश्‍च्य तद्व प्रतियातु साधुना ॥*
        भागवत १० - ३२ - २२

श्रीकृष्ण भगवान गोपिकांना म्हणतात, तुम्ही माझ्याकरता गृह व गृहस्थपणाच्या अभिमानाच्या सर्व अभेद्य बेडया तोडून टाकल्या आहेत. वास्तविक मोठमोठे योगी-संन्यासीही त्या तोडू शकत नाहीत. माझ्याशी तुमचा हा आत्मिक संयोग सर्वस्वी निर्मल व निर्दोष आहे, मी जरी अमर अशा शरीराने अनंतकाल पावेतो तुमच्या प्रेमाचा, त्यागाचा नि सेवेचा मोबदला देण्याचा प्रयत्न करीन तरी ते शक्य नाही. मी जन्मजन्मांतरीचा तुमचा ऋणी आहे.' यापेक्षा त्या व्रजवासी गोपिकांच्या ठिकाणी असलेल्या परमात्मविषयक महात्म्यज्ञानाचे कोण विशेष वर्णन करू शकेल ? म्हणूनच श्रीनारद 'गोपिकांच्या ठिकाणी महात्म्य ज्ञानाची विस्मृती होती असा अपवाद देऊ नये, असा कलंक लावू नये' असे अट्टाहासाने सांगत आहेत.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

वज्रगोपिकानाम :-७

*वज्रगोपिकानाम*
---------------------------
      *भाग :- ७..*

क्षीरसागरनिवासी लक्ष्मीही तुझ्या चरणरजाची इच्छा करते. तुझा अवतार या व्रजात झाल्यापासून ही लक्ष्मी येथे कायमची वास्तव्य करून आहे. तू या व्रजातील सर्वांचेच भय दूर करीत आहेस, तुझ्या सौंदर्याने त्रैलोक्याला शोभा प्राप्त होत असते. तू केवल गोपिका (यशोदा) नंदन नव्हेस, तर अखिल प्राणिमात्रांचा अंतरात्मा साक्षी आहेस. जे तुला अनन्यशरण होतात त्यांना तू सर्व पातकांपासून मुक्त करतोस.

ब्रह्मदेवाने या विश्वाच्या रक्षणाकरिता तुझी प्रार्थना केली होती, त्या प्रार्थनेवरून तू हा अवतार धारण केला आहेस, हे देवाधिदेवा, अनेक भक्त या दुःखमय संसारापासून मुक्त होण्याकरिता तुझाच आश्रय घेतात. आणखीही गोपी असे वर्णन करतात की, हे श्रीकृष्णा ! तुझ्या लीलाकथाही अमृतस्वरूप आहेत. विरहाने तप्त झालेल्या लोकांना शांत करणार्‍या आहेत. मोठमोठ्या ज्ञानी पुरुषांनी त्यांचे गायन केले आहे. त्यांच्या महात्म्याचे वर्णन केले आहे. त्या कथा सर्व पाप तर नष्ट करतातच, त्याबरोबर परम मंगल कल्याणाचे दानही करतात, जे तुमच्या या लीलाकथांचे गायन करतात. तेच या भूलोकात मोठे दान करणारे असे म्हणविले जातात. त्यांच्याच द्वारा जगावर सर्वांपेक्षा अधिक उपकार होतात. तुमच्या कथेचे जर हे माहात्म्य आहे तर प्रत्यक्ष संगसौख्याचे वर्णन कोण करू शकेल ?

श्रीमद्‌भागवत दशमस्कंध, अध्याय एकोणतीस ते तेहतीसमध्ये जे रासलीलेचे वर्णन आहे त्यावरून व्रजवासी गोपिकांना महात्म्यज्ञान किती पूर्ण होते हे सहज सिद्ध होते.

गोपिकांच्या महात्म्यज्ञानाचे श्रीएकनाथमहाराज, श्रीकृष्ण-उद्धव संवाद प्रसंगी वर्णन करीत आहेत -
*नवरसांचा रसिक । नवरंगडा मीचि एक । *
*यालागी माझ्या कामी कामुक । भावो निष्टंक गोपिकांचा ॥ *
*जीवा आतुलियें खुणें । मीचि एक निववू जाणे । *
*ऐसें जाणोनि मज कारणें । जीवें प्राणें विनटल्या ॥ *
*अंगी प्रत्यंगी मीचि भोक्ता । सबाह्य सर्वांगें मीचि निवविता ।*
*ऐसें जाणोनि तत्त्वतां ।* *कामासक्तता मजलागी ॥ *
*ऐसा सर्वकामदायक । पुरुषांमाजी मीचि एक । **
*हा गोपिकी जाणोनि विवेक । भाव निष्टंक धरियला ॥*
 एकनाथी भागवत, अ. १२. १९७ - २००

श्रीतुकाराममहाराज ही म्हणतात -
*लोका गोकुळीच्या झालें ब्रह्मज्ञान । केलिया वांचून जपतपें ॥ *
*जपतपे काय करावी साधनें । जंव नारायणें कृपा केली ॥ *
*सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणीक दुसरा नाही नाही ॥*
व्रजवासी गोपिकांना सामान्य समजणे हे घोर अज्ञान आहे. स्वतः चतुर्मुख ब्रह्मदेव श्रीकृष्णापुढे त्यांचे वर्णन करीत आहे -
*अहोऽतिधन्या व्रजगोरमण्यः स्तन्यामृतं पीतमतीव ते मुदा ॥ *
*यासां विभो वत्सतरात्मजात्मना यतृप्तयेऽद्यापि न चालमध्वराः ॥* -
       भागवत १० - १४ - ३१

'मोठमोठे यज्ञ तुमची तृप्ती करू शकत नाहीत, परंतु या व्रजातील गायी व गोपिकांची धन्य आहे, ज्यांची वासरे व बालके बनून तुम्ही मोठ्या आनंदाने त्यांचे दुग्ध प्राशन केले आहे.'

भक्तवर्य उद्धव तर आपली आत्यंतिक अभिलाषा प्रकट करून म्हणतो -
आसामहोचरणरेणुजुषामहं स्यां वृन्दावने किमपि गुल्मलतौषधीनाम ।
या दुस्त्यजं स्वजनमार्यपथं च हित्वा भेजुर्मुकुन्दषदवीं श्रुतिभिर्विमृग्याम ॥ - भागवत १० - ४७ - ६१
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

कथा श्रीकृष्णजन्माची

*कथा श्रीकृष्णजन्माची*
-----------------------------------

बलवान कंसाने जरासंधाच्या साहाय्याने प्रलंबासुर, बकासुर, चाणूर, तृणावर्त, अघासुर, मुष्टिक, अरिष्टासुर, द्विविद, पूतना, केशी, धेनुक बाणासुर, भौमासुर इत्यादि पुष्कळसे दैत्य व राजे यांना हाताशी धरून तो यादवांचा संहार करू लागला.

तेव्हा ते भयभीत होऊन कुरू, पंचाल, केकय, शाल्व, विदर्भ, निषध, विदेह आणि कौशल या देशांत जाऊन राहिले. काही नातलग वरवर त्याच्या मनासारखे वागून त्याची सेवा करीत राहिले. कंसाने जेव्हा एक-एक करून देवकीची सहा मुले मारली, तेव्हा देवकीच्या सातव्या गर्भात भगवंतांचे अंशस्वरूप श्रीशेष, ज्यांना *अनंत* असेही म्हणतात, ते आले. त्यामुळे देवकीला स्वाभाविकच आनंद झाला, पण कंस कदाचित यालाही मारील, या भितीने दुःखही झाले.

मलाच आपले सर्वस्व मानणारे यादव कंसामुळे त्रस्त झाले आहेत असे पाहून विश्वात्मा भगवंतांनी योगमायेला आज्ञा केली. "देवी ! कल्याणी ! तू गोकुळात जा. गवळी आणि गायी यांनी तो प्रदेश सुशोभित झाला आहे. तेथे नंदांच्या गोकुळात वसुदेवांची पत्‍नी रोहिणी राहात आहे. त्यांच्या इतर पत्‍न्याही कंसाच्या भितीने गुप्त जागी रहात आहेत. सध्या माझा शेष नावाचा अंश देवकीच्या उदरात गर्भरूपाने राहिला आहे. त्याला तेथून काढून तू रोहिणीच्या पोटात नेऊन ठेव. हे कल्याणी ! नंतर मी माझ्या सर्व शक्तींसह देवकीचा पुत्र होईन आणि तू नंदपत्‍नी यशोदेच्या ठिकाणी जन्म घे. सर्व वर देण्यास समर्थ असणार्‍या तुला माणसे आपल्या सर्व कामना पूर्ण करणारी समजून धूप, दीप, नैवेद्य इत्यादि अर्पण करून तुझी पूजा करतील. लोक पृथ्वीवर पुष्कळ ठिकाणी तुझी स्थापना करतील आणि तुला दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी, कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्या, माया, नारायणी, ईशानी, शारदा, अंबिका इत्यादि अनेक नावे ठेवतील. देवकीच्या गर्भातून काढून घेतल्यामुळे शेषाला लोक जगात ’ *संकर्षण* ’ म्हणतील, तो लोकरंजन करणार असल्यामुळे त्याला राम म्हणतील, आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे ’बल’ सुद्धा म्हणतील. (६-१३)

जेव्हा भगवंतांनी अशी आज्ञा केली, तेव्हा योगमायेने "जशी आपली आज्ञा’ असे म्हणून त्यांचे म्हणणे शिरोधार्य मानले आणि त्यांना प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर आली आणि भगवंतांनी जसे सांगितले तसे तिने केले. जेव्हा योगमायेने देवकीचा गर्भ नेऊन रोहिणीच्या उदरात ठेवला, तेव्हा तेथील नागरीक दुःखी अंतःकरणाने देवकीचा गर्भपात झाला, असे म्हणू लागले.

भक्तांना अभय देणारे विश्वरूप भगवान वसुदेवांच्या मनामध्ये आपल्या सर्व कलांसह प्रविष्ट झाले. भगवंतांचे तेज धारण केल्यामुळे वसुदेव सूर्याप्रमाणे तेजस्वी झाले. त्यांना पाहून लोकांचे डोळे दिपून जात. त्यांना कोणीही जिंकू शकत नव्हते. जगाचे मंगल करणार्‍या, सर्वात्मक व आत्मरूप भगवंतांच्या अंशाला वसुदेवांनी मनाने प्रदान केल्यानंतर जशी पूर्व दिशा चंद्राला धारण करते, त्याचप्रमाणे देवकीने विशुद्ध मनानेच त्यांना धारण केले. (येथे भौतिक शरीराचा कोणताही संबंध नव्हता.) घड्यामध्ये बंद केलेल्या दिव्याचा प्रकाश किंवा आपली विद्या दुसर्‍याला न देणार्‍या गर्विष्ठ ज्ञान्याच्या श्रेष्ठ विद्येचा प्रकाश जसा सगळीकडे पसरत नाही, त्याचप्रमाणे कंसाच्या कारागृहात बंद असलेल्या देवकीचासुद्धा प्रभाव जगन्निवास तिच्यामध्ये राहात असूनही लोकांना जाणवला नाही. (हा आनंद बाहेर प्रगट न करता देवकी अंतर्मनातच तो अनुभवत होती.) देवकीच्या अंतरंगात भगवंत विराजमान झाले होते. तिच्या देहर्‍यावर पवित्र हास्य होते; आणि तिच्या शरीराच्या कांतीने कारागृह झगमगत होते. कंसाने जेव्हा तिला पाहिले, तेव्हा तो मनात म्हणू लागला की, "यावेळी माझे प्राण घेणारे विष्णूच हिच्यात राहिले आहेत. कारण यापूर्वी कधीही देवकी अशी दिसत नव्हती. आता या बाबतील मला लवकरात लवकर काय केले पाहिजे बरे ? देवकीला मारणे तर उचित होणार नाही. कारण स्वार्थासाठी वीरपुरुष आपलापराक्रम कलंकित करीत नाही. शिवाय ही स्त्री असून, माझी बहीण आहे. तसेच गर्भवती आहे. हिला मारल्याने माझी लक्ष्मी आणि आयुष्य तत्काळ नष्ट होऊन जाईल आणि माझी कायमची अपकीर्ती होईल. जो अत्यंत क्रूरपणे वागतो, तो माणूस जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला शिव्याशाप देतात, इतकेच नव्हे तर तो देहाभिमान्यांसाठी योग्य अशा नरकात निश्चितच जातो." कंस जरी देवकीला मारू शकत होता, तरीसुद्धा तो स्वतःच या अत्यंत क्रूर विचारापासून परावृत्त झाला. आता भगवंतांच्याबद्दल दृढ वैरभाव बाळगणारा तो त्यांच्या जन्माची वाट पाहू लागला. (भगवत्‌ सान्निध्यामुळेच त्याचे दुष्ट विचार मावळले.) तो उठता, बसता, खाता-पिता, जागेपणी-झोपेत आणि चालता-फिरताना नेहमी श्रीकृष्णांचाच विचार करीत असे. त्यामुळे त्याला सारे जगच श्रीकृष्णमय दिसु लागले
========================🙏🏻
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

श्राध्ददेव व पितृवर्णन:-२४

*श्राध्ददेव व पितृवर्णन* ---------------------------------     श्राध्दमाहात्म्य :-६..         *ब्रह्मदत्ताचा वृतांत* मार्कंडेय सांगता...